Wednesday, March 2, 2022

काजूच्या बोंडांचे दह्यातले रायते! ✨

 काजूच्या बोंडांचे दह्यातले रायते! ✨


सफाळा स्टेशनला पिवळेधम्मक ओले काजूचे बोंडू मिळाले. घमघमाट होता उग्र सुगंधाचा... थोडे लालसर मिळाले असते तरी मज्जा आली असती... तसे पाहिले तर Cashew apple ला Cashew nut एवढे प्रेम क्वचितच लाभते. काजू बी अलगद पिरगळून काढली की बहुतेकदा गर फेकला जातो. कारणही तसेच, हा गर खाल्ला कि घशाला खवखवते आणि ह्यावर पाणी प्याले कि पोटातही बाधते असे म्हणतात. 


आई आणि आमच्या स्टोअर स्टाफ मधल्या तृप्ती ह्या दोघी अस्सल कोकणी- काजूंच्या गावातल्या, त्या दोघींनी मात्र एक एक काजू बोंड अगदी लहान मुलासारखे हौसेने मीठ लावून खाल्ले. आणि काजू बीया भाजून 🤗 रसदार असे हे फळ, C vitaminने समृध्द असते.


कोकणात गोव्यात मोठ्या प्रमाणावर काजेची लागवड होते. आणि बोंडांवर प्रक्रिया करून Jam, Jelly, candy, सरबत किंवा squash बनवतात. गोव्यातील 'फेनी' तर प्रसिद्धच आहे. आपणही घरी, काजू बोंडांच्या तुकड्यांमध्ये, लिंबू रस, मीठ, चाट मसाला, साखर वैगरे मिसळून, मिक्सरला लावून, गाळून ज्युस काढून पिऊ शकतो. 


तर सफाळ्याला काजू बोंडे हौस म्हणून घेतली खरी पण बोंडांची खास अशी पाककृती काही मिळाली नाही. ही एक पाककृती एका कोकणी ब्लॉग वरून मिळाली.बहुदा मंगेश यांचे कोकण मेवा नावाचा ब्लाॅग असावा.


काजू बोंडांच्या रायत्याची पाककृती:

काजू बोंडे धुवून चौकोनी तुकडे करायचे. मीठ लावून एक वाफ काढून घ्यायची. पाणी सुटते ते फेकून द्यायचे. काजू तुकडे जरा पिळायचे. जीरा पावडर, मीठ, इलुशी साखर, लिंबू रस आणि दही छान मिक्स करायचे.


पळीमधे तुप किंवा तेल गरम करून, कढीपत्ता, राई, जीरे, हिंग, हिरवी मिरचीची फोडणी करून, ह्या काजूच्या मिश्रणावर चुरचुरीत फोडणी लावायची. मस्त एकत्र मिसळून भाकरी किंवा भाताबरोबर खाता येते. त्यांनी मेतकुट देखील मिसळले आहे.


पाणी काढल्याने घसा जास्त खवखवत नाही पण हो जरा फ्लेवर कमी होतो असे मला जाणवले. म्हणजे काजूबोंडांची जी पंच देणारी चव असते ती कमी होते.


ह्या सिझनला एकदा दोनदा खायला आवडेल इतपतच आवडले पण काजू बोंडू ज्यांचे favourite आहे त्यांनी नक्की करून पहा.


#काजू #काजूगर #कोकण #रायते #काजूबोंड #cashewapple #cashew








No comments:

Post a Comment