Tuesday, March 15, 2022

#आमखंडी #कोलंबी_आंबा #वाडवळी

 #आमखंडी #कोलंबी_आंबा #वाडवळी !

❤️🌿🥭🌶️🌰🧄🦐

नुसता गरमा-गरम वाफाळता भात, त्यावर आंबटसर तिखट आमखंडी कसली अफलातून लाजवाब लागते हे ज्या वाडवळांनी ही आमखंडी किंवा कोलंबी-शेंग-कैरी चाखलेय त्यांनाच कळणार.... ❤️

खाडीचे कोलंबट म्हणजे जरा लहान आकाराची कोलंबी... चवीला छानच आणि शेवग्याच्या शेंगा आणि आंबटगोड कै-या आता बाजारात वर्षभर मिळतात त्यामुळे अगदी सहज कधीही आपण हे बनवू शकतो ही कोलंबी-आंबा भाजी... 

साधारणतः: तोंडाला पाणी आणणाऱ्या आंबटसर चटकदार कैरीचा सिझन सुरू झाल्यावर सतत घरात कैरीचे झटपट लोणचे, चटणी, शेंग कैरीचा वरण, टक्कू, गोडं लोणचं अशा पदार्थांची रेलचेल सुरू होते. तसाच कैरीचा सढळ हस्ते वापर करून आमखंडीसारख्या अनेक मिश्र  प्रकारच्या भाज्या आम्हा वाडवळांकडे केल्या जातात. 🌿✨💁

वाडवळ म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय, मुख्यत्वे वसई ते डहाणूच्या समुद्रकिनारकडे जमिनी, शेती-वाडी व घरे असणारे. भातशेती व बागायत वाडी हे उपजत पारंपारिक मुख्य व्यवसाय. त्यामुळे कोलंबी वा मासे आणि उळपात म्हणजे पातीचा कांदा, कैरी, वांगी, शेवगाच्या शेंगा वाडीतच मुबलक. त्यामुळे आवारातच उपलब्ध होणा-या भाज्यांचा वापर करून कोलंबी-आंबा किंवा शेंग-कोलंबी-वांग-आंबा ह्या वारंवार होणाऱ्या भाज्या!❤️🌿🥭🌶️🌰🧄🦐

उन्हाळ्यात घरी जेव्हाही जातो तेव्हा फोनवर मम्मीने विचारलेल्या, 'जेवायला काय बनवू?' ह्या प्रश्नाला आमचे उत्तर हमखास कोलंबी-आंबा असे असते. ताज्या ताज्या झाडावरून उतरवलेल्या कै-या आणि नुकतीच आणलेली कोलंबी असली की झटपट आमखंडी बनवता येते.

तर अशी ही सहज सोपी आणि चमचमीत अशी भाजी, वाडवळी मसाला वापरून कशी बनवायची ते बघूयात!🙂💁

वाडवळी मसाला प्रत्येकाकडे असेलच असे नाही, तर तुम्ही तुमच्या घरातील रोजच्या वापरातील मसाला देखील भाजीत घालू शकता. 💁🍲


बघुया काय काय लागेल साहित्य कोलंबी-आंबा किंवा आमखंडी साठी:

१. दोन मोठ्या आकाराचे उभे कापलेले कांदे 

२. एका मोठया आंबट कैरीचे तुकडे 

३. पंधरा-वीस कोळंबी साफ केलेल्या (साले काढू नका)

४. आले लसूण पेस्ट

५. बारीक चिरलेली कोथिंबीर

६. हिरवी मिरची व कढीपत्ता

७. रोजच्या वापराचा घरगुती वाडवळी मसाला

८. सेलम हळद पावडर

९. मीठ आणि चिमूटभर साखर

१०. कोथिंबीर बारीक चिरून


एका जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून त्यात कापलेला  कांदा चांगला परतून लालसर रंगावर शिजवून घ्यावा. मग मिरची, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, घरगुती वाडवळी मसाला, सेलम हळद, मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर  आंबट कैरीचे तुकडे आणि कोळंबी टाकून व्यवस्थित ढवळावे.🥘🍲


सगळी भाजी व्यवस्थित मिक्स केली, की थोडे पाणी घालून झाकणामधेदेखिल पाणी ठेवून वाफेवर  शिजू द्यावे. एव्हाना मस्त दरवळ पसरला असेल. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे व मस्त मिश्र चवीची गावरान कैरी टाकलेली कोळंबीची भाजी तयार असेल. चुलीवर करता आली तर चव अजूनच वाढते हा स्वानुभव आहे.😋


नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल.💁


ही भाजी भाकरी सोबत उत्तमच लागते. पण साध्या  वाफाळत्या मऊसुत भाताबरोबर खायची गंमतच न्यारी! :) मग चिंचेचे सार, वरण किंवा आमटीची वेगळी अशी गरज भासत नाही. आणि सोबतीला फोडलेला कांदा वा मुळा, मिरची-बोंबलाचा ठेचा असले तर 'ज्जे ब्बात!!!' 😋🍲💁🦐🥭


टिप:

१. कोळंबी लहान किंवा मध्यम आकाराच्या घ्या. कोळंबीची साले काढू नका. फक्त पाय, शेपटी आणि मधला घाण असलेला काळा धागा काढून टाका. ह्या आमखंडीमधे साले असलेली कोलंबी जास्त चांगली लागते.

२. कोळंबी जागी करंदी टाकून देखील भाजी करू शकता.

३. काहीजण कांदा, आलेलसूण, कोथिंबीर, मिरची आणि एखादा टाॅमेटो असे मिक्सरमधून काढून, हे वाटण लावून जाडसर रस्सा देखील बनवतात.

४. काही जण, ह्यामध्ये थोडेसे नारळाचे दुध देखील घालतात. हेदेखील भन्नाट लागते. ‍‍


.

.

.

.

.

.

.

.

.

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


#currywithmango #rawmango  #valvalispecial  #आमखंडी #कोलंबी_आंबा #cookingwithfreshingredients













No comments:

Post a Comment