Monday, March 28, 2022

श्रीखंड आणि गुढीपाडवा! 🌿🌤️😍

श्रीखंड आणि गुढीपाडवा! 🌿🌤️😍 

लहानपणाच्या गुढीपाडव्याच्या सुरेख आठवणी आहेत. एडवणला मम्मी भल्या पहाटेच उठत असे. आंघोळीच्या गरमागरम पाण्यात कडुनिंबाची पाने टाकत असत...‌ शरिरावर येणारे त्वचारोग, खाज, घामोळ्या नष्ट व्हावेत म्हणून कडूनिंबाची पाने औषधी ठरत. आम्ही उठेपर्यत ती छान पैठणी किंवा कांजीवरम नेसून, मोजकेच दागिने, ठसठशीत नथ घालून, ओलसर केसांत मोग-याचा किंवा ह्यावेळी आमच्या भागात मिळणा-या सुरंगीचा गजरा माळून देवबाप्पा ची आणि घराशेजारी असलेल्या देवळातील साईबाबांची साग्रसंगित पुजा-अर्चा करून, हातात निरनिराळ्या फुलांनी भरलेली थाळी घेऊन गुढी उभारायची तयारी करत असे. तीने हलकेच लावलेल्या अत्तराचा फाया मन अगदी प्रसन्न करत असे. बांगड्यांची लयबध्द किणकिण ऐकायला मजा येत असे‌.  छान रांगोळी काढून, स्वस्तिक काढून त्यावर पाट मांडत असे. एका काठीला गंध, हळदीकुंकू अक्षता वाहून, त्यावर छानसा मलमल किंवा ब्रोकेडचे कापड छानशा नि-या पाडून सराईतपणे वरच्या टोकाला बांधत असे. मग आंब्याच्या पानाचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची माळ, कडुनिंबाची पाने बांधत असे. मग त्यावर हळदीकुंकवाची पाच पाच बोटे ओढलेला तांब्याचा कलश मधल्या बाजूने अलगद मजबूतपणे बसवत असे. झाली ऐटबाज गुढी तयार! बाबा ती तयार गुढी उभारून बांधून ठेवत. गुढीची पुजा करून आरती ओवाळून तीच आरती सर्व व्यवसायांच्या जागी फिरवून आणली जाई. 🙂 नारळ-कडुनिंबाची पाने, गुळ आणि धण्याचा मिक्स  प्रसाद आणि पेढा किंवा जिलेबी मी आणि लहान बहिण, सर्व घरात आणि कामगारांना वाटून येत असू. येणा-या-जाणा-या तसेच आप्तेष्टांना हिंदू नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते. ❤️ संध्याकाळी परत हळदीकुंकू वाहून‌ गुढी उतरवली जाई. 

फार सुरेख दिवस ते... मस्त आंब्याला बहर येऊन‌ कै-या मोठ्या झालेल्या असतात.  गावात घर असल्याने कोकिळेची तान‌ अगदी वारंवार ऐकू येई. तिच्याच तालात आवाज काढून तिला चिडवायचे प्रकार आम्ही सगळेच करत बसू... 🐦

मदतनीस मावशीच्या सोबतीने मम्मी नैवेद्याची तयारी करत असे. नैवेद्य अगदी टिपिकल... टम्म फुगलेल्या पु-या, उकडलेल्या बटाट्याची भाजी, एखादी रस्सा भाजी (बहुधा मटार-फ्लाॅवरच), दारच्या कैरी आणि नारळाची चटणी, नुकतेच घातलेले लोणचे, वरण-भात, कोशिंबीर आणि श्रीखंड! श्रीखंड आम्ही बाहेरूनच आणत असू. फ्रिजमधे ठेऊन मग नैवेद्यासाठी काढत असू. लग्नानंतर विरार ला आईदेखील हाच नैवेद्य प्रकार बनवत असे. बहुतांश घरी हाच बेत असतो म्हणा... पण हे जे श्रीखंड गुढीपाडव्यानिमित्त आवर्जून आणतात ते मात्र गेल्या वर्षी लाॅकडाऊन असताना घरातच बनवू असे मनात आले... 😍

