Thursday, December 29, 2022

पोपटी 💚

#पोपटी (सदृश्य)

ह्या महिन्यात हंगामी भाज्या भरपूर प्रमाणात मिळत असल्याने, गुजरात स्पेशल उंधियु झाला, आमच्या पालघर पट्ट्यातील उकडहंडी झाली आणि आता रायगड- अलिबाग ची पोपटी बनवायची खुमखुमी आली. त्यातच अलिबागच्या खास मित्रमंडळीतल्या प्रशांत- प्रिया चा पोपटीचा व्हिडिओ पाहिला आणि तडक पोपटीची रेसिपी प्रियाकडून घेतली. पुडल्याची आयडिया पण प्रियाचीच. चिकन, अंडी, जांभळा कंद, बटाटे, वालाच्या शेंगा, अभी ला आवडतात म्हणून तुरीच्या भरलेल्या शेंगा आणि जाड मीठ- मसाले अशा साध्या जिन्नसामधे मस्त पोपटी तयार केली. चुल किंवा पालापाचोळ्याचा जाळ, तेल-पाणी, केळीची पाने, भांबुर्डी पाला हे आवश्यक.

काल एडवणला पोपटी बनवली. भांबुर्डीचा पाला पोपटी मधे महत्वाचा आहे. त्याने एक विशिष्ट उत्तम चव येते पोपटी तील जिन्नसांना. पण भांबुर्डीचा पाला काही वेळेवर मिळाला नाही मग आमच्याकडे उकडहंडी ला वापरतात तो रान- भेंडीचा पाला मडक्यात भरायला वापरला. पण चांगली झाली एकंदरीत. पुन्हा बनवताना जास्त साग्रसंगीत करणार बरं का! 😸 

साधारण खालीलप्रमाणे बनवतात पोपटी... आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या- मसाले वापरता येतात... 

चिकन स्वच्छ धुवून त्याला आले-लसूण-मिरची पेस्ट, जाड मीठ (चेचून बारीक केलेले) आणि काळे मिरे पावडर लावून एक तास मुरवत ठेवले. नंतर जरा मसाला लावला.

केळीची पाने शेगडीवर जरा शेकवली म्हणजे मऊ होतात, त्यात चिकनचे २-३ तुकडे ठेऊन‌ ६-७ पुडके धाग्याने बांधून तयार केले. 

लहान आकाराचे बटाटे मधे चिरा पाडून, मीठ भरून घेतले. दोन्ही प्रकारच्या शेंगा हळद मीठाच्या पाण्यात जरा थोडा वेळ भिजवून घेतल्या. जांभळ्या कंदाचे तुकडे,‌ धुतलेली अंडी तयार ठेवली. (नुसते मीठ, हळद, मसाला, मिरची पावडर हे वापरूनही उत्तम पोपटी तयार होते. पण मला आवडतात म्हणून काही जास्तीचे मसाले मी वापरले.)   

जाड मडके (सिझन केलेले) घेऊन त्यात तेल टाकून सगळीकडे पसरवून घेतले. मग थोड्या शेंगा, मग बटाटे, मग दोन-तीन चिकनचे पुडले, मग थोडे मीठ- हळद- मसाला, काही भेंडीची पाने असे करत कंद, अंडी, परत शेंगा, मीठ-मसाला, चिकनचे पुडले असे थर रचले. थोडा पाण्याचा हबका मारला. 

भेंडी आणि केळीच्या पानाने मडक्याचे तोंड बंद केले. शेगडीवर मडके भाजण्यासाठी ठेवले. फिरवत फिरवत सगळ्या बाजूने मडके छान भाजून घेतले. (शेतात ज्वाळ  करून मडकी‌ भाजायला टाकताना मात्र, मडक्याचे तोंड आम्ही खाली ठेवतो.) साधारण एक- दीड तासात भांबुर्डीचा पाला असल्यास एक सुंदर दरवळ उठतो. म्हणजे पोपटी झाली. मग मडकी आगीतून अलगद बाजूला काढायची. थोड्या वेळाने केळीच्या पानाने बांधलेले तोंड आणि पाला काढायचा आणि हळूहळू पोपटी केळीच्या पानावर काढायची. मस्त एकत्र बसून, गप्पा टप्पा रंगवत, एकेक शेंगा सोलून खात पोपटीचा बेत रंगतो. छान थंडीमध्ये गरमागरम पोपटी भन्नाट लागते.

