Friday, April 19, 2024

वाडवळी चिकन रस्सा आणि सुक्के पध्दती



वाडवळी चिकन रस्सा आणि सुक्के पध्दती आणि चिंचकढी तसेच भाकरीची पध्दत:

वाडवळ- सोमवंशी क्षत्रिय समाजाचे मसाले, स्वयंपाकाच्या पध्दती आणि चविष्ट पारंपरिक पदार्थ त्यांच्या खास शैलीमुळे अन्य समाजातील अनेकांना देखील आवडतात. समुद्रपट्टीला वसलेल्या वाडवळी समाजाच्या माशाची कालवणे, चिकन-मटणाचे चमचमीत रस्से आणि हातवळणीच्या भाक-या आणि वडे हे अतिशय प्रसिद्ध पदार्थ. कोल्हापुरी, कोकणी, मालवणी, आगरी समाजांचे पदार्थ जितके प्रसिद्ध झाले त्यामानाने वाडवळी पदार्थ तोडीस- तोड असूनही विशेष लोकप्रिय होऊ शकले नाहीत. आजकल बरेच जण खुप छान व्हिडिओ आणि लेखाव्दारे वाडवळी पदार्थांबाबत लिहीत आहेत. अनेकांना ते आवडतही आहेत. वाडवळी चिकन, औषधी गावठी चिकन पुडला, सुप फार छान वैशिष्ट्यपूर्ण पाककृती आहेत.


पुर्वी गावाला पाहुणे, जावई वैगरे आले कि चुलीवरची कोंबडी खास तवकटात (म्हणजेच मातीच्या भांड्यात) आणि वडे केले जायचे. पाट्यावर वाटण केले जायचे, वाटण चिकनला लावून चांगले राळले (मुरवत ठेवणे) जायचे आणि खोबरे चुलीत भाजायचे त्याचा छान smoky flavour यायचा.  


आमच्याकडे साखरपुडा आणि व्याही जेवणाला खास मटण किंवा चिकन चे जेवण असते पण हळदीला- लग्नाला आजही बहुतेक ठिकाणी शाकाहारी जेवण असते. आणि लग्नानंतर तिखट जेवण म्हणून खास मटण- चिकन रस्सा, भात- चिंचकढी चा बेत असतो. चिकन-मटणामधे घातलेले बटाटे ही देखील वाडवळी खासियत! रस मुरलेले भन्नाट बटाटे काय भारी लागतात हे मात्र चव घेऊन पाहिली आहे तेच सांगतील! बटाटे आणि सुरण देखील चिकन मधे वापरतो. उत्तम जमून येते चव.


आज तीन प्रकारच्या वाडवळी चिकन (कोंबडी) रस्सा आणि सुके बाबत माहिती लिहते आहे. तसेच औषधी पुडा आणि सुप, आमची भाकरी आणि चिंचकढी यांच्या पाककृती देखील दिल्या आहेत. हे संकलन आहे. सर्व फोटो मिळाले नाहीत. थोडाबहूत प्रत्येकाच्या पध्दतीमधे फरक असू शकतो. वाडवळी मसाला हा २-४ प्रकारच्या मिरच्या आणि २०+ वाणे वापरून बनवलेला असतो. चवीला उत्तम. 


-------------+----------------+-------------+------------+-----


• वाडवळी कोंबडी रस्सा


- साधारण अर्धा किलो चिकन

- दोन बटाटे (मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करून)

- एक मोठा कांदा बारीक चिरून 

- आले- लसूण पेस्ट (दीड चमचा)

- लक्ष्मी मसालेचा डंकावरचा वाडवळी मसाला (दीड- दोन चमचे) तुम्ही कोणताही रोजच्या वापरातील वाडवळी मसाला वापरू शकता.

- तेल गरजेप्रमाणे आणि मीठ चवीनुसार 

- ५-६ काळेमीरे, दोन लवंगा, दोन तमालपत्र, एक बादियान, एक मसाला वेलची आणि २ हिरव्या वेलची, एक इंच दालचिनी चे दोन तुकडे, जरासे जीरे

- लक्ष्मी मसालेची सेलम हळद पावडर अर्धा चमचा

- लक्ष्मी मसाले ची काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा (ऐच्छिक)

- लक्ष्मी मसालेचा गरम मसाला अर्धा ते पाऊण चमचा

- एक वाटी सुके खोबरे, किसून, कढईत परतून लालसर झाले कि मिक्सरमधून फिरवून बारीक करून घेणे.


