Monday, October 11, 2021

उपवासाला होतील असे कच्च्या केळ्याचे काप 🍌🍌😍

 उपवासाला होतील असे कच्च्या केळ्याचे काप 🍌🍌😍


एडवणला घराच्या पाठीच हिरवीगार प्रफुल्लित करणारी केळीची बागायत... वर्षभर या ना त्या झाडाला सतत केळीचे घड लगडलेले... आमच्या पालघर पट्ट्यातही नाजूक दर्जेदार वेलची केळी, भुरकेळी, लांबट वेलची, राजेळी, मांसल केळी आणि अजूनही निरनिराळ्या त-हेच्या केळीच्या जाती मोठ्या प्रमाणात होतात... केळ हे झाड पण असे कि लावल्यानंतर लग्गेच वर्षाच्या आत भरलेले लोंगर तयार! केळ्यांची हौस म्हणून मम्मीनेदेखील ५-६ केळीचे नुकतेच उगवलेले कोंब विरारला लावायला दिले. आणि वर्षभरात केळीची हिरवीगार आल्हाददायक बागच तयार झाली. केळीचे पान सतत वापरायला तर आवडतेच मला आणि घडाला लगडलेली ताजी कच्ची केळी काढून स्वयंपाकात वापरही करायला मज्जा वाटते. कच्च्या केळीचे काप आणि नारळाचा चव वापरून आम्ही उपवासाची भाजी देखील करतो. तर मुग-केळी, 'बोंबलाचा पोपट' भाजी देखील केळीच्या कच्च्या कापांनी तयार होते. उकडहंडी हा संक्रांतीवेळचा खास पदार्थ बनवताना ही आम्ही कच्ची केळी वापरतो.


उपवासाला साबुदाणा वडे, खिचडी, कच्च्या केळ्याची भाजी, फिंगर चिप्स, भगर वैगरे सोबत कच्च्या केळ्याचे कापदेखील घरी केले जातात.  उपवास नसतानाही, घरी कधी चमचमीत मसालेभात किंवा तांदुळाची भाकरी केली की सोबत मस्त कुरकुरीत कच्च्या केळ्याचे, वांग्याचे किंवा सुरणाचे काप तोंडी लावायला छान लागतात आणि करायलाही अतिशय सोपे असतात....


पाच सहा मोठ्या आकाराची कडक, हिरवीगार केळी स्वच्छ धूवून  घ्या. मग सोलाण्याने साले सोलून मधला गर तेवढा घ्या. त्याच्या थोड्या जाडसर अशा लांबट कापा कापून घ्या. कापलेल्या कापांना लगेचच थोडासा तेलाचा हात लावा अन्यथा कापा काळसर पडतील. थोडेसे मीठ चोळा.


कढईत किंवा पॅनमधे तेल गरम करून त्यात कापा अगदी कडक होईतोवर तळा. तुम्ही shallow किंवा deep fry दोन्ही प्रकारे करू शकता. टिश्युपेपरवर काप काढून तेल निथळले कि केळीच्या पानावर वाढा. वरून थोडीशी काश्मिरी मिरची पावडर आणि ताजी बनवलेली काळे मिरे पावडर भुरभुरावा आणि मस्त आस्वाद घ्या.


उपवास नसेल तेव्हा अंदाजानुसार बेडगी मिरची पावडर, सेलम हळद पावडर, काळेमिरे पावडर, आलेलसूण पेस्ट, लिंबाचा रस, चिमुटभर साखर व चवीपुरता मीठ एकत्र करून कच्च्या केळीच्या कापलेल्या कापांना सर्व बाजूंनी व्यवस्थित लावा. तव्यावर तेल गरम करून केळ्याचे काप गोलाकार लावून मस्त वरून खालून तळून घ्या. बारीक चिरलेली कोवळी कोथिंबीर पण वरून थोडी टाका.

अशाच पध्द्तीने सुरण, वांग्याचे काप देखिल करू शकता. :)  सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोवळी कोथिंबीर वरून भुरभुरवा. 


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


#कच्च्या_केळ्याचे_काप #raw_banana_chips

#fasting_menu #banana













No comments:

Post a Comment