Friday, April 19, 2024

वाडवळी चिकन रस्सा आणि सुक्के पध्दती



वाडवळी चिकन रस्सा आणि सुक्के पध्दती आणि चिंचकढी तसेच भाकरीची पध्दत:

वाडवळ- सोमवंशी क्षत्रिय समाजाचे मसाले, स्वयंपाकाच्या पध्दती आणि चविष्ट पारंपरिक पदार्थ त्यांच्या खास शैलीमुळे अन्य समाजातील अनेकांना देखील आवडतात. समुद्रपट्टीला वसलेल्या वाडवळी समाजाच्या माशाची कालवणे, चिकन-मटणाचे चमचमीत रस्से आणि हातवळणीच्या भाक-या आणि वडे हे अतिशय प्रसिद्ध पदार्थ. कोल्हापुरी, कोकणी, मालवणी, आगरी समाजांचे पदार्थ जितके प्रसिद्ध झाले त्यामानाने वाडवळी पदार्थ तोडीस- तोड असूनही विशेष लोकप्रिय होऊ शकले नाहीत. आजकल बरेच जण खुप छान व्हिडिओ आणि लेखाव्दारे वाडवळी पदार्थांबाबत लिहीत आहेत. अनेकांना ते आवडतही आहेत. वाडवळी चिकन, औषधी गावठी चिकन पुडला, सुप फार छान वैशिष्ट्यपूर्ण पाककृती आहेत.


पुर्वी गावाला पाहुणे, जावई वैगरे आले कि चुलीवरची कोंबडी खास तवकटात (म्हणजेच मातीच्या भांड्यात) आणि वडे केले जायचे. पाट्यावर वाटण केले जायचे, वाटण चिकनला लावून चांगले राळले (मुरवत ठेवणे) जायचे आणि खोबरे चुलीत भाजायचे त्याचा छान smoky flavour यायचा.  


आमच्याकडे साखरपुडा आणि व्याही जेवणाला खास मटण किंवा चिकन चे जेवण असते पण हळदीला- लग्नाला आजही बहुतेक ठिकाणी शाकाहारी जेवण असते. आणि लग्नानंतर तिखट जेवण म्हणून खास मटण- चिकन रस्सा, भात- चिंचकढी चा बेत असतो. चिकन-मटणामधे घातलेले बटाटे ही देखील वाडवळी खासियत! रस मुरलेले भन्नाट बटाटे काय भारी लागतात हे मात्र चव घेऊन पाहिली आहे तेच सांगतील! बटाटे आणि सुरण देखील चिकन मधे वापरतो. उत्तम जमून येते चव.


आज तीन प्रकारच्या वाडवळी चिकन (कोंबडी) रस्सा आणि सुके बाबत माहिती लिहते आहे. तसेच औषधी पुडा आणि सुप, आमची भाकरी आणि चिंचकढी यांच्या पाककृती देखील दिल्या आहेत. हे संकलन आहे. सर्व फोटो मिळाले नाहीत. थोडाबहूत प्रत्येकाच्या पध्दतीमधे फरक असू शकतो. वाडवळी मसाला हा २-४ प्रकारच्या मिरच्या आणि २०+ वाणे वापरून बनवलेला असतो. चवीला उत्तम. 


-------------+----------------+-------------+------------+-----


• वाडवळी कोंबडी रस्सा


- साधारण अर्धा किलो चिकन

- दोन बटाटे (मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करून)

- एक मोठा कांदा बारीक चिरून 

- आले- लसूण पेस्ट (दीड चमचा)

- लक्ष्मी मसालेचा डंकावरचा वाडवळी मसाला (दीड- दोन चमचे) तुम्ही कोणताही रोजच्या वापरातील वाडवळी मसाला वापरू शकता.

- तेल गरजेप्रमाणे आणि मीठ चवीनुसार 

- ५-६ काळेमीरे, दोन लवंगा, दोन तमालपत्र, एक बादियान, एक मसाला वेलची आणि २ हिरव्या वेलची, एक इंच दालचिनी चे दोन तुकडे, जरासे जीरे

- लक्ष्मी मसालेची सेलम हळद पावडर अर्धा चमचा

- लक्ष्मी मसाले ची काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा (ऐच्छिक)

- लक्ष्मी मसालेचा गरम मसाला अर्धा ते पाऊण चमचा

- एक वाटी सुके खोबरे, किसून, कढईत परतून लालसर झाले कि मिक्सरमधून फिरवून बारीक करून घेणे.


बनवायची पध्द्त:

- स्वच्छ धुतलेल्या चिकन मधे मीठ, हळद, आले-लसूणाची थोडी पेस्ट आणि दीड चमचा वाडवळी मसाला व्यवस्थित लावून थोडा वेळ मुरवत झाकून ठेवावे.

- गॅसवर मध्यम आचेवर जाड बुडाचे मोठे पातेले ठेवावे. त्यात तेल घालून गरम झाले कि खडे मसाले परतून घ्यावे. 

- बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. उरलेली आलेलसूण पेस्ट मिसळावी. छान परतून झाले की त्यात उरलेला वाडवळी मसाला आणि मुरवत ठेवलेले चिकन टाकून अगदी व्यवस्थित परतून घ्या. वाफेवर खोलगट झाकणात थोडे पाणी ठेवा. 

