Saturday, April 9, 2022

रामनवमी_सुंठवडा_शिरा ❤️

 #रामनवमी_सुंठवडा_शिरा ❤️🌿🌼🌺🙏

आज रामनवमी! 

रामनवमीच्या दिवशी, "राम जन्मला ग बाई राम जन्मला!" असे सूरेल स्वर भारदस्त आवाजात, आमच्या एडवण गावातील प्रसिद्ध श्री राममंदिरातील माईकवरून दुपारी १२ च्या सुमारास गावामधे गुंजत असत. गावातील तसेच आगर, मथाणे येथील देखील मंडळी, सुरेख तयार होऊन महिलावर्ग असे सारेच देवळात भक्तीभावाने रामजन्माचा सोहळा बघण्यास जमलेले असत. झगमगत्या प्रकाशयोजना, तोरणे आणि फुलांच्या माळा, सुरेख सडारांगोळ्या ह्यांनी मंदिर लखाखलेले दिसे. देवळातल्या श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, मारूतीच्या मुर्ती देखील सुरेख प्रसन्न सात्विक भावाने उजळलेल्या....  साखरे कुटूंबातील सदस्याकडून पुजन-अर्चनाचा मान असतो. सुंदरसा मंडप, तबला- पेटी, टाळ साथीने माईकवरून किर्तन प्रवचन करणा-या किर्तनकार एडवण दुमदुमून टाकतात.


फुलामाळांनी सजवलेल्या पाळण्यात मुर्तीरूपी श्री. रामांना झोका देण्यात येई. किर्तनकार आणि गावातील महिला छान एकत्र पाळणागीत गात असत. एकूणच उत्सवप्रिय एडवण गावात, मध्यवर्ती नाक्यावर असलेल्या ह्या राममंदिरात  रामजन्म सोहळा रंगत असे. गावभर वाजतगाजत रामाची पालखीदेखील फिरवली जाते.  यात्रादेखील भरते. सार्वजनिक नाटके किंवा पडदे लावून चित्रपटाचे आयोजन असते. 🙂🙏 गावत राहण्याची मज्जाच आगळी हे खरेच!


रामजन्मानंतर सा-या भक्तांना प्रसाद म्हणून भाविकांनी अर्पण केलेले गोडधोड पदार्थ आणि सुंठवडा प्रसाद म्हणून वाटत असत! ❤️


रामनवमीच्या निमित्ताने घरची, एडवणची पुन्हा आठवण आली.... काय धम्माल असायची गावात... उत्सवप्रिय एडवणमधे नेहमीच सर्व देवळांमधले समारंभ जल्लोषात करतात. आमच्याकडचे बाजार भरून ओसांडतात. आनंदीआनंद असतो. 😃🏵️🌼🌿 मम्मी देखील घरातले आवरून लगबगीने राममंदिर पोहोचत असे. रामनवमीच्या निमित्ताने पहाटेपासूनच साईबाबांच्या मंदिरात देखील, "श्री राम जय राम, जय जय राम, अमर तुझे हे नाम" चा गजर सुरू असे. आमच्याही घरी वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुंठवडा केला जायचा त्या सुंठवड्याचा नाकाला हलकेच झोंबणारा वास पण हवाहवासा सुगंध संपुर्ण परिसरात दरवळायचा. एकूणच हा सुंठवडा पदार्थ आणि सुगंध माझ्या आठवणीत राम-नामाच्या वातावरणासोबत जोडला गेला.


सुंठवडा आवर्जून खा. कफविकारावर उत्तम आणि अजूनही अनेक औषधी गुणधर्म असलेला. प्रसादाच्या रूपाने अगदी थोडाथोडा खायचा. 🙂❤️


१. प्रसादाचा सुंठवडा: 

सुंठवडा काही जण फक्त सुंठ आणि साखर एकत्र वाटून करतात. काही जण सुंठ, साखर आणि वेलची आणि वेगवेगळ्या पध्दतीने... आमच्याकडे अर्धी वाटी खोब-या किसच्या पावडरमधे, पाव वाटी सुंठ पावडर, पाव वाटीपेक्षा थोडी अधिक साखर (मिक्सरला बारीक करून) आणि धणा पावडर टाकतात. अगदी बारीक पावडर नसतात सुंठ आणि धण्याच्या. किंचित जाडसर. मस्त सगळे हे मिश्रण एकत्र करायचे आणि सुंठवडा तयार. राममंदिरात रामनवमी आणि हनुमान जयंती च्या दिवशी हा प्रसाद असतो. 


२. श्री रामनवमीच्या निमित्ताने प्रसादाचा रवा-केळ्याचा शिरा:

आमच्याकडे रामनवमीच्या दिवशी गोडधोड पदार्थ म्हणून प्रसादाचा रवा-केळ्याचा शिरा बनवायची प्रथा आहे.

आई रश्मी इंदूलकर हा उत्तम बनवते. :)


साहित्य पाहून घेऊया:

१. पाव किलो तूप (आम्ही चितळेंचे वापरतो.)

२. पाव किलो बारीक रवा (साफ केलेला)

३. पाव किलो साखर

४. अर्धा लिटर दुध

५. एक-दोन पिवळी पिकलेली केळी

६. पाच-सहा बदामाचे उभे चिरलेले काप

७. पाच-सहा काजूचे तुकडे

८. बेदाणे/ मनूका

९. वेलची पावडर

१०. थोडीशी जायफळ पावडर

११. केशर काड्या दुधात भिजवून

१२. तुळशीची पाने


१. एक मोठा जाड बुडाची कढई गॅसवर चढवा. गरम झाली कि थोडेसे तुप ठेऊन बाकी कढईमधे ओता. गरम होत आले कि निवडून साफ केलेला रवा त्यात घाला व सतत परतत रहा. उत्तम शिरा जमून येण्यासाठी तो उत्तम सोनेरीसर भाजला जाऊन उमलुन येणे महत्वाचे आहे. बराच वेळ परतत भाजला कि खमंग असा वास येतो. उमललेला दिसतो. आणि तुप जरा रव्यावरती तरंगल्यासारखे वर छोटे बुडबुडे येत तरंगते म्हणजे समजावे रवा भाजला गेलेय. ही कढई गॅसवरून काढणे. 

२. दुस-या छोट्या भांड्यात उरलेले तुप ओता. गरम झाले कि बदामाचे काप, काजूचे तुकडे परतून घ्या. केळींचे गोलसर कापदेखील ह्यात टाका. मस्त तुपात सुकामेवा आणि केळी ७-८ मिनीटे परतली कि किंचित जायफळ पावडर घाला. बेदाणे घाला. परत परता.

३. ह्या सुकामेवा-केळी मिश्रणात भाजलेला गरम रवा घाला. अगदी छान एकजीव करा. मग गरम  दुध ओता. रव्याचे मिश्रण गरम असल्याने सारख्या तापमानाचे गरम दुध आपण घालतो. ह्यामुळे शिरा मस्त उमलतो. दुध आणि रवा अगदी एकजीव मिसळा आणि मंद गॅसवर झाकण ठेवून दहा-पंधरा मिनिटे उमलू द्या. 

४. झाकण काढून परत एकदा सर्व उमललेले मिश्रण वरखाली करा आणि साखर घाला. परत व्यवस्थित परता आणि साखर विरघळेपर्यंत दहा-पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या.

६. झाकण काढून वेलचीपूड घालून ढवळा आणि तुळशीपाने घालून वरखाली करा.

 

अगदी उत्तम मऊसुत चविष्ट शिरा तयार!!! 🙂🙏


नैवेद्यासाठी आमच्याकडे दोन सण सोडता बाकी दिनी कांदा लसूण विरहित नैवेद्य अर्पण केला जातो. परंतु संक्रांत आणि रामनवमीच्या दिनी आम्ही जो नैवेद्य दाखवतो त्यात कांदा असतो. रामनवमी दिवशी शिरा, वरण-भात-दही-तुपसोबत, सुका झुणका, भाकरी, चटणी आणि एखादी भाजी असा ठरलेला नैवेद्य बेत असतो. ❤️🌿

पोस्टमधील फोटो हे आमच्या एडवणच्या राममंदिर येथील दोन वर्षांपूर्वी च्या उत्सवातील आहेत. राम आणि इतर मुर्तींचे फोटो Shree Ram Mandir Edwan ह्या फेसबुक पानावरून Admin च्या परवानगीने घेतले आहेत. ❤️🏵️🌼🌿

जयश्री राम!!! 🙏🌼🌺

#ramnavami #edwan #shreeram #rammandir #sheera #sunthvada #sunth #dryginger #prasad #festivals #सुंठवडा


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर
























Thursday, April 7, 2022

भोकराचे_कैरीचे_लोणचे 😊

 #भोकराचे_कैरीचे_लोणचे ❤️🥭😋

#Pickled_Memories

छान मुरलेले भोकराचे लोणचे हे माझे विशेष आवडते लोणचे.‌ आजी अगदी दरवर्षी आंब्याच्या लोणच्याबरोबर हे चविष्ट लोणचे देखील बनवायची. आमच्या अंगणात देखील भोकराची झाडे होती आणि मस्त झुपक्यांनी लगडून ही गोल गोल टपोरी हिरवीगार अशी भोकरे यायची. चांगली टोपलीभरून टपोरी ताजी भोकरे आणली जायची. लहानगे आणि हौशी असे मी आणि माझा चुलतभाऊ अनिकेत त्या चिकट भोकराला फोडून आणि बारीकसा छेद करून चमच्याच्या दुस-या‌ टोकाने त्यातला बी-सकट लगडलेला चिकट गर काढून टाकत असू. आज्जी मग या पोकळ भोकरांना आतून बाहेरून हळद मीठ चोळत असे आणि लोणच्याचा खार बनवून तो भोकराच्या आतमधे भरून बरणीत भोकरे लावत असे. वरून गरम करून थंड केलेले तेल ओतण्यात येई. आणि आठवडाभरात भोकराची साल मऊसर होऊन लोणचे मुरत असे. मला आणि दादाला जेवताना अंख्खा भोकर ती आवर्जून देत असे. मला प्रचंड आवडते हे‌ लोणचे... 


आमची आज्जी आम्हाला काही वर्षांपूर्वी सोडून गेली. पण आजही जेव्हा मी कोणतेही लोणचे विशेषतः भोकराचे लोणचे भरते तेव्हा अज्जीची हमखास आठवण आणि लोणचे भरतानाची आज्जी मनामधे तरळते. ❤️ ह्यावर्षी भोकराचे लोणचे दर्पणा भट काकी ह्यांच्या पध्दतीने भोकरामधे आंब्याचा खिस भरून बनवले आणि ही कल्पना उत्तम असून लोणचे चविष्ट झाले म्हणून पाककृती देत आहे. 


भोकरांचे मराठमोळे लोणचे सोडले तर बाकी आमच्याकडे भोकराचा वापर करून काहीही बनवत नाहीत. गुजराती लोक देखील भोकरे मोठ्या प्रमाणात खातात.  ह्यावर्षी लाॅकडाऊनमुळे उत्कृष्ट दर्जाची भोकरे आम्हाला मिळाली नाहीत म्हणून आहेत ती वापरून लोणचे भरावे लागले.


भोकर- कैरीचे तिखट लोणचे:


साहित्य बघूया काय काय लागते:

एक लोणच्याची कडक मोठी कैरी, 

अर्धा किलो भोकरे

चवीनुसार मीठ, 

१ चमचा मेथीदाणे भरड (मेथी थोडीशी भाजून, मिक्सरमधून जाडसर भरडून घ्यावी), 

१ चमचा सेलम हळद पावडर, 

१०-२० ग्रॅम हिंग पावडर, 

८० ग्रॅम बेडगी मिरची पावडर, 

४० ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर,

५० ग्रॅम  राईगोळे/  राईडाळ, 

५० ग्रॅम रेशमपट्टा मिरची पावडर, 

१२५ ग्रॅम गुळ,

तेल,

काळेमिरे ८-१० दाणे (ऐच्छिक)

