Sunday, October 31, 2021

पातळ_पोह्यांचा_चिवडा_दिवाळी_फराळ

पातळ पोह्यांचा झट-के-पट चिवडा ❤️🌶️🍋🌿

दिवाळीच्या फराळात हा हमखास घरोघरी बनतो. आणि कधीही निवांत वेळेत खायलाही मज्जा येते आणि हो चिवडा खाता खाताच चिवड्याची पाककृती लिहायला पण गंमत वाट्टेय... 😛

लाॅकडाऊनमुळे थोडा निवांतपणा होता... भुक जरा जास्तच लागतेय जणू... संध्याकाळी चहानंतर किंवा चहासोबत हलकेफुलके काहीतरी खायला म्हणून आईने पातळ पोह्यांचा चिवडा आत्तापर्यंत दोनदा-तिनदा केला. मस्त लागतो चवीला आणि छोट्या-छोट्या भुकेला अगदी योग्य! ❤️😍

अगदी घराघरात सगळ्यांनाच येतो हा बनवता... म्हणून आज सहजच प्रमाणाविना लिहीतेय...अगदी अंदाजे... कारण आहेच पाककृती अगदी साधी...अंदाजाने कुणीही अगदी Perfect बनवू शकेल अशी... 🙂 लिहीतेय म्हणजे कोणालातरी ही पोस्ट बघून चिवडा करायचे आठवेल आणि पोटभरीचा अजून एक झटपट होणारा पदार्थ झाल्याने थोड्या काळासाठी का होईना घरातल्यांच्या 'काहीतरी आहे का खायला?!' ला वाटी भरून चमचमीत उत्तर द्यायला मिळेल. 😛

तर चिवडा बनवण्यासाठी, पातळ पोहे घ्या जरा निवडून आणि गरम करत ठेवलेल्या मोठ्या कढईत अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजा! बाजूला काढून ठेवा. (हे पातळ पोहे एखादा दिवस कडक उन्हात ठेवले तरी चालेल.)
कढईत तेल घालून त्यात राई, जिरे, भरपुर कढीपत्ता, सुक्या खोब-याचे तुकडे, शेंगदाणे, डाळे, हिरव्या मिरच्या आणि काळ्या मनूका न करपवता खरपुस भाजून घ्या. काजू असतील तर ते पण टाका.

त्यात हळद पावडर, मीठ आणि साखर टाकून परता. आवडत असल्यास थोडासा लिंबाचा रस ओता. आणि मग आपण आधीच भाजून ठेवलेले पोहे ह्यामधे ओता. आणि वरखाली करत सर्व पोह्यांना इतर जिन्नस व्यवस्थित लागेल असे परता. चिवड्याला हलका शेक गॅसवर द्या.

आणि तुमचा पातळ पोह्यांचा हलकाफुलका पण चवदार चिवडा तय्यार! 😍

चिवडा फॅनखाली किंवा हवेवर ठेऊ नये. जरा थंड झाला‌ की पिशवीमध्ये भरून हवाबंद करून डब्यात ठेवा.

मस्त चहासोबत आस्वाद घ्या!

#चिवडा #jhatpat_recipes #chivada #pohe_chivada #food #marathi_food







Saturday, October 30, 2021

केळफुलाची भजी

 हिरव्यागार बहरलेल्या केळी-नारळांचा आमचा पट्टा... त्यामुळे बहुतेकांकडे परसातील केळी, केळफूले मुबलक.‌ केळ्याचे घड एकदा तय्यार झाले कि केळफुल काढून टाकतात. लालसर- मरून- गुलाबी मलमली छटेच्या उलगडत्या पाकळ्यांच्या आवरणातील केळीची फुले फारच मोहक दिसतात.

केळफुलाची भाजी, वडी, केळीच्याच पानातील पानगी, भानोल्यामधे टाकलेले केळफुल अशा वेगवेगळ्या प्रकारे केळफूल आमच्याकडे खाल्ले जाते. केळफुल साफ करायला मला अतिशय मज्जा यायची पण केळफुल खायला मात्र‌ मलाच काय घरच्यांनाही अजिबात नाही आवडायचे. 

