Tuesday, October 12, 2021

पिठोरी_आणि_पुरणपोळी #पुरणपोळी_कटाची_आमटी

 #पिठोरी_आणि_पुरणपोळी

#पुरणपोळी_कटाची_आमटी 


"अतिथी कोण आहे?!"

"अतिथी मी आहे!"❤️🌿


असे बोलून फळांचे आणि तांदळाचे वाण पदरात घेऊन 'गुलाबी गावरान तेरडा आणि पांढरी फुले असलेला कोंबडा झाडाच्या फांद्या' एकत्र बांधून बनवलेल्या वृक्षरूपी पिठोरीला पुरणपोळी, उकडीचे मोदक किंवा उकडीचे डाळिंब्याचे मुटगे आणि फळे ह्यांचा नैवेद्य दाखवून आणि पोथी वाचून हा मराठमोळा मातृदिन आमच्याकडे साजरा करतात. 🤗


मुलाबाळांना सुखी ठेवावे, वंशवेल वाढावी आणि सुखसमृद्धी-समाधान नांदावे म्हणून पिठोरी अमावस्या करतात.

तर मग पिठोरीच्या निमित्ताने पाहूया कशा करतात पुरणपोळ्या! :)


पुरणपोळी हा मराठमोळा पदार्थ, महाराष्ट्रातील आवडता असा सणासुदीला बनवला जाणारा जिन्नस आहे. आईची पुरणपोळी ही खास आवर्जून सगळे मागून खातात. मस्त भरपूर पुरण, खुसखुशीत अशी ही पुरणपोळी कटाची आमटी, दुध किंवा गरमागरम तूपाबरोबर अगदी मन तृप्त करते. आमच्याकडे होळी, पिठोरी अमावस्या तसेच पुजाविधी वैगरे प्रसंगी आई आणि मम्मी हमखास मैदा-चणाडाळ पुरणपोळी बनवते. तर माझी मम्मी पारंपारिक चणाडाळीच्या पुरणपोळीसोबतच गव्हाचे पीठ-मुगडाळ वैगरे च्या पुरणपोळ्या देखील बनवते. 


आपण बघुया पारंपरिक मैदा-चणाडाळ पुरणपोळीची आमच्या घरच्या पध्द्तीची रेसिपी:😃

१. पुरणपोळी: 

साहित्य: (अंदाजे १० पुरणपोळी करता)

१. साखर: २५० ग्रॅम

२. गुळ: ५० ग्रॅम

३. मैदा: १२५ग्रॅम

४. बारीक रवा: १२५ ग्रॅम

५. तेल: एक वाटी

६. मीठ: चवीनुसार

७. चणाडाळ: २५० ग्रॅम

८. वेलचीपूड: अर्धा चमचा

९. जायफळ: पाव जायफळ खिसलेले

१०. केशर काडी: ८-१०

११. तांदूळ पीठ: एक वाटी

१२. किंचित हळद व लेमन फुड कलर


१. प्रथम १२५ ग्रॅम मैदा व बारीक रवा चाळून घ्या आणि पाणी घालून भिजवून घ्यावा.‌ चवीनुसार मीठ व‌ रंगासाठी हळद किंवा फुड कलर घालावा. मग त्यात एक वाटी तेल टाकावे. आणि पीठ अगदी सैलसर लवचिक मळून घ्यावे. थोडे तेल वरती टाकून पीठ दोन तास तिंबवत ठेवावे. छान सैलसर मऊ होते.

२. चणाडाळ धुवून घ्या. जाड बुडाच्या भांड्यात चणाडाळ आणि पाणी घेऊन शिजवत ठेवा. सतत ढवळत रहा. ह्या चणाडाळ ला शिजायला वेळ लागतो.

 (गॅसवर कुकरमध्ये चणाडाळ आणि पाणी ठेवून ८-९ शिट्या काढून पण शिजवू शकता.)

३. चणाडाळ शिजली कि चाळणीवर पाणी गाळून घ्या. ह्याची आपण कटाची आमटी करणार आहोत. पाणी काढल्याने पुरणपोळी हलकी होते.

चणाडाळ मधे थोडे पाणी असू द्या. साखर आणि गुळ घालून मिश्रण एकजीव करा. वेलचीपूड आणि जायफळ पूड टाका. मिश्रण पुरणपात्रामधून फिरवून काढा. खुप घट्ट नाही आणि खुप सैलसर नाही असे पुरण तयार होईल.

४. आता तिंबवलेल्या पीठातून एक गोळा गोल मळून घ्या. आणि त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्या. पुरणाच्या गोळ्याला हलकेच तांदूळ पीठ लावून घ्या.

हा गोळा पीठाच्या पसरट केलेल्या गोळ्यावर ठेवून, भरून पीठाचा गोळा गोलाकार वळून घ्या.

५. तांदळाच्या पिठात घोळवून मग मस्त गोलाकार पुरणपोळी लाटून घ्या. लाटताना‌ फाटून पुरण बाहेर येत नाही ना ह्याची काळजी घ्या. तरीही फाटलीच तर तांदूळ पीठ पसरवा.