- १०-१५ मिनिटांनी झाकण काढून वाफेवर ठेवलेले पाणी मिसळा आणि बटाटे घाला. परत थोडा वेळ वाफेवर शिजू द्यावे.

- चिकन आणि बटाटे शिजत आले कि बारीक केलेले भाजलेले खोबरे मिसळून एक वाफ येऊ द्या.

- वरून काश्मिरी मिरची पावडर (ऐच्छिक) आणि गरम मसाला टाकून उकळी येऊ द्या. चिकन आणि बटाटा शिजलेय का ते पहा. मीठ चवीनुसार वाढवायचे असल्यास वाढवा. 


चिकन तयार आहे. वड्यांसोबत आस्वाद घ्या. मटण ही अशाच पध्दतीने बनवले जाते. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू पिळून चव घेऊन पहा. By the way, गावठी तांदळाच्या इडली (नीरा/ ताडी घालून इडली पीठाचे चांदणं देखील बनवतात) सोबत पण चिकन किंवा मटण खायला उत्तम लागते.


-------------+----------------+-------------+------------+-----


• वाडवळी सुके चिकन प्रकार: १


वाडवळी मटण-चिकनमधे बटाटा वापरायची पध्दत आहे.... आमच्या वाडवळ स्वयंपाकात मटणासोबत, चिकनसोबत, रस्स्यात किंवा सुक्या प्रकारात आणि भुजिंगमधेदेखील साले न काढलेले बटाट्याचे काप घातले जातात आणि खुप आवडीने खाल्लेही जातात. मला स्वत:ला मटण-चिकनच्या फोडींपेक्षा त्या रस्सा शोधलेल्या, पिठूळ अशा बटाट्याच्या कापा मनापासून आवडतात. अभिषेक (Husband) ला ह्याबाबत अजिबात कल्पना नव्हती. त्याला माहित असलेल्या कोकण आणि कोल्हापूर कडच्या दोन्ही पध्दतीत असा प्रकार नाही. जेव्हा पहिल्यांदा चिकनमधे बटाटे त्याने पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले, जणू काही असे बटाटे चिकन- मटणाची भाजी वाढवण्यासाठी घालतोय. पण जेव्हा रसात मुरलेल्या बटाट्याच्या फोडीचा आस्वाद त्याने घेतला तेव्हा त्यालाही चव आवडली. अशीच एक वाडवळी चिकनची, बटाटा घालून केलेली छानशी पाककृती ‌पाहुयात. 


माझ्या वसईच्या ओजस्वी वहिनी ची आई प्रतिक्षाकाकी ही मुळत: सुगरण... तिचा लाडका जावई, म्हणजे माझा खवय्या भाऊ प्रथमेश नेहमीच काकींच्या चविष्ट मांसाहारी स्वयंपाकाचे तोंडभरून कौतूक करत असे. अगत्यशील, हौशी अशा काकींकडे वाडवळी पाककृतींचा खजिना आहे. गेल्यावेळी मी ओजस्वीच्या पाठी‌ लागून‌ काकींकडून‌ ही पाककृती मागवली आणि त्यांनीदेखील आवडीने साग्रसंगीत लिहून पाठवली. या वाडवळी सुक्या चिकनची पाककृतीनुसार मी दोन दिवसांपुर्वी चिकन करून‌ पाहिले आणि खरच ते फारच अप्रतिम चवीचे होते. आणि साध्या-सहज उपलब्ध सामुग्रीतून तयार होते हे. 


साहित्य पहा काय लागणार आपल्याला:

१. चिकन: पाऊण किलो

२. बटाटे: २ मध्यम आकाराचे बटाटे (स्वच्छ धुवून व साले‌ न काढता) गोलाकार किंवा चौकोनी कापून

३. कांदे: मध्यम आकाराचे २-३ बारीक चिरून

४. आले: १ ते दीड इंच

५. लसूण पाकळ्या: १०- १२


अख्खे मसाले:

१. दालचिनी: २-३ एक इंचाचे तुकडे

२. खसखस: १ चमचा

३. जीरा: २ मोठे चमचे

४. सफेद तीळ: दीड मोठे चमचे

५. काळे मिरे: १५-१६ (तिखट हवे असल्यास जास्त वाढवा.)

६. मीठ: चवीनुसार

७. सेलम हळद पावडर


तडक्यासाठी:

१. तमालपत्र २

२. लवंग ४-५


चला तर मस्त वाडवळी सुक्के चिकन कसे बनवायचे ते पाहूया.

१. दालचिनी, खसखस, जीरा, सफेद तीळ, काळे मिरे हलकेच एखादं मिनिटासाठी कढईत भाजून परतून घ्या. थंड झाल्यावर हे मिश्रण, कांदा, लसूण पाकळ्या आणि आले तुकडा ह्यासोबत अगदी थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करून  घ्या.

२. धुवून पाणी निथळून घेतलेल्या चिकनला आणि बटाटे यांना ही पेस्ट आणि मीठ व हळद अगदी व्यवस्थित चोळून २-३ तास चांगले मॅरिनेट होऊ द्या.‌ (मी थोडासा गरम मसाला आणि लिंबू रस पण वापरला. जो पुर्णपणे ऐच्छिक आहे)

३. कढईत तेल गरम करा. आणि तमालपत्र आणि लवंगा फोडणीला टाका. (मी मिरची, कढीपत्ता आणि दोन हिरव्या वेलची सहज वापरल्या आहेत. नाही वापरल्या तरी चालतील.) लगेचच मॅरिनेट करत ठेवलेले चिकन आणि बटाटे टाकून अगदी व्यवस्थित परता. 

