Monday, February 28, 2022

महाराष्ट्रीयन मराठमोळ्या थाळ्या

 #मराठमोळ्या_थाळ्या_मराठीभाषादिनानिमित्ताने


मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठीतील‌ लिहीलेला, मराठमोळ्या पदार्थांनी भरलेल्या ताटांबद्दलचा गेल्यावर्षी लिहीलेला लेख परत देत आहे. इंग्लिश मोबाईल वर लिहायला सोपे म्हणून आधी इंग्रजी लाच प्राधान्य देऊन लेख तसेच काहीही माहिती लिहायला मी किंवा अनेकजण पुढाकार घेत असत. आता मराठी किबोर्ड मुळे सारे सोपे आहे. 😀🌿♥️


कदाचित इतर भाषांमध्ये लिहील्याने, आपल्या मराठमोळ्या पदार्थांबाबत, संस्कृती, कुळाचार किंवा ‌पारंपारिक रिती रिवाजांबाबत लिहील्याने ते मराठी भाषिकांसकट इतरही भाषिकांपर्यत किंवा देशो-देशीच्या प्रांतिय सीमा ओलांडून अनेकांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा अनेक भाषेत लिहील्याने देखील आपण आपली मराठमोळी सुरेख संस्कृती अनेकांपर्यंत पोहोचवू शकतो. पण का कुणास ठाऊक जसा इतिहास मराठीतून वाचताना शहारे येतात अंगावर, तसेच कोणत्याही महाराष्ट्रातील पदार्थांबाबत मराठीतून वाचताना‌ आनंद जणू व्दिगुणित होतो. 🌟😀🌿🙏🍱


तर आजचा हा जागतिक मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली आहे. 


"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्या एक तो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामानात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी"!!! 😀🙏🍱🌿


#अन्नपदार्थातील_मराठमोळ्या_थाळ्या

#सजावट_नेटकेपणा #अन्न_हे_पुर्णब्रम्ह

#सहजच #repost #मराठी_भाषा_दिन

🥘🥙🍛🍲🥗🥣🍛🍱🍽️🍴☕🍵🌶️🥦❤️🌿


आज्जी नेहमी  सांगत असे कि स्वयंपाक बनवून वाढण्याइतकीच, जेवण करतेवेळी स्वच्छता अनुसरून करणे व छानपणे सुटसुटीत पान/ ताट वाढणे हीदेखील महत्वाची कला आहे. ज्या कलेला आजकल आपण Presentable, hygiene food serving किंवा Food Art म्हणतो. वाढलेल्या अन्नाचा दरवळ नाकाला आणि त्याची मांडणी नेत्रसुखद असली की चविष्ट जेवणाचा लाभ घेणा-याच्या पोटासोबत मनही तृप्त होते. 🌿❤️🙃


आजकाल जसे 'बुफे' पध्द्तीत, food counters वर उत्तमोत्तम सजावट केलेली असते, त्याचपध्द्तीने पुर्वी काळी पंगती बसत. अगरबत्तीचे गुलदस्ते आणि रांगोळीचे सडे किंवा साध्या फुलांच्या आराशींच्या साथीने केळीच्या पानामधे अथवा सुरेख गुंफलेल्या पत्रावळीमधे "वदनी कवळ घेता..." रूपी देवाचे स्मरण करून जेवणाचा आस्वाद घेऊन पंगतीच्या पंगती समाधानाने जेऊन उठत.

स्वच्छ टापटीप स्वयंपाकघर, चकचकीत नेटकी भांडी, हसतमुख अन्नपुर्णा आणि अगत्यशील यजमान असले कि साधी भाजी-भाकरी खातानाही छानच वाटते.

अशी ही स्वच्छता ही जेवण करताना खुपच महत्वाची... आम्ही लहान असताना मुद्दामच गणपती मधल्या घरगुती पंगतीमधे सगळ्यांची ताटे व्यवस्थित वाढायला म्हणून मम्मी, मावशी व माम्या आम्हा लहानग्यांना पिटाळायच्या. ताटे, वाट्या, चमचे व पाणी पिण्याचा ग्लास स्वच्छ कपड्यांनी पुसून नीट मांडायचे हे धडे जेवण रांधण्याइतकेच महत्वाचे...


