Monday, March 28, 2022

श्रीखंड आणि गुढीपाडवा! 🌿🌤️😍

श्रीखंड आणि गुढीपाडवा! 🌿🌤️😍 

लहानपणाच्या गुढीपाडव्याच्या सुरेख आठवणी आहेत. एडवणला मम्मी भल्या पहाटेच उठत असे. आंघोळीच्या गरमागरम पाण्यात कडुनिंबाची पाने टाकत असत...‌ शरिरावर येणारे त्वचारोग, खाज, घामोळ्या नष्ट व्हावेत म्हणून कडूनिंबाची पाने औषधी ठरत. आम्ही उठेपर्यत ती छान पैठणी किंवा कांजीवरम नेसून, मोजकेच दागिने, ठसठशीत नथ घालून, ओलसर केसांत मोग-याचा किंवा ह्यावेळी आमच्या भागात मिळणा-या सुरंगीचा गजरा माळून देवबाप्पा ची आणि घराशेजारी असलेल्या देवळातील साईबाबांची साग्रसंगित पुजा-अर्चा करून, हातात निरनिराळ्या फुलांनी भरलेली थाळी घेऊन गुढी उभारायची तयारी करत असे. तीने हलकेच लावलेल्या अत्तराचा फाया मन अगदी प्रसन्न करत असे. बांगड्यांची लयबध्द किणकिण ऐकायला मजा येत असे‌.  छान रांगोळी काढून, स्वस्तिक काढून त्यावर पाट मांडत असे. एका काठीला गंध, हळदीकुंकू अक्षता वाहून, त्यावर छानसा मलमल किंवा ब्रोकेडचे कापड छानशा नि-या पाडून सराईतपणे वरच्या टोकाला बांधत असे. मग आंब्याच्या पानाचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची माळ, कडुनिंबाची पाने बांधत असे. मग त्यावर हळदीकुंकवाची पाच पाच बोटे ओढलेला तांब्याचा कलश मधल्या बाजूने अलगद मजबूतपणे बसवत असे. झाली ऐटबाज गुढी तयार! बाबा ती तयार गुढी उभारून बांधून ठेवत. गुढीची पुजा करून आरती ओवाळून तीच आरती सर्व व्यवसायांच्या जागी फिरवून आणली जाई. 🙂 नारळ-कडुनिंबाची पाने, गुळ आणि धण्याचा मिक्स  प्रसाद आणि पेढा किंवा जिलेबी मी आणि लहान बहिण, सर्व घरात आणि कामगारांना वाटून येत असू. येणा-या-जाणा-या तसेच आप्तेष्टांना हिंदू नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते. ❤️ संध्याकाळी परत हळदीकुंकू वाहून‌ गुढी उतरवली जाई. 

फार सुरेख दिवस ते... मस्त आंब्याला बहर येऊन‌ कै-या मोठ्या झालेल्या असतात.  गावात घर असल्याने कोकिळेची तान‌ अगदी वारंवार ऐकू येई. तिच्याच तालात आवाज काढून तिला चिडवायचे प्रकार आम्ही सगळेच करत बसू... 🐦

मदतनीस मावशीच्या सोबतीने मम्मी नैवेद्याची तयारी करत असे. नैवेद्य अगदी टिपिकल... टम्म फुगलेल्या पु-या, उकडलेल्या बटाट्याची भाजी, एखादी रस्सा भाजी (बहुधा मटार-फ्लाॅवरच), दारच्या कैरी आणि नारळाची चटणी, नुकतेच घातलेले लोणचे, वरण-भात, कोशिंबीर आणि श्रीखंड! श्रीखंड आम्ही बाहेरूनच आणत असू. फ्रिजमधे ठेऊन मग नैवेद्यासाठी काढत असू. लग्नानंतर विरार ला आईदेखील हाच नैवेद्य प्रकार बनवत असे. बहुतांश घरी हाच बेत असतो म्हणा... पण हे जे श्रीखंड गुढीपाडव्यानिमित्त आवर्जून आणतात ते मात्र गेल्या वर्षी लाॅकडाऊन असताना घरातच बनवू असे मनात आले... 😍

तर गेल्यावर्षी मी श्रीखंड बनवायचे ठरवले... ते बनवणे खुप सोपे हे माहित होते. तुम्हीही ह्यावर्षी सहज बनवू शकाल. श्रीखंड  बनवायच्या आधी अनेक व्हिडीओ पाहिले. खाद्यभ्रमंतीच्या आवडीमुळे ओळखीचे झालेले, पुण्याचे श्री. अरविंद आठल्ये काका आणि काकींचा अगदी बरकाव्यासोबत सांगितलेला श्रीखंड बनवण्याचा व्हिडीओ बघून करायचे ठरले. हे हौशी दांपत्य अगदी सोप्या-सुरेख शब्दांत मराठमोळे पदार्थांचे व्हिडिओ बनवून सादर करतात, ज्यामुळे आमच्या सारख्या मंडळींना नवेनवे पदार्थ बनवायला‌ हुरूप येतो. 🙂