तर गेल्यावर्षी मी श्रीखंड बनवायचे ठरवले... ते बनवणे खुप सोपे हे माहित होते. तुम्हीही ह्यावर्षी सहज बनवू शकाल. श्रीखंड  बनवायच्या आधी अनेक व्हिडीओ पाहिले. खाद्यभ्रमंतीच्या आवडीमुळे ओळखीचे झालेले, पुण्याचे श्री. अरविंद आठल्ये काका आणि काकींचा अगदी बरकाव्यासोबत सांगितलेला श्रीखंड बनवण्याचा व्हिडीओ बघून करायचे ठरले. हे हौशी दांपत्य अगदी सोप्या-सुरेख शब्दांत मराठमोळे पदार्थांचे व्हिडिओ बनवून सादर करतात, ज्यामुळे आमच्या सारख्या मंडळींना नवेनवे पदार्थ बनवायला‌ हुरूप येतो. 🙂

तुमच्या माहितीसाठी व्हिडीओ लिंक देत आहे. अगदी परफेक्ट बनवण्यासाठी तो व्हिडिओ फाॅलो करा. 🙂

अरविंद आठल्ये काकांनी आणि काकींनी उत्तमरित्या बनवलेला श्रीखंडाचा व्हिडीओ:

https://m.facebook.com/groups/220729798431405?view=permalink&id=872828446554867


मी थोडीशी वेगळी पध्दत केली, श्रीखंड बनवायला तुम्हाला खालील जिन्नस लागतील:

१. एक किलो दही (पाणी निथळून त्याचा ५०० ग्रॅम चक्का झाला.)

२. साधारण चक्कयाइतकीच साखर

३. वेलचीपूड

४. केसर काड्या कोमट दुधात भिजवून

५. काजू-बदाम-पिस्ता काप

६. गावरान गुलाबाच्या पाकळ्या

७. जायफळ पावडर

एका स्वच्छ कापडात एक किलो दही चार तासांसाठी टांगून ठेवले. खाली पाणी जमा करण्यासाठी भांडे ठेवले. चार तासांनी तयार झालेला घट्ट चक्का एका भांड्यात काढला.

चक्क्याएवढीच साखर त्यात घातली. आणि छान एकजीव करण्यासाठी १०-१५ मिनिटे ढवळले. दहा-पंधरा मिनिटे तसेच ठेवले. मग ते चांगले एकजीव झाले. मिश्रणामधे वेलची पावडर, अगदी थोडी जायफळ पावडर आणि केसर भिजवलेले दुध घालून मिसळून घ्या.

मला दोन ते तीन प्रकारचे श्रीखंड बनवायचे असल्याने मी तीन भाग केले. (ह्यानंतर मी एक मोठी चुक केली जी तुम्ही करू नका. मी ह्यातला एक भाग अरविंद काकांनी सांगितल्याप्रमाणे पुरणयंत्रातून किंवा चाळणीतून गाळयचा सोडून, साखर अजून छान एकजीव व्हावी म्हणून मिक्सरला लावला आणि तो पातळसर झाला. ) पण हा चांगला धडा होता. पुढच्या वेळी नको तिथे 'शाॅर्टकट' मारणार नाही. 😓

हे अगदी जसे हवे तसे दाटसर होण्यासाठी फ्रिजमधे ठेवले त्यामुळे थोड्याच वेळात हवे तसे तयार झाले. :)

तर तीन प्रकारच्या श्रीखंडासाठी तीन भाग केले. 

१. वेलची-केशर श्रीखंड: एका भागात जास्त वेलची पावडर आणि केशर भाजवलेले दुध टाकून ढवळले.

२. काजू-बदाम सुकामेव्याचे काप टाकलेले श्रीखंड:

काजू बदामाच्या उभ्या आडव्या बारीक कापा. श्रीखंडाच्या एका भागात मिसळा. गुलकंदासाठी आणलेल्या गावरान गुलाबाच्या पाकळ्या नेमकीच होत्या, त्यादेखील तुकडे करून मिसळल्या. छान चवीचे Mix Dryfruit श्रीखंड तयार झाले.

