Thursday, March 17, 2022

कैरीचे पन्हे- उन्हाळ्यातले आवडीचे पेय! ❤️🥭

 कैरीचे पन्हे- उन्हाळ्यातले आवडीचे पेय! ❤️🥭

असह्य उन्हाळा देखील आवडायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, त्यापैकी एक म्हणजे चटपटीत कैरी/ आंबा! 😍🥭 

मस्त हिरव्यागार त-हेत-हेच्या कै-या बाजारात दिसत आहेत आणि लाॅकडाऊनमुळे थोडासा वेळही उपलब्ध आहे. कैरीचे लोणचे, चटण्या, भाज्यांमधे आणि वरणामधे कैरी टाकून आपण खात आहोतच. अशातच कैरीचे पन्हे पण नक्की बनवून पहा. कैरीचे पन्हे, त्या उकडून किंवा भाजून दोन्ही प्रकारे बनवता येते. मस्तच लागते. ग्लासमधे बर्फाचे तुकडा घालून त्यावर थंडगार पन्हे ओतून प्यायची मज्जाच वेगळी. पाककृती अर्थात आई रश्मी इंदूलकर कडून घेतली आहे. आईने बनवलेले पन्हे हे नेहमीच उत्कृष्ट चवीचे असते. आम्हाला आवडते म्हणून निरनिराळ्या चवीच्या कैरीचे पन्हे संपुर्ण उन्हाळा आई बनवत असते. 💁🥭❤️

चला सोप्या कैरी पन्हेसाठी काय काय लागते पाहूयात:

आपल्याला लागणार आहे:

४-५ कैरी (गोडसर आंब्याच्या असल्या तरी उत्तम)

साखर 

गुळ

वेलची पावडर

केशर काड्या


कृती:

१. हिरव्यागार कै-या स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये भांड्यात, अख्याच ठेवून २-३ शिट्या घेऊन शिजू द्या. कुकरला पाणी घालून, ट्रे स्टॅड ठेऊन एका भांड्यात कै-या ठेऊ शकता.

२. थंड झाल्यावर सगळा गर व्यवस्थित काढून घ्या आणि साल व बाठा फेकून द्या. 

३. जितका गर तितकीच साखर ह्यात घाला आणि एकदा मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्या. कैरी जितकी आंबट तितकी साखर जास्त लागते.

४. ह्या मिश्रणात वेलची पावडर आणि केशर काड्या टाकून मिक्स करा. मी अगदी चिमुट मीठ देखील टाकते. (आवडत असल्यास तुम्हीदेखील टाकू शकता. ऐच्छिक आहे.) 

५. आपला पन्हे साठी लागणारा पल्प तयार आहे. बाटलीमध्ये किंवा डब्यामधे भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. हवे तेव्हा काढून त्यात पाणी घालावे. पाणी किती घालावे ह्याचा अंदाज तुम्हाला येईलच. 

ह्यावेळी मी पन्हे बनवताना साखरेऐवजी गुळ किसून घातला. आणि मिश्रण हाताने कुस्करले. उत्तम लागले पन्हे. तुम्हालाही साखर नको असल्यास गुळ वापरू शकता. आणि शिजवण्याऐवजी कै-या छानपैकी गॅसवर भाजून Smoky flavour चे पन्हेदेखील बनवता येते! 🥭💁 

#panhe #summer_drink #mango #raw_mango #cooler #aampanha





No comments:

Post a Comment