४. अगदी थोडेसे पाणी घाला आणि झाकणावर पाणी ठेऊन वाफेवर चिकन छान शिजवा. 

शिजल्यानंतर मोठ्या आचेवर गॅस करून पटापट चिकन वरखाली करून घ्या. असे परतून‌ अजून छान लागते.


शिजल्यानंतर चिकनचा अर्क उतरलेली जी जाड रस्सासदृश्य 'निखवण' म्हणजेच हे चटणी तयार होते ती चटणी, रस शोषलेला बटाटा गरमागरम भाताबरोबर कालवून कधी खाऊन पहा. अगदी भन्नाट चव असते. चिकनच्या फोडीपेक्षाही उत्तम.


-------------+----------------+-------------+------------+-----


• वाडवळी सुके चिकन प्रकार: २


साहित्य चिकन रस्सा साठी लिहीलेले आहे तेच घ्यायचे आहे. कांदे मात्र तीन- चार घ्या आणि  पध्दत थोडी निराळी आहे.


स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनला आणि बटाट्यांच्या फोडींना जरा जाडसर वाटलेले आले-लसूण भरड, मीठ, हळद, वाडवळी मसाला आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मुरवत ठेवावे.

तापलेल्या तेलात फोडणीला खडा मसाला घालून परतायचे. थोडे साजूक तूप पण टाका. बारीक चिरलेले ३-४ कांदे टाकून अगदी चांगले परतून घ्यायचे. थोडी आले लसूण भरड, वाडवळी मसाला टाकून परतायचे. मुरवत ठेवलेले चिकन टाकून परतायचे. झाकणामधे वाफेवर पाणी ठेवायचे. दहा मिनिटांनी वाफेवर ठेवलेले झाकणातील थोडे थोडे पाणी घालून चिकन परतून घ्या. भाजलेले- बारीक केलेले सुके खोबरे टाकून परतावे. परत झाकण ठेवावे.‌ चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत थोडे थोडे पाणी घालत वाफेवर शिजवावे. चिकन शिजल्यावर वरून गरम मसाला घालून एकदा वाफ काढावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. भाकरीसोबत चविष्ट लागते.


-------------+----------------+-------------+------------+-----


• चिकन सुप for Soul! ❤️✨🌿


आजारपणानंतर कोणी जवळचे नातेवाईक, स्टीलचा उभा फिरकीचा डब्यामधे पिलुचा सुप घेऊन येणे फार जिव्हाळ्याचे समजले जाई. सामिष आहार पद्धती असलेल्या आमच्याकडे ऑपरेशन वैगरे झाले असता, हाडांची झीज व जखम लौकर भरावी, ताकदी यावी, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून पाया सुप, सर्दी कमी व्हावी म्हणून चिंबोरी रस, विशेषतः पावसाळा- थंडीत, शरीरात ऊब राहावी, प्रतिकारशक्ती टिकून राहावी म्हणून कोवळ्या चिकनचे सुप हे वरचेवर होत असते. कफाची बाधा झाली असेल तर कफ सुटायला देखील मदत होते हा माझा स्वत:चा देखील अनुभव आहे. दुपारी किंवा संध्याकाळी जेवणा अगोदर हे गरमागरम घोट-घोट पिणे महत्वाचे. आणि कोंबडी/ कोंबडा गावठी आणि कोवळा असावा. 


हे चिकनचे सुप म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीने बनवतात, मसाल्यांचा आणि इतर जिन्नसांचा खुप डामडौल अजिबात नसतोच. तरीही चवीला छान लागते. लहान मुले, वयस्कर व्यक्ती देखील पिऊ शकतात. हे सुप देखील घरोघरी वेगवेगळ्या पध्द्तीने केले जाते. मी आमची पध्द्त सांगते. हाडांचा भाग जास्त असलेले, शक्यतो कोवळ्या चिकनचे ताजे तुकडे महत्वाचे आहेत. हाडांचा रस उकळवताना निघाला पाहिजे. ते जास्त महत्त्वाचे ठरते.


काही जण उकडलेले चिकन मिक्सरला बारीक करून तो सुपसाठी वापरतात पण ते फार जड होते आणि दाट असल्यामुळे प्यायला सगळ्यांनाच आवडते असे नाही.


साहित्य पाहूया काय लागेल:

 • पाव किलो हाडे जास्त असलेले चिकनचे बारीक केलेले तुकडे (बोनलेस वापरत नाहीत शक्यतो.)