बनवायची पध्द्त:

- स्वच्छ धुतलेल्या चिकन मधे मीठ, हळद, आले-लसूणाची थोडी पेस्ट आणि दीड चमचा वाडवळी मसाला व्यवस्थित लावून थोडा वेळ मुरवत झाकून ठेवावे.

- गॅसवर मध्यम आचेवर जाड बुडाचे मोठे पातेले ठेवावे. त्यात तेल घालून गरम झाले कि खडे मसाले परतून घ्यावे. 

- बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. उरलेली आलेलसूण पेस्ट मिसळावी. छान परतून झाले की त्यात उरलेला वाडवळी मसाला आणि मुरवत ठेवलेले चिकन टाकून अगदी व्यवस्थित परतून घ्या. वाफेवर खोलगट झाकणात थोडे पाणी ठेवा. 

- १०-१५ मिनिटांनी झाकण काढून वाफेवर ठेवलेले पाणी मिसळा आणि बटाटे घाला. परत थोडा वेळ वाफेवर शिजू द्यावे.

- चिकन आणि बटाटे शिजत आले कि बारीक केलेले भाजलेले खोबरे मिसळून एक वाफ येऊ द्या.

- वरून काश्मिरी मिरची पावडर (ऐच्छिक) आणि गरम मसाला टाकून उकळी येऊ द्या. चिकन आणि बटाटा शिजलेय का ते पहा. मीठ चवीनुसार वाढवायचे असल्यास वाढवा. 


चिकन तयार आहे. वड्यांसोबत आस्वाद घ्या. मटण ही अशाच पध्दतीने बनवले जाते. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू पिळून चव घेऊन पहा. By the way, गावठी तांदळाच्या इडली (नीरा/ ताडी घालून इडली पीठाचे चांदणं देखील बनवतात) सोबत पण चिकन किंवा मटण खायला उत्तम लागते.


-------------+----------------+-------------+------------+-----


• वाडवळी सुके चिकन प्रकार: १


वाडवळी मटण-चिकनमधे बटाटा वापरायची पध्दत आहे.... आमच्या वाडवळ स्वयंपाकात मटणासोबत, चिकनसोबत, रस्स्यात किंवा सुक्या प्रकारात आणि भुजिंगमधेदेखील साले न काढलेले बटाट्याचे काप घातले जातात आणि खुप आवडीने खाल्लेही जातात. मला स्वत:ला मटण-चिकनच्या फोडींपेक्षा त्या रस्सा शोधलेल्या, पिठूळ अशा बटाट्याच्या कापा मनापासून आवडतात. अभिषेक (Husband) ला ह्याबाबत अजिबात कल्पना नव्हती. त्याला माहित असलेल्या कोकण आणि कोल्हापूर कडच्या दोन्ही पध्दतीत असा प्रकार नाही. जेव्हा पहिल्यांदा चिकनमधे बटाटे त्याने पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले, जणू काही असे बटाटे चिकन- मटणाची भाजी वाढवण्यासाठी घालतोय. पण जेव्हा रसात मुरलेल्या बटाट्याच्या फोडीचा आस्वाद त्याने घेतला तेव्हा त्यालाही चव आवडली. अशीच एक वाडवळी चिकनची, बटाटा घालून केलेली छानशी पाककृती ‌पाहुयात. 


माझ्या वसईच्या ओजस्वी वहिनी ची आई प्रतिक्षाकाकी ही मुळत: सुगरण... तिचा लाडका जावई, म्हणजे माझा खवय्या भाऊ प्रथमेश नेहमीच काकींच्या चविष्ट मांसाहारी स्वयंपाकाचे तोंडभरून कौतूक करत असे. अगत्यशील, हौशी अशा काकींकडे वाडवळी पाककृतींचा खजिना आहे. गेल्यावेळी मी ओजस्वीच्या पाठी‌ लागून‌ काकींकडून‌ ही पाककृती मागवली आणि त्यांनीदेखील आवडीने साग्रसंगीत लिहून पाठवली. या वाडवळी सुक्या चिकनची पाककृतीनुसार मी दोन दिवसांपुर्वी चिकन करून‌ पाहिले आणि खरच ते फारच अप्रतिम चवीचे होते. आणि साध्या-सहज उपलब्ध सामुग्रीतून तयार होते हे. 


