Monday, October 11, 2021

#झटपट_नारळवड्या नारळीपोर्णिमेसाठी ❤️🥥🧈🌿

 #झटपट_नारळवड्या नारळीपोर्णिमेसाठी ❤️🥥🧈🌿

साध्या पण चविष्ट अशा या गावरान नारळाच्या वड्या अगदी हव्या त्या प्रकारे हव्या त्या चवीच्या झटपट बनवता येतात. लाॅकडाऊन मधे गोड काहीतरी खायची इच्छा कधीना कधी तरी होतेच.... त्यात सर्वच साहित्य उपलब्ध नसल्याने अनेक पाककृती इच्छा असूनही बनवता येत नाहीत. मग तेव्हा हा सोपा आणि अगदी उपलब्ध साहित्यात होणारा नारळवडीचा पर्याय तुम्ही बनवू शकता. 🙂🥥🥥🧈 लहानसहान sweet cravings साठी एक उत्तम पर्याय! ❤️


नारळाचा खवलेला खिस मात्र ताजा आणि शुभ्रच वापरा. ह्या वड्या उपवासासाठी पण खाऊ शकता. मम्मी म्हणजे अस्मिता चौधरीने बनवलेली ही पाककृती आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असू तेव्हा, मम्मी अगदी झटपट वेगवेगळ्या प्रकारच्या नारळवड्या बनवून आम्हाला आणि आमच्या मित्रपरिवारासाठी डब्ब्यात नारळवड्या रचून देत आहे. ❤️🥥🌿🧈 अगदी दोन तीन दिवसांनी देखील चवीला छान आणि मऊ राहत असत. 


साहित्य:

१. दोन वाट्या खवलेला नारळ (शक्यतो‌ शुभ्र नारळाचा खिस)

२. एक ते सव्वा वाटी साखर

३. वेलची पुड

४. चिमुटभर साखर

५. उकडलेला बटाटा बारीक खिसून (ऐच्छिक)

६. पाव वाटी दुध

७. काजू-बदाम तुकडे

८. साजूक तूप


चला नारळवड्यांची कृती पाहूया. 

१. जाड बुडाच्या कढईत तुप तापवत ठेवा. त्यात खवलेला नारळाचा खिस आणि उकडलेल्या बटाट्याचा खिस (हा ऐच्छिक आहे. ह्याने वड्या मऊ पडत नाहीत.) घालून दहा मिनिटे परता. खिस सुका पडणार नाही ह्याची काळजी घ्या. 

२. लगेचच साखर, चिमुटभर मीठ आणि दुध टाकून व्यवस्थित एकजीव करा.

३. वेलची पावडर आणि काजू-बदाम तुकडे घालून परतून मिसळून घ्या. हे सर्व मंद आचेवर करायचे.


जरा पाच दहा मिनिटे नीट शिजून होऊ द्या. एका ताटाला तुप लावून ठेवा आणि लगेचच हे मिश्रण ताटात काढून वाटीने हलकेच दाब देत समप्रमाणात पसरवून घ्या. 


वरून अजून थोडे सुकामेव्याचे तुकडे टाकायचे असल्यास टाकून घ्या. आणि परत वाटीने अलगद दाब द्या. आता लगेचच काप कापून घ्या नाहीतर अगदीच थंड झाल्यावर काप पाडणे कठिण होते. 🙂


ह्या ३-४ दिवस किंवा जास्तही बाहेर आरामात चांगल्या राहतात. जास्त दिवस ठेवायचे असल्यास फ्रिजमधे ठेवा.


खुप प्रकार करता येतात ह्या नारळवडीमधे... गुलकंदाची, आमरसाची नारळवडी पण छान लागते. ज्या प्रकारात बनवायची आहे त्याचा रस किंवा ते जिन्नस साखर टाकतो त्यावेळी टाकावे आणि नीट मिसळावे. हापुसच्या आमरसाची तर अफलातून नारळवडी बनते.


#नारळवडी #naralvadi #sweets #coconut_recipes

#simple_recipes #lockdown_recipes






No comments:

Post a Comment