प्लॅंटवर लावलेल्या केळींमुळे विरारला देखील केळफुले भरपुर मिळायची. पण आवडतच नाहीत विशेष म्हणून कधी खास लक्ष दिले नाही. पण गेल्याच महिन्यात केळफुलाच्या भज्यांचा फोटो आमच्या केळवारोडच्या भक्तीदिदीच्या स्टेटस वर दिसला‌. भक्ती दिदी नेहमीच तिच्या मुलांनी आवडीने निरनिराळ्या भाज्या खाव्यात म्हणून पोषक पाककृतींचे प्रयोग करत असते. त्यातलाच हा एक.‌ लगेचच तिची पाककृती मागितली आणि केळफुलांची भजी आईने बनवली. पाककृती व्यतिरिक्त आईने थोडे अख्खे धणे हलकेच भाजून, जाडसर भरडून घातले.

पाककृती तिच्याच शब्दांत, भक्तीदिदीने जशी पाठवली तशी खाली दिली आहे. खरेच करून पहा. कांद्याची खेकडा भजी जशी लागते चवीला तशीच खुप छान लागते.

"केळफुलाची भजी:

1. केळफूल साफ करून थोडी लांबटच कापावी. हळद, मसाला आणि मिठ चोळून ठेवावे.

2. भजीचे पीठ तयार करण्यास घ्यावे. भाकरी साठी वापरतो ते जाडसर तांदळाचे पिठ, चण्याचे पीठ आणि थोडे उडीदाचे पिठ घालावे. उडीद भिजवुन वाटले तरी चालतील.

3. थोडा ओवा व थोडे तिळ भाजुन घाला. आले, लसुण, मिर्ची, कढीपत्ता, कोथिंबीर याचे वाटण आणि पिठ छान मिक्स करा. जाडसर consistency हवी. त्यात थोडे तेल ही घाला. ओव्हर कोटींग नको व्हायला पीठाचे इतकेच पीठ घ्या.

4. आता कापुन ठेवलेले केळफूल पिठात मिक्स करावे

आणि medium flame वर भजी तळावी. कुरकुरीत होते छान.

 गरमागरम खाण्यास द्यावी."








Wednesday, October 20, 2021

गोड_शंकरपाळे_दिवाळी_फराळ

 #गोड_शंकरपाळे_दिवाळी_फराळ

♥️🌟💥🌿🌾✨ #फराळ_प्रकार

आज पाहूया गोड शंकरपाळे! 

शंकरपाळे दोन तीन प्रकारचे असतात. गोड, खारे आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे...  दोन्ही प्रकार करायला सोपे आणि चवीला झक्कास. गरमागरम चहामधे बुडवूनही छानच लागतात. :) वर्षभर कधीही करून खाता येतात.

गोड शंकरपाळी साठी साहित्य:

१. १ ते सव्वा वाटी मैदा

२. तूप: एक वाटी (आम्ही गोवर्धन किंवा चितळेंचे तूप वापरतो.)

३. पिठीसाखर: १ वाटी

४. दुध एक वाटी

५. तळण्यासाठी तूप


१. एक वाटी तूप दुधात मिसळून, त्यात पिठीसाखर घालून विरघळून घ्या. थोडेसे कोमटसर करा. मग त्यात व्यवस्थित भागेल असा एक ते सव्वा वाटी मैदा घालून पीठ अगदी व्यवस्थित मिसळून आणि मळून घ्या. 

२. पीठ तीस-चाळीस मिनिटे उमलू द्या.

३. कढईत तूप गरम करत ठेवा.

४. मळलेल्या पीठाचा मोठा गोळा घेऊन तो पोलपाटावर जाडसर गोल लाटा. 

५. चिरणे घेऊन त्याने उभे आडवे लहान काप करा आणि ते चौकोनी काप सोडवून, कढईतील तूपात मध्यम आचेवर तळून घ्या.

झाले गोड शंकरपाळे तयार!!! ♥️🌿

#शंकरपाळे #shankarpale #faral #diwali #maharashtrian


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर








Tuesday, October 19, 2021

जाड_पोह्यांचा_तळलेला_कोल्हापुरी_चिवडा

#kolhapuri_chivada #कोल्हापुरी_चिवडा 

#जाड_पोह्यांचा_चिवडा_दिवाळी_फराळ

♥️🌟💥🌿🌾✨ #फराळ_प्रकार

संध्याकाळी चहानंतर किंवा चहासोबत हलकेफुलके काहीतरी खायला म्हणून आईने पातळ पोह्यांचा चिवडा आत्तापर्यंत ब-याचदा केला. मस्त लागतो चवीला आणि छोट्या-छोट्या भुकेला अगदी योग्य! ❤️😍 पण जाड पोह्यांचा चिवडा आमच्याकडे दिवाळीच्या दरम्यान बनतो. आमच्याकडे त्याला कोल्हापुरी चिवडा म्हणून संबोधतात. खमंग, लज्जतदार आणि कुरकुरीत असा जाड पोह्यांचा चिवड्याचा चहासोबत नक्कीच आस्वाद घेऊ शकता.