साहित्य पहा काय लागणार आपल्याला:

१. चिकन: पाऊण किलो

२. बटाटे: २ मध्यम आकाराचे बटाटे (स्वच्छ धुवून व साले‌ न काढता) गोलाकार किंवा चौकोनी कापून

३. कांदे: मध्यम आकाराचे २-३ बारीक चिरून

४. आले: १ ते दीड इंच

५. लसूण पाकळ्या: १०- १२


अख्खे मसाले:

१. दालचिनी: २-३ एक इंचाचे तुकडे

२. खसखस: १ चमचा

३. जीरा: २ मोठे चमचे

४. सफेद तीळ: दीड मोठे चमचे

५. काळे मिरे: १५-१६ (तिखट हवे असल्यास जास्त वाढवा.)

६. मीठ: चवीनुसार

७. सेलम हळद पावडर


तडक्यासाठी:

१. तमालपत्र २

२. लवंग ४-५


चला तर मस्त वाडवळी सुक्के चिकन कसे बनवायचे ते पाहूया.

१. दालचिनी, खसखस, जीरा, सफेद तीळ, काळे मिरे हलकेच एखादं मिनिटासाठी कढईत भाजून परतून घ्या. थंड झाल्यावर हे मिश्रण, कांदा, लसूण पाकळ्या आणि आले तुकडा ह्यासोबत अगदी थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करून  घ्या.

२. धुवून पाणी निथळून घेतलेल्या चिकनला आणि बटाटे यांना ही पेस्ट आणि मीठ व हळद अगदी व्यवस्थित चोळून २-३ तास चांगले मॅरिनेट होऊ द्या.‌ (मी थोडासा गरम मसाला आणि लिंबू रस पण वापरला. जो पुर्णपणे ऐच्छिक आहे)

३. कढईत तेल गरम करा. आणि तमालपत्र आणि लवंगा फोडणीला टाका. (मी मिरची, कढीपत्ता आणि दोन हिरव्या वेलची सहज वापरल्या आहेत. नाही वापरल्या तरी चालतील.) लगेचच मॅरिनेट करत ठेवलेले चिकन आणि बटाटे टाकून अगदी व्यवस्थित परता. 

४. अगदी थोडेसे पाणी घाला आणि झाकणावर पाणी ठेऊन वाफेवर चिकन छान शिजवा. 

शिजल्यानंतर मोठ्या आचेवर गॅस करून पटापट चिकन वरखाली करून घ्या. असे परतून‌ अजून छान लागते.


शिजल्यानंतर चिकनचा अर्क उतरलेली जी जाड रस्सासदृश्य 'निखवण' म्हणजेच हे चटणी तयार होते ती चटणी, रस शोषलेला बटाटा गरमागरम भाताबरोबर कालवून कधी खाऊन पहा. अगदी भन्नाट चव असते. चिकनच्या फोडीपेक्षाही उत्तम.


-------------+----------------+-------------+------------+-----


• वाडवळी सुके चिकन प्रकार: २


साहित्य चिकन रस्सा साठी लिहीलेले आहे तेच घ्यायचे आहे. कांदे मात्र तीन- चार घ्या आणि  पध्दत थोडी निराळी आहे.


स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनला आणि बटाट्यांच्या फोडींना जरा जाडसर वाटलेले आले-लसूण भरड, मीठ, हळद, वाडवळी मसाला आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मुरवत ठेवावे.

