Thursday, September 14, 2023

पालघर पट्ट्यातील केळ्यांचे काही प्रकार #सुकेळी



पालघर पट्ट्यातील केळ्यांचे काही प्रकार

#सुकेळी #sukeli #gobananas 🌿🍌 #repost

केळी तशी पाहिली तर आम्हा वाडवळांच्या आणि बहुतेकांच्या पुजेतील, देवधर्मातील, स्वयंपाकघरातील तसेच खाद्यसंस्कृतीचा महत्वाचा घटक. सफेद वेलची, आंबट वेलची, भुराकेळी/ भुरकेळी, भाजीची केळी, मद्रासी केळी, लाल केळी, राजेळी केळी अशा अनेक जातींची केळींची लागवड पालघर पट्ट्यातील वाड्यांमधे केलेली असते आणि वातावरण व जमीन अनुकूल असल्याने दर्जेदार लोंगरांनी झाड लगडून उत्पादनही भरघोस मिळते.

इथल्या फळवाल्यांकडे अर्थात आपली नेहमीची केळीच जास्त दिसतात पण स्थानिक फळविक्रेते, भाजीवाल्या बायका, वाडीवाल्यांकडे ह्या केळी दिसतील. इथे बंगालचे कारागीर देखील खुप प्रमाणात आहेत. केळ्यांचे ट्रक च्या ट्रक भरून केळी उतरवली जातात आणि भल्या मोठाल्या कढयांमधून रात्रंदिवस वेफर्स बनवण्याचे काम सुरू असते.

फोटोंमध्ये आमच्या वाडीतील भुरकेळी/ आंबट वेलची (अगदी मांसल, मऊ, आंबड- गोड गर असतो), बनकेळी (कच्च्या केळी भाजी चविष्ट होते आणि काप सुध्दा) आणि वसईची राजेळी (मोठी केळी, सुकेळी साठी), सफेद वेलची केळी (अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट) यांचे फोटो दिले आहेत. लाल केळी माझ्या मामाकडे वाडीत आहे पण नेमकीच फोटो मिळाला नसल्याने इंटरनेट वरचा माहितीसाठी दिला आहे.

सोमवंशी क्षत्रिय म्हणजेच वाडवळांमधे काही ठिकाणी एक प्रथा आहे, लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरहून एक दिवस माहेरी येऊन‌ पुजेनंतर पुन्हा सासरी जाते तेव्हा तिच्यासोबत 'पाचपरतवणी' म्हणून टोपली भरून‌ पिकलेली तयार दर्जेदार केळी देखील पाठवली जातात. माझ्या लग्नानंतर, मोठ्या सुरेख विणलेल्या टोपलीत हिरवीगार केळीची पाने लावून, खास मामाकडून‌ मागवलेल्या लाल केळ्यांचे फणे, ताजी लोंगरावरची अस्सल वेलची केळी आणि उत्तम भली मोठी राजेळी केळीचे घड आणि वरून परत केळीची पाने असे सर्व सुंदर रचून पाठवले होते. इकडेही हे पाहून सर्वांनाच मजा आली आणि चविष्ट केळी आवडीने खाल्ली गेली. राजेळी केळ्याची आगळीवेगळी चव सर्वांनाच भावली होती. राजेळी केळी आधीपासून माहिती असूनही त्या बाबतची उत्सुकता सुकेळी मुळे जास्तच असायची.❤️

इथली पाच प्रकारची केळी:

१. आंबट वेलची: हा अगदी मांसल, मऊ, आंबड- गोड गराचा केळ्याचा प्रकार. मुबलक प्रमाणात होतो इथे. खायला पोटभरीचा आणि चविष्ट. शिकरणात चांगली लागतात. वेफर्स बनवतात.

२. बनकेळी/ भुराकेळी/ भाजीची केळी: कच्च्या केळीची उपवासाची भाजी चविष्ट होते, मुग- केळी भाजी‌ आणि काप सुध्दा छान होतात. बोंबलाचा पोपट हा मांसाहारी पदार्थ बनवताना आम्ही ह्या बनकेळी ची केळी वापरतो. वेफर्स देखील चांगले बनतात आणि केळीचे पीठ देखील...

३. सफेद वेलची किंवा वेलची केळी:

आगाशी आणि वसईतील सफेद वेलची केळी मुंबई, दादर मार्केटमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट अशी ही छोट्या चणीची, पिवळ्या रंगाची मऊ केळी. प्रसादाचा शिरा, शिकरण उत्तम बनतेच. पण लहान मुले, आजारी माणसांना केळे उत्तम समजले जाते. घडही देखणा दिसतो.

४. लाल केळी: तशी क्वचितच दिसतात ही बाजारात आजकल पण इथे छान होतात. लाल सालीची आणि मधला गर पिवळसर- पांढ-या छटेचा असतो. चव देखील वेगळी आणि छान‌ असते. मांसल- घट्ट गर असतो.

५. वसईची राजेळी केळी: राजेळी केळी म्हणजे मोठी, लांब केळी, सुकेळी साठी वापरली जाणारी म्हणून प्रसिद्ध. गर मांसल आणि आगळी खास चव. राजेळीचा प्रसादाचा शि-याचा गोडवा‌ अविस्मरणीय चवीचा. भरली केळी ही उत्तम लागतात. राजेळी ते सुकेळी प्रक्रियेची ची पुर्ण माहिती खाली आहेच.