 • आलेलसूण- कोथिंबीर पेस्ट 

 • दालचिनी तुकडा

 • तमालपत्र १-२

 • काळेमिरे ६-७ (तुम्हाला कितपत तिखट लागते त्यानुसार)

 • लवंग १

 • जीरे अर्धा चमचा

 • मीठ

 • अर्ध्या लिंबूचा रस (मुळ पाककृती मधे वापर करत नाहीत)

 • धणा जीरा पावडर

 • अगदी नावाला गरम मसाला

 • साजूक तूप

 • बारीक चिरलेली कोथिंबीर

 • बारीक चिरलेला लसूण

 • हळद पावडर

 • चिकनच्या अडिच पट गरम पाणी


कोणतेही सुप मंद आचेवर बराच वेळ शिजवणे आणि आटवणे महत्वाचे असते म्हणून शक्यतो लवकर बनवायला घेऊन तुम्ही मंद आचेवर शिजवू शकता. पण आज मी तुम्हाला दाखवतेय ते कुकरमधले लवकर होणारे सुप.


 • तर चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. वरवंट्याने हाडांवर बारीक एखादी चीर पडेल इतपत फोडा. बारीक तुकडे पडता कामा नये. बारीक केलेले आले-लसूण-कोथिंबीर, मीठ, हळद पावडर सर्व चिकनला व्यवस्थित चोळून घ्या.


 • गॅस वर कुकर गरम झाला की, त्यात साजूक तूप टाकावे. थोडे गरम झाले की जिरा, दालचिनी, काळेमिरे, तमालपत्र, लवंग टाकून परतावे. बारीक चिरलेला लसूण लालसर परतुन घ्यावा. 


 • लगेच मॅरिनेट केलेले चिकन टाकून पाच मिनिटे छान परतावे. धणाजीरा पावडर आणि अगदी नावाला गरम मसाला टाकून परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जरासा लिंबाचा रस (नाही टाकला तरी चालतो) मिसळून चिकनच्या साधारण अडीच पण गरम पाणी त्यात ओता. एक उकळी आली कि कुकरला ५-६ शिट्या करून घ्या. 


 • वाफ गेल्यावर झाकण खोलून थोडी कोथिंबीर अजून मिसळा आणि १० मिनीटे रस उकळवून आटू द्या. सर्व्ह करताना अख्खे मसाले काढून टाका. एक-दोन तुकडे आणि रस्सा असे वाढा.


मुख्य म्हणजे गरमागरम प्यायला सांगा!


-------------+----------------+-------------+------------+-----


• केळीच्या पानातील बिनतेला-तुपातला गावठी चिकनचा पुडला

(खास खोकल्यावर गुणकारी आणि बाळंतीणीसाठी)


४००-५०० ग्रॅम ची छोटी गावठी कोंबडी सोलून साफ करून घ्या. २५०-  ३०० ग्रॅम पर्यंत चिकन मिळेल. स्वच्छ धुतलेल्या चिकनला एक लहान चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळेमिरे पावडर, एक चमचा जीरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित चोळून घ्या. १५-३० मिनिटे मुरू द्या. तेल- तुप काहीही वापरायचे नाही.


केळीची मोठी पाने घ्यायची. एक पान मोठे अखंड ठेवायचे आणि ६-७ पाने लहान करावीत. पाने धुवून पुसून मग त्यांना गॅसच्या आचेवर फिरवून मऊसर करून घ्यायची. मुरवत ठेवलेले सर्व चिकन एका मध्यम आकाराच्या पानावर ठेऊन पानांनी चारही बाजूने व्यवस्थित पुडला बांधत जा. त्या पुडल्याला दुस-या पानात ठेवून परत पुडला बांधा. असे २-३ पुडले बांधून मोठ्या पानात बांधा आणि केळीच्या पानांच्या वाकीने किंवा सुताने घट्ट बांधा. चुलीवर खोलगट जाडसर कढई ठेवून मग त्यात हा पुडला पुर्ण बसेल असा ठेवा. वरून झाकण ठेवा. वाफेवर १५ मिनिटे शिजू दया आणि मग झाकण काढून पुडला उलटा करा. दुसऱ्या बाजूने देखील १५-२० मिनिटे शिजू द्या. (चुलीवर किंवा गॅसवर करू शकता. पण आच मध्यम ठेवा.) 


आचेवरून कढई बाजूला काढून १०-१५ मिनिटे तसेच ठेवा. आणि मग पुडला काढून अलगद खोला. छान दरवळ उठतो. केळीच्या पानाचा अर्कात तयार झालेले गावठी चिकन म्हणजेच तयार पुडला चिकन केळीच्या पानात काढून वाढा. खाल्ल्यानंतर थोडा वेळ पाणी पिऊ नये. औषधी म्हणून हे चिकन बनवले जाते म्हणून खाल्ल्यानंतर त्याचे गुणधर्म चांगल्या प्रकारे लाभावेत म्हणून पाणी लगेच पित नाहीत. फार गुणकारी आहे.


-------------+----------------+-------------+------------+-----


• तांदूळाची भाकरी: 


ही भाकरी साध्या unpolished रत्ना तांदूळाला किंवा कणीला बारीक भरडून केलेल्या पिठाची असते.

पीठात डोस्यासारखी flowing consistency मिळेल इतपत पाणी आणि मीठ घालून पीठ मस्त मळतात. मग मोठ्या तव्यावर खोलगट चमच्याने पीठ टाकून गोलाकार मोठा पसरवत जातात. वरुन एक मिनिटाकरता झाकण ठेवून लगेच झाकण काढल्यावर भाकरी कालथ्याने काढली कि तयार. काही जणी तर हातानेच गरम तव्यावर लयबध्द् गोल फिरवत भाकरी बनवतात. थोडीशी Crispy पण खाताना मऊ असते मस्त.


