Thursday, October 14, 2021

श्रीखंड आणि आम्रखंड! ❤️🥭

श्रीखंड आणि आम्रखंड! ❤️🥭

मराठमोळे आवडते गोड-धोडाचे पदार्थ! 😋

दसरा आणि गुढीपाडव्यानिमित्त घरीच श्रीखंड आणि आम्रखंड बनवला होता. श्रीखंड घरी बनवणे किती सोपे असते हे बनवल्यानंतर कळले. टम्म फुगलेल्या पु-या, उकडलेल्या बटाट्याची भाजी, एखादी रस्सा भाजी (बहुधा मटार-फ्लाॅवरच), दारच्या कैरी आणि नारळाची चटणी, नुकतेच घातलेले लोणचे, वरण-भात, कोशिंबीर आणि श्रीखंड! असा टिपिकल नैवेद्य प्रकार आमच्याकडे बनत असे. बहुतांश घरी हाच बेत असतो म्हणा... ह्यातले श्रीखंड आम्ही बाहेरूनच आणत असू. फ्रिजमधे ठेऊन मग नैवेद्यासाठी काढत असू.  पण हे जे श्रीखंड आवर्जून आणतात ते मात्र ह्यावेळी घरात बनवू असे पहिल्यांदाच मनात आले होते आणि बनवले होते त्याची पाककृती.... 😍 थोडे घडले-बिघडले करत हा प्रयोग झाला. 

श्रीखंड बनवणे खुप सोपे हे माहित होते. कोणीही सहज बनवू शकाल. श्रीखंड  बनवायच्या आधी अनेक व्हिडीओ पाहिले. खाद्यभ्रमंतीच्या आवडीमुळे ओळखीचे झालेले, पुण्याचे श्री. अरविंद आठल्ये काका आणि काकींचा अगदी बरकाव्यासोबत सांगितलेला श्रीखंड बनवण्याचा व्हिडीओ बघून करायचे ठरले. हे हौशी दांपत्य अगदी सोप्या-सुरेख शब्दांत मराठमोळे पदार्थांचे व्हिडिओ बनवून सादर करतात, ज्यामुळे आमच्या सारख्या मंडळींना नवेनवे पदार्थ बनवायला‌ हुरूप येतो. 🙂

मी थोडीशी वेगळी पध्दत केली, श्रीखंड बनवायला तुम्हाला खालील जिन्नस लागतील:

१. एक किलो दही (पाणी निथळून त्याचा ५०० ग्रॅम चक्का झाला.)

२. साधारण चक्कयाइतकीच साखर

३. वेलचीपूड

४. केसर काड्या कोमट दुधात भिजवून

५. काजू-बदाम-पिस्ता काप

६. गावरान गुलाबाच्या पाकळ्या

७. जायफळ पावडर

एका स्वच्छ कापडात एक किलो दही चार तासांसाठी टांगून ठेवले. रात्रभर देखील ठेऊ शकता. खाली पाणी जमा करण्यासाठी भांडे ठेवले. चार तासांनी तयार झालेला घट्ट चक्का एका भांड्यात काढला. ❤️

चक्क्याएवढीच साखर त्यात घातली. आणि छान एकजीव करण्यासाठी १०-१५ मिनिटे ढवळले. दहा-पंधरा मिनिटे तसेच ठेवले. मग ते चांगले एकजीव झाले. मिश्रणामधे वेलची पावडर, अगदी थोडी जायफळ पावडर आणि केसर भिजवलेले दुध घालून मिसळून घ्या.

मला दोन ते तीन प्रकारचे श्रीखंड बनवायचे असल्याने मी तीन भाग केले. (ह्यानंतर मी एक मोठी चुक केली जी तुम्ही करू नका. मी ह्यातला एक भाग अरविंद काकांनी सांगितल्याप्रमाणे पुरणयंत्रातून किंवा चाळणीतून न गाळता, साखर अजून छान एकजीव व्हावी म्हणून एक भाग मिक्सरला लावला आणि तो पातळसर झाला. )पण हा चांगला धडा होता. पुढच्या वेळी नको तिथे 'शाॅर्टकट' मारणार नाही. 😓

हे अगदी जसे हवे तसे दाटसर होण्यासाठी फ्रिजमधे ठेवले त्यामुळे थोड्याच वेळात हवे तसे तयार झाले. :)

तर तीन प्रकारच्या श्रीखंडासाठी तीन भाग केले. 

१. वेलची-केशर श्रीखंड: एका भागात जास्त वेलची पावडर आणि केशर भिजवलेले थोडेसे दुध टाकून ढवळले.

२. काजू-बदाम सुकामेव्याचे काप टाकलेले श्रीखंड:

काजू बदामाच्या उभ्या आडव्या बारीक कापा. श्रीखंडाच्या एका भागात मिसळा. गुलकंदासाठी आणलेल्या गावरान गुलाबाच्या पाकळ्या नेमकीच होत्या, त्यादेखील तुकडे करून मिसळल्या. छान चवीचे Mix Dryfruit श्रीखंड तयार झाले.

३. आम्रखंड: चितळेंचा दर्जेदार आंब्याचा रस होता. तो तिस-या भागात मिसळला आणि छान मिसळला. आणि केसर टाकले. छान आम्रखंड तयार झाला. ह्याचा घट्टपणा थोडा कमी झाला‌ म्हणून फ्रिजरमधे एखाद तास ठेवला आणि मस्त झाला. 🥭🥭🥫किंवा छानपैकी घट्ट आमरस घालून आम्रखंड बनवू शकतो.

पहिल्यांदाच प्रयोग केला आणि चवीला उत्तम झाला पण काही चुकांमुळे थोडासा घट्टपणा कमी आलेला. पुढच्यावेळी अजून चांगले श्रीखंड नक्की बनवता आले. 🤩

तुम्ही देखील बनवून पहा घरच्याघरी श्रीखंड आणि आम्रखंड! पुरी बरोबर श्रीखंडाचा घास घेताना स्वत:ला नक्कीच दाद द्याल. :)

#maharashtrian #shrikhand #garland #marathifood #food #curd #hung_curd #sweets

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर



















No comments:

Post a Comment