We certainly loved this 😍

#पोपटी #अलिबाग #थंडी #popati #popti #winterspecial #edwan #traditionalfood #traditional #food #recipes #trending #marathi #maharashtrian #एडवण #harvest














Wednesday, August 10, 2022

जर्दाळू- तज ❤️

Apricot म्हणजे माझ्या आवडीच्या फळांपैकी एक.

आणि साऊथ कोरियामधे सुंदर असे जर्दाळू ची ताजी फळे म्हणजेच Apricot अगदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, हे पाहून जीव अगदी सुखावला. आम्ही राहतो आहेत त्या अपार्टमेंट च्या आजूबाजूला असलेल्या घरांच्या भागांमधून अंजीर, apricot च्या झाडांवर लगडलेली फळे पाहून अगदी तोडण्याचा मोह होतो.😷 हिरवेगार कोरिया आणि स्थानिकांची बागायती ची आवड अगदी किचन गार्डन, टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन मधून दिसून येते.

इथे Jeju island आहे तिथे अगदी सुरेख असा गुलाबीसर बहर म्हणजेच pink blossoms चा खास फेस्टिवल असतो फेब्रुवारी- मार्च दरम्यान... लाल, गुलाबी, पांढरट, पिवळ्या रंगाची उधळण असते म्हणे. तर ह्या जर्दाळू/ apricot च्या दर्जेदार फळांचे ट्रक हर एक आकाराची फळे घेऊन असतात. परवा त्यातलेच काही कडक असे apricot घेऊन आलो. 

तज/ दालचिनी वापरून पाकातले apricot बनवायला मला आवडते. कडकसर जर्दाळू मुख्यत: लागतात. तज भारतातूनच आणलेली. इथे तत्सम मसाल्याचे पदार्थ सहजासहजी मिळत नाहीत. पाककृती अगदीच सोपी आहे. 

पॅनमधे तुप गरम करायचे. त्यात apricot चे तुकडे घालून परतायचे. जरा गुलाबीसर होत आले, की त्यात पाणी घालायचे आणि जरा उकळी आली की साखर किंवा brown sugar तुम्हाला कितपत गोडसर हवे त्या अंदाजात घालायची. मिश्रणाला मध्यम आचेवर ठेवायचे. तज चे दोन तीन लहान तुकडे मिश्रणात टाकायचे. हे उकळत असताना apricotच्या कापा साखरेचे पाणी शोषुन घेतात आणि मऊसर होत जातात. पाणी अगदी थोडेसे राहिले आणि कापा साधारण मऊ झाल्या कि गॅस बंद करायचा. कापा serving bowl मधे काढून वरून पाक किंवा मध सोडायचे. आवडत असल्यास जर्दाळूच्या बियांच्या आतला मगज काढून तुकडे करून पसरवायला.

हिंदी मधे जर्दाळूला खुबानी संबोधतात. 'खुबानीका मीठा' म्हणून एक Sweet dish बनवली जाते. त्यात थोडे सुके apricot बारीक तुकडे करून‌ पाकात शिजवितात. तज असतेच आणि serve करताना पाकातले तयार जर्दाळू वाढून त्यावर, जाडसर मलाई वरून टाकतात आणि त्यातला मगज आणि आवडते इतर सुकेमेवे... नवाबी sweet dish एकदम! 

#जर्दाळू #खुबानी #साऊथकोरीया #apricot #cassia #sweetdish #travelstories #day4 #southkorea #changwon #euphoriawanderer






Wednesday, July 13, 2022

Pineapple तवा पुलाव 🍍

 पाईनअॅपल तवा पुलाव

#pineapple_tawa_pulav


तवा पुलाव हे आपल्या मुंबईच्या रस्त्यांवर आवडीने आनंद घेऊन खाल्ले जाणारे लोकप्रिय असे Street Food!

