Tuesday, October 12, 2021

साखरचौथ निमित्ताने खोबरे- साखरेच्या सारणाचे तळणीचे मोदक

 





#साखरचौथ निमित्ताने खोबरे- साखरेच्या सारणाचे तळणीचे मोदक


आमच्याकडे वर्षभर संकष्टीला उकडीच्या मोदकांची चलती असते. पण साखरचौथ ला मात्र तळणीचे मोदक! वरून पुरेशा कुरकुरीत आणि आतून मधूर,लुशलुशीत असलेले, साखरेचे ओल्या नारळाचे तळणीचे मोदक अंगारकी/ साखरचौथ चतुर्थीच्या निमित्ताने आई रश्मी इंदूलकरच्या करते त्या पध्द्तीने!


 आई कोकणातील आचिर्णे गावातील. ऊस, मध, तांदूळ, फळभाज्या, मोठमोठ्या गोडगोड नारळाचा तोटा नाही तिथे... प्रत्येक दुस-या तिस-या रेसिपीमधे नारळ खोब-याचा सढळ हात! :)  तिच्या हातच्या ओल्या नारळाच्या करंज्या किंवा मोदक तर अगदी लाजवाब!  ही रेसिपी आज आईने दाखवली. एक गोष्ट कळली, कि ही ओल्या नारळाचे तळणीचे मोदक किंवा करंजी आहे बनवायला सोपी पण patience ठेवून निगुतीने करणे गरजेचे. अगदी अलगद पाकळ्या वाळणे असो कि मंद गॅसवर धांदरटपणा न करता तळणे असो. :) बाकी एकदा जमली कि lifetime बनवता येईल.


काय काय लागते पहा:

सारणासाठी:

१. दोन मोठ्या ओल्या नारळाचे खवलेले खोबरे (फक्त वरवरचा पांढराशुभ्र नारळ खऊन घ्या. बाकीचा दुस-या पदार्थांसाठी फ्रिजमधे ठेवून द्या.)

२. दिड-दोन वाटी साखर किंवा गोडपणा जितका हवा तसे प्रमाण कमी-अधिक करा.

३. अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस

४. जरासा नावाला कढईत भाजलेला बदाम, पिसस्ता, काजू हा सुकामेवा बारीक कापून

५. केसर काड्या थोड्याशा दुधात भिजवून

६. वेलदोडा पूड


वरच्या आवरणासाठी:

७. मैदा दीड वाटी

८. बारीक रवा एक चमचा

९. मीठ चवीनुसार

१०. तेल व पाणी मळण्याकरता


तुप किंवा तेल तळण्याकरीता


 • आतमधले मधूर सारण: 

१. कढईत थोडे तुप गरम करून घ्या आणि ओला खवलेला नारळ आणि साखर घालून मंद ते मध्यम आचेवर परतत रहा. 

२. ५-१० मिनीटाने वेलदोडे पूड आणि बारीक कापलेला सुकामेवा मिक्स करा. आणि केशरकाड्या घालून परता. 

३. थोडासा लिंबाचा रस टाकून, ५ मिनीटे परतून गॅस बंद करा.  लिंबाच्या रसामुळे सुरेख शुभ्र रंग अबाधित राहतो. मधले सारण जरा मऊसुतच रहावे म्हणून जास्त वेळ गॅसवर भाजत/शिजवत नाहीत.

सारण तयार आहे. :)


 • वरच्या आवरणासाठी पीठ बांधून घेताना:

४. पीठ बांधून घेताना दिड वाटी मैदा चाळून घ्या.

५. चवीपुरते मीठ व बारीक रवा मिक्स करा.

६. थोडे तुप गरम करून मोहन म्हणून ते पीठात घाला. 

७. पीठ पाणी किंवा दूध घालत मऊसर मळून घ्यावे. आणि थोडा वेळ उमलू द्या. खलबत्त्याच्या वरवंट्याने चेचून घ्या. हे चेचणे महत्वाचे आहे. त्यामुळे मोदक तळताना मस्त पुरेसे कुरकुरीत आवरण होते.

८. पोळपाट लाटणे घेऊन, एका थाळीत थोडे तांदूळ पीठ घ्या. भिजवलेल्या पिठाचे छोटे गोळे बनवा. तांदूळ पीठात गोळा फिरवून गोलाकार लाटून  घ्या. 

९. त्यात सारण भरून मस्त पाकळ्या किंवा पा-या बनवून त्यात सारण भरून पाकळ्या अलगद मोदकाच्या आकारात वाळून बाजूला ताटात लावून ठेवा. उकडीच्या मोदकाच्या मानाने हे मोदक पटापट होत असले तरी पाकळ्यांचा सुबकपणा उकडीच्या मोदकांचाच जास्त असतो असा माझा अनुभव आहे.

१०. तेल किंवा तूप गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यावर मंद आचेवर एकामागून एक मोदक सोडावेत. मंद आचेवरच तळून घ्यावेत. मग तेल निथळून झाऱ्याने बाहेर काढून परत व्यवस्थित टिश्युपेपरवर  लावावे.

११. देवबाप्पा ला मस्तपैकी नैवेद्य दाखवावा आणि मग तुम्हीही आस्वाद घ्या नारळ आणि साखरेच्या आतून गोड गोड मऊ लुसलुशीत आणि बाहेरून crispy आवरणाच्या तळणीच्या मोदकाचा.... :)


टीप:

१. तळण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप यापैकी काहीही वापरू शकता. 

२. साखरेऐवजी गुळ वापरू शकता. पण ही रेसिपी साखरेचा मस्त गोडवा आणि खोब-याचा अबाधित शुभ्र पणा ह्यामुळे मला आवडते आणि 'साखरचौथ' असेल तेव्हा साखर वापरतो! :)

३. मैदा न खाणारे, गव्हाच्या पीठाचा आवरणासाठी वापर करू शकतात.


साखरेच्या सारणाचे तळणीचे सुरेख असे ११ किंवा २१ मोदक नैवेद्याच्या ताटात सजवून लाडक्या बाप्पाला साखर चौथ संकष्टी चतुर्थी निमित्ताने मनोभावे अर्पण करतो.


"ओम श्री गणेश देवताभ्यो नम:

नैवेद्यं समर्पयामि!!!" :) 🌿🌼


#modak #ओल्यासारणाच्यातळणीचेमोदक #साखरचौथ #sakharchauth #karanji #modak #maharashtrian_sweets


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर
















No comments:

Post a Comment