ह्या पोस्टबरोबर दिलेल्या फोटोंमधे, मी जरी एक-दोन ताटे सोडून सर्वच ताटे अगदी 'ताट कसे वाढावे' ह्यावर मम्मीने सांगितलेल्या पध्दतीने वाढली नसली तरी जमेल तेव्हा पंगतीच्या वेळी मी शक्यतो व्यवस्थित वाढायचा प्रयत्न करते. आमच्याकडे ढोबळमानाने, पानाच्या डाव्या हाताला पाण्याचा ग्लास आणि डाव्या बाजूला खालपासून वरपर्यंत क्रमाने चपाती/ पोळी, पापड,  कोशिंबीर, चटणी, मीठ, लिंबू फोड, गोड पदार्थ, मग उजव्या बाजूला वरपासून खालपर्यंत क्रमाने सुक्की भाजी, रस्सा भाजी, कढी, वरण किंवा आमटी. मधल्या भागात भात आणि दहीभात असे ताट वाढले जाई. ताक किंवा मठ्ठा असल्यास ताटाबाहेर उजवीकडे ठेवले जाई. 

मांसाहारी ताटावेळी मोजकेच आटोपशीर पदार्थ असल्याने ताट लावायची काळजी नसे. :) जेवल्यावर पान खायची आमच्याकडे सवय नसली तरी पानाच्या चवीचे विविध मुखवास हमखास असत. ते हातावर दिले कि जेवण उरकत असे. 


पाहुणे आल्यावरच कशाला पण घरातल्या घरातदेखील

अगदी रोज नाही पण जमेल तेव्हा बहुतांशी वेळा, घरच्यांसोबत आहे ते रोजचेच पदार्थ आवडीने व्यवस्थित वाढून, एकत्र जेवण्याची मजा काही औरच!! 😊 आम्ही देखील रोजचेच मेन्यू बनवतो, रोज सहजच ताटात वाढत असलो तरी तेच पदार्थ पाहूणे आल्यावर छानश्या वाट्यांमधून, ठेवणीतल्या काढलेल्या भांड्यामधून वाढले कि खाणारा पाहुणाही खुश होऊन जातो. साध्या गोष्टी असतात पण फार छान परिणाम होतात.


अनेकदा  फोनवर विचारले जाते, 'अग पाहूणे येताहेत जेवायला, काहीतरी सुचव ना घरच्याघरी काय काय पदार्थ बनवू?' 🙃

माझ्या मते, अगदीच जवळचे पाहुणे असतील तर आपण थेट त्यांनाच विचारून त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून उत्तम पाहुणचार करू शकतो. मग मराठमोळेच कशाला, चाईनीज, continental, Italian, South Indian, North Indian अशा अनेक पदार्थांची रेलचेल होते. पण जेव्हा येणा-या पाहुण्यांशी जुजबी ओळख असते तेव्हा बहुतेकदा वयोमान आणि ज्या ठिकाणाहून आले आहेत त्याचा अंदाज घेऊन आणि शाकाहारी कि मांसाहारी कि फक्त मत्स्याहारी अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊन त्या अंदाजाने परिपुर्ण 'थाळी' त्यांच्यासमोर पेश करून नक्कीच जिभेसोबत मनावरही मराठमोळ्या जेवणाचा ठसा उमटवू शकतो.

🍱🌶️🌿❤️


महाराष्ट्रातच मराठमोळ्या पद्धतीतच कित्ती विविधता आहे बघा ना... आणि असंख्य सुरेख पदार्थ आहेत प्रत्येक एका समाजामधे, प्रांत आणि जिल्ह्यानुसार... शाकाहारी, मांसाहारी, मांसाहारी मधेही फक्त अंडी खाणारे, फक्त मासे खाणारे, नुस्ते चिकन खाणारे पण मटणाला स्पर्शही न करणारे असे अनेक प्रकारचे लोक असतात. आठवड्यातील काही ठराविक वारीच मांसाहारी व इतर वारी शाकाहारी खाणा-या महाराष्ट्रीयन लोकांची संख्या खुप आहे. काही जण मिक्स खातात तर काहींना मटण, चिकन, मासे एकत्र आवडत नाहीत.


