Saturday, October 30, 2021

केळफुलाची भजी

 हिरव्यागार बहरलेल्या केळी-नारळांचा आमचा पट्टा... त्यामुळे बहुतेकांकडे परसातील केळी, केळफूले मुबलक.‌ केळ्याचे घड एकदा तय्यार झाले कि केळफुल काढून टाकतात. लालसर- मरून- गुलाबी मलमली छटेच्या उलगडत्या पाकळ्यांच्या आवरणातील केळीची फुले फारच मोहक दिसतात.

केळफुलाची भाजी, वडी, केळीच्याच पानातील पानगी, भानोल्यामधे टाकलेले केळफुल अशा वेगवेगळ्या प्रकारे केळफूल आमच्याकडे खाल्ले जाते. केळफुल साफ करायला मला अतिशय मज्जा यायची पण केळफुल खायला मात्र‌ मलाच काय घरच्यांनाही अजिबात नाही आवडायचे. 

प्लॅंटवर लावलेल्या केळींमुळे विरारला देखील केळफुले भरपुर मिळायची. पण आवडतच नाहीत विशेष म्हणून कधी खास लक्ष दिले नाही. पण गेल्याच महिन्यात केळफुलाच्या भज्यांचा फोटो आमच्या केळवारोडच्या भक्तीदिदीच्या स्टेटस वर दिसला‌. भक्ती दिदी नेहमीच तिच्या मुलांनी आवडीने निरनिराळ्या भाज्या खाव्यात म्हणून पोषक पाककृतींचे प्रयोग करत असते. त्यातलाच हा एक.‌ लगेचच तिची पाककृती मागितली आणि केळफुलांची भजी आईने बनवली. पाककृती व्यतिरिक्त आईने थोडे अख्खे धणे हलकेच भाजून, जाडसर भरडून घातले.

पाककृती तिच्याच शब्दांत, भक्तीदिदीने जशी पाठवली तशी खाली दिली आहे. खरेच करून पहा. कांद्याची खेकडा भजी जशी लागते चवीला तशीच खुप छान लागते.

"केळफुलाची भजी:

1. केळफूल साफ करून थोडी लांबटच कापावी. हळद, मसाला आणि मिठ चोळून ठेवावे.

2. भजीचे पीठ तयार करण्यास घ्यावे. भाकरी साठी वापरतो ते जाडसर तांदळाचे पिठ, चण्याचे पीठ आणि थोडे उडीदाचे पिठ घालावे. उडीद भिजवुन वाटले तरी चालतील.

3. थोडा ओवा व थोडे तिळ भाजुन घाला. आले, लसुण, मिर्ची, कढीपत्ता, कोथिंबीर याचे वाटण आणि पिठ छान मिक्स करा. जाडसर consistency हवी. त्यात थोडे तेल ही घाला. ओव्हर कोटींग नको व्हायला पीठाचे इतकेच पीठ घ्या.

4. आता कापुन ठेवलेले केळफूल पिठात मिक्स करावे

आणि medium flame वर भजी तळावी. कुरकुरीत होते छान.

 गरमागरम खाण्यास द्यावी."








No comments:

Post a Comment