तापलेल्या तेलात फोडणीला खडा मसाला घालून परतायचे. थोडे साजूक तूप पण टाका. बारीक चिरलेले ३-४ कांदे टाकून अगदी चांगले परतून घ्यायचे. थोडी आले लसूण भरड, वाडवळी मसाला टाकून परतायचे. मुरवत ठेवलेले चिकन टाकून परतायचे. झाकणामधे वाफेवर पाणी ठेवायचे. दहा मिनिटांनी वाफेवर ठेवलेले झाकणातील थोडे थोडे पाणी घालून चिकन परतून घ्या. भाजलेले- बारीक केलेले सुके खोबरे टाकून परतावे. परत झाकण ठेवावे.‌ चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत थोडे थोडे पाणी घालत वाफेवर शिजवावे. चिकन शिजल्यावर वरून गरम मसाला घालून एकदा वाफ काढावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. भाकरीसोबत चविष्ट लागते.


-------------+----------------+-------------+------------+-----


• चिकन सुप for Soul! ❤️✨🌿


आजारपणानंतर कोणी जवळचे नातेवाईक, स्टीलचा उभा फिरकीचा डब्यामधे पिलुचा सुप घेऊन येणे फार जिव्हाळ्याचे समजले जाई. सामिष आहार पद्धती असलेल्या आमच्याकडे ऑपरेशन वैगरे झाले असता, हाडांची झीज व जखम लौकर भरावी, ताकदी यावी, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून पाया सुप, सर्दी कमी व्हावी म्हणून चिंबोरी रस, विशेषतः पावसाळा- थंडीत, शरीरात ऊब राहावी, प्रतिकारशक्ती टिकून राहावी म्हणून कोवळ्या चिकनचे सुप हे वरचेवर होत असते. कफाची बाधा झाली असेल तर कफ सुटायला देखील मदत होते हा माझा स्वत:चा देखील अनुभव आहे. दुपारी किंवा संध्याकाळी जेवणा अगोदर हे गरमागरम घोट-घोट पिणे महत्वाचे. आणि कोंबडी/ कोंबडा गावठी आणि कोवळा असावा. 


हे चिकनचे सुप म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीने बनवतात, मसाल्यांचा आणि इतर जिन्नसांचा खुप डामडौल अजिबात नसतोच. तरीही चवीला छान लागते. लहान मुले, वयस्कर व्यक्ती देखील पिऊ शकतात. हे सुप देखील घरोघरी वेगवेगळ्या पध्द्तीने केले जाते. मी आमची पध्द्त सांगते. हाडांचा भाग जास्त असलेले, शक्यतो कोवळ्या चिकनचे ताजे तुकडे महत्वाचे आहेत. हाडांचा रस उकळवताना निघाला पाहिजे. ते जास्त महत्त्वाचे ठरते.


काही जण उकडलेले चिकन मिक्सरला बारीक करून तो सुपसाठी वापरतात पण ते फार जड होते आणि दाट असल्यामुळे प्यायला सगळ्यांनाच आवडते असे नाही.


साहित्य पाहूया काय लागेल:

 • पाव किलो हाडे जास्त असलेले चिकनचे बारीक केलेले तुकडे (बोनलेस वापरत नाहीत शक्यतो.)

 • आलेलसूण- कोथिंबीर पेस्ट 

 • दालचिनी तुकडा

 • तमालपत्र १-२

 • काळेमिरे ६-७ (तुम्हाला कितपत तिखट लागते त्यानुसार)

 • लवंग १

 • जीरे अर्धा चमचा

 • मीठ

 • अर्ध्या लिंबूचा रस (मुळ पाककृती मधे वापर करत नाहीत)

 • धणा जीरा पावडर

 • अगदी नावाला गरम मसाला

 • साजूक तूप

 • बारीक चिरलेली कोथिंबीर

 • बारीक चिरलेला लसूण

 • हळद पावडर

 • चिकनच्या अडिच पट गरम पाणी


कोणतेही सुप मंद आचेवर बराच वेळ शिजवणे आणि आटवणे महत्वाचे असते म्हणून शक्यतो लवकर बनवायला घेऊन तुम्ही मंद आचेवर शिजवू शकता. पण आज मी तुम्हाला दाखवतेय ते कुकरमधले लवकर होणारे सुप.


 • तर चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. वरवंट्याने हाडांवर बारीक एखादी चीर पडेल इतपत फोडा. बारीक तुकडे पडता कामा नये. बारीक केलेले आले-लसूण-कोथिंबीर, मीठ, हळद पावडर सर्व चिकनला व्यवस्थित चोळून घ्या.