फोडणीभाताच्या प्रकारात मोडणारे पण अनेक भाज्यांच्या वापराने चवीला अजून चटपटीत. आमच्या विरारमधील The Greenroof ह्या Fastfood joint ला अनेक पदार्थांसोबत तवा पुलावचेही पाच-सहा प्रकार आहेत.  झटपट आणि चविष्ट म्हणून तवा पुलाव आवडीने ओरपला जातो. 


एकदा Pineapple तवा पुलावाबाबत हाॅटेलच्या तवा पुलाव "मारणा-या" (बनवणा-या) कारागिर कुक ने सांगितले होते. तेव्हा हा Pineapple Tawa Pulav बनवला. छानच लागला म्हणून घरगुती twisted Recipe तुमच्यासोबत शेअर करते. (PLASE NOTE: सध्याच्या आमच्या मेन्युमधे हा पदार्थ नाही)


तवा पुलाव ला शक्यतो ५-६ तास शिळा भात वापरावा. रोजच्या वापरातील तांदूळ असला तरी चालेल किंवा आवडत असल्यास बासमतीही वापरू शकता. हा सुटसुटीत मोकळा झाला पाहिजे. हवे तर तयार भाताला पाण्याने एकदा दोनदा स्वच्छ धुवा म्हणजे starch निघून जाऊन भात मोकळा होईल.


मोकळा सुटसुटीत भात: दोन कप

आलेलसूण पेस्ट एक चमचा

एक मोठा कांदा बारीक चिरून

मटार दाणे थोडेसे

एक गाजर लहान चौकोनी तुकडे करुन

एक भोपळी मिरची लहान चौकोनी तुकडे करुन

एक मोठे टाॅमेटो बारीक तुकडे करून

अर्धा कप अननसाचे बारीक तुकडे

कोथिंबीर बारीक चिरून


अर्धा चमचा जीरे

एडवणच्या लक्ष्मी मसालेची सेलम हळद पावडर: अर्धा चमचा

एडवणच्या लक्ष्मी मसालेचा स्पेशल गरम मसाला: एक चमचा

एडवणच्या लक्ष्मी मसालेचा पावभाजी मसाला: दीड चमचा

एडवणच्या लक्ष्मी मसालेची बेडगी मिरची पावडर: एक चमचा

(तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रॅण्ड चे मसाले वापरू शकता.)

चवीपुरते मीठ

चिमुटभर साखर

एका लिंबाचा रस

तेल व अमुल बटर

एक मोठी कढई तापवत ठेवा. त्यात तेल गरम करा. जी-याची फोडणी द्या. मग कांदा तळून गुलाबीसर झाला कि आलेलसूण पेस्ट टाकून परता. मग सेलम हळद, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला, मीठ व चिमूटभर साखर घालून व्यवस्थित परता. आता सगळ्या कापलेल्या भाज्या व अननसाचे तुकडे टाकून परता. लिंबूरस ओता. कोथिंबीर पण मिक्स करा. बटर टाकून वितळू द्या. थोडावेळ भाज्या शिजल्या कि मोकळा भात टाकून वरखाली करत सर्व भाज्या व भात मस्त मिसळू द्या. थोडा वेळ गॅसवर वरखाली करा आणि जबरदस्त असा तवा पुलाव तय्यार. 

अननस कापतानाच दोन तुकडे करून कापला आणि मधला गर काढून घेतला. उरलेल्या दोन रिकाम्या अननसाच्या खोलगट भागात मस्तपैकी अननस तवा पुलाव वाढला. कोथिंबीर भुरभुरली. 

तवापुलावसोबत तळलेला उडदाचा पापड, लोणचे आणि रायते दिले जाते. पाईनअॅपल तवा पुलाव म्हणून मी सोबत पाईनअॅपल दही रायते आणि तोंडी लावण्यासाठी 'पाईनअॅपल-चिझ क्युब-चेरी' स्टिकस बनवल्या होत्या.