तुमच्या माहितीसाठी व्हिडीओ लिंक देत आहे. अगदी परफेक्ट बनवण्यासाठी तो व्हिडिओ फाॅलो करा. 🙂

अरविंद आठल्ये काकांनी आणि काकींनी उत्तमरित्या बनवलेला श्रीखंडाचा व्हिडीओ:

https://m.facebook.com/groups/220729798431405?view=permalink&id=872828446554867


मी थोडीशी वेगळी पध्दत केली, श्रीखंड बनवायला तुम्हाला खालील जिन्नस लागतील:

१. एक किलो दही (पाणी निथळून त्याचा ५०० ग्रॅम चक्का झाला.)

२. साधारण चक्कयाइतकीच साखर

३. वेलचीपूड

४. केसर काड्या कोमट दुधात भिजवून

५. काजू-बदाम-पिस्ता काप

६. गावरान गुलाबाच्या पाकळ्या

७. जायफळ पावडर

एका स्वच्छ कापडात एक किलो दही चार तासांसाठी टांगून ठेवले. खाली पाणी जमा करण्यासाठी भांडे ठेवले. चार तासांनी तयार झालेला घट्ट चक्का एका भांड्यात काढला.

चक्क्याएवढीच साखर त्यात घातली. आणि छान एकजीव करण्यासाठी १०-१५ मिनिटे ढवळले. दहा-पंधरा मिनिटे तसेच ठेवले. मग ते चांगले एकजीव झाले. मिश्रणामधे वेलची पावडर, अगदी थोडी जायफळ पावडर आणि केसर भिजवलेले दुध घालून मिसळून घ्या.

मला दोन ते तीन प्रकारचे श्रीखंड बनवायचे असल्याने मी तीन भाग केले. (ह्यानंतर मी एक मोठी चुक केली जी तुम्ही करू नका. मी ह्यातला एक भाग अरविंद काकांनी सांगितल्याप्रमाणे पुरणयंत्रातून किंवा चाळणीतून गाळयचा सोडून, साखर अजून छान एकजीव व्हावी म्हणून मिक्सरला लावला आणि तो पातळसर झाला. ) पण हा चांगला धडा होता. पुढच्या वेळी नको तिथे 'शाॅर्टकट' मारणार नाही. 😓

हे अगदी जसे हवे तसे दाटसर होण्यासाठी फ्रिजमधे ठेवले त्यामुळे थोड्याच वेळात हवे तसे तयार झाले. :)

तर तीन प्रकारच्या श्रीखंडासाठी तीन भाग केले. 

१. वेलची-केशर श्रीखंड: एका भागात जास्त वेलची पावडर आणि केशर भाजवलेले दुध टाकून ढवळले.

२. काजू-बदाम सुकामेव्याचे काप टाकलेले श्रीखंड:

काजू बदामाच्या उभ्या आडव्या बारीक कापा. श्रीखंडाच्या एका भागात मिसळा. गुलकंदासाठी आणलेल्या गावरान गुलाबाच्या पाकळ्या नेमकीच होत्या, त्यादेखील तुकडे करून मिसळल्या. छान चवीचे Mix Dryfruit श्रीखंड तयार झाले.

३. आम्रखंड: चितळेंचा दर्जेदार आंब्याचा रस होता. तो तिस-या भागात मिसळला आणि छान मिसळला. आणि केसर टाकले. छान आम्रखंड तयार झाला. ह्याचा घट्टपणा थोडा कमी झाला‌ म्हणून फ्रिजरमधे एखाद तास ठेवला आणि मस्त झाला. 🥭🥭🥫

पहिल्यांदाच प्रयोग केला होता आणि चवीला उत्तम झाला पण काही चुकांमुळे थोडासा घट्टपणा कमी आला. पुढच्यावेळी अजून चांगले श्रीखंड स्ट्राॅबेरी, आंबा काप घालून छान श्रीखंड झाले. 🤩

तुम्ही देखील बनवून पहा पुढच्या आठवड्यात गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड! पुरी बरोबर श्रीखंडाचा घास घेताना स्वत:ला नक्कीच दाद द्याल. :)

#गुढीपाडवा #gudhipadava #gudhi #maharashtrian #shrikhand #garland #marathifood #food #curd #hung_curd #sweets #amrakhand #laxmimasale #themasalabazar

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर



















No comments:

Post a Comment