Wednesday, October 13, 2021

सुरेख_बेसन_लाडू_दिवाळी_फराळ

बघता बघता दसरा आला आणि आता दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळीची साफसफाई आणि फराळाची तयारी सुरू झालीदेखील असेल अनेकांकडे. फराळाच्या पाककृतींची मालिका आपण आपल्या दि मसाला बझारच्या Official पानावर आजपासून सुरु करत आहोत.


#सुरेख_बेसन_लाडू_दिवाळी_फराळ #फराळ_प्रकार_१

#DiwaliFaralSeriesTMB ❤️

मराठमोळा खास असा दिवाळी फराळ हा आजकल वर्षभर दुकानांमधे किंवा ऑर्डरने मिळत असला तरी बहुधा घरोघरी निगुतीने दिवाळसणाच्या वेळेसच उत्तम असा बनवला जातो. फराळ बनवणे अत्यंत जिकरीचे काम म्हणून बहुधा अनेक महिला तयार फराळ विकत आणतात. पण घरी बनवलेल्या फराळाची लज्जतच न्यारी... आणि अगदीच खुप कठिण किंवा जमणारच नाही कसे कोणतेही फराळ नसतात. योग्य पध्दती अनुसरल्या, मोठ्यांचे अनुभवाचे बोल आणि शिकवणी अंगिकारल्या कि फराळ सहज जमू शकतो. अर्थात एक दोनदा चुकायला होईल पण पुनश्च नव्याने पुढील वेळी चांगला होणार हा माझा अनुभव आहे. 


फराळाच्या सर्व पाककृती आई रश्मी इंदूलकर कडून घेतल्या आहेत. वैभववाडी जवळच्या आचिर्णे गावातील रावराण्यांच्या घरच्या आईचा स्वयंपाक नेटका आणि सुगरणीसारखा... आईचा अगदी सर्वच फराळ खुप छान होतो. भरपुर खसखस लावून केलेले चविष्ट अनारसे, मऊ खमंग बेसन लाडू आणि कुरकुरीत चकली ही तिची खासियत... :) आईच्या बहुतेक कोकणातील फराळाच्या पाककृती आईने आमच्या कोल्हापूर (मुळच्या रत्नागिरी) आज्जीकडून म्हणजे बाबांच्या आईकडून घेतल्या आहेत. 


फराळ बनवताना आई नेहमी म्हणते कि, खरेच कसे बनवले असतील सर्वप्रथम बनवणा-या सुगरणीने हे पदार्थ... किती वेगवेगळे आकार, काही उकडून तर काही नुसते पीठे मळून बनवायचे प्रकार....चवी देखील त-हेत-हेच्या...गोल गोल लाडू, चकलीच्या साच्यातून वाळलेल्या spiral चकल्या, चौकोनी खुसखुशीत शंकरपाळ्या, खसखस वर थापलेले अनारसे, सारणाच्या करंज्या, देखणी चंपाकळी, गुलाबाच्या फुलासारखे दिसणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे पिठीसाखर भुरभुरलेले चिरोटे अशा कितीतरी मराठमोळ्या महाराष्ट्रातल्या फराळाचे अचंबित करणारे प्रकार कुणालाही भुरळ पाडतात.


तर आईच्या परंपरेने पिढ्यान् पिढ्या जोपासलेल्या महाराष्ट्रातील फराळाच्या पाककृती, तुमच्यासाठी आपल्या फेसबूकवरील पानावर देत आहे. नक्कीच आवडतील अशी अपेक्षा आहे. :)


आज पाहूया बेसन लाडू! 

बेसन लाडू कसा मस्त बेदाणा लावलेला, सोनेरी-गर्द पिवळसर असा, खाताना मऊसुत, मधेच लागणारे सुकामेवा तुकडे... माझाही अगदी आवडीचा लाडूप्रकार...


बेसन लाडू साठी साहित्य:

१. चणाडाळ: १ किलो

२. तूप: ५०० ग्रॅम (आम्ही गोवर्धन किंवा चितळेंचे तूप वापरतो.)

३. साखर: ५००-६०० ग्रॅम

४. वेलची पावडर

५. बदाम, पिस्ता यांचे बारीक केलेले तुकडे

६. बेदाणे

७. थोडासा बारीक रवा


१. एक किलो चणाडाळ चांगली निवडून घ्या. जाड बुडाच्या कढईत रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. करपू देऊ नका. ही डाळ नंतर जरा रवाळ अशी दळून आणा. चक्की सांभाळणा-या माणसाला सांगितले कि तो बरोबर दळतो.

२. एक किलो बेसनडाळीला साधारण ४५० ग्रॅम ते ५०० ग्रॅम साजूक तूप लागते. तूप जास्त झाले तरी लाडू बसतात. आणि कमी झाले कि अगदी कोरडे लागतात. म्हणून आधी फक्त अंदाजे ४५० ग्रॅम तूप गरम करा. 

३. तूप गरम झाले कि त्यात रवाळ बेसनाचे पीठ घाला. आणि रंग छान गर्द पिवळा बदलेतोवर तुपात चांगले भाजून घ्या. जाड बुडाच्या पातेल्यात हे छान खमंग भाजता येते.

आई ह्यात थोडासा बारीक रवा देखील घालते म्हणजे त्यामुळे लाडू खाताना घशाला चिकटत नाही.

४. रवाळ बेसन आणि रवा खमंग भाजून झाले कि मिश्रण गॅसवरून उतरवून थोडे थंड होऊ द्या.

५. मिक्सरमध्ये फिरवून बारीक केलेली पिठीसाखर ह्यात घाला. आम्ही साधारण ५०० ग्रॅम ते ६०० ग्रॅम साखर वापरतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता... बेसन पीठ आणि साखर, हाताने अगदी व्यवस्थित मळून एकजीव करा. 

६. वेलची पावडर व आवडत असल्यास जरासे जायफळ किसून घाला. परत एकदा छान मळून घ्या.

७. बारीक कापलेले पिस्ता, बदामाचे बारीक तुकडे ह्या मिश्रणात टाकून एकदा व्यवस्थित मिसळा.

आता‌ कशाप्रकारे मि‌श्रण तयार झाले कि, लाडू वाळायला घेऊ.

लाडू गोलाकार चांगले वळून घेतानाच एक बेदाणा लाडूवर लावत जा‌. 

छान चवीचे मऊसर बेसन लाडू तयार होतील. आणि सर्वांना नक्कीच आवडतील.


#बेसन_लाडू #लाडू #बेसनलाडू #besan_laadu #faral #diwali #maharashtrian #DiwaliFaralSeriesTMB

#laxmimasaleedwan #kitchen 










spice #kolhapur


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com



No comments:

Post a Comment