पातळ पोह्यांच्या चिवड्याप्रमाणेच, बहुदा अगदी घराघरात सगळ्यांनाच येतो हा बनवता... म्हणून हा चिवडा देखील आज सहजच प्रमाणाविना लिहीतेय...अगदी अंदाजे... कारण आहेच पाककृती अगदी साधी...अंदाजाने कुणीही अगदी Perfect बनवू शकेल अशी... 🙂 लिहीतेय म्हणजे कोणालातरी ही पोस्ट बघून चिवडा करायचे आठवेल आणि पोटभरीचा अजून एक झटपट होणारा पदार्थ झाल्याने थोड्या काळासाठी का होईना घरातल्यांच्या 'काहीतरी आहे का खायला?!' ला वाटी भरून चमचमीत उत्तर द्यायला मिळेल. 😛

आई रश्मी इंदूलकर च्या पध्द्तीने बनवलेला चिवडा! ❤️

तर चिवडा बनवण्यासाठी, जाड पोहे घ्या. सर्व नीट निवडून आणि चाळून घ्या. आणि गरम करत ठेवलेल्या मोठ्या कढईत तेल घालून गरम तेलात अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढा! एका जाळीदार भांड्याला मोठ्या भांड्यावर मांडून मग जाळीत हे तळलेले पोहे काढा. म्हणजे तेल निथळले जाईल.

त्याच कढईत तेल घालून त्यात  भरपुर कढीपत्ता, सुक्या खोब-याचे तुकडे, शेंगदाणे, डाळे, हिरव्या मिरच्या आणि काळ्या मनूका, एकामागून एक न करपवता खरपुस तळून घ्या. काजू असतील तर ते पण तळून घ्या.

तळून निथळत ठेवलेले पोहे, कढीपत्ता, सुक्या खोब-याचे तुकडे, शेंगदाणे, डाळे, हिरव्या मिरच्या, काजू आणि काळ्या मनूका सर्व एकत्र करा.

राई, जीरे, तीळ, हिंग पावडर यांची गरम तेलाची फोडणी करा.

त्यात हळद पावडर, मिरची पावडर, जीरा पावडर, धणा पावडर, मीठ आणि साखर टाकून परता. आवडत असल्यास थोडासा लिंबाचा रस ओता. आणि मिक्स करून ठेवलेल्या जिन्नसावर फोडणी ओता. आणि वरखाली करत सर्व पोह्यांना इतर जिन्नस व्यवस्थित लागेल असे हलक्या हाताने मिसळून घ्या.

आणि तुमचा जाड पोह्यांचा हलकाफुलका पण चविष्ट कोल्हापुरी चिवडा तय्यार! 😍

पावसात मस्त‌ मसाला चहासोबत आस्वाद घ्या!

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/

आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com

#चिवडा #jhatpat_recipes #chivada #फराळ #दिवाळी #faral #pohe_chivada #food #marathi_food






जाळीदार अनारसा! ❤️✨

 जाळीदार अनारसा! ❤️✨ 

दिवाळी फराळ 

दिवाळीतला मराठमोळ्या घरातला फराळ असो किंवा अधिकमासातील जावयाला द्यायच्या भेटवस्तू... अनारसा नेहमीच भाव खाऊन जातो. बनवायला क्लिष्ट आणि कठीण असा वाटला तरी तसे अजिबातच नाही पण हो सुगरणीच्या हातांची कमाल जाळीदार खुसखुशीत अनारस्यांना नक्कीच उपयोगी पडते. फक्त आंबण्याची प्रक्रिया असल्याने पीठ तयार व्हायला दिवस थोडे जास्त लागतात.

आमच्या लहानपणीची दिवाळी भारावलेली भासायची... लहान होतो म्हणून की खरेच ९० च्या दशकातला काळ तसा होता म्हणून हे सांगणे कठीणच... नवरात्र संपते तोच दसरा दिवाळी तयारी सुरू व्हायची. फराळाच्या सामानाची आणि साफसफाई ची गडबड असायची. दस-यानंतर घराघरांतून निरनिराळ्या फराळांचे सुगंध यायचे. लाडवांपासून सुरुवात व्हायची, चकली, करंजी, चिवडा, अनारसे, चंपाकळी, शंकरपाळी, चिरोटे आणि अजूनही कितीतरी फराळाचे पदार्थ...


