Saturday, March 12, 2022

सुकामेवा_आणि_मसाल्यांची_थंडाई

#सुकामेवा_आणि_मसाल्यांची_थंडाई

उन्हाळ्यात येणा-या होळीपोर्णिमेसाठी आल्हाददायक थंडाई! ❤️ होळी धुलवड/रंगपंचमीच्या निमित्ताने केली जाणारी थंडाई मी ह्या वर्षी बनवली. उन्हाने अंगाची काहिली होत असताना थंडगार थंडाई प्यायला छान वाटते. थंडाई निरनिराळ्या पध्द्तीने बनवतात. सुकामेवा भिजवून जाडसर पेस्ट बनवून किंवा सुकी पावडर बनवून देखील बनवतात. यात खसखस सुध्दा घातली जाते. थंडाई आमच्याकडे आधी कधीच बनवली गेली नाही पण बनवायची उत्सुकता मात्र होती म्हणून ह्यावर्षी बनवली. थंडाई पावडर बनवताना मी Arati Aarti Madan यांचा Video पाहून त्याप्रमाणे अंदाज घेत बनवली. तसेच थंडाई पेस्टची पण पाककृती खाली देत आहे.

 • सुकी थंडाई पावडर किंवा थंडाई मसाला:

एक वाटी बदाम

अर्धी वाटी पिस्ता

अर्धी वाटी काजू

पाव वाटी मगज

थोड्याशा सुकलेल्या गुलाबपाकळ्या

१ टेबलस्पून काळेमिरे 

३ टेबलस्पून बडीशेप


(मी मसाला दुध साठीचा मसाला देखील थोडयाफार अशाच पध्द्तीने करते. मसाल्यांमधे मात्र फक्त वेलची घालते आणि काजू जास्त प्रमाणात वापरते.)


१. बदाम, काजू, पिस्ता, मगज, गुलाब पाकळ्या, केशर काड्या हे सारे मिक्सर वर थोड्या थोड्या अंतराने फिरवत बारीक करून घ्या.‌ एकदाच खुप वेळ फिरवल्यास सुकामेव्यामधील तेल निघून पावडर मोकळी न होता तेलकट होऊ शकते, ही व्हिडिओ मधील टीप होती. 

२. ही पावडर आता बाजूला काढून ठेवा. ह्याच मिक्सरमध्ये जराशी कुटलेली अशी वेलची, दालचिनी, बडीशेप, काळेमिरे आणि बादियान पावडर घालून अगदी बारीक करून घ्या. 

३. आता ह्यात परत आधी बनवलेली सुकामेवा पावडर घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. आपला थंडाई मसाला तयार आहे.

 हा मसाला फ्रिजमधे १-२ महिनेही आरामात राहतो. उन्हाळ्यामध्ये थंडावा म्हणून आपण हा होळीनंतरही वापरू शकतो.

४. आता एक ग्लास कोमट दुधात तीन चमचे हा थंडाई मसाला मिसळा. चमच्याने चांगला ढवळा. दहा ते पंधरा मिनिटे ग्लास तसाच राहू दे. दुस-या एका भांड्यात एक ग्लास थंड दुध घ्या. त्यात तुम्हाला गोडसरपणा जेवढा आवडतो त्या प्रमाणात साखर घेऊन, चमच्याने ढवळत पुर्ण मिसळा. 

५. आता आधीचे मसाला मिसळून बनवलेले एक ग्लास दुध ह्या साखर मिसळलेल्या दुधात ओता. ढवळून घ्या. आणि हवे असल्यास फ्रिजमधे थोडे थंड करा. किंवा लगेचच ग्लासमधे ओता आणि त्यावर पिस्त्याचे काप, गुलाबपाकळ्या, केशर काड्या टाकून सजवा आणि थंडाईचा आस्वाद घ्या.


 • थंडाई पेस्ट

१. अर्धी वाटी बदाम, पाव वाटी पिस्ता गरम पाण्यात अर्धा तास भिजवा आणि थंड झाल्यावर त्यांची साले काढून टाका.

पाव वाटी काजू, पाव वाटीपेक्षा कमी मगज, गुलाबपाकळ्या हे सारे देखील कोमट पाण्यामधे अर्धा ते एक तास भिजत ठेवा.

२. आता भिजवलेले वरील सर्व एकत्र करा. आणि केशर काड्या, थोडे दुध  आणि थोडीशी साखर घालून बारीक करून घ्या.

३. पाव टेबलस्पून काळेमिरे , २ टेबलस्पून बडीशेप, चिमुटभर बादियान पावडर, ४-५ वेलदोडे/ हिरवी वेलची यांचीदेखील बारीक पावडर करून घ्यायची. चाळून वस्त्रगाळ केली तरी चालेल. ही पावडर सुकामेव्याच्या पेस्ट मधे घालून मिक्स करा.

४. कोमट दुधात आवडीप्रमाणे साखर घालून, एकजीव करून, ही पेस्ट मिसळा. अर्धा तास तसाच ठेवा. साधारण एका ग्लासला एक ते दीड चमचा पेस्ट पुरेशी होते. थंडाई तयार‌. सुकामेव्याचे तोंडात येणारे तुकडे आवडत नसल्यास, सरळ गाळून घ्या. 

४. एका ग्लासमधे बर्फाचे खडे टाकून त्यावर ही थंडाई ओतून सर्व्ह करा. आणि केशर काड्या, गुलाबपाकळ्यांनी गार्निश करून आस्वाद घ्या.

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#थंडाई #thandai #holi #dhulivandan #होळी
















No comments:

Post a Comment