३. आम्रखंड: चितळेंचा दर्जेदार आंब्याचा रस होता. तो तिस-या भागात मिसळला आणि छान मिसळला. आणि केसर टाकले. छान आम्रखंड तयार झाला. ह्याचा घट्टपणा थोडा कमी झाला‌ म्हणून फ्रिजरमधे एखाद तास ठेवला आणि मस्त झाला. 🥭🥭🥫

पहिल्यांदाच प्रयोग केला होता आणि चवीला उत्तम झाला पण काही चुकांमुळे थोडासा घट्टपणा कमी आला. पुढच्यावेळी अजून चांगले श्रीखंड स्ट्राॅबेरी, आंबा काप घालून छान श्रीखंड झाले. 🤩

तुम्ही देखील बनवून पहा पुढच्या आठवड्यात गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड! पुरी बरोबर श्रीखंडाचा घास घेताना स्वत:ला नक्कीच दाद द्याल. :)

#गुढीपाडवा #gudhipadava #gudhi #maharashtrian #shrikhand #garland #marathifood #food #curd #hung_curd #sweets #amrakhand #laxmimasale #themasalabazar

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर



















Friday, March 25, 2022

आगाशी आणि वसईची प्रसिद्ध सुकेळी

 

#सुकेळी #sukeli #gobananas 🌿🍌❤️
आगाशी आणि वसईची प्रसिद्ध सुकेळी

सुकामेव्यांचे फोटो काढत असताना अचानक माझ्याकडे ह्यावेळी उपलब्ध असलेल्या 'सुकेळी' ह्या आमच्या पट्ट्यात तयार होणा-या विशिष्ट अशा केळीच्या सुकामेव्याकडे लक्ष गेले. काजू, बदाम, मनुका, अक्रोडबरोबर एका भागात सुकेळीचे तुकडे ठेऊन सहजच फोटो काढले. इतर सुकामेव्याप्रमाणेच सुकेळी ही सूकामेव्यात गणली जाऊन लवकरच प्रसिद्ध व्हावी असे मनोमन वाटले.🌿❤️

केळी तशी पाहिली तर वाडवळांच्या आणि बहुतेकांच्या अगदी स्वयंपाकघरातील तसेच खाद्यसंस्कृतीचा महत्वाचा घटक. वेलची, आंबट वेलची, भुराकेळी, भुरकेळी, भाजीची केळी, मद्रासी केळी, लाल केळी, राजेळी केळी अशा अनेक जातींची केळींची लागवड वाड्यांमधे केलेली असते आणि वातावरण व जमिन अनुकूल असल्याने दर्जेदार लोंगरानी झाड लगडून उत्पादनही भरघोस मिळते. सोमवंशी क्षत्रिय म्हणजेच वाडवळांमधे काही ठिकाणी एक प्रथा आहे, लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरहून एक दिवस माहेरी येऊन‌ पुजेनंतर पुन्हा सासरी जाते तेव्हा तिच्यासोबत 'पाचपरतवणी' म्हणून टोपली भरून‌ पिकलेली तयार दर्जेदार केळी देखील पाठवली जातात. माझ्या लग्नानंतर, मोठ्या सुरेख विणलेल्या टोपलीत केळीची पाने लावून, खास मामाकडून‌ मागवलेल्या लाल केळ्यांचे फणे, ताजी लोंगरावरची अस्सल वेलची केळी आणि उत्तम भली मोठी राजेळी केळीचे घड आणि वरून परत केळीची पाने असे सर्व सुंदर रचून पाठवले होते. इकडेही हे पाहून सर्वांनाच मजा आली आणि चविष्ट केळी आवडीने खाल्ली गेली. राजेळी केळ्याची आगळीवेगळी चव सर्वांनाच भावली होती. राजेळी केळी आधीपासून माहिती असूनही त्या बाबतची उत्सुकता सुकेळी मुळे जास्तच असायची.❤️

विरार स्टेशनला पश्चिमेला असलेल्या फळविक्रेतांकडे, खास करून केळी विकणा-या विक्रेतांकडे राजेळी जातीच्या केळ्यांपासून बनलेली ही सुकेळी हमखास मिळतात. केळ्याच्या झाडांच्या सुकलेल्या जाडसर सालींच्या वेष्टनामधे ही ३-४ अख्खी सुकलेली केळी गोलाकार बांधलेली असतात. हे आवरण देखील आकर्षक दिसते. आगाशी, वसई भागांत मुख्यत: वाडवळ आणि अर्थातच अनेक समाजातील लोक पारंपारिक पध्दतीने सुकेळी बनवतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी आगाशीतील श्री. अभय म्हात्रे ह्यांचा सुकेळ्याबाबत व्यवस्थित माहिती आवडीने देतानाचा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता. ते पारंपारिक शास्त्रशुध्द पध्दत वापरून राजेळी केळ्यापासून सुकेळी बनवतात. राजेळी केळी आकाराने मोठाली असतात. माझ्याकडचा हा फार जुना फोटो आहे जो मी देत आहे. खोबरे भरली राजेळी केळी हा अनेकांचा आवडता पदार्थ... तसेच गणपतीत बहुतेकांकडे राजेळीचे घड मांडलेले असत आणि विसर्जनानंतर प्रसाद म्हणून राजेळी केळ्याच्या सालासकट गोलाकार तुकडे करून खायला सर्वांना  फार आवडत असे.

कल्पेश म्हात्रे दादाने सुकेळी प्रक्रियेतील काही फोटो देखील पाठवले आहेत. ते पोस्ट मधे दिले आहेत. कल्पेश म्हात्रे सुध्दा ह्या सुकेळी प्रक्रियेत सक्रिय आहेत.

केळी हे पिकल्यानंतर अगदी पटकन नाशिवंत होणारे फळ... त्यामुळे ते वाया न घालवता व त्याला सुकामेव्याप्रमाणे सुकवून त्याचे गुणधर्म अबाधित ठेवणे हे जमण्यासारखे आहे लक्षात आल्याने ते सुकवून विक्री करणे गरजेचे वाटले आणि सुकेळीचा उगम झाला. श्री. अभय म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही राजेळी केळी पुर्ण पिकल्यानंतर त्याची साल काढून टाकतात आणि तळहातावर केळी गोलगोल हलका दाब देऊन फिरवली जातात. नंतर या केळ्यांना योग्य उन्हात पाच ते सहा दिवस कारवीच्या मांडवावर सुकवण्याच्या प्रक्रियेकरता ठेवले जाते. केळ्यातून स्त्रवणारा मधासारखा स्त्राव आणि पाणी ह्यातील पाण्याचे उन्हात बाष्पीभवन होते.‌ अणि उरलेल्या मधातच केळ्याला सुकवले जाऊन त्याचे मुलभुत गुणधर्म त्यातच राहतात. योग्य पध्दतीने सुकवलेले केळे हे सुका मेव्यासारखे खाता येते. पिशवीत व्यवस्थित बांधून ते महिना-दिड महिना बाहेर तर फ्रिजमधे ७-८ महिने राहू शकते. श्री. अभय म्हात्रे ह्यांचे व्हिडिओ comment मधे पण पोस्ट केला आहे. 

Here is YouTube link for reference:

https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=eMNcS-ol86w

#सुकेळी #banana #dried_banana #sukeli #vasai #virar #agashi #bananadryfruits #dryfruits













Thursday, March 17, 2022

भाजलेल्या कैरीचे पन्हे- Sunmer special Smoky पेय! ❤️🥭

 भाजलेल्या कैरीचे पन्हे- Sunmer special Smoky पेय! ❤️🥭














 कै-या छानपैकी गॅसवर भाजून Smoky flavour चे पुदिना टाकलेले पन्हे जब्राट लागते!

असह्य उन्हाळा देखील आवडायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, त्यापैकी एक म्हणजे चटपटीत कैरी/ आंबा! 😍🥭 मस्त हिरव्यागार त-हेत-हेच्या कै-या बाजारात दिसत आहेत आणि लाॅकडाऊनमुळे थोडासा वेळही उपलब्ध आहे. कैरीचे लोणचे, चटण्या, भाज्यांमधे आणि वरणामधे कैरी टाकून आपण खात आहोतच. अशातच कैरीचे पन्हे पण नक्की बनवून पहा. कैरीचे पन्हे, त्या उकडून किंवा भाजून दोन्ही प्रकारे बनवता येते. मस्तच लागते. ग्लासमधे बर्फाचे तुकडा घालून त्यावर थंडगार पन्हे ओतून प्यायची मज्जाच वेगळी. उकडलेल्या कैरीचे पन्हे आई नेहमीच करते. त्याची स्वतंत्र पाककृती आधी दिली आहे. भाजलेल्या कैरीच्या पन्ह्याची मुख्य पाककृती Annapurna in you च्या सोनल पंडित जांभेकर Sonal Pandit Jambekar यांची आहे.  मी त्यात काळेमिरे देखील टाकले आहे. 💁🥭❤️