पण माझ्या मनात अनारस्याभोवतीचे वलय लहानपणापासून, वाड्याची आज्जी अप्रतिम अनारसे बनवायची. सकाळीच आंघोळ करून लवकरच करायला बसायची. कोणी बाहेरचे आले, डोकावले किंवा पीठावर नजर पडली तर अनारसा तुपात सुटतो किंवा हसतो असे मानायचे त्याकाळी. म्हणून सकाळीच सवडीने शांतपणे, एकाग्रतेने ती खसखशीवर अनारस्याचा गोळा फुलवत बसायची. तुपात सोडलेल्या अनारस्याचा सौम्य गोडसर दरवळ घरभर असायचा. छोटे छोटे अनारसे आम्हा लहानग्यासाठी तयार असायचे. आंघोळ केली असेल तरच देवापुढे अनारसा ठेवून आम्हाला खायला मिळायचा. गरमागरम अनारसा तुप निथळायच्या आधीच मटकावला तस खसखस तुपाचा स्वाद लाजवाब असायचा.

मम्मीदेखील छानच बनवते अनारसा पण तेव्हा शिकता आला नाही किंवा मम्मीला जास्त कधी मदत देखील केली नाही. लग्नानंतर आई खुप सुरेख अनारसे बनवते हे कळाले. आईचे अनारसे थापून तळून झाले की शेवटचे दोन तीन अनारसे मला करायला देते. तसे चांगले मला जमले नाही तरी अगदीच वाईट होत नाहीत ते... जमतील सवयीने हळूहळू... ;)

अनारसे ची पाककृती आईकडूनच घेतलेली. आवडेल हे नक्की! :)


१. १ किलो जाडसर चिकटा पकडून ठेवतील असे जून तांदूळ घ्या. अनारसे बनवण्यासाठी आई शक्यतो परिमल तांदूळ घेते.  

हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि मग परत पाणी भरून रात्रभर भिजवायचे. सकाळी पाणी ओतून टाकायचे आणी पुन्हा पाणी भरून ठेवायचे. असे पाच दिवस करायचे.

२. पाचव्या दिवशी धुवून पाणी काढून टाकयचे. चटई अंथरून त्यावर स्वच्छ धुऊन सुकवलेल्या पांढ-या शुभ्र सुती कापड अंथरावे आणि धुतलेले तांदूळ सुकवायला पसरवून ठेवायचे.

सावलीमधे सुकवणे गरजेचे आहे. उन्हात सुकवू नये.

एक दिवसासाठी सुकवावे. थोडे दमट राहतात. तसेच मिक्सरला अर्थातच पाणी न घालता बारीक पीठ करून घ्यायचे. 

बारीक चाळणीने‌ पीठ चाळून घ्यायचे.

३. ह्या पीठामधे एक किलो किसलेला गुळ किंवा एक किलो साखर घालायची, दोन चमचे साजूक तुप टाकायचे आणि अगदी व्यवस्थित एकजीव मळून घ्यायचे. आणि एका मोठ्या भांड्यात दाबून व्यवस्थित लावून झाकून ठेवायचे. हे चार दिवस उघडायचे नाही. अशाप्रकारे बरेच महिने देखील हे पीठ असेच ठेऊन वापरु शकतो.

४. पाचव्या किंवा सहाव्या दिवशी हवे तेवढे पीठ काढून घ्यायचे. दुधाचा हलका हात लावून मळायचे आणि खलबत्त्यात चेचून घ्यायचे. परत दुधाचा हात लावत मळायचे. लहान गोळे करायचे.

५. अनारसा तळण्यासाठी कढईत तूप टाकायचे आणि मंद आचेवर गरम करत ठेवायचे. 

६. सपाट ताटामधे खसखस भुरभुरत ओतायची. पसरवायची. त्यावर पीठाचा लहान गोळा ठेवून बोटांनी हलकेच दाबत दाबत अनारसा गोलाकार थापायचा. अगदी पातळ नाही आणि जाडही नाही.

७. गरम तुपात खसखस लावलेली बाजू वरच्या दिशेला राहील असे अलगद सोडून द्या. आच मध्यम ठेवा. झा-याने अनारस्यावर हळूहळू तुप उडवत रहा. अनारसा उलटा न करता तळला जातो. तुप वर उडवत नंतर सोनेरीसर होत जातो. तळलेला दिसला कि अलगद काढून छिद्र असलेल्या जाळीदार भांड्यात उभे लावून ठेवायचे. त्या भांड्याच्या खालीदेखील एक भांडे ठेवावे, म्हणजे निथळलेले तुप त्यात जमा होते.