-------------+----------------+-------------+------------+-----


• चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार (शिसोणी)


ही चिंचकढी दोन पध्द्तीने बनवतात. एक कच्चे चिंचेचे सार आणि दुसरी उकळी आणून कढवलेली चिंचेची कढी. विरार आगाशी आणि वसई पट्ट्यातील काही वाडवळ महिला अप्रतिम अशी चिंचकढी करण्यात माहिर आहेत. आपण आज उकळी देऊन केलेली चिंचकढी पाहणार आहोत. चिंचकढी आणि मऊसर भाताचा पहिलाच घास, मनाला एडवणच्या घरी अलवार पोहोचवतो. ढोबळमानाने अशी पध्द्त थोड्याबहुत फरकाने वापरली जाते.


चिंचकढीसाठी आपल्याला खालील साहित्य लागते:

- मुठभर आंबट चिंचेच्या कोळाचे पाणी

- पातळ उभा लांबट चिरलेला कांदा

- कढीपत्ता

- दोन-तीन बारीक चिरलेल्या मिरच्या

- आलेलसूण पेस्ट

- थोडासा गुळ

- चवीपुरते मीठ

- जराशी साखर

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- सेलम हळद पावडर


१. बारीक उभा चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, मीठ एका भांड्यात घेऊन जोर लावून कुस्करावे.

२. एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यामधे तेल गरम  करा. लगेचच अगदी थोड्याशा राई जीरा-हिंगाची फोडणी करा. त्यात हे कुस्करलेले मिश्रण आणि आले-लसूण परतवा, थोडेसे शिजवा आणि चिंचेचे पाणी आणि गुळ टाका. 

मस्त उकळी येऊ द्या आणि बघा ही चटपटीत चिंचकढी झालीसुध्दा तय्यार.

काहीवेळा आमच्याकडील वाडवळी लग्नातील तिखटजेवणावेळी सुक्के चिकन, मटण रस्सा, चिकन तंदूरी, भातासोबत चिंचकढी ठेवतात. सुके मासे वापरून केलेल्या पदार्थांनाही चिंचकढी उत्तम चविष्ट साथ देते. तुम्हीदेखील सहज म्हणून करून खाऊन पहाच!

• चिंचेचे कच्चे सार:

१. एक कांदा उभा पातळ किंवा अगदी बारीक चिरून

२. एक ते दोन मिरच्या (तिखटाचे प्रमाण कितपत हवे त्यानुसार)

३. कोथिंबीर बारीक चिरून

४. चवीनुसार मीठ

५. गुळ किसून

६. चिंचेच्या कोळाचे पाणी

७. पातीचा कांदा

चिंचेच्या कोळाचे पाणी सोडून बाकी सगळे एका खोलगट भांड्यात एकत्र करायचे आणि छान कुस्करायचे. कांद्याचे पाणी सुटेल आणि इतरही स्वाद एकत्र उतरतील. त्यानंतर चिंचेच्या कोळाचे पाणी टाकायचे. आणि ढवळायचे. झटपट होणारे चटपटीत चिंचेचे सार अगदी जबरदस्त लागते. चिकन मटण असो वा मासे, भातावर सार घेऊन प्यायला किंवा नुसतेच वाटीभर प्यायला मस्त लागते चव. 

गावी आवणी/ रोपणी च्या शेवटच्या दिवशी काही मालक हौसेने चिकन रस्सा देतात आवणी मजुरांना तेव्हादेखील भातावर वाढायला आवर्जून चिंचकढी बनवतात. Combination अगदी झक्कास लागते बघा!

#चिकनसुक्के #chicken #vadval #chickenrecipe #vadvali_food #वाडवळी #वाडवळ #वाडवळीकोंबडीरस्सा

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर



















Friday, March 22, 2024

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold
























भारतीय मसाले: प्रकार १०:

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold

शिरा छान वाफेवर फुलत असताना, पितळेच्या भारदस्त ओखलीत (छोटा खलबत्ता), लगबगीने, लयबध्द आवाजात वेलदोडा खलत बसलेली आज्जी अगदी डोळ्यासमोर येते. ताज्या वेलची पुड ची मजाच वेगळी असायची. रोजच्या मसाल्यांच्या डब्याव्यतिरिक्त खास शाही आणि महागड्या मसाल्यांच्या डब्यात, पिशवीत बांधलेल्या लवंगा, शहाजीरे, जायवंत्री, जायफळ, तमालपत्रांच्या सोबतीला हिरवट- पिवळट वेलची असायची. गोड पदार्थ करताना डब्यातून मोजून वेलची बाहेर काढल्या जायच्या.