एखाद इंच दालचिनी (ऐच्छिक)

एखाद-दुसरी लवंग (ऐच्छिक)

०५ ग्रॅम बडीशेप  (ऐच्छिक)

चिमुटभर साखर (ऐच्छिक)

एक टीस्पून लिंबू रस (ऐच्छिक)


(राईडाळ कढईत थोडी भाजून घ्या आणि भाजलेल्या राईडाळसोबत काश्मिरी, बेडगी, रेशमपट्टा मिरची पावडरी, हिंग, सेलम हळद पावडर, मेथीदाणे भरड आणि थोडेसे मीठ एकत्र करायचे म्हणजे झटपट लोणचे मसाला तयार होईल.)


चला कृतीकडे वळूया:

१. कैरी व भोकरे स्वच्छ धुवून व नीट पुसून घ्या. पाण्याचा अगदी थोडाही अंश रहायला किंवा लागायला नको. कैरीची साले काढून खिसणीवर खिस/ किस करून घ्या व मीठ व हळद लावून ठेवा. मीठ जरासे भाजून घ्यावे म्हणजे कैर्‍यांना किंवा भोकरांना फार पाणी सुटत नाही. वर तयार केलेला लोणचे मसाला देखील खिसाला चोळावा व मिसळावा.

भोकरे फोडून बी काढून टाकावी. भोकरांना पण आतून बाहेरून हळद व मीठ चोळावे. आणि एक तास तरी तसेच ठेवावे.


२. तेल एका जाड तळाच्या कढईत घालून गरम करा. त्यात हिंग आणि मोहरी तडतडवावी. (सोबतच आम्ही काळेमिरे, लवंग, दालचिनी, बडीशेप व मेथी भरड टाकून हलकिशी परतुन घेतो. पातेले खाली उतरवून त्यात चिमुटभर साखर, लिंबू रस (ऐच्छिक) घालून जरा हलवावे. एव्हाना छान वास सुटला असेल. मला आवडते म्हणून एखादी काश्मिरी मिरची देखील घालते.) तेल आणि फोडणी जरा कोमटसर झाली की त्यातच गुळ खिसून घालतो म्हणजे लवकर एकजीव होतो. 

३. ताटात कैरी मीठ, हळद आणि लोणचे मसाला लावून मुरवत ठेवलेला खिस एकत्र करून, त्यावर गार झालेली लोणचे फोडणी ओतून सर्व नीट कालवावे. 

४. आता भोकरे ह्या कैरीच्या खिसाने अलगद भरायला सुरुवात करा. भोकराच्या पोकळीत खिस भरून भरली भोकरे तयार करा. फोडणीवर परतलेले अख्खे मसाले खिस भरताना काढून बाजूला ठेवा. 

५. काचेची स्वच्छ धुवून कोरडी केलेली बरणी घ्यावी. बरणीला हिंगाची धुरीदेखील देतात अनेक जण.... या बरणीत व्यवस्थित हळूहळू ही भरलेली भोकरे अलगद रचावी. बाजूला काढून ठेवलेले खडे मसाले आणि उरलेला कैरीचा खिस भोकरांच्या वर टाकावा.

६.थोडेसे गरम करून थंड केलेले तेल हे वरून, लोणचे बुडेल इतपत अलगद ओतावे. लोणच्याच्या फोडींवर तेल राहील इतके असले, म्हणजे लोणचे खराब होत नाही. झाकण घट्ट लावावे. हवे तर बरणीच्या तोंडाशी व झाकणाखाली एक बेताचे गोल कापलेले स्वच्छ फडके धाग्याने बांधावे. त्याला दादरा बांधणे असे म्हणतात. 


काही दिवस मुरल्यानंतर भोकराची साल मऊ होते आणि आत भरलेला कैरीचा खिस देखील छान मुरून अगदी भन्नाट लागते हे लोणचे! 🙂


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


#pickle #rawmangopickle #lonache_masala #pickle_masala #भोकर #भोकर_लोणचे