सर्व अनारसे अशा पध्दतीने मंद आचेवर तळून घ्यायचे. आणि व्यवस्थित उभे लावून तूप झिरपत निथळू द्यायचे. थंड झाले की डब्यामधे लावून ठेवायचे. 

खसखशीवर थापलेला हा तयार सोनेरीसर, ब्राऊनिश जाळीदार अनारसा सुरेख दिसतो आणि चवीलाही अव्वल लागतो. 

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#अनारसा #diwali #anarasa #festiv

al #marathi #maharashtrian #faral







Sunday, October 17, 2021

कोजागिरी पौर्णिमा आणि मसाला दुध

 को जागर्ति?!🌜😃🌟❤️🌿

#कोजागिरी_पोर्णिमा #को_जागर्ति ❤️🌿🌠🌝🌜

"आसमंत हा उजळून जाई, चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई;

कोजागिरीच्या पौर्णिमेची, रात हि आनंदात रंगून जाई ...

चंद्र चांदणे आकाश सजवी, पृथ्वी सगळी उजेडात हि थिजली;

मना-मनामध्ये आनंदाचे, रंग तरंग हे भरून जाई ...

बदाम- पिस्ता, केशर मलई, दुध सुगंधी बनवून जाई;

आई लक्ष्मी च्या आशीर्वादाने, चंद्र तारका हरकून जाई ...

चंद्राची ती मंगल पूजा, लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादे;

लहान मोठे सुखात न्हाई , कोजागिरीच्या पौर्णिमेची

रात हि आनंदात रंगून जाई ...!" 🌝🌛❤️🌿🌠🌜

कवी अमोल गोवेकर (Lovely poem Taken from Internet) यांनी अगदी सोप्या शब्दांत कोजागिरी पौर्णिमा चे वर्णन केले आहे. 

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आणि मोठा आणि सुरेख वाटतो. ✨🧡

लहानपणापासून कोजागिरी ही एक खास चांदणी रात्र‌ म्हणून मम्मी-बाबांसोबत आम्ही दोघी बहिणी एडवणच्या घरी गच्चीवर छान जागरण करत मसाला दूधाचा आस्वाद घेत असू. एडवण गावी प्रदुषण कमी त्यामुळे लख्ख स्वच्छ आकाश दिसे... जवळच असलेल्या समुद्राचा आवाज रात्रीच्या सुन्न वातावरणात कानावर येत असे. एव्हाना थंडी देखील आपले अस्तित्व दाखवून एक छानसे वातावरण बनवून ठेवी. त्यात मस्त चंद्राच्या उजेडाने उजळलेल्या रात्री, दूध चांगले घोटून‌ आणि त्यात केशर, काजू, पिस्ते, बदाम, वेलदोडे पावडर आणि साखर घालून, आटवून चंद्रदेवाला आणि लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात, चंद्राचे प्रतिबिंब स्थिर दुधात‌ दिसते आणि ते दूध मग प्रसाद म्हणून प्राशन केले जाते. चंद्राचे चांगले गुणधर्म असलेली किरणे या दुधावर पडल्याने ते पिण्यास उत्तम असे मानले जाते. गरमागरम चविष्ट दुध प्यायला काय ती मज्जा येई... 🥛🥛🍶❤️🌜

आज विरारघरी हलकाफुलका मेन्यु असतो. दस-याला तोरणासाठी आणल्या जाणा-या भाताच्या लोंबीतले भाताचे भरलेले दाणे सोलून ते भात शिजवताना टाकतात. आज सहजच पांढरा पुलाव आणि कढी केली. नैवेद्य अर्पण केला. रोजच्या साग्रसंगीत वरण-भात-चपाती-भाजी-कोशिंबीर बेताला डच्चू देऊन आज रात्री घरी वडापाव, चटणी, कांदाभजी आणि मसाला दुध असा चटकमटक बेत असतो. आज गडबडीत फोटो काढायला जमले नाही म्हणून काही फोटो आधीचेच जोडलेत... ;) 

तर अशा ह्या कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्रीपर्यंत जागरण केले जाते. त्याची अशी आख्यायिका सांगतात की मध्यरात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन 'को जागर्ति' म्हणजेच 'कोण जागत आहे' असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. 

कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे श्री लक्ष्मी देवी विचारत येते. खरेच किती सुरेख कल्पना... ❤️🌟😃

नुकत्याच नवरात्री संपलेल्या असतात आणि गरबा fever पण पुर्णपणे ओसरलेला नसतो...मग अनेक ठिकाणी आवडीने रात्र जागवत गरबा रंगतो. अंताक्षरीच्या मैफिली झाडल्या जातात. चंद्राच्या सुरेख सोबतीने उजळलेल्या रात्री, मस्त पांढरीशुभ्र मेजवानी रंगते. अनेक सुगरणी पांढ-या रंगसंगतीचे निरनिराळे पदार्थ मोठ्या हौसेने बनवून आणतात. पांढरा ढोकळा, भात, पांढरी कढी, रसमलाई, दहीभात, खमंग काकडी, नारळाची वडी आणि अशा अनेक शुभ्र पदार्थांनी मैफिल रंगते. एकमेकांच्या सोबतीने एकत्र येत, हसतखेळत जागरण होते. 

कोजागिरी निमित्ताने सर्व एकत्र येत. आनंद भरलेला राही उजळलेल्या लख्ख रात्री!!! तुम्हाला देखील कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!! जागते रहो!!! 😃🌟🌜❤️🌿

#kojagiri #kojagarti

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/

आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com














झटपट होणारे पापलेटचे कालवण: 🐟🐠

झटपट होणारे पापलेटचे कालवण: 🐟🐠

(चिंच वापरून)

ताजे पापलेट नीट साफ करून घ्या.‌ पावसाळ्यात आत्ता सध्या ताजे पापलेट मिळणे थोडे कठीण असते. पापलेट चे तुकडे करून घ्या. स्वच्छ धुवून पाणी निथळवा. मीठ व आलेलसूण पेस्ट लावून ठेवा.  

एका भांड्यात तेल मध्यम गरम करा. त्यात आले लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित परता. एक दोन मिरच्यांना उभी चिर पाडून घ्या. ह्या मिरच्या आणि कढीपत्ता देखील घाला.


मग थोडीशी सेलम हळद, मीठ आणि वाडवळी घरगुती मसाला किंवा तो नसेल तर रोजचा मसाला आणि मध्यम तिखट मिरची पावडर, थोडी धणा पावडर घालून नीट परता. सुके खोबरे जरासे भाजून घ्या अणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हे वाटण टाकून चांगले परतले कि मग पुन्हा माशांचे साफ केलेले तुकडे घालून अलगद परतायचे. 

चिंचेच्या कोळाचे पाणी आणि थोडे साधे गरम पाणी घालून चांगली उकळी काढायची. उकळी येऊन शिजू द्या. मासे नाजूक असतात त्यामुळे ते तुटणार नाहीत किंवा जास्त शिजणार नाहीत ह्याची काळजी घ्या. ह्यात मला टाॅमेटोच्या उभ्या फोडी घालून एक उकळी घेऊन केलेले कालवणही खुप आवडते.

आवडत असल्यास चिरलेली कोथींबीर घालावी. मस्त झक्कास आंबट-तिखट कालवण तयार! हातपोळ्याची भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर सर्व्ह करा. भारीच लागते. 😋

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com


#पापलेट #कालवण #pomphret #fish #seafood #curry #rassa










Friday, October 15, 2021

दरवळणारा मराठमोळा मसालेभात: ✨

 दरवळणारा मराठमोळा मसालेभात: ✨

मराठमोळ्या स्वयंपाकघरात सणासुदीला किंवा खास कार्यक्रमांना आवर्जून बनवला जाणारा‌ भाताचा एक प्रकार... सणासुदीलाच नाही पण लग्नाच्या पंगतीत देखील सुवासिक मसालेभाताचा मान! 🌶️🧄❤️🌿

केळीच्या हिरव्यागार पानावर वाढलेला तो दरवळणारा वाफाळता मसालेभात, त्यावर घरीच कढवलेल्या साजूक तुपाची धार, ताजे खवलेले शुभ्र गोडगोड खोबरे आणि बागेतली ताजी हिरवीगार कोथिंबीर! (जेव्हा नैवेद्यासाठी नसतो तेव्हा वरून भुरभुरवलेला थोडासा कुरकुरीत बिरीस्ता म्हणजेच तळलेला कांदा पण छान लागतो.) 😋🌿🥥 पहिल्याच घासाला मनाला भावलेल्या चविष्टपणाची अनुभूती येतेच. 👩‍🍳

तसा हा मसालेभात बनवायला सोपा.‌ जास्त क्लिष्ट पाककृती च्या पाय-या नाहीत. पण चव पुलाव, बिर्याणी, खिचडी किंवा फोडणी भात ह्या सगळ्यांपेक्षा वेगळी. हा बनवायला सुरुवात केली तरी अगदी तडक्यापासूनच ह्याचा घमघमणारा सुगंध स्वयंपाकघरातच नाही तर घराबाहेरही दरवळतो! ही असते ह्यात मुख्यत: वापरल्या जाणा-या अख्ख्या साबुत भारतीय मसाल्यांची आणि खोबरे, तीळ असलेल्या गोड्या मसाल्याची अनोखी कमाल....  🌶️🧄 मी स्वत: हा भात आई रश्मी इंदूलकरकडून शिकली. आम्ही कामकाजावरून घरी परतलो कि दरवाज्याबाहेर येणा-या मसालेभाताच्या सुगंधावरूनच अचुक ओळखत असू कि आईने आज ह्या पदार्थाचा बेत केला आहे. 😋👩‍🍳🌶️🧄🥥  गुढीपाडवा किंवा दस-या दिवशी, पुर्ण बेतामधे समावेश असतो, पुरी, बटाटा भाजी, टाॅमेटोचे सार, कुरडई, खमंग काकडी, वांग्याचे भरीत, शिरा आणि हा मसालेदार मसालाभात! 👩‍🍳❤️

मसालेभात जेव्हा सणासुदीला करतात तेव्हा त्यात कांदा, लसूण वापरले जात नाही. कारण देवबाप्पाला नैवेद्य दाखवायचा असतो. बाकी वेळा आमच्याकडे कांदा लसूण घालतात बनवताना...‌ चव अजूनच चांगली लागते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मसालेभात हा बहुतांश ठिकाणी फक्त उभ्या चिरलेल्या तोंडली वापरून करतात. आम्ही काही वेळा तोंडली किंवा मटार वापरून करतो. काहीजण गाजराचे तुकडे, टाॅमेटो देखील घालतात मसालेभात बनवताना....‌ प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्रमाणे त्यात बदल होतात.😃

पाककृती च्या फोटोमधे दोन वेगवेगळ्या वेळचे मसालेभाताचे फोटो आहेत. एकावेळी तोंडली वापरून तर दुस-या ठिकाणी मटार... तुम्ही नैवेद्यासाठी बनवताना कांदा-लसूण वगळून‌ बनवा. 🧄🌰 अख्खे मसाले माफफच वापरा. खुप मसाले घालून त्याची उग्र चव आणू नका.

साहित्य अगदी रोजच्या वापरातील आहे. पहा काय काय लागते आपल्याला...जवळपास ५-६ जणांना पुरेल हा:

१. कढीपत्ता ८-१० पाने

२. उभा कापलेला कांदा

३. काजू दोन तुकडे केलेले

४. मनूका थोड्याशा

५. कोथिंबीर बारीक चिरून

६. खवलेले ताजे खोबरे 

७. दोन प्याले तांदूळ (खास दिवसासठी बनवताना तुम्ही बासमती वापरू शकता‌. पण मी जास्त वेळा वाडा सुरती कोलम किंवा रोजच्या वापरातील तांदूळ घेते.)

८. अर्धा चमचा गोडा मसाला

९. सेलम हळद पावडर पाव चमचा

१०. चिमुटभर साखर किंवा गुळाचा लहान तुकडा

११. लिंबू पाव भाग

१२. मीठ चवीनुसार

१३. साजूक तूप

१४. तेल

१५. वाफवलेले मटार किंवा उभी चिरलेली तोंडली

वाटण भरडसाठी: (हे सगळे अख्खे मसाले हलकेच १ मिनिटे भाजून घ्या. थंड झाल्यावर, ओले मसाल्यांसोबत एकत्र करून मिक्सरला फिरवून भरड काढून घ्या. बारीक होता कामा नाही. )

१. आले अर्धा इंच

२. लसूण ५-६ पाकळ्या

३. एखादी हिरवी मिरची

४. हिरवी वेलची २

५. दालचिनी अर्धा इंच तुकडा

६. मसाला वेलची १

७. तमालपत्र २

८. बादियान १

९. लवंग २

१०. काळे मिरे ४

११. तीळ पाऊण चमचा

१२. खवलेले खोबरे थोडेसे

१३. बडीशेप पाव चमचा

१४. धणे अर्धा चमचा

अख्खे मसाले: (तडक्यासाठी)

१. मसाला वेलची ३

२. तमालपत्र २

३. लवंगा ५

४. काळे मिरे ५

५. दालचिनी १ इंच तुकडा 

६. बादियान २

७. जायवंत्री १

८. शहाजीरे पाव चमचा

९. हिरवी वेलची ४

१०. राई अगदी जराशी

११. हिंग पाव चमचा

१२. जीरे पाव चमचा

आता सुरेख घमघमणारा मसालेभात बनवायला सुरुवात करूया. आम्ही जाड बुडाच्या मोठ्या भांड्यात किंवा मोठ्या कुकरला करतो. कुकरला केला कि एक ते दोन शिटीमधे होतो.

१. प्रथम एक जाड बुडाचे मोठे गॅसवर ठेवा. त्यात तेल आणि थोडे तुप घाला. गरम झाले कि लगेचच तडक्यासाठी ठेवलेले अख्खे मसाले टाकून परता. त्यावर कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा टाकून, कांदा पारदर्शक होईस्तोवर परता आणि शिजू द्या.

२. चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर टाकून परता. काजू आणि बेदाणे टाका आणि वाफवलेले मटार किंवा उभी चिरलेली तोंडली किंवा दोन्ही पण टाकू शकता. (मटार शक्यतो कोवळी नसल्यास थोडी वाफवावी, कारण अर्धकच्ची राहिल्यास अजिबात चांगली लागत नाही.) सगळे परत परता व्यवस्थित.

३. आता आपण जी अख्खे मसाले आणि ओल्या पदार्थांची भरड केली आहे ती ह्यात टाका.... मस्त परता सगळे... आता स्वयंपाकघरात घमघमाट सुटला असेल ह्याबाबत शंकाच नाही. हा सुगंध हेच खुप खास आहे मसालेभात बाबत, असे किमान मला तरी वाट्टे... 😍

४. तयार मसाल्याची भरड कांद्यावर परतून झाली नीट की थोडी कोथिंबीर आणि लगेचच धुवून घेतलेला तांदूळ त्यात घाला‌. (आम्ही मसालेभातासाठी तांदूळ भिजवून ठेवत नाहीत. तुम्हाला हवे असल्यास ठेऊ शकता.) तांदूळ अगदी चार- पाच मिनिटे छान परता. आणि गरम पाणी अंदाजाने बेताचे ओता. भात मोकळा झाला पाहिजे. जास्त टाकले तर सगळेच फसेल आणि कमी टाकले तर करपेल. म्हणून काळजीपूर्वक टाका. सगळे एकदा ढवळून, एक चमचा साजूक तुप घालून झाकण लावा आणि मध्यम आचेवर शिजवा‌. झाकणावर पाणी ठेवा. सगळा भात शिजतानाच फुलला पाहिजे. अगदी मोकळा होत नाही हा. पण खिचडी प्रकारही नाही. 😋 (कुकर असेल तर दोन शिटीमधे मसालेभात होतो.)

झाकण काढले कि मसालेभात तय्यार!!!! एकदा हलक्या हाताने ढवळा आणि मस्त ताजे खवलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून वाढा. परत एकदा तुपाची सढळ हस्ते धार विसरू नका बरे! 😍😋 🥣🥘 

ताकाची कढी, टाॅमेटोचे सार, सोबतीला पापड किंवा कुरडई अफलातून लागते. खानेवाला मनसे दुवा देगा और आप हमे!!! 👩‍🍳😛

मसालेभात घरोघरी वेगवेगळ्या छानछान पध्दतीने अनेक सुगरणी बनवतातच पण हा आईने बनवलेला आणि मला स्वत:ला आवडलेला मला भावला म्हणून साग्रसंगीत लिहला.

To be very frank, ह्या सा-या मारूतीच्या शेपटासारख्या लांबच लांब घटकांची यादी पाहून अनेकांना त्या भानगडीत पडू नये असे वाटेल पण नीट वाचले तर लक्षात येईल साधे घरच्या घरी उपलब्ध घटक आहेत. काही जण अगदी थोडे अख्खे मसाले, गोडा मसाला आणि गरम मसाला एवढ्या मोजक्या साहित्यांत पण झटपट मसालेभात करतात. तोदेखील छानच लागतो. पण मी जेव्हा हा मसालेभात खाल्ला आणि दिलेल्या घटकांना वापरून पाय-यांमधे बनवला तेव्हा सुगंध आणि चवीच्या बाबतीत तो खरेच वेगळीच अनुभूती देऊन गेला. 

😍🌿🌶️🧄🥥

जमले तर करून पहा आणि अजून काही चांगले बदल असल्यास नक्की कळवा. 😘😍

#masalabhat #maharashtrian_food #foodwelove #मसालेभात #soulfood #edwan #virar

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर