Tuesday, October 19, 2021

जाळीदार अनारसा! ❤️✨

 जाळीदार अनारसा! ❤️✨ 

दिवाळी फराळ 

दिवाळीतला मराठमोळ्या घरातला फराळ असो किंवा अधिकमासातील जावयाला द्यायच्या भेटवस्तू... अनारसा नेहमीच भाव खाऊन जातो. बनवायला क्लिष्ट आणि कठीण असा वाटला तरी तसे अजिबातच नाही पण हो सुगरणीच्या हातांची कमाल जाळीदार खुसखुशीत अनारस्यांना नक्कीच उपयोगी पडते. फक्त आंबण्याची प्रक्रिया असल्याने पीठ तयार व्हायला दिवस थोडे जास्त लागतात.

आमच्या लहानपणीची दिवाळी भारावलेली भासायची... लहान होतो म्हणून की खरेच ९० च्या दशकातला काळ तसा होता म्हणून हे सांगणे कठीणच... नवरात्र संपते तोच दसरा दिवाळी तयारी सुरू व्हायची. फराळाच्या सामानाची आणि साफसफाई ची गडबड असायची. दस-यानंतर घराघरांतून निरनिराळ्या फराळांचे सुगंध यायचे. लाडवांपासून सुरुवात व्हायची, चकली, करंजी, चिवडा, अनारसे, चंपाकळी, शंकरपाळी, चिरोटे आणि अजूनही कितीतरी फराळाचे पदार्थ...


पण माझ्या मनात अनारस्याभोवतीचे वलय लहानपणापासून, वाड्याची आज्जी अप्रतिम अनारसे बनवायची. सकाळीच आंघोळ करून लवकरच करायला बसायची. कोणी बाहेरचे आले, डोकावले किंवा पीठावर नजर पडली तर अनारसा तुपात सुटतो किंवा हसतो असे मानायचे त्याकाळी. म्हणून सकाळीच सवडीने शांतपणे, एकाग्रतेने ती खसखशीवर अनारस्याचा गोळा फुलवत बसायची. तुपात सोडलेल्या अनारस्याचा सौम्य गोडसर दरवळ घरभर असायचा. छोटे छोटे अनारसे आम्हा लहानग्यासाठी तयार असायचे. आंघोळ केली असेल तरच देवापुढे अनारसा ठेवून आम्हाला खायला मिळायचा. गरमागरम अनारसा तुप निथळायच्या आधीच मटकावला तस खसखस तुपाचा स्वाद लाजवाब असायचा.

मम्मीदेखील छानच बनवते अनारसा पण तेव्हा शिकता आला नाही किंवा मम्मीला जास्त कधी मदत देखील केली नाही. लग्नानंतर आई खुप सुरेख अनारसे बनवते हे कळाले. आईचे अनारसे थापून तळून झाले की शेवटचे दोन तीन अनारसे मला करायला देते. तसे चांगले मला जमले नाही तरी अगदीच वाईट होत नाहीत ते... जमतील सवयीने हळूहळू... ;)

अनारसे ची पाककृती आईकडूनच घेतलेली. आवडेल हे नक्की! :)


१. १ किलो जाडसर चिकटा पकडून ठेवतील असे जून तांदूळ घ्या. अनारसे बनवण्यासाठी आई शक्यतो परिमल तांदूळ घेते.  

हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि मग परत पाणी भरून रात्रभर भिजवायचे. सकाळी पाणी ओतून टाकायचे आणी पुन्हा पाणी भरून ठेवायचे. असे पाच दिवस करायचे.

२. पाचव्या दिवशी धुवून पाणी काढून टाकयचे. चटई अंथरून त्यावर स्वच्छ धुऊन सुकवलेल्या पांढ-या शुभ्र सुती कापड अंथरावे आणि धुतलेले तांदूळ सुकवायला पसरवून ठेवायचे.

सावलीमधे सुकवणे गरजेचे आहे. उन्हात सुकवू नये.

एक दिवसासाठी सुकवावे. थोडे दमट राहतात. तसेच मिक्सरला अर्थातच पाणी न घालता बारीक पीठ करून घ्यायचे. 

बारीक चाळणीने‌ पीठ चाळून घ्यायचे.

३. ह्या पीठामधे एक किलो किसलेला गुळ किंवा एक किलो साखर घालायची, दोन चमचे साजूक तुप टाकायचे आणि अगदी व्यवस्थित एकजीव मळून घ्यायचे. आणि एका मोठ्या भांड्यात दाबून व्यवस्थित लावून झाकून ठेवायचे. हे चार दिवस उघडायचे नाही. अशाप्रकारे बरेच महिने देखील हे पीठ असेच ठेऊन वापरु शकतो.

४. पाचव्या किंवा सहाव्या दिवशी हवे तेवढे पीठ काढून घ्यायचे. दुधाचा हलका हात लावून मळायचे आणि खलबत्त्यात चेचून घ्यायचे. परत दुधाचा हात लावत मळायचे. लहान गोळे करायचे.

५. अनारसा तळण्यासाठी कढईत तूप टाकायचे आणि मंद आचेवर गरम करत ठेवायचे. 

६. सपाट ताटामधे खसखस भुरभुरत ओतायची. पसरवायची. त्यावर पीठाचा लहान गोळा ठेवून बोटांनी हलकेच दाबत दाबत अनारसा गोलाकार थापायचा. अगदी पातळ नाही आणि जाडही नाही.

७. गरम तुपात खसखस लावलेली बाजू वरच्या दिशेला राहील असे अलगद सोडून द्या. आच मध्यम ठेवा. झा-याने अनारस्यावर हळूहळू तुप उडवत रहा. अनारसा उलटा न करता तळला जातो. तुप वर उडवत नंतर सोनेरीसर होत जातो. तळलेला दिसला कि अलगद काढून छिद्र असलेल्या जाळीदार भांड्यात उभे लावून ठेवायचे. त्या भांड्याच्या खालीदेखील एक भांडे ठेवावे, म्हणजे निथळलेले तुप त्यात जमा होते.

सर्व अनारसे अशा पध्दतीने मंद आचेवर तळून घ्यायचे. आणि व्यवस्थित उभे लावून तूप झिरपत निथळू द्यायचे. थंड झाले की डब्यामधे लावून ठेवायचे. 

खसखशीवर थापलेला हा तयार सोनेरीसर, ब्राऊनिश जाळीदार अनारसा सुरेख दिसतो आणि चवीलाही अव्वल लागतो. 

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#अनारसा #diwali #anarasa #festiv

al #marathi #maharashtrian #faral







No comments:

Post a Comment