Wednesday, October 13, 2021

श्रीखंड_पुरी_फाफडा_जलेबी_आणि_दसरा

 #श्रीखंड_पुरी_फाफडा_जलेबी_आणि_दसरा

🥣🥨🥨🥖❤️🌿 #नैवेद्य #विजयादशमी

'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा....!!!' अशा या दसरा (विजयादशमी ) दिवसाला हिंदू संस्कृतीत खूप महत्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दसरा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो.  

या दिवशी महिषासुरमर्दिनी देवीने राक्षसाचा वध केला आणि प्रभु श्री रामांनी रावणाचा! तशाच पद्धतीने देशावरच नाही तर जगावर ओढावलेल्या कोरोनारूपी संकटावर, योग्य ती खबरदारी व काळजी घेऊन लवकरच आपण सर्व मात करू!

गेल्यावर्षी प्रमाणेच ह्या वर्षीचा दसरादेखील Covid 19 च्या दहशतीच्या सावटामुळे निराळा आहे, सामुहिक कार्यक्रमावरील मर्यादा, आर्थिक झळ, मंदी, भीतीचे वातावरण ह्या सर्वांमुळे जरा निराशा आहे पण तरीही रंगबिरंगी फुले, पाने तोरणे यांनी बाजार सजले आहेत आणि ते पाहून जरा प्रसन्न वाटत आहे.

दसरा दिवाळीची चाहूल घेऊन‌ हा दिवस येतो. घराघरांना, उद्योगधंद्यांच्या वास्तूला, गाड्या म्हणजेच वाहनांना तोरणे बांधली जातात. याच दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन देखील केले जाते. व्यवसायात किंवा घरामधे वापरत असलेली शस्त्र किंवा उपकरणे‌ यांची पुजा होते. काही वर्षानुवर्षे परंपरेने किंवा पिढीजात चालत आलेली आयुधे देखील त्यानिमित्ताने कपाटातून बाहेर काढून चकचकीत करून पुजली जातात. नवीन व्यवसायांची श्रीगणेशा करून दणक्यात सुरुवात होते. 

विरार पुर्वेच्या बाजारात चक्कर मारली तर अख्खा बाजार तोरणे, तोरणासाठी लागणारी झेंडूची (गोंड्याची) केसरी, पिवळी फुले, आंब्याची पाने, भाताच्या लोंब्या, सोनेरूपी लुटण्यात येणारी आपट्याची पाने यानेच रंगबिरंगी झालेला असतो.  पण एकूणच बाजारात उत्साह वाटला. 

आज विद्या नावाची तरतरीत मुलगी विरारच्या सेंट पीटर स्कुलच्या बाहेरच्या रस्त्याच्या कडेला तोरणे आणि आपट्याची पाने विकताना दिसली. आदिवासी पध्द्तीने बनवलेली फुले, लोंब्या, आंब्याची पाने अन् झेंडूची फुले यांचा सुरेख मेळ तीने घातला होता. विद्यासारख्या अशा कितीतरी महिला उन्हातान्हात बसून फुले तोरणे घेऊन एक-दोन दिवसांत जमेल तसे पैसे अर्थांजनासाठी मिळवणा-या आणि घराचा रहाटगाडा ओढणा-या फुलविक्रेता नवदुर्गांचे कौतूक आणि आभार! No bargaining! फुले तोरणे विकणा-या या महिलांकडे शक्यतो पैशाची घासाघीस नको. 

🙂🌼☘️❤️

आज घरोघरी मस्त गोडधोड बनवले जाते. मस्त गरमागरम पाकातली जलेबी- आणि ओवा टाकून बनवलेला फाफडा दस-यादिवशी आवर्जून नाश्त्याला खाल्ला जातो. प्रसिद्ध अशा जलेबी-फाफडांच्या दुकानासमोर ह्या मोठाल्या Waiting वाल्या रांगा लागलेल्या असतात... दस-याला श्रीखंड-पुरी-बटाटा भाजी हे देखील काही ठरलेले पदार्थ... त्यातही ते चितळेचे आम्रखंड असले म्हणजे उत्तमच! :) 

🥣🥨🥨🥖❤️🌿























असा हा हसरा दसरा संपतो तो दिवाळीचे वेध लावूनच... :) मग झाली का तयारीला, साफसफाई ला सुरूवात? आणि हो अनारसे पीठासाठी आज तांदूळ भिजवत ठेवतात. फराळाची देखील जय्यत तयारी सुरू करायला हवी नाही का एव्हाना... :)


विजयादशमीच्या सा-यांना खुप खुप शुभेच्छा! ❤️


#dasara #festivals_of_India #food_culture

No comments:

Post a Comment