६. गॅसवर नाॅनस्टीक तवा गरम करत ठेवा. जराशे तेल पसरवा.  लाटलेली पोळी अलगद हातावर पेलत तव्यावर टाका. परत पोळीवरून तेल भिरभिरवा. खालची बाजू व्यवस्थित शेकली कि पू्रणपोळी कलथ्याने दुर-या बाजूला उलटावी. ह्यावेळी गॅस बारीक करावा. मस्त पुरणपोळी शेकून तयार. मधे घडी पाडून पुरणपोळी काढा.

७. खाताना मस्त साजूक तुपाची धार सोडून दुधासोबत खायला द्या. 😋🤩


------------------------------------------------------------


आता बनवूया चटपटीत कटाची आमटी:

२. कटाची आमटी: 🍲🌶️🥥

पुरणपोळी साठी चणाडाळ शिजवली कि चाळणीवर जे पाणी गाळून घेतो त्याची आई कटाची आमटी बनवते.


साहित्य:

१. पाव चमचा जीरे पावडर, ३-४ काळे मिरे दाणे, १-२ लवंगा, एखादा दालचिनी तुकडा, थोडेसे सुके खोबरे आणि मिरची पावडर नाॅनस्टिक पॅनमधे भाजून घ्या. आणि थंड झाल्यावर मिक्सरवर वाटण बारीक वाटून घ्या. 

२. चिंच भिजवून, चिंचेचा कोळ थोडासा

३. गुळ 

४.  बेडगी मिरची पावडर एक चमचा

५. एक चमचा गोडा मसाला

६. पाव चमचा हळद

७. अर्धा चमचा राई 

८.  हिंग पावडर

९. १०-१२ कढीपत्ता पाने

१०. चवीपुरते मीठ


पुरणपोळी सोबत खाल्ली जाणारी कटाची आमटी कशी बनवायची ते पाहुया:

१. आपण बाजूला काढलेल्या डाळीच्या पाण्यात चिंचेचा कोळ, गुळ, गोडा मसाला, हळद, बेडगी मिरची पावडर आणि सुके वाटण घाला आणि चांगले मिक्स करा.

२. आमटी गॅसवर चढवा आणि उकळी येऊ द्या.

३. तडकापात्रात तेल गरम करा. तेलामधे राई, हिंग आणि कढीपत्ता तडतडवा.

आणि ही फोडणी आमटीला द्या.

४. एक उकळी येऊ द्या आणि पुरणपोळी सोबत खायला  कटाची आमटी तयार!!!

नक्की आवडतील तुम्हाला माझी मम्मी आणि आई ह्या दोघींच्या पध्द्तीच्या पुरणपोळ्या, पंचामृत आणि कटाची आमटी! :)


---------------------------------------------------------


३. भोपळी_मिरचीचे_पंचामृत ♥️🌿🥘


समृध्द कोकणखाद्यसंस्कृतीतील हा आणखी एक अप्रतिम पदार्थ. भाजीपेक्षा चटणी सारखा थोडासा वाढला जातो आणि तोंडी लावणे सारखा खाल्ला जातो. आंबटसर, गोड, तिखट अशा भन्नाट मिश्र चवीचा पंचामृत, हा महाराष्ट्रीयन घरी बनवला एक पारंपरिक मराठमोळा पदार्थ आहे.‌ पुरणपोळी-कटाची आमटी ह्याबरोबर भोपळी मिरचीचे पंचामृत अगदी चविष्ट लागते.🥜🥥🌶️🍲🌿


बहुदा होळी, पिठोरी, गौरी-गणेशा वेळी नैवेद्यासाठी पुरणपोळी, कटाची आमटी आणि पंचामृत बनवत असलेल्याने कांदा लसूण कोणत्याच पदार्थात वापरत नाही. परिपुर्ण सात्विक नैवेद्यासाठीचा कांदा-लसूण-विरहीत स्वयंपाक बनवण्यावर आईचा कल असतो. 🤷😊 पुरणपोळी, कटाची आमटी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, कडव्या वालाची उसळ, लोणची, पापड, चटणी, कोथिंबीर वडी अशा पदार्थांच्या यादीत भोपळी मिरचीचे पंचामृताची पहिल्यांदा ओळख झाली. दिसण्यात हा पदार्थ उजवा नसला तरीही चवीमधे मात्र अव्वल गुण बरे का!💁


आतापर्यंत मला फक्त देवपुजेसाठी बनवण्यात येणारे दुध-दही-साखर(गुळ)-मध-तुप हे एकमेव पंचामृत माहित होते. पण हे पंचामृत ही मनात आवडीने सामावले त्या अफलातून चवीमुळे... शुभकार्यासाठी घरी पुरणपोळीचा घाट घातला कि आमच्याकडे हमखास पंचामृत बनवले जाते. 🥘🌿♥️


भोपळी मिरची, शेंगदाणे, खोबरे, काजू आणि मनूका हे महत्वाचे पाच घटक पंचामृतमधे असतात. पण त्यामुळे ह्या पदार्थांला पंचामृत म्हणतात कि काही जण म्हणतात त्याप्रमाणे ह्यामधे पाच वेगवेगळ्या चवी अनुभवायला मिळतात म्हणून पंचामृत संबोधतात ह्याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही. कुणाला माहित असल्यास त्याबाबत आम्हाला सांगितले तर आनंद होईल.🤷♥️


ही पाककृती आई रश्मी इंदूलकर कडून घेतली आहे. आईला आज्जीने म्हणजे तिची अतिशय हौशी सुगरण सासू मंदाकिनी इंदूलकर ह्यांनी ही पाककृती दिली आहे. 


