Thursday, December 14, 2023

उकड्या तांदळाच्या इडल्या

 कोकणातील उकडा तांदळाची इडली!


राता लाल तांदूळ, काळा तांदूळ, बासमती तांदूळासोबतच काही दिवसांपूर्वी कोकणातील उकडा तांदूळ देखील दि मसाला बझार मधे विक्रीसाठी उपलब्ध होता. उकडा तांदूळ ची माहिती आईकडून कळली होती. पण हा भात गेल्यावर्षी प्रथमच खाल्ला. पचायला जड वाटला. मग पुन्हा ह्या भाताच्या वाटेला फिरकली नाही. मग कोकणात रानमाणूस कडे फिरायला गेले असता झोळांबे गावात ओंकार च्या आईने गरमागरम उकड्या तांदळाची पेज आणि फणसाची भाजी बनवली होती ती खाल्लेली. गेल्या महिन्यात कोकणातील दापोली मधे माहेर असलेल्या मनिषा अभ्यंकर मसाला बझार ला रूजू झाल्या. उकडा तांदूळ पाहून सहजच ह्याच्या इडल्या आम्ही बनवतो, छानच होतात असे बोलल्या. एक दोन दिवसात इडली सांबार चा बेत होताच म्हटले ह्यावेळी उकड्या तांदळाच्या इडल्या बनवूया. 

तर हा खास उकडा तांदूळ बनवताना, टरफलासकटच भात, पाण्यात शिजवला जातो. चुलीवर मोठ्या पातेल्यात पाणी गरम झाले की भात/ धान त्यात टाकतात. निकृष्ट किंवा पोकळ धान वर तरंगते ते काढून टाकतात. भातावर झाकण ठेवून चांगली उकळी आली की पुन्हा ढवळून कढ आणली जाते. चांगला रटरटत शिजतो. टरफलातून आतला पांढरा तांदूळ डोकावतो. ह्या तांदळाला मोठ्या टोपलीत/ चाळणीत पाणी निथळून जावे म्हणून ठेवले जाते. सर्व पाणी निथळून गेले की मग स्वच्छ कापडावर सावलीमध्ये हा भात पसरवला जातो. वर खाली करत सावलीतच चांगला सुकला की मग गिरणीत भरडून आणला जातो. पेज करून, भात करून, पीठ स्वरूपात भाकरी करून उकडा तांदूळ, पुर्वी कोकणी घराघरात खाल्ला जायचा. 

इडली करताना नेहमीप्रमाणे स्वच्छ धुतलेले चार वाटी उकडा तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ+ १५-२० मेथी दाणे पाण्यात वेगवेगळे भिजत घातली. सकाळी १० च्या सुमारास भिजवले. रात्री १० च्या सुमारास थोडे थोडे करत उकडा तांदूळ, उडीद डाळ, मेथी आणि पोहे एकत्र करून मिक्सरमधून बारीक केले. पाणी जास्त न घालता, पीठाचा पोत मध्यम ठेवला. सगळे नीट मिसळले आणि मोठ्या चमच्याने फेटले. कापलेला कांदा ठेवून पीठ झाकले. उकड्या तांदळामुळे पीठाचा रंग offwhite- grainy लालसर होता. 

सकाळी पीठ चांगलेच वर आले होते. छोट्या मिनी बटण इडली साच्यात आणि नेहमीच्या साच्यात इडल्या वाफवून घेतल्या. इडल्या काढताच सुरेख spongy texture ने मन सुखावून गेले. पीठ भरडताना लागलेल्या जास्तीच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखं वाटले. 😀 खरेच चांगल्या इडल्या झाल्या.‌

सोबत पटकन होणारी खोबरे- मिरची- जीरा- कोथिंबीर - लसूण- कैरीची, फोडणी टाकून केलेली हिरवीगार चटणी आणि आपला लक्ष्मी मसालेचा सांबार मसाला वापरून झटपट चटपटीत सांबार बनवला. तुम्ही वापरला आहे का आपला सांबार मसाला? मस्त चव येते सांबार ला!

इतकी वर्षे उकड्या तांदळाच्या इडल्या इतक्या सुंदर होतात हे माहीत नव्हते. म्हणून आज लिहीले ह्या बाबत खास म्हणजे जे इडली प्रेमी आहेत त्यांच्या नजरेस लेख आला की ते एकदा तरी करून आस्वाद घेऊ शकतात.

#उकडातांदूळ #rice #preboiledrice