 • गॅस वर कुकर गरम झाला की, त्यात साजूक तूप टाकावे. थोडे गरम झाले की जिरा, दालचिनी, काळेमिरे, तमालपत्र, लवंग टाकून परतावे. बारीक चिरलेला लसूण लालसर परतुन घ्यावा. 


 • लगेच मॅरिनेट केलेले चिकन टाकून पाच मिनिटे छान परतावे. धणाजीरा पावडर आणि अगदी नावाला गरम मसाला टाकून परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जरासा लिंबाचा रस (नाही टाकला तरी चालतो) मिसळून चिकनच्या साधारण अडीच पण गरम पाणी त्यात ओता. एक उकळी आली कि कुकरला ५-६ शिट्या करून घ्या. 


 • वाफ गेल्यावर झाकण खोलून थोडी कोथिंबीर अजून मिसळा आणि १० मिनीटे रस उकळवून आटू द्या. सर्व्ह करताना अख्खे मसाले काढून टाका. एक-दोन तुकडे आणि रस्सा असे वाढा.


मुख्य म्हणजे गरमागरम प्यायला सांगा!


-------------+----------------+-------------+------------+-----


• केळीच्या पानातील बिनतेला-तुपातला गावठी चिकनचा पुडला

(खास खोकल्यावर गुणकारी आणि बाळंतीणीसाठी)


४००-५०० ग्रॅम ची छोटी गावठी कोंबडी सोलून साफ करून घ्या. २५०-  ३०० ग्रॅम पर्यंत चिकन मिळेल. स्वच्छ धुतलेल्या चिकनला एक लहान चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळेमिरे पावडर, एक चमचा जीरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित चोळून घ्या. १५-३० मिनिटे मुरू द्या. तेल- तुप काहीही वापरायचे नाही.


केळीची मोठी पाने घ्यायची. एक पान मोठे अखंड ठेवायचे आणि ६-७ पाने लहान करावीत. पाने धुवून पुसून मग त्यांना गॅसच्या आचेवर फिरवून मऊसर करून घ्यायची. मुरवत ठेवलेले सर्व चिकन एका मध्यम आकाराच्या पानावर ठेऊन पानांनी चारही बाजूने व्यवस्थित पुडला बांधत जा. त्या पुडल्याला दुस-या पानात ठेवून परत पुडला बांधा. असे २-३ पुडले बांधून मोठ्या पानात बांधा आणि केळीच्या पानांच्या वाकीने किंवा सुताने घट्ट बांधा. चुलीवर खोलगट जाडसर कढई ठेवून मग त्यात हा पुडला पुर्ण बसेल असा ठेवा. वरून झाकण ठेवा. वाफेवर १५ मिनिटे शिजू दया आणि मग झाकण काढून पुडला उलटा करा. दुसऱ्या बाजूने देखील १५-२० मिनिटे शिजू द्या. (चुलीवर किंवा गॅसवर करू शकता. पण आच मध्यम ठेवा.) 


आचेवरून कढई बाजूला काढून १०-१५ मिनिटे तसेच ठेवा. आणि मग पुडला काढून अलगद खोला. छान दरवळ उठतो. केळीच्या पानाचा अर्कात तयार झालेले गावठी चिकन म्हणजेच तयार पुडला चिकन केळीच्या पानात काढून वाढा. खाल्ल्यानंतर थोडा वेळ पाणी पिऊ नये. औषधी म्हणून हे चिकन बनवले जाते म्हणून खाल्ल्यानंतर त्याचे गुणधर्म चांगल्या प्रकारे लाभावेत म्हणून पाणी लगेच पित नाहीत. फार गुणकारी आहे.


-------------+----------------+-------------+------------+-----


• तांदूळाची भाकरी: 


ही भाकरी साध्या unpolished रत्ना तांदूळाला किंवा कणीला बारीक भरडून केलेल्या पिठाची असते.