चला भाजलेल्या कैरी पन्हेसाठी काय काय लागते पाहूयात:

आपल्याला लागणार आहे:

१. २ मध्यम कैरींचा गर (भाजलेल्या). साधारण एक मोठी वाटी (गोडसर आंब्याच्या असल्या तरी उत्तम)

२. साखर: पाव वाटी

३. गुळ: पाव‌ वाटी किंवा थोडा अधिक

४. जिरा पावडर: अर्धा ते पाऊण चमचा

५. काळेमिरे: ५-६ (मुख्य पाककृती मधे घातलेले नाहीत. )

६. वेलची पावडर: ४-५ वेलच्या खलून

७. पुदिना: पाव वाटी

८. सैंधव मीठ: स्वादानुसार

९. साधे मीठ: स्वादानुसार

१०. केशर काड्या


कृती:

१. हिरव्यागार कै-या स्वच्छ धुवून घ्या. पुसून गॅसवर अगदी खरपुस भाजा. 

२. थंड झाल्यावर साले अलगद सोडवून घ्या. सगळा गर व्यवस्थित काढून घ्या आणि साल व बाठा फेकून द्या. 

३. जितका गर त्याच्या अर्धी साखर आणि अर्धा खिसलेला गुळ ह्यात घाला आणि सोबतच जरासे सैंधव मीठ, साधे मीठ, काळेमिरे, जिरा पावडर आणि पुदिन्याची ताजी पाने घालून मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्या. कैरी जितकी आंबट तितकी साखर आणि गुळ जास्त लागतो. तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करा. (पन्हे स्टोअर करायचे असल्यास पुदिना घालू नका. पुदिना मुळे काळपट रंग येऊ शकतो. वेळेवर पन्ह्यामधे पुदिना पाने आणि पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता.)

४. ह्या मिश्रणात खलबत्त्यात खललेल्या वेलचीची पावडर आणि केशर काड्या टाकून मिक्स करा. 

५. आपल्याला पन्हे साठी लागणारा पल्प तयार आहे. बाटलीमध्ये किंवा डब्यामधे भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. हवे तेव्हा ग्लासमधे पल्प काढून त्यात पाणी घालावे आणि मस्त ढवळून घ्यावे.  पाणी किती घालावे ह्याचा अंदाज तुम्हाला येईलच. अफलातून चटकदार लागते पन्हे... मस्त स्मोकी फ्लेवर! बर्फाचे खडे ग्लासमधे घालून त्यावर पुदिन्याची चुरडलेली ताजी पाने, लिंबाची चकती आणि पन्हे ओतून छान सर्व्ह करू शकता. अहाहा! थंडगार पन्हे! आल्हाददायक!! 🙂❤️

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#panhe #summer_drink #mango #raw_mango #cooler #aampanha #‍smoked_panhe



कैरीचे पन्हे- उन्हाळ्यातले आवडीचे पेय! ❤️🥭

 कैरीचे पन्हे- उन्हाळ्यातले आवडीचे पेय! ❤️🥭

असह्य उन्हाळा देखील आवडायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, त्यापैकी एक म्हणजे चटपटीत कैरी/ आंबा! 😍🥭 

मस्त हिरव्यागार त-हेत-हेच्या कै-या बाजारात दिसत आहेत आणि लाॅकडाऊनमुळे थोडासा वेळही उपलब्ध आहे. कैरीचे लोणचे, चटण्या, भाज्यांमधे आणि वरणामधे कैरी टाकून आपण खात आहोतच. अशातच कैरीचे पन्हे पण नक्की बनवून पहा. कैरीचे पन्हे, त्या उकडून किंवा भाजून दोन्ही प्रकारे बनवता येते. मस्तच लागते. ग्लासमधे बर्फाचे तुकडा घालून त्यावर थंडगार पन्हे ओतून प्यायची मज्जाच वेगळी. पाककृती अर्थात आई रश्मी इंदूलकर कडून घेतली आहे. आईने बनवलेले पन्हे हे नेहमीच उत्कृष्ट चवीचे असते. आम्हाला आवडते म्हणून निरनिराळ्या चवीच्या कैरीचे पन्हे संपुर्ण उन्हाळा आई बनवत असते. 💁🥭❤️