दुधात‌ साखर, चहा पावडर,‌ आले आणि हिरवी वेलची घालून छान उकळवून प्यालेला मसाला चहा अगदी चुटकीसरशी ताजेतवाने करून टाकतो. मोदकाच्या सारणाच्या प्रत्येक घासागणिक जाणवणा-या वेलचीच्या सौम्य चवीने देखील अगदी छान वाटते. हिरवी वेलची म्हणजे आपणा भारतीयांच्या स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या साबूत मसाल्यांमधील एक महत्त्वाचा जिन्नस. किंमतीमुळे महागड्या शाही मसाल्यांमधील एक. हिरव्या वेलचीला True cardamom, green cardamom, small cardamom, Queen of spices म्हटले जाते. केरळमध्ये परंपरागत वेलचीचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या केला जातोय. दक्षिण भारतात केरळात मोठाल्या बागायती आपल्या बघायला मिळतात. कर्नाटक, तामिळनाडू पट्ट्यात देखील लागवड होते. भारतात जरी केरळ हाच मुख्य उत्पादक असला. तरी जगभरात भारताच्याही पुढे, मध्य अमेरिकेतील Guatemala (ग्वाटेमला) हा देश प्रमुख आणि सगळ्यात जास्त उत्पादन करणारा आहे. आपल्या भारतात, मुंबईत देखील ग्वाटेमाला वेलची उपलब्ध आहे. ग्वाटेमाला वेलची आपल्या भारतीय वेलची पेक्षा गडद हिरव्या रंगाची आणि अव्वल दर्जाची वेलची आहे. ग्वाटेमाला मधे वेलची लागवड अगदी १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच झाली, तरीही उत्तम पोषक वातावरणाच्या आणि मेहनतीच्या जोरावर, भारतापेक्षा अव्वल उत्पादक म्हणून नावाजला गेला. भारत देखील इतर मसाल्यांसोबत मोठ्या प्रमाणात वेलचीची अरब देशात निर्यात करतो. 

वेलची भारतात निरनिराळे मसाले बनवणे, मिठाई, आम पन्ना (पन्हे) सारखी पेय, गोड पदार्थ, बिर्याणी- पुलाव सारखे कैक भाताचे प्रकार, मांस- मटण ह्यांची सिझनिंग तसेच शाही मसाले तडका ह्यामध्ये वापरतात. काही खास महाराष्ट्रीय पदार्थ, शाही मिठाई मधे वेलचीचा सुगंध आणि स्वाद पदार्थांचा स्वाद खुलवतो. तेलावर  मांसाहारी चिकन मटणाचे पदार्थ आणि बिर्याणी चा स्वाद‌ देखील वधारते.

वेलचीचा वापर नैराश्य असलेले आजार, पचनसंस्था संबंधित व्यथा ह्यासाठी देखील होतो. वेलचीचे चांदीचा वर्ख लावलेले दाणे, तोंडाची दुर्गंधी दुर करण्यास, जेवणानंतर चघळण्यासाठी देखील वापरले जातात. वेलचीचे आकर्षक असे गुंफलेले सुबक हार देवाला चढवले जातात. लग्नसमारंभात नवरा नवरीला घालण्यासाठी देखील हिरव्यागार वेलचीचे हार, हौशी मंडळी बनवून घेतात. फारच  छान दिसतात हे हार.

वेलची आवरणाचे पिवळसर, हिरवट, गडद हिरवी, पांढरट पिवळी असे रंग असतात. दर्जेदार वेलचीची बाजारातील प्रत ही वेलचीची रूंदी, आवरणाचा हिरवेगारपणा आणि भरलेला (single seed or double seed) दाणा ह्यावर आधारीत असतो. 5 mm, 6 mm, 7 mm, 8 mm, 8+ mm आणि त्याहून थोडी मोठी अशा वेलचीच्या प्रत आणि त्यानुसार रोज ठरणारे भाव असतात. त्यातही ७०-८०% भरलेला दाणा, हिरवा रंग असे मुद्दे महत्वाचे ठरतात. व्यापारी भाषेत, rejection cardamom म्हणजे लहान आकारातील, वरचे आवरण अर्धवट उघडलेले, अपरिपक्व खुडणी झालेल्या, थोड्याशा दुमडलेल्या आकार बिघडलेल्या, निरनिराळ्या आकारातील लहान मोठ्या वेलची यांचा समावेश असतो. हे rejection/ split cardamom, दळण्यासाठी वापरता येतात. वरचे आवरण सोलून मोकळा केलेला वेलची दाणा (single or double seed) हा वेलची पावडर करण्यास वापरतात. Per liter gram असे मोजमाप ह्या व्यवसायात महत्त्वाचे ठरते‌. एक लिटर द्रव्य पदार्थ ज्या मोजमापाच्या भांड्यात राहतो, त्या भांड्यात पुरेपूर भरून, ८ mm किंवा कोणत्याही विशिष्ट आकारातील किती नग वेलची राहतात ती संख्या म्हणजे Per liter gram. 

दक्षिण भारतातील काही प्रदेशात आणि प्रामुख्याने केरळात होणारी वेलची लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, डोंगर उतारावरील जमिन, सावली असलेली जागा आवश्यक असते.