अननसातच वाढल्यामुळे छान वाटत होता तवा पुलाव आणि चवीलाही झक्कास! मग करून पहाच.

#तवा_पुलाव #अननस #pineapple recipes #tawa_pulav #tawapulav #pineapple_tawapulav #raita #laxmi_masale #laxmi_masale_edwan #the_masala_bazaar #spice_blends #garam_masala #greenroof #hotel_greenroof







Sunday, July 10, 2022

तवसाचे घारगे किंवा मोठ्या काकडी चे घारगे 🥒🥒

तवसाचे घारगे किंवा मोठ्या काकडी चे घारगे 🥒🥒

पौष्टिक असा पारंपरिक पदार्थ!

कोल्हापुरच्या घरी आम्ही कोकणी पध्दतीने ओवसा/ओसा/वंसा पुजतो. हा घरोघरी परंपरागत वेगवेगळ्या पध्दतीने पुजला जातो. गौरी आवाहनच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खास पुजेसाठी घेतलेल्या सुपामधे नारळ, विड्याची पाच पाने आणि त्यावर सुकी फळे म्हणजे अक्रोड, खारीक, सुपारी, लेकूरवाळी हळद आणि बदाम मांडलेले, मोठ्या काकड्या (तवस), ओटीचे सामानातील बांगडी आणि हळद लावलेले दोरे असे सर्व रचले जाते. त्यावर हळदीकुंकू, फुले आणि अक्षतांनी पुजले जाते. त्या सुपावर पदर झाकून देवापुढे आणि गौरीपुढे ओवाळले जातात. शेवटच्या दिवशी सुपातील काकड्या किसून काकडीचे घारगे किंवा घेवदे बनवतात. 


जसे लाल भोपळ्याचे घारगे प्रकार कोकणात करतात तसेच गावरान काकड्यांचे घारगे देखील उत्तम लागतात. बनवण्यासाठी पध्दत सारखीच...


सोपे चविष्ट घारगे बघुया बनवतात कसे ते:

साहित्य: 

गावठी काकड्या: ४-५ नग (साले काढून खिसून)

देशी गुळ खिसलेला (जेवढा खिस तेवढाच गुळ आम्ही घेतो.)

चवीपुरते मीठ

गव्हाचे पीठ (काकडी आणि गुळ खिसात सामावेल इतके.)

हलकेच भाजलेल्या जी-याची पुड एक ते दीड चमचा

तांदूळ पीठ थोडेसे

घारगे बनवताना खिसलेली काकडी, मीठ,‌ जीरापुड आणि खिसलेला गुळ एकत्र‌ मिक्स करून काकडीचे सुटलेले पाणी जरा सुकेल इतपत गरम करून परतून घ्या.‌ आणि साधारण थंड झाले की मस्त पुरीच्या पीठाच्या consistency पेक्षा थोडे पातळसर पीठ होईल अशा‌ बेताने त्यात गव्हाचे‌ पीठ मिक्स करा. एकजीव मळून पीठ तयार करा. थोडे लिबलिबीत राहते हे खरे... (तांदळाचे पीठ थोडेसे वापरू शकता.)

आता तेल गरम करा. आणि कर्दळी किंवा केळीच्या पानावर तेल लावून, घारगे थापून तेलात सोडायचे. पातळ थापले असता घारगे टम्म फुगत नाहीत. आम्ही जरा जाडसर थापतो‌ त्यामुळे घारगे टम्म फुगतात. ह्यांना करण्यासाठी सरावाची गरज लागते. सरावाने छान जमतात.

काळ्या वाटाण्याच्या उसळी सोबत घारगे खातात. छान लागतात. नक्की करुन पहा. 

#घारगे #gharage #gharge #cucumber_recipes #kokani_food #traditional_recipes












Friday, July 8, 2022

खापरोळी आणि रस!!! 🥞🥥👩‍🍳❤️

 This is heavenly in taste! 😍

#खापरोळी_आणि_रस ❤️🥥

साधा, सात्त्विक आणि बनवायला सोपा असा छान गोड कोकणी पदार्थ म्हणजे खापरोळी आणि रस!!! 🥞🥥👩‍🍳❤️🌿 

तसे पाहिले तर खापरोळी या पदार्थांची ओळख मला लग्नानंतरच झाली. आणि आई (रश्मी इंदूलकर) ने नाश्त्याला जेव्हा रसरशीत खापरोळी बनवली तेव्हा पहिल्याच घासात खापरोळीच्या सात्त्विक चवीने अगदी जिव्हा आणि मन तृप्त होऊन गेले. कोकणातील अनेक पदार्थामधे खोबरे आणि तांदूळ वापरला जातो. खापरोळीमधेदेखील तांदूळ, गुळ आणि खोबरे हे तीनच साधे घटक विशेषत: आहेत‌. 


आमच्याकडे हे पीठ जास्तीचेच बनवतात. आणि एकदा हे खापरोळीसाठी पीठ आंबवले की बाबा मजेमजेत बोलतात कि आता पुढचे तीन-चार दिवस नास्ता फिक्स... डोसे आंबोळ्या, इडल्या, आप्पे, मसाला उत्तपा असे प्रकार पीठ संपेपर्यंत सुरूच असतात. 😃❤️

तर करून पहा खापरोळी आणि रस न्याहरी ला, गोडसर आवडत असेल तर खापरोळी आवडेल तुम्हांला... घरात न्याहरीला खापरोळीचा बेत केला आणि कुणाला गोड नको असेल तर त्यांच्यासाठी नुस्ती आंबोळी चटणी बनवू शकता. :)

खापरोळी आणि रस बनवण्यासाठी आधीच तयारी करावी लागते. खापऱोळीच्या पीठाची आणि नारळाच्या रसाची...👩‍🍳

पाहुया कसे बनवायचे पीठ:

(मी दिलेले प्रमाण वापरून दोन तीन दिवस आंबोळी वैगरे बनवता येईल एवढे पीठ होते. म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजाने हे पीठ कमी प्रमाणात बनवा. तसेच पीठ बनवताना तांदूळ आणि डाळीचे प्रमाणही प्रत्येक घरी काही प्रमाणात निरनिराळे असू शकते. मी आमच्याकडचे प्रमाण दिले आहे.)

तर खापरोळी बनवण्यासाठी आदल्या दिवशी सकाळी चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ (प्रमाण: 4:1), मेथी एक चमचा आणि एक वाटी पोहे भिजवा. मग रात्री थोडेसे पाणी घालून थोडे थोडे करत भिजवलेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक केलेले पीठ चमच्याने ढवळून एकजीव करा. एका मोठ्या भांड्यात वरती झाकण ठेवून पीठ आंबून येण्यासाठी (Fermentation) ठेवा. सध्या थंडी असल्याने पीठ यायला वेळ लागू शकतो.

दुस-या दिवशी सकाळी पीठ छान आंबून वर आले असेल, ते ढवळावे आणि चवीनुसार मीठ आणि जराशीच सेलम हळद घालावी व परत एकजीव करावे. 

खापरोळीसाठी नारळाचा आणि गुळाचा रस: 🥥👩‍🍳🌿❤️🥞

दोन नारळ फोडून ताजे खोबरे खवून घ्या. ते मिक्सरमधून फिरवा. हा वाटलेला चव स्वच्छ धुतलेल्या सुती कापडातून पिळून आणि गाळून एका मोठ्या भांड्यात रस काढा. 

खोब-याचा रस काढून उरलेला चोथा परत बेताचे पाणी घालून मिक्सरमधून काढा. आणि दुस-या भांड्यात पिळून आणि गाळून घ्या. 