पीठात डोस्यासारखी flowing consistency मिळेल इतपत पाणी आणि मीठ घालून पीठ मस्त मळतात. मग मोठ्या तव्यावर खोलगट चमच्याने पीठ टाकून गोलाकार मोठा पसरवत जातात. वरुन एक मिनिटाकरता झाकण ठेवून लगेच झाकण काढल्यावर भाकरी कालथ्याने काढली कि तयार. काही जणी तर हातानेच गरम तव्यावर लयबध्द् गोल फिरवत भाकरी बनवतात. थोडीशी Crispy पण खाताना मऊ असते मस्त.


-------------+----------------+-------------+------------+-----


• चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार (शिसोणी)


ही चिंचकढी दोन पध्द्तीने बनवतात. एक कच्चे चिंचेचे सार आणि दुसरी उकळी आणून कढवलेली चिंचेची कढी. विरार आगाशी आणि वसई पट्ट्यातील काही वाडवळ महिला अप्रतिम अशी चिंचकढी करण्यात माहिर आहेत. आपण आज उकळी देऊन केलेली चिंचकढी पाहणार आहोत. चिंचकढी आणि मऊसर भाताचा पहिलाच घास, मनाला एडवणच्या घरी अलवार पोहोचवतो. ढोबळमानाने अशी पध्द्त थोड्याबहुत फरकाने वापरली जाते.


चिंचकढीसाठी आपल्याला खालील साहित्य लागते:

- मुठभर आंबट चिंचेच्या कोळाचे पाणी

- पातळ उभा लांबट चिरलेला कांदा

- कढीपत्ता

- दोन-तीन बारीक चिरलेल्या मिरच्या

- आलेलसूण पेस्ट

- थोडासा गुळ

- चवीपुरते मीठ

- जराशी साखर

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- सेलम हळद पावडर


१. बारीक उभा चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, मीठ एका भांड्यात घेऊन जोर लावून कुस्करावे.

२. एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यामधे तेल गरम  करा. लगेचच अगदी थोड्याशा राई जीरा-हिंगाची फोडणी करा. त्यात हे कुस्करलेले मिश्रण आणि आले-लसूण परतवा, थोडेसे शिजवा आणि चिंचेचे पाणी आणि गुळ टाका. 

मस्त उकळी येऊ द्या आणि बघा ही चटपटीत चिंचकढी झालीसुध्दा तय्यार.

काहीवेळा आमच्याकडील वाडवळी लग्नातील तिखटजेवणावेळी सुक्के चिकन, मटण रस्सा, चिकन तंदूरी, भातासोबत चिंचकढी ठेवतात. सुके मासे वापरून केलेल्या पदार्थांनाही चिंचकढी उत्तम चविष्ट साथ देते. तुम्हीदेखील सहज म्हणून करून खाऊन पहाच!

• चिंचेचे कच्चे सार:

१. एक कांदा उभा पातळ किंवा अगदी बारीक चिरून

२. एक ते दोन मिरच्या (तिखटाचे प्रमाण कितपत हवे त्यानुसार)

३. कोथिंबीर बारीक चिरून

४. चवीनुसार मीठ

५. गुळ किसून

६. चिंचेच्या कोळाचे पाणी

७. पातीचा कांदा

चिंचेच्या कोळाचे पाणी सोडून बाकी सगळे एका खोलगट भांड्यात एकत्र करायचे आणि छान कुस्करायचे. कांद्याचे पाणी सुटेल आणि इतरही स्वाद एकत्र उतरतील. त्यानंतर चिंचेच्या कोळाचे पाणी टाकायचे. आणि ढवळायचे. झटपट होणारे चटपटीत चिंचेचे सार अगदी जबरदस्त लागते. चिकन मटण असो वा मासे, भातावर सार घेऊन प्यायला किंवा नुसतेच वाटीभर प्यायला मस्त लागते चव. 

गावी आवणी/ रोपणी च्या शेवटच्या दिवशी काही मालक हौसेने चिकन रस्सा देतात आवणी मजुरांना तेव्हादेखील भातावर वाढायला आवर्जून चिंचकढी बनवतात. Combination अगदी झक्कास लागते बघा!

#चिकनसुक्के #chicken #vadval #chickenrecipe #vadvali_food #वाडवळी #वाडवळ #वाडवळीकोंबडीरस्सा

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर