Monday, October 11, 2021

अळूचे_फतफदे #फतफदे :) #पावसाळ्यातील_खास #अळूची_आमटी ❤️🌿🍲🌽🥜

 #अळूचे_फतफदे #फतफदे :) #पावसाळ्यातील_खास

#अळूची_आमटी ❤️🌿🍲🌽🥜

अळूचे भाजीचा अळू, वडीचा जाडसर- काळसर देठांचा अळू आणि शोभेचा अळू असे वेगवेगळे प्रकार असतात. जाडसर अळूच्या पानांची कुरकुरीत खमंग अळूवडी बहुधा लहान-थोर सर्वानाच  आवडते आणि ती वारंवार घरोघरी होतेच...  पण आमच्याकडे अळूवडीच्या मानाने हे भाजीच्या अळूचे फतफदे क्वचितच व्हायचे... माझ्या लग्नानंतर मला ही कोकणी खासियत पाककृती आई रश्मी इंदूलकर‌ कडून शिकता आली. खास गुणांची खाण असलेला पौष्टिक अळू खाल्ला जावा म्हणून ही चविष्ट आमटी म्हणजेच फदफदे, पावसाळ्यासुमारास दोन-तीनदा तरी आई  बनवायची. फदफदे हे नाव ऐकले तेव्हा जरा कसेकसेच वाटायचे पण नंतर कळले कि हे लागते छान चवीला आणि कोकणातील लोकही आवडीने खातात. ❤️🌿🍲🌽🥜


तर अशी ही कोकण खासियत, अळूचे फतफदे म्हणजे अळूची हिरवट काळसर पाने, मक्याची कणसे आणि भुईमुगाचचे दाणे म्हणजेच शेंगदाणे यांची लसूणी तडक्याची पातळसर आमटी किंवा भाजी... हे बनवताना जेव्हा अळूचा रस्सा उकळतो तेव्हा एका लयीत उकळीचे गरम बुडबुडे फतफद आवाज करत उडतात म्हणून त्याचे नाव अळूचे‌ फतफदे अशी माझी वेडी समज!!!😁😄


पावसाळ्यामधे आमच्या विरार मधे वडीच्या आणि भाजीच्या अळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हल्ली वर्षभर जरी अळू माळत असले तरी पावसाळ्यात त्याची चव खास असते. काळसर देठाची अळू ही अळूवडीसाठी वापरली जातात. आणि साधारण हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठी. तसेच आमच्या सफाळ्याच्या विविध गावातून छान दर्जेदार अळूची पाने येतात आणि विरारलाही आगाशीच्या महिला स्वत:च्या वाडीतील ताजी फडफडीत मस्त पानांच्या जुड्या बांधून सकाळच्या बाजारात घेऊन येतात. त्यांना वडीसाठी कि भाजीसाठी ते सांगितले की त्या बरोबर टोपलीतून योग्य जुडी हातात देतात. भाजी बनवताना १४-१५ पाने‌ तरी घ्या.


आई ह्यावेळी बाजारात गेली ती अळूची ताजी पाने, तयार कणसे आणि अजूनही माती ल्यालेल्या नुकत्याच उकललेल्या भुईमुगाच्या शेंगा घेऊन आली. ह्या पाककृतीत अळूच्या पानांसोबत देठाचाही वापर करतात म्हणून अळूची पाने आणि देठ अगदी स्वच्छ धुऊन घेतले. पानापासून देठ वेगळे करून साले खेचून काढून (शेवग्याच्या शेंगांची काढतो तशी) साफ केली.


भुईमुगाच्या शेंगा सोलून टपोरे दाणे मोकळे केले आणि कणसे सोलून ठेवली. 

अळूची पाने धुताना हाताला हलकीशी खाज सुटली, म्हणून तुम्हीदेखील काळजी घ्या. काळजी करू नका, भाजी बनवताना वापरलेले चिंच आणि मसाले ह्यामुळे तितकीशी खाज खाताना जाणवली नाही. 😁


Tips:

१. आम्हाला स्विटकाॅर्न जातीची पिवळी कणसे मिळाली. तुम्हाला सफेद गावठी कणसे मिळाली तर उत्तमच!

2. काही अळूच्या पानांना नैसर्गिकरीत्याच भयंकर खाज असते, विशेषतः भाजीच्या अळूना. आणि त्यात आपण देठही वापरणार असल्याने देठ धुतो. त्यामुळे हाताला थोडावेळ खाज सुटते स्वाभाविक आहे. जास्त नाजूक त्वचा असल्यास हाताला तेल लावून पाने स्वच्छ करा आणि नंतर चिंचेच्या कोळाने किंवा लिंबाने हात चोळून घ्या.

३. खाताना खसा खवखवू नये म्हणून भाजी किंवा वडी करताना चिंच किंवा लिंबू रसाचा आवर्जून वापर करावा.

४. पिवळसर पाने भाजीसाठी वापरणे टाळावे.

५. काही ठिकाणी शेंगदाणे सोबतच काळे वाटाणे देखिल वापरतात.


चला तर मग आपण साहित्य पाहुया काय लागते.

१. भाजीच्या अळूची १४-१५ पाने 

२. दोन ते तीन मक्याची कणसे 

३. मोठी वाटी भरून शेंगदाणे/ काळे वाटाणे/ काजू

४. मोठी वाटी सोललेल्या लसूण पाकळ्या

५. ३-४ हिरव्या मिरच्या मध्यम तुकडे

६. १-२ कांदे बारीक चिरून (कांदा नाही घातला तरी चालेल.)

७. राई १ चमचा

८. जीरे अर्धा चमचा

९. हिंग पावडर 

१०. गुळ चवीनुसार 

११. मीठ चवीनुसार

१२. तेल

१३. गोडा मसाला दीड चमचा

१४. सेलम हळद पावडर अर्धा चमचा

१५. चिंचेचा कोळ (आंबटगोड चव आवडेल त्या प्रमाणात)

१६. बेडगी मिरची पावडर एक चमचा


तयारी झाली कि बनवायला सुरुवात करूया...

१. फदफदे बनवण्यासाठी अळूची पाने आणि देठ वर सांगितल्याप्रमाणे साफ करून आणि स्वच्छ धुवून घ्या. आणि दोन्हीही सुरीने किंवा विळीवर अगदी बारीक चिरून घ्या. एका भांड्यात थोडे पाणी घालून त्यात ही चिरलेली भाजी आणि एखादी मिरची टाकून कुकरला एक ते दोन शिट्या काढून घ्या.

भाजी जरा थंड झाली कि जाडसर भरड स्वरूपात मिक्सरला फिरवून घ्या. जास्त पातळ करू नका.

२. सोललेली कणसे आणि कोवळे शेंगदाणे पण शिजतील अशाप्रकारे तीन ते चार शिट्या काढून उकडवून घ्या. आम्ही शक्यतो अळू आणि कणसे-शेंगदाणे एकाखाली एक डब्यात ठेऊन २-३ शिटीमधे एकदाच उकडतो. (शेंगदाणे कोवळे नसतील तर २ ते ३ तास भिजवून मग उकडा.) 

३. एका कणसाचे तीन अशाप्रकारे गोल तुकडे कापून घ्या. आणि लसूण पाकळ्या हलक्याच चेचून घ्या.

४. मोठया कढईत तेल गरम झाले कि राई, जीरे आणि हिंगाची फोडणी करा. नंतर कापलेल्या मिरच्या आणि चेचलेला लसूण खरपुस परतून घ्या. कांदा टाकून परता. 

५. कांदा शिजल्यावर मीठ, गोडा मसाला, सेलम हळद पावडर आणि बेडगी मिरची पावडर टाकून परतावे. गुळ टाकून मिक्स करून झाकण ठेवावे आणि एक वाफ काढावी.

६. आता उकडलेले शेंगदाणे, काजू आणि मक्याच्या कणसाचे तुकडे घालून परता. चिंचेच्या कोळाचे पाणी टाकून ढवळा आणि लगेचच अळूचे मिक्सरमधून काढलेले मिश्रण ओतून चांगले परतून घ्या.

७. हे सगळे फतफद आवाज करत, व्यवस्थित उकळी येऊन शिजू द्या.


चमचमीत अशी अळूची आमटी किंवा अळूचे फतफद तय्यार... आवडत असल्यास तयार भाजीवर खमंग अशी तेलावर हिंग, मिरची पावडर आणि लसूण परतलेली चुरचुरीत फोडणी घाला. भारीच लागते पहा... :)


गरमागरम फुलका, भाकरी किंवा वाफाळत्या भाताबरोबर भुरका मारत अळूच्या कोकणी पद्धतीच्या अळूच्या आमटीचा आस्वाद घ्या. :)


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी-इंदूलकर


#अळू #फदफदे #colocasia #aluchi_bhaji #aluchi_aamati #virar #edwan #marathmole #maharashtrian #marathi_food #food_we_love














No comments:

Post a Comment