Sunday, October 31, 2021

पातळ_पोह्यांचा_चिवडा_दिवाळी_फराळ

पातळ पोह्यांचा झट-के-पट चिवडा ❤️🌶️🍋🌿

दिवाळीच्या फराळात हा हमखास घरोघरी बनतो. आणि कधीही निवांत वेळेत खायलाही मज्जा येते आणि हो चिवडा खाता खाताच चिवड्याची पाककृती लिहायला पण गंमत वाट्टेय... 😛

लाॅकडाऊनमुळे थोडा निवांतपणा होता... भुक जरा जास्तच लागतेय जणू... संध्याकाळी चहानंतर किंवा चहासोबत हलकेफुलके काहीतरी खायला म्हणून आईने पातळ पोह्यांचा चिवडा आत्तापर्यंत दोनदा-तिनदा केला. मस्त लागतो चवीला आणि छोट्या-छोट्या भुकेला अगदी योग्य! ❤️😍

अगदी घराघरात सगळ्यांनाच येतो हा बनवता... म्हणून आज सहजच प्रमाणाविना लिहीतेय...अगदी अंदाजे... कारण आहेच पाककृती अगदी साधी...अंदाजाने कुणीही अगदी Perfect बनवू शकेल अशी... 🙂 लिहीतेय म्हणजे कोणालातरी ही पोस्ट बघून चिवडा करायचे आठवेल आणि पोटभरीचा अजून एक झटपट होणारा पदार्थ झाल्याने थोड्या काळासाठी का होईना घरातल्यांच्या 'काहीतरी आहे का खायला?!' ला वाटी भरून चमचमीत उत्तर द्यायला मिळेल. 😛

तर चिवडा बनवण्यासाठी, पातळ पोहे घ्या जरा निवडून आणि गरम करत ठेवलेल्या मोठ्या कढईत अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजा! बाजूला काढून ठेवा. (हे पातळ पोहे एखादा दिवस कडक उन्हात ठेवले तरी चालेल.)
कढईत तेल घालून त्यात राई, जिरे, भरपुर कढीपत्ता, सुक्या खोब-याचे तुकडे, शेंगदाणे, डाळे, हिरव्या मिरच्या आणि काळ्या मनूका न करपवता खरपुस भाजून घ्या. काजू असतील तर ते पण टाका.

त्यात हळद पावडर, मीठ आणि साखर टाकून परता. आवडत असल्यास थोडासा लिंबाचा रस ओता. आणि मग आपण आधीच भाजून ठेवलेले पोहे ह्यामधे ओता. आणि वरखाली करत सर्व पोह्यांना इतर जिन्नस व्यवस्थित लागेल असे परता. चिवड्याला हलका शेक गॅसवर द्या.

आणि तुमचा पातळ पोह्यांचा हलकाफुलका पण चवदार चिवडा तय्यार! 😍

चिवडा फॅनखाली किंवा हवेवर ठेऊ नये. जरा थंड झाला‌ की पिशवीमध्ये भरून हवाबंद करून डब्यात ठेवा.

मस्त चहासोबत आस्वाद घ्या!

#चिवडा #jhatpat_recipes #chivada #pohe_chivada #food #marathi_food







No comments:

Post a Comment