Sunday, October 10, 2021

सुरण-बटाटा पॅटिस/ कटलेट ❤️

 सुरण-बटाटा पॅटिस/ कटलेट ❤️


काही दिवसांपूर्वी अमेय ह्या चुलतभाऊ कडे आमच्या माहिम च्या शैला आत्याने वाडीतला ताजा टवटवीत भाजीपाला पाठवला. आमचा डहाणू ते नायगाव पट्टा वाड्यांनी-मळ्यांनी फुललेला... सगळ्यांच्याच घरोघरी परसबाग, वाड्या असल्या तरी अशी घरची भाजी पाठवून प्रेम-माया सहज व्यक्त केली जाते. 


आत्याकडच्या केळवा माहिमच्या समृद्ध वाडीतली काळसर देठाची मोठाली अळूची पाने, नुकतीच काढलेली केळफुले, माती साफ करून दिलेला सुरणाचा गड्डा, पिवळीधम्मक वेलची केळी, भलेमोठ्ठे नारळ आणि माझा आवडता चाफा असा सर्वच ऐवज अमेयने दिला. प्रेमाने धाडलेला हा ताजा नजराणा पाहून कितीतरी पटीने अधिक आनंद झाला. Thank you Amey! 😁🙏


सुरण छान स्वच्छ करून‌ दिलेला आणि आम्ही लावलेला बागेतला सुरण देखील होता. त्यामुळे सुरणाच्या अनेक पाककृती लागोपाठ झाल्या. घरी कित्येक वर्षांपासून लावलेला सुरणाचा कंद, दरवर्षी अगदी त्याच्या वेळेत फुलून येतो. मातीतून उगवलेल्या उग्र दर्प असलेल्या जांबळट-व्हेलवेटी ब्राऊनिश फुलाच्या रूपापासून ते हिरव्यागार बहरलेल्या उंच देखण्या झुडपासारखी सगळीच रूपे निराळी सुरणाची... सुरणाचे काप, सुरणाची तुपातली भाजी, बाळंतीणीला खास बनवलेली कोकम घालून बनवलेली पथ्याची भाजी, बावर्ची सिनेमात दाखवलेली मटणासारखी लागणारी  भाजी अशा सर्वच पध्दतीने आमच्याकडे सुरण आवडीने खाल्ला‌ जातो. त्यातच समीरा रेड्डी ह्या अभिनेत्री ने तिच्या गुजराती सासूसोबत बनवलेले सुरण-बटाट्याचे पॅटिस फेसबुकवर नजरेस पडले. लग्गेच बनवले, आवडले म्हणून पोस्ट केले. By the way, समीरा रेड्डी आणि तिची सासू मंजिरी वर्दे ह्यांचे basic ingredients वापरून बनवलेले फुड व्हिडीओ खुप छान असतात. 😁


सुरण-बटाटा पॅटिस/ कटलेट: 

१. दोन वाटी सोलून साफ करून तुकडे सुरण आणि दिड वाटी सोललेला बटाटा कुकरला दोन-तीन शिटीमधे शिजवून घेतले.

२. तीन-चार सफेद किंवा ब्राऊन ब्रेड स्लाईस थोडेसे पाण्यात भिजवून घेतले.

३. बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा, कोथिंबीर, दीड लहान चमचा आले लसूण मिरची पेस्ट (मिरची कमी तिखट असलेली वापरली), 

४. गरजेनुसार धणा पावडर, जीरा पावडर, चाट मसाला, गरम मसाला आणि मीठ घेतले. (मी थोडासा चीझ वापरला.) 

५. वरील सगळे छान मिसळून मळून घेतले पण अगदी एकजीव नाही केले. परत थोडी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातला आणि परत एकदा वरखाली करत मिश्रण बांधून घेतले. वाफवलेले मटार दाणे घातले. हे जास्त मिसळायचे नाही. अख्खे छान वाटतात.

६. गोळे चपटे थापून तेलावर शॅलो फ्राय करून घेतले. उकडलेले हिरवेगार मटार मधेमधे छान दिसतात आणि लागतात.


खरेच इतका सुंदर सोनेरी-ब्राऊन रंग आणि क्रिस्पी रूप येते ह्या पॅटिसला... मस्त वाटते पाहून... आणि चवीलाही आवडले घरी सर्वांना. पटकन‌ संपले.


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com


#सुरण #सुरणाच्यावड्या #सुरणाचे_कटलेट #elephantfootyam  #suran #edwan


















No comments:

Post a Comment