साहित्य:

१. भोपळी मिरची (Capsicum): ३-४ नग

२. हिरवी मध्यम तिखट मिरची: २-३ नग

३. ओले खवलेले खोबरे: अर्धी वाटी

४. ओले खोबरे: बारीक पातळ तुकडे करून अर्धी वाटी

५. उकडलेला शेंगदाणे: अर्धी वाटी

६. काजू तुकडे‌: अर्धी वाटी

७. बेदाणे: अर्धी वाटी

८. खसखस: पाव वाटी

९. तीळ: पाव वाटी

१०. गोडा मसाला: पाव वाटी

११. बेडगी मिरची पावडर: पाव चमचा

१२. गुळ: पाव वाटी

१३. चिंचेचा कोळ: पाव वाटी

१४. मीठ: चवीनुसार

१५. साखर: चिमूटभर (ऐच्छिक)

१६. मोहरी: पाव चमचा

१७. धणे: पाव चमचा

१८. जीरे: पाव चमचा

१९. हिंग पावडर

20. साजूक तुप/ तेल

२१. मेथी दाणे ४-५


१. एका कढईमध्ये अख्खे धणे, जीरे, तीळ आणि खसखस हलकेच भाजून घ्या. थंड झाल्यावर त्याची मिक्सरवर पुड करा.

२. त्याच कढईत तेलावर ओले खवलेले खोबरे परतून घ्या. आणि आधीच बनवलेल्या पुडमधे मिसळून मिक्सरमधे बारीक करून घ्या.

३. कढईमधे तेल किंवा साजूक तूप गरम करा.‌ त्यावर राई आणि हिंगाची फोडणी देऊन तडतडवा. ४-५ मेथीदाणे पण परता.

४. हिरव्या मिरचीचे तुकडे फोडणीवर टाकून परतून घ्या. आणि मिक्सरमधे बारीक केलेली खोबरे आणि अख्ख्या मसाल्याची पुड टाकून परता. चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर तसेच गोडा मसाला आणि बेडगी मिरची पावडर टाकून परता. सगळे व्यवस्थित शिजू द्या.

५. सगळे व्यवस्थित परतले कि त्यात भोपळी मिरचीच्या बिया काढून, भोपळी मिरची चे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे, काजूचे तुकडे, ओल्या खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि बेदाणे टाकून परतून घ्या. बेदाणे छान टम्म फुलतात. :)

६. दहा मिनिटांनंतर चिंचेचा कोळ आणि खिसलेला गुळ टाकून मिक्स करा. अजून दहा-पंधरा मिनिटे वाफेवर शिजू द्यावे.

झाले कि तय्यार आगळेवेगळे पंचामृत तयार! 

पुरणपोळीसोबत खास आस्वाद घेता येतो पंचामृतचा पण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर देखील छान जमते पंचामृतचे! बनवणार ना मग लवकरच?!


काही छोट्या-मोठ्या टिप्स:

१. तेलापेक्षा अर्थातच साजूक तुपाची फोडणी सुरेख चव देते.

२. भोपळी मिरची गावठी मिळाल्या तर उत्तमच. Bell pepper म्हणजेच पिवळ्या, नारिंगी आणि लाल भोपळी मिरच्यांचे गंमत म्हणून किंवा सादरीकरण करण्यासाठी वापर करण्यास हरकत नाही. पण गावरान किंवा नेहमी मिळणा-या भोपळी मिरची उत्तम.

३. फोडणीसाठी कढीपत्ता आणि सजवणूकीसाठी कोथिंबीर चा वापर जाणूनबुजून टाळला आहे. कारण आज्जी च्या मते कढीपत्ता किंवा कोथिंबीर चे स्वाद मुळ चवीसाठी थोडेसे उग्र ठरू शकतात. पण तुम्हाला आवडत असल्यास वापर करण्यास हरकत नाही. 

४. उकडलेल्या शेंगदाणे च्या जागी भाजलेले शेंगदाणे हलकेच मिक्सरमधे एकदाच फिरवून वापरू शकता.


तर मग होळीसाठी बनवणार ना खुसखुशीत पुरणपोळी, पंचामृत आणि चविष्ट कटाची आमटी?! 😊🤟🌿🙏❤️


 - Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


#पुरणपोळी #कटाची_आमटी #puranpoli #katachi_amati #food #maharashtrian_food #marathi #homemade
















No comments:

Post a Comment