तर सुकामेव्यांचे फोटो काढत असताना अचानक माझ्याकडे ह्यावेळी उपलब्ध असलेल्या 'सुकेळी' ह्या आमच्या पट्ट्यात तयार होणा-या विशिष्ट अशा केळीच्या सुकामेव्याकडे लक्ष गेले. काजू, बदाम, मनुका, अक्रोडबरोबर एका भागात सुकेळीचे तुकडे ठेऊन सहजच फोटो काढले. इतर सुकामेव्याप्रमाणेच सुकेळी ही सूकामेव्यात गणली जाऊन लवकरच प्रसिद्ध व्हावी असे मनोमन वाटले.🌿❤️

विरार स्टेशनला पश्चिमेला असलेल्या फळविक्रेतांकडे, खास करून केळी विकणा-या विक्रेतांकडे राजेळी जातीच्या केळ्यांपासून बनलेली ही सुकेळी हमखास मिळतात. केळ्याच्या झाडांच्या सुकलेल्या जाडसर सालींच्या वेष्टनामधे ही ३-४ अख्खी सुकलेली केळी गोलाकार बांधलेली असतात. हे आवरण देखील आकर्षक दिसते. आगाशी, वसई भागांत मुख्यत: वाडवळ आणि अर्थातच अनेक समाजातील लोक पारंपारिक पध्दतीने सुकेळी बनवतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी आगाशीतील श्री. अभय म्हात्रे ह्यांचा सुकेळ्याबाबत व्यवस्थित माहिती आवडीने देतानाचा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता. ते पारंपारिक शास्त्रशुध्द पध्दत वापरून राजेळी केळ्यापासून सुकेळी बनवतात. राजेळी केळी आकाराने मोठाली असतात. माझ्याकडचा जुना फोटो आणि मम्मीने, नुकताच नवा आणलेला‌ वसईच्या बाजारातील राजेळी केळ्याचा घड आहे त्याचाही फोटो देत आहे. खोबरे भरली राजेळी केळी हा अनेकांचा आवडता पदार्थ... तसेच गणपतीत बहुतेकांकडे राजेळीचे घड मांडलेले असत आणि विसर्जनानंतर प्रसाद म्हणून राजेळी केळ्याच्या सालासकट गोलाकार तुकडे करून खायला देतात.

आगाशीच्या कल्पेश म्हात्रे दादाने सुकेळी प्रक्रियेतील काही फोटो देखील पाठवले आहेत. ते पोस्ट मधे दिले आहेत. कल्पेश म्हात्रे सुध्दा ह्या सुकेळी प्रक्रियेत सक्रिय आहेत.

केळी हे पिकल्यानंतर अगदी पटकन नाशिवंत होणारे फळ... त्यामुळे ते वाया न घालवता व त्याला सुकामेव्याप्रमाणे सुकवून त्याचे गुणधर्म अबाधित ठेवणे हे जमण्यासारखे आहे लक्षात आल्याने ते सुकवून विक्री करणे गरजेचे वाटले आणि सुकेळीचा उगम झाला. श्री. अभय म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही राजेळी केळी पुर्ण पिकल्यानंतर त्याची साल काढून टाकतात आणि तळहातावर केळी गोलगोल हलका दाब देऊन फिरवली जातात. नंतर या केळ्यांना योग्य उन्हात पाच ते सहा दिवस कारवीच्या मांडवावर सुकवण्याच्या प्रक्रियेकरता ठेवले जाते. केळ्यातून स्त्रवणारा मधासारखा स्त्राव आणि पाणी ह्यातील पाण्याचे उन्हात बाष्पीभवन होते.‌ अणि उरलेल्या मधातच केळ्याला सुकवले जाऊन त्याचे मुलभुत गुणधर्म त्यातच राहतात. योग्य पध्दतीने सुकवलेले केळे हे सुका मेव्यासारखे खाता येते. पिशवीत व्यवस्थित बांधून ते महिना-दिड महिना बाहेर तर फ्रिजमधे ७-८ महिने राहू शकते. श्री. अभय म्हात्रे ह्यांचे व्हिडिओ comment मधे पण पोस्ट केला आहे.  

Here is YouTube link for reference:

https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=eMNcS-ol86w

#सुकेळी #banana #dried_banana #sukeli #vasai #virar #agashi #bananadryfruits #dryfruits




























Sunday, September 10, 2023

दह्यातले थालीपीठ

 कोकणातील न्याहरी! 😋


मेथी आणि कांदा टाकून तुपावर खमंग परतलेले मिश्र धान्यांचे मिनी थालीपीठ by वहिनी Gauri Desai ❤️


थालीपीठाच्या भाजणीत कांदा, मेथी, मिरची, आलेलसूण पेस्ट, हळद, मीठ, दही घालून छान मळून घ्यायचे. आणि आकाराने जरा लहान गोळे करून तेला-तुपावर थोडे जाडसर थापून खमंग शॅलो फ्राय करून घ्यायचे. कांदा आणि दह्यासोबत आस्वाद घ्यायला तय्यार! 🙃

.

.

.

.

.


#breakfast #thalipeeth #fenugreekleaves

#coastal #kokan #Sunkissed_home #Pure_bliss

#ratnagiri #इराचे_घर #कोकण #beauty #natural #sunlight #लालमाती #sunkissed_beauty