खोब-याच्या रसाने भरलेल्या दोन्ही भांड्यात किसलेला गुळ टाका. (गुळाचे प्रमाण तुम्हाला अपेक्षित गोडव्याप्रमाणे कमी जास्त करू शकता.) दोन्ही भांड्यातील नारळाच्या रसामधे गुळ अगदी एकजीव झाला पाहिजे असे सतत ढवळून करा. एक पाणी दाट असते आणि एक सौम्य! ❤️😍🍝

तुम्हाला आवडत असल्यास ह्या रसामधे तुम्ही वेलची पावडर, जायफळ पावडर आणि केसर टाकू शकता. आमच्याकडे आम्ही ही सारी जिन्नसे टाकत नाही कारण त्याचे साधे फ्लेवर्स आम्हाला आवडतात. कोकणातही सहज करतात हा तेव्हा खास काही दुसरे टाकत नाहीत. :)

बीडाचा जाड तवा गरम करत ठेवा. आणि तापल्यावर मीठाचे पाणी शिंपडून चुरचूरू द्या. कांद्याला आडवा मधोमध कापून त्याला तेलात बुडवून हलकेच तव्यावर फिरवतो. त्यावर खोलगट डावाने पीठ ओतायचे आणि हलकेच गोल फिरवायचे. जास्त नाही. हे जाडच राहिले पाहिजे. आणि त्यावर लगेच वाफ नीट लागण्यासाठी झाकण उलटे ठेवायचे. दोन मिनिटांनी झाकण काढले कि आंबोळी फुगून तयार असेल. चांगली जाळीदेखील पडली असेल. (आम्ही उलट्या बाजूने नाही भाजत) ती पलाटणीने तशीच काढायची आणि घट्ट रसात बुडवायची. हाताने पातळसर रसात जरा भिजवून लगेच खोलगट थाळीमधे ठेवायची आणि त्यात दुसरा जाडसर रस ओतायचा आणि मस्त आस्वाद घ्यायचा खापरोळी रसाचा! 😋❤️🥥


एक खापरोळी रसात बुडवलेली खाल्ली तरी पोट भरून जाते. रस जरा जास्त प्याला कि छान सुस्ती येते बरे का! 😛


#खापरोळी #khaproli #kokani #food #marathifood #soul_food #tasty

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर



















Tuesday, June 14, 2022

अनसा_फणसाची_भाजी 🍍 आणि फणसाच्या आठल्या आणि ग-यांची भाजी ❤️ (अंसा_फनसाची आमटी)

 #अनसा_फणसाची_भाजी 🍍 आणि

फणसाच्या आठल्या आणि ग-यांची भाजी ❤️

(अंसा_फनसाची आमटी)


वटपोर्णिमेच्या पुजेच्या दिवशी अन् आदल्या दिवशी कापा-बरका फणसाने आणि निरनिराळ्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून येणा-या आंब्यांनी अख्खा बाजार भरलेला असतो. मुख्यत: कापा फणसाचे ढीग घेऊन बायका बसलेल्या असतात. पुजेसाठी लागणा-या पाच फळांमधे फणसाचे गरे आणि आंबेदेखील असतात. म्हणून ह्या मे-जून दोन महिन्यात खास अनसा_फणसाची भाजी करायची मज्जा असते... मामाकडून आलेला फणस मम्मीने पाठवून दिला आणि छान अननस देखील मिळाला. वटपौर्णिमा साठी आणलेले पिकलेले गोड दशहरी आंबेदेखील होते. थोडे गोड चवीचे रसाळ आंबे, अर्धपिक्का आंबट गोड अननस, कापा फणसाचे रसरशीत गरे ह्या भाजीला योग्य असतात.


आंबट-तिखट-गोड अशा मिश्र चवीची अशी ही पारंपरिक भाजी ह्या मौसमात अनेकजणी बनवतात. अनसा_फणसाची भाजी ही तशी सारस्वतांची खासियत हे ऐकून होतेच. जेव्हा ह्या भाजीविषयी सई कोरान्ने ह्यांच्या पंगत पुस्तकात वाचले होते तेव्हापासूनच कधी एकदा करते असे झाले होते. पण ही पुस्तकाप्रमाणे तंतोतंत केली नाहीए. ह्या भाजीचे उपवासाची आणि नेहमीची अशी दोन्ही प्रकार आम्ही बनवले. (मुख्य पाककृती मधे धणा जीरा, कोथिंबीर, चिंचेचा कोळ किंवा काजू पाकळी वापरत नाहीत.)


अनसा_फणसाची भाजीला लागणारे साहित्य:

१. एक वाटी अननस मध्यम फोडी करून

२. एक वाटी आंबा लहान फोडी करून आणि साले पिळून काढलेला आंब्याचा रस

३. फणसाचे गरे उभे तुकडे करून

४. मोहरी

५. खवलेले ताजे खोबरे

६. काळमिरे दहा-बारा

७. हिंग

८. बारीक चिरलेली कोथिंबीर

९. उभी चिर पाडून हिरव्या मिरच्या/ किंवा दोन सुक्या बेडगी मिरच्या

१०. रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर

११. गुळ

१२. मीठ

१३. चिंचेचा कोळ (अननसाला थोडाही आंबटपणा नसल्यास)

१४. सेलम हळद पावडर आणि धणा-जीरा पावडर

१५. काजू पाकळी तुपावर लालसर करून

१६. खोबरेल तेल 


 • एका कढईत खोबरेल तेल घालून मोहरी तडतडवली. त्यातच जरासे हिंग आणि उभी चिर दिलेल्या हिरव्या मिरच्या परतल्या. लाल सुक्या मिरच्याही छान चव देतात. 

 • लगेचच अननसाच्या फोडी परतल्या. हळद, मीठ, धणा जीरा पुड, काश्मिरी मिरची पावडर घालून परतल्या. गुळ घातला. आणि फणसाचे तुकडे घातले. एक वाफ काढली.

 • खवलेले खोबरे, काळे मिरे बारीक वाटून घेतले. हे मिश्रण भाजीत घातले. थोडा वेळ परतून मग आंब्याचे काप आणि रस घालून एकत्र केले. थोड्या काजूच्या तुपावर परतलेल्या पाकळ्या घातल्या. आणि जरासा चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर घालून एक वाफ घेतली. छान दरवळ उठला होता. 

अनसा-फणसाची भाजी तय्यार झाली. घडीच्या मऊसुत पोळ्या किंवा भातासोबत अगदी चविष्ट लागते. मला तर नुसती खायलाही आवडते.


--------------------------------------------------------------


आता फणसाचे गरे वापरून झाले मग उरलेल्या फणसाच्या आठल्यांची केलेल्या भाजी ची पाककृती:


 • फणसाच्या आठल्या स्वच्छ धुवून त्यात थोडे पाणी आणि मीठ घालून उकडवून घेतल्या. थंड झाल्यावर वरचे सहज निघणारे आवरण काढून, आठल्याना जरासे चेचले.


 • खवलेले ताजे खोबरे, आल्याचा तुकडा, जीरे, जरासे धणे (उपवासासाठी नसल्यास टाकतो), थोडी काळेमिरी असे पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घेतले. अगदीच बारीक केले नाही.


 • कढईत खोबरेल तेल घालून त्यात जीरे तडतडवले. मुहाना ची वेगवेगळी उत्पादने मागवली होती. त्यात सुरेख असे खोबरेल तेल होते ते वापरले. आठल्या जरा पोटाला बाधू शकतात म्हणून जरासे हिंग, उभी चिर पाडलेल्या मिरच्या असे सर्व तेलात परतावे. लगेचच खोब-याचे बनवलेले वाटण टाकून परतले. जरासा गुळ, मीठ घालून मिक्स केले. आणि चेचलेल्या आठल्या  टाकल्या. आणि छान परतून, झाकणावर थोडेसे पाणी टाकून दहा ते पंधरा मिनिटे वाफेवर ठेवली भाजी.


 • झाकण काढून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मला आवडतो म्हणून जरासा लिंबाचा रस आणि फणसाचे सोललेले गरे टाकून पाच मिनीटे वाफ दिली. 


चमचमीत भाजी तय्यार झाली. ❤️


फणसाच्या अजूनही ब-याच पाककृती आधीच्या पोस्टमधे आहेत. त्याची लिंक खाली दिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10222639461149233&id=1053839802


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


















अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com