हिरवी वेलचीचे झुडूप असते. झुडूपाच्या तळाशी/ बुडाशी येणा-या सरळ काड्यांना वेलचीची सुरेख पांढरी फुले येतात ज्यावर जांभळट छटा असते. ह्या फुलांचे वेलची मधे रूपांतर होते. एका काडीवरील, सर्व वेलची एकदाच पक्व न होता, टप्प्याटप्प्याने तयार होत जातात. वेलची खुडण्यासाठी अनुभवी कामगार लागतात. कारण काढणीवेळी, खुडण्यासाठी कोणती वेलची योग्य आहे ते कळणे आवश्यक असते. खुडताना पण नखांनी वेलदोडा अलगद वेगळा करावा लागतो, जेणे करून इतर अपरिपक्व किंवा कोवळ्या फुलांना वा फळांना धक्का लागू नये. पाय दुमडून, कमरेत वाकून बसलेल्या स्थितीमध्ये, वेलचीची काढणी करणारे हे कुशल मनुष्यबळ केरळातील किंवा आजूबाजूच्या राज्यांमधून स्थलांतरित झालेले असते. अनेकांच्या पिढ्यानपिढ्या वेलची लागवड, काढणीमधे कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत.

सुकवलेल्या वेलचीदाण्यापासून रोपे बनवायचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. पण तशा वेलदोड्यांना वापरून खुप नगण्य प्रमाणात दर्जेदार रोपे तयार होतात. तसेच वातावरण देखील खास प्रकारचे पोषक असे आवश्यक असते. लागवडीकरीता झुडूपावर काही पक्व वेलची मुद्दाम ठेवल्या जातात, ज्यांच्यामधून वेलची दाणे काढून खास प्रक्रियेव्दारे रोपे बनवली जातात. सप्टेंबर- नोव्हेंबर दरम्यान वेलचीची तोड असते. कधीकधी पार फेब्रुवारी पर्यंत थोड्या अधिक प्रमाणात वेलची खुडणी चालू‌ राहते.

केरळमध्ये गेल्यावर अनेक ठिकाणी मसाला बागायती किंवा वेगवेगळ्या मसाल्यांची लागवड केलेले खास Spice farms पर्यटनासाठी उपलब्ध असतात. तिथे प्रशिक्षित, मसाल्यांची माहिती असलेला कर्मचारी वर्ग, सर्व मसालापिकांची आणि वापराची माहिती देतो. तिथे वेलची ची झुडूपे सहज पाहता येतात. सगळ्या मसाला पिके,‌ काॅफी, चहा आणि अन्य वनौषधी वैगरे व्यवस्थित माहिती मिळते.

वेलची जेव्हा खुडली जाते तेव्हा ती फुगीर आणि हिरवीगार असते. Capsule म्हणतात त्याला आणि Pods. लंआतील दाणे ब्राऊन किंवा काळसर रंगाचे आणि थोडे चिकटसर असतात. वेलचीचे फळ जमिनीलगतच्या काड्यांवर आल्याने बहुतेकदा त्यावर माती लागलेली असू शकते. काही ठिकाणी हि पुर्ण काढणी पाण्याने धुऊन मग पुढच्या प्रक्रियेतून जाते. पारंपरिक पद्धतीने, ५-७ दिवस कडकडीत उन्हात सुकवून देखील वेलची साठवणूकीसाठी तयार करता येते. पण आजकाल, बहुतांशी ही वेलची काढल्यानंतर लगेचच काही वेळात, ड्रायर मधे सुकवली जाते. व्यावसायिक ड्रायर अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतात. वेलची झुडूपावरून काढून ड्रायर मधे टाकायच्या आधी, जास्त काळ बाहेर राहिल्यास, आवरणाच्या हिरव्या रंगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून कुशल अनुभवी मनुष्यबळ महत्वाचे ठरते.

मरियम रेशी या प्रसिध्द लेखिकेच्या, The Flavour of Spices ह्या पुस्तकात, मरियम ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण २०० किलो वेलची ही सुकवण्याच्या प्रक्रियेतून जवळपास ४० किलो पर्यंत उरते तेव्हा ती विक्रीयोग्य असते. एवढी आद्रता निघून गेल्यावर वेलची साठवणूक आणि वापरण्यास योग्य होते. वेलची त्यामुळेच एक शाही आणि महागड्या मसाल्यांमधे गणली जाते. 

घरगुती वापरासाठी वेलची साठवताना कोरड्या बरणीत ठेवावी. पण नैसर्गिकरीत्या रंग हळूहळू पिवळसर होत जातो. हिरवीगार वेलची फ्रिजमध्ये ठेवल्यास मात्र रंग छान हिरवाच राहतो. व्यावसायिकरित्या वेलची पावडर करताना वेलचीदाणा   भरडला जातो. चाळणा मारून बारीक पावडर केली जाते. घरगुती स्वरूपात वेलची पावडर करताना, काही जण वेलची दाणा मोकळा करून, दाणा भरडून घेतात. किंवा काही जण अख्खी वेलची पॅनमधे ३-५ मिनिटे, मंद आचेवर परतून घेतात. थंड झाल्यावर नुसती वेलची भरड स्वरूपात वाटून घेतात. काही साखर आणि वेलची एकत्र भरडून घेतात. पुड केल्यावर कोरड्या हवाबंद बरणीत २-३ महिने देखील चांगली राहते पावडर. पण अर्थातच ताज्या वेलची पुड ची लज्जतच वेगळी. तसेच वेलची अर्क असलेले केशर वेलची सिरप, वेलची अर्क ही बाजारात मिळतात.

बाकी वेलचीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, काही देशांमधे उत्तम उचल आहे. जानेवारी ते मे मसाला बनवायचा हंगाम म्हणून गरम मसाल्यात वापरण्यास आणि गणपती- दिवाळी दरम्यान मागणी आणि बाजारभाव बहुदा जास्त असतात. बाकी वेलची बाबत तुमच्याकडे काही छान आठवणी माहिती असाल तर नक्की सांगा.

