Monday, October 11, 2021

ओल्या_नारळाच्या_लुशलुशीत_करंज्या

 #ओल्या_नारळाच्या_लुशलुशीत_करंज्या

ओल्या नारळाच्या चविष्ट करंज्या आज आई रश्मी इंदूलकरच्या पध्द्तीने! :) आई आचिर्णे गावातील. ऊस, मध, तांदूळ, फळभाज्या, मोठमोठ्या गोडगोड नारळाचा तोटा नाही तिथे... प्रत्येक दुस-या तिस-या रेसिपीमधे नारळ खोब-याचा सढळ हात! :)  तिच्या हातच्या ओल्या नारळाच्या करंज्या तर अगदी लाजवाब!


नारळी पौर्णिमा किंवा काही वेळेला नैवेद्यासाठी नारळीभात, नारळ वडी किंवा खोब-याच्या वड्या आईकडे कोकणात बनवतात. ही रेसिपी आईने दाखवली. एक गोष्ट कळली, कि ही ओल्या नारळाची करंजी आहे बनवायला सोपी पण patience ठेवून निगुतीने करणे गरजेचे. अगदी अलगद वाळणे असो कि मंद गॅसवर धांदरटपणा न करता तळणे असो. :) बाकी एकदा जमली कि lifetime बनवता येईल.


काय काय लागते पहा:

सारणासाठी:

१. दोन मोठ्या ओल्या नारळाचे खवलेले खोबरे (फक्त वरवरचा पांढराशुभ्र नारळ खऊन घ्या. बाकीचा दुस-या पदार्थांसाठी फ्रिजमधे ठेवून द्या.)

२. दिड-दोन वाटी साखर किंवा गोडपणा जितका हवा तसे प्रमाण कमी-अधिक करा.

३. अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस

४. जरासा नावाला कढईत भाजलेला बदाम, पिसस्ता, काजू हा सुकामेवा बारीक कापून 

५. केसर काड्या थोड्याशा दुधात भिजवून

६. वेलदोडा पूड


वरच्या आवरणासाठी:

७. मैदा दीड वाटी

८. बारीक रवा एक चमचा

९. मीठ चवीनुसार

१०. तेल व पाणी मळण्याकरता


तुप किंवा तेल तळण्याकरीता


अगदी सोप्या आहेत ओल्या नारळाच्या करंज्या पण निगुतीने करा बरे का! :)

१. कढईत थोडे तुप गरम करून घ्या आणि ओला खवलेला नारळ आणि साखर घालून मंद ते मध्यम आचेवर परतत रहा. 

२. ५-१० मिनीटाने वेलदोडे पूड आणि बारीक कापलेला सुकामेवा मिक्स करा. आणि केशरकाड्या घालून परता. 

३. थोडासा लिंबाचा रस टाकून, ५ मिनीटे परतून गॅस बंद करा. मधले सारण जरा मऊसुतच रहावे म्हणून जास्त वेळ गॅसवर भाजत/शिजवत नाहीत. लिंबाच्या रसामुळे सुरेख शुभ्र रंग अबाधित राहतो.

४. पीठ बांधून घेताना दिड वाटी मैदा चाळून घ्या.

५. चवीपुरते मीठ व बारीक रवा मिक्स करा.

६. थोडे तुप गरम करून मोहन म्हणून ते पीठात घाला. ७. पीठ पाणी किंवा दूध घालत मऊसर मळून घ्यावे. आणि थोडा वेळ उमलू द्या. खलबत्त्याच्या वरवंट्याने चेचून घ्या. हे फार महत्त्वाचे आहे.

८. पोळपाट लाटणे घेऊन, एका थाळीत थोडे तांदूळ पीठ घ्या. भिजवलेल्या पिठाचे छोटे गोळे बनवा. तांदूळ पीठात गोळा फिरवून गोलाकार लाटून  घ्या. 

९. त्यात सारण भरून मस्त करंजी बनवून बाजूला ताटात लावून ठेवा. सर्व करंज्या अशाच प्रकारे तयार करून ताटात ठेवा. मला आईने करंजीचा साचा दिला. मी तो वापरते त्यामुळे करंज्या एकसारख्या सुबक आणि पटापट झाल्या. 

१०. तेल किंवा तूप गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यावर मंद आचेवर एकामागून एक करंज्या सोडाव्यात. मंद आचेवरच तळून घ्याव्यात. मग तेल निथळून झाऱ्याने बाहेर काढून परत व्यवस्थित लावाव्यात.

११. देवबाप्पा ला मस्तपैकी नैवेद्य दाखवावा आणि मग तुम्हीही आस्वाद घ्या नारळ आणि साखरेच्या गोड गोड मऊ लुसलुशीत करांज्यांचा...अगदी मनापासून गोड असणाऱ्या आणि माया लावणाऱ्या कोकणी माणसांसारख्या!!! :)


टीप:

१. तुम्ही तेल किंवा तूप यापैकी काहीही वापरू शकता. 

२. साखरेऐवजी गुळ वापरू शकता. पण ही रेसिपी साखरेचा मस्त गोडवा आणि खोब-याचा अबाधित शुभ्र पणा ह्यामुळे मला आवडते म्हणून मी साखर वापरते! :)


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर














#ओल्यासारणाच्याकरंज्या 

#karanji #maharashtrian_sweets #snehaeuphoria



No comments:

Post a Comment