चला सोप्या कैरी पन्हेसाठी काय काय लागते पाहूयात:

आपल्याला लागणार आहे:

४-५ कैरी (गोडसर आंब्याच्या असल्या तरी उत्तम)

साखर 

गुळ

वेलची पावडर

केशर काड्या


कृती:

१. हिरव्यागार कै-या स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये भांड्यात, अख्याच ठेवून २-३ शिट्या घेऊन शिजू द्या. कुकरला पाणी घालून, ट्रे स्टॅड ठेऊन एका भांड्यात कै-या ठेऊ शकता.

२. थंड झाल्यावर सगळा गर व्यवस्थित काढून घ्या आणि साल व बाठा फेकून द्या. 

३. जितका गर तितकीच साखर ह्यात घाला आणि एकदा मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्या. कैरी जितकी आंबट तितकी साखर जास्त लागते.

४. ह्या मिश्रणात वेलची पावडर आणि केशर काड्या टाकून मिक्स करा. मी अगदी चिमुट मीठ देखील टाकते. (आवडत असल्यास तुम्हीदेखील टाकू शकता. ऐच्छिक आहे.) 

५. आपला पन्हे साठी लागणारा पल्प तयार आहे. बाटलीमध्ये किंवा डब्यामधे भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. हवे तेव्हा काढून त्यात पाणी घालावे. पाणी किती घालावे ह्याचा अंदाज तुम्हाला येईलच. 

ह्यावेळी मी पन्हे बनवताना साखरेऐवजी गुळ किसून घातला. आणि मिश्रण हाताने कुस्करले. उत्तम लागले पन्हे. तुम्हालाही साखर नको असल्यास गुळ वापरू शकता. आणि शिजवण्याऐवजी कै-या छानपैकी गॅसवर भाजून Smoky flavour चे पन्हेदेखील बनवता येते! 🥭💁 

#panhe #summer_drink #mango #raw_mango #cooler #aampanha





Tuesday, March 15, 2022

#आमखंडी #कोलंबी_आंबा #वाडवळी

 #आमखंडी #कोलंबी_आंबा #वाडवळी !

❤️🌿🥭🌶️🌰🧄🦐

नुसता गरमा-गरम वाफाळता भात, त्यावर आंबटसर तिखट आमखंडी कसली अफलातून लाजवाब लागते हे ज्या वाडवळांनी ही आमखंडी किंवा कोलंबी-शेंग-कैरी चाखलेय त्यांनाच कळणार.... ❤️

खाडीचे कोलंबट म्हणजे जरा लहान आकाराची कोलंबी... चवीला छानच आणि शेवग्याच्या शेंगा आणि आंबटगोड कै-या आता बाजारात वर्षभर मिळतात त्यामुळे अगदी सहज कधीही आपण हे बनवू शकतो ही कोलंबी-आंबा भाजी... 

साधारणतः: तोंडाला पाणी आणणाऱ्या आंबटसर चटकदार कैरीचा सिझन सुरू झाल्यावर सतत घरात कैरीचे झटपट लोणचे, चटणी, शेंग कैरीचा वरण, टक्कू, गोडं लोणचं अशा पदार्थांची रेलचेल सुरू होते. तसाच कैरीचा सढळ हस्ते वापर करून आमखंडीसारख्या अनेक मिश्र  प्रकारच्या भाज्या आम्हा वाडवळांकडे केल्या जातात. 🌿✨💁

वाडवळ म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय, मुख्यत्वे वसई ते डहाणूच्या समुद्रकिनारकडे जमिनी, शेती-वाडी व घरे असणारे. भातशेती व बागायत वाडी हे उपजत पारंपारिक मुख्य व्यवसाय. त्यामुळे कोलंबी वा मासे आणि उळपात म्हणजे पातीचा कांदा, कैरी, वांगी, शेवगाच्या शेंगा वाडीतच मुबलक. त्यामुळे आवारातच उपलब्ध होणा-या भाज्यांचा वापर करून कोलंबी-आंबा किंवा शेंग-कोलंबी-वांग-आंबा ह्या वारंवार होणाऱ्या भाज्या!❤️🌿🥭🌶️🌰🧄🦐

उन्हाळ्यात घरी जेव्हाही जातो तेव्हा फोनवर मम्मीने विचारलेल्या, 'जेवायला काय बनवू?' ह्या प्रश्नाला आमचे उत्तर हमखास कोलंबी-आंबा असे असते. ताज्या ताज्या झाडावरून उतरवलेल्या कै-या आणि नुकतीच आणलेली कोलंबी असली की झटपट आमखंडी बनवता येते.

तर अशी ही सहज सोपी आणि चमचमीत अशी भाजी, वाडवळी मसाला वापरून कशी बनवायची ते बघूयात!🙂💁

वाडवळी मसाला प्रत्येकाकडे असेलच असे नाही, तर तुम्ही तुमच्या घरातील रोजच्या वापरातील मसाला देखील भाजीत घालू शकता. 💁🍲


बघुया काय काय लागेल साहित्य कोलंबी-आंबा किंवा आमखंडी साठी:

१. दोन मोठ्या आकाराचे उभे कापलेले कांदे 

२. एका मोठया आंबट कैरीचे तुकडे 

३. पंधरा-वीस कोळंबी साफ केलेल्या (साले काढू नका)

४. आले लसूण पेस्ट

५. बारीक चिरलेली कोथिंबीर

६. हिरवी मिरची व कढीपत्ता

७. रोजच्या वापराचा घरगुती वाडवळी मसाला

८. सेलम हळद पावडर

९. मीठ आणि चिमूटभर साखर

१०. कोथिंबीर बारीक चिरून


एका जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून त्यात कापलेला  कांदा चांगला परतून लालसर रंगावर शिजवून घ्यावा. मग मिरची, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, घरगुती वाडवळी मसाला, सेलम हळद, मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर  आंबट कैरीचे तुकडे आणि कोळंबी टाकून व्यवस्थित ढवळावे.🥘🍲


सगळी भाजी व्यवस्थित मिक्स केली, की थोडे पाणी घालून झाकणामधेदेखिल पाणी ठेवून वाफेवर  शिजू द्यावे. एव्हाना मस्त दरवळ पसरला असेल. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे व मस्त मिश्र चवीची गावरान कैरी टाकलेली कोळंबीची भाजी तयार असेल. चुलीवर करता आली तर चव अजूनच वाढते हा स्वानुभव आहे.😋


नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल.💁


ही भाजी भाकरी सोबत उत्तमच लागते. पण साध्या  वाफाळत्या मऊसुत भाताबरोबर खायची गंमतच न्यारी! :) मग चिंचेचे सार, वरण किंवा आमटीची वेगळी अशी गरज भासत नाही. आणि सोबतीला फोडलेला कांदा वा मुळा, मिरची-बोंबलाचा ठेचा असले तर 'ज्जे ब्बात!!!' 😋🍲💁🦐🥭


टिप:

१. कोळंबी लहान किंवा मध्यम आकाराच्या घ्या. कोळंबीची साले काढू नका. फक्त पाय, शेपटी आणि मधला घाण असलेला काळा धागा काढून टाका. ह्या आमखंडीमधे साले असलेली कोलंबी जास्त चांगली लागते.

२. कोळंबी जागी करंदी टाकून देखील भाजी करू शकता.

३. काहीजण कांदा, आलेलसूण, कोथिंबीर, मिरची आणि एखादा टाॅमेटो असे मिक्सरमधून काढून, हे वाटण लावून जाडसर रस्सा देखील बनवतात.

४. काही जण, ह्यामध्ये थोडेसे नारळाचे दुध देखील घालतात. हेदेखील भन्नाट लागते. ‍‍


.

.

.

.

.

.

.

.

.

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


#currywithmango #rawmango  #valvalispecial  #आमखंडी #कोलंबी_आंबा #cookingwithfreshingredients