#वेलची #cardamom #हिरवीवेलची #वेलदोडा #greencardamom

Note: ह्या लेखातील बहुतेक फोटो स्वतः काढलेले, काही ओजस्वी चौधरी वहिनीने पाठवलेले तर‌ काही Royalty free photo माहितीसाठी घेतलेले आहेत. इंटरनेटवरून वेलची हारचे फोटो screenshot पोस्टकर्त्यांच्या नावासकट घेतले आहेत.


Saturday, February 10, 2024

मेथी-मटार-मलई

मेथी-मटार-मलई ही उत्तर भारतीय लोकप्रिय भाजी आहे. दाटसर अशी ही भाजी सफेद ग्रेव्ही, पिवळसर ग्रेव्ही किंवा लाल ग्रेव्ही अशा तिन्ही प्रकारात चवीला छानच लागते. थंडीमधे ताजी मेथी आणि हंगामातील गोडूस मटारदाणे वापरून केलेली ही भाजी, गरमागरम पराठा, चपाती, रोटी सोबत खायला एकदम भारी!

मेथीच मेथी आलेय घरी. परवाच, केळीच्या पानात, नारळाच्या झावळीच्या दो-यांनी, रबरांनी बांधून घरून, मम्मीने एडवणवरून माझ्यासाठी आणि आजूबाजूला वाटायला पाठवलेल्या कोवळी मेथीच्या जुड्या पाठवल्या.🍀💚 मम्मीने एडवणला हौस म्हणून लावलेले हे हिरव्या गालीच्यांचे थोडेसे वाफे पण कमालीचा आनंद देतात. ताज्या मेथीच्या जुड्या भरभरून वाटून देखील उरल्या. त्यामुळे आता थोडे दिवस तरी ताज्या मेथीच्या पाककृती होणार आणि पोस्ट केल्या जाणार.

मेथी-मटर-मलाई ची सफेद किंवा पिवळसर ग्रेव्ही घरी विशेष आवडत नसल्याने लाल रंगाची ग्रेव्ही केली.

१. मेथी चार-पाचदा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन घेतली. माती राहणार नाही ह्याची काळजी घेऊन, निथळत ठेवली. हे खुप महत्वाचे आहे, नाहीतर खाताना हलकी कचकच जाणवते. मेथी जरा चिरून त्यावर हलकेसे मीठ मिसळून पंधरा मिनिटे ठेवले. मग जरा कुस्करून मेथी चे पाणी पिळून काढले. परत एकदा पाण्याने धुऊन पिळून निथळत ठेवली. त्यामुळे कडवटपणा थोडासा कमी होतो.

२. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दोन चिरलेले कांदे, १४-१५ काजू, अर्धा इंच आले, ६-७ लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि दोन टाॅमेटो असे थोडे मीठ टाकून चांगले परतून घेतले. पिवळी किंवा सफेद ग्रेव्ही करताना कोथिंबीर आणि टाॅमेटो टाळावे.‌ आवडीप्रमाणे काजू आणि कांदा वाढवावा. हे थंड करून, मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतले.

३. पॅनमध्ये, जरासे तेल घालून मेथी परतून घ्यावी. आणि बाहेर काढून ठेवावी.

४. परत तेल गरम करून, दोन हिरवी वेलची, दोन लवंगा, ३-४ काळेमिरे परतून घ्यावी. जीरे टाकावे. मग आपण केलेली लाल ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्या. चवीनुसार मीठ, थोडी जास्तीची साखर आणि लक्ष्मी मसालेचा गरम मसाला, रोजच्या वापरातील खास डंकावर बनवलेला स्पेशल वाडवळी मसाला, धणा पावडर आणि जीरा पावडर मिसळून चांगले परतून घ्यावे.

५. दहा मिनिटे पाण्यात वाफवलेले मटारचे दाणे ग्रेव्ही मधे टाकले, परतलेली मेथी देखील घातली आणि मिसळून घेतले.

६. दोन वाटी दुधाची दाट साय मिक्सरमधून हलकेच फिरवली. (किंवा बाजारात मिळणारे तयार क्रिम पण वापरता येते.)
एका भांड्यात थोडी भाजी काढली आणि त्यात ही वाटलेली साय टाकून चांगले ढवळली. मग सर्व मुख्य भाजीत मिसळले. ह्यामुळे भाजी साय मिसळूनही फाटत नाही. सतत ढवळत जरा शिजवून घेतली. वरून किचन किंग मसाला भुरभुरवला आणि भाजी गरमागरम पराठ्यासोबत सर्व्ह केली. सोबतीला ताजे झटपट केलेले कैरीचे लोणचे.

मेथीच्या भाजीला नाक मुरडणारेदेखील, चवीने खातात ही भाजी...

(मेथी मुळे, चवीला जरा कडवट लागू शकते. कहीजण अगदीच कमी प्रमाणात मेथी घालतात आणि साखर जास्तीची घालतात म्हणजे कडवटपणा जाणवत नाही.)

#मेथी_मटर_मलाई #मेथी_मटर_मलई #मेथी #एडवण #मेथीचीभाजी