तर बघुया हाॅटेलस्टाईल वेगवेगळ्या मराठमोळ्या "थाळी" चे कोणकोणते 7 various combination Options आपण बनवू शकतो. अजूनही असल्यास नक्की suggest करा. 🙂🙏


१. शाकाहारी मराठमोळी थाळी:🍲🥣🥗🥙

शाकाहारी जेवणामधे ढोबळमानाने चिमुटभर मीठ, लिंबाची काप, लोणचे, चटणी, दही, कोशिंबीर, पापड, एखादा कटलेट किंवा कांदा बटाटा भजी, सुकी भाजी (बटाट्याची भाजी, कडधान्याची सुकी भाजी, भेंडीची भाजी वैगरे), वाटीत ओली भाजी (मुगाची उसळ, वालाचे भिरडे, भरले वांगे, दुधीची आमटी वैगरे), वाटीमधे वरण वा आमटी, वाटीत ताक किंवा मठ्ठा, गोड पदार्थ वा खिर, पोळी अथवा भाकरी, साधा भात आणि पुलाव किंवा मसालाभात मध्यभागी. अगदीच आंबा सिझन असला कि आमरस पुरी आणि खास दिवशी श्रीखंड पुरीचा किंवा पुरणपोळी चा घाट असतो.


२. अंड्याची स्पेशल थाळी:🐣🍳🥚🍛

मांस मच्छी न खाणारे पण आवडीने अंडी खाणा-यांचीदेखील बरीच संख्या आहे. मग ताटात, चपाती किंवा भाकरी, भाता, कोशिंबीर सोबत आम्लेट Fry किंवा भुर्जी आणि अंड्याची आमटी, अंडाकरी आणि उन्हाळ्यातल्या काजूच्या हंगामी ओले काजू-अंडा करी अगदी चार चांद लावते जेवणाला.


३. चिकन थाळी:🐔🐓

मांसाहारी जेवण चिकनचे असेल तर, चपाती किंवा भाकरी, एक गावरान चिकन रस्सा भाजी किंवा सावजी चिकन रस्सा, सुक्के चिकन किंवा ग्रीन मसालख चिकन fry, चिकन खीमा पॅटीस, तंदूर किंवा Grilled पदार्थ 

नाहीतर मस्त कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा बेत,  सोबत कांदा-टाॅमेटोची कोशिंबीर, सोलकढी, आणि भात/ जीराभात! आमच्याकडे चिंचेची कढी देखील चालते सोबत... किंवा चिकन दम बिर्याणी मस्तपैकी!


४. मटण थाळी:🐐

भात, जीराभात किंवा मटण दम बिर्याणी, कोशिंबीर, मटणाचा कडक गावरान रस्सा किंवा सावजी मटण, सुक्के मटण fry, भेजा fry किंवा कलेजी fry, मटण चाप fry, खीमा भाजी, खीमा पॅटीस असे एकापेक्षा एक सरस पदार्थ मटण थाळी सजवतात. सोबत पाया सुप बनवून देता आले तर अतिउत्तम!


५. ताजे मासे थाळी: 🐟🦈🐠🦐🦀

आणि मासे असतील तर चपाती किंवा तांदळाची भाकरी, भातासोबत सोलकढी, बोय, रावस, पापलेट सारख्या माशाचे कालवण किंवा आमटी, तिस-या किंवा खेकड्याचा रस्सा, तळलेला कोलंबी कांदा, खरपुस तळलेले बोंबील, बांगडे, मांदेळी, पापलेट, कोलंबी, सुरमई सारखे मासे, कोशिंबीर, माशाचे तिखले अगदीच जमले तर कोलंबीची बिर्याणी असलेली, घरी प्रेमाने रांधून सजवून वाभलेली थाळी अगदी जेवणाबाबतीत मत्स्यप्रेमींच्या हृदयाचा आरपार ठाव घेते.


६. सुके खारवलेले मासे थाळी:🦐🦞

खारवलेले मासेदेखील बहुतांश ठिकाणी आवडीने 'ओरपले' जातात. ह्या थाळीमधे चपाती किंवा तांदळाची भाकरी आणि भातासोबत कोशिंबीर, चिंचेची कढी, सुके बोंबील-बटाटा-वांगे रस्सा भाजी, सुकी करंदी-कांदा भाजी, सुक्या बोंबलाची चटणी असे मस्त सगळे खायला मज्जा येते.


७. उपवासाची थाळी:🍌🥣🍚🥛🥜🌶️

आमच्याकडे आषाढी एकादशीला आई हमखास ही उपवासाची थाळी बनवते. मग आम्ही उपवास करणारे आणि न‌करणारेदेखील आवडीने ह्या थाळीचा आस्वाद घेतो. ह्या थाळीमधे आई भगरीचा भात, उकडलेल्या शेंगदाणे वाटून केलेली आमटी, मिरचीचा ठेचा आणि रताळे-उकडलेल्या शेंगदाण्याची भाजी करते. सोबत वेलची केळे आणि बटाट्याचा चिवडा किंवा चिप्स देते. काय अफलातून चविष्ट लागते ही थाळी कि काय सांगू... 


लाडक्या बाप्पाला किंवा देवबाप्पाला, नैवेद्यासाठी ताट रचताना देखील निखळ आनंद मिळतो.


माझे मामाचे गाव व घर बंधा-याला लागुन, आणि मामाकडे केळीची बागायत, त्यामुळे सुरेख मोठी, हिरवीगार पाने पंगतीतल्या जेवणासाठी मिळायची.ती पाने स्वच्छ पुसून, पानापाठची शिर काढून व पाने न फाडता पंगतीसाठी मांडणे हे आपल्यातच असे skillful काम असे.  तसेच केळीच्या हिरव्यागार पानावर वाढलेले ते जेवण अतिशय सात्विक भासत असे.


ह्याच सात्विकतेमुळे की काय, नैवेद्यासाठी देखील पहिला मान केळीच्या पानाचा...  मुख्यत्वे, संकष्टीला गणपतीबाप्पा ला किंवा खास सणांना देवबाप्पला नैवेद्य वाढताना, खाली स्टीलचे ताट आणि वरती केळीचे पान असायचे. त्यावर इतर पदार्थांच्या जोडीने, ती पांढ-या शुभ्र भाताची मूद, त्यावर मोजकेच वरण, थोडेसे दही आणि हळुवार सोडलेले साजूक तूप... आणि दुर्वा किंवा तुळशीपत्र, उकडलेले किंवा तळलेले २१ मोदक, दोन भाज्या, गोड पक्वान्न, पापड, कोशिंबीर, लोणचे, चटणी कसले भारी वाटायचे!!! आणि नैवेद्य दाखवताना, रांगोळीची किंवा फुलांची हलकिशी महिरप ताटाभोवताली... :)


मी कधीतरी आधी सुंदर बांधलेल्या पत्रावळी आणि द्रोणाच्या वापराने सजलेल्या पंगतीत जेवलेय. जुना फोटो नेमकीच सापडला नाही पण खुप च सुरेख आरास वाटत होती. मोठाल्या सागवानी वृक्षाच्या जाडसर मोठ्या पानांच्या पत्रावळ्या किंवा लहान लहान हिरव्यागार पानांच्या गोलाकार काडया लावत सुरेख बांधलेल्या पत्रावळ्या असलेल्या भारी वाटतात. साक्षीने मांडलेल्या पत्रावळ्या, त्याभोवती हलकीशी रांगोळी...साधीशी... कुठेतरी वाचलेले कि आधीच्या काळी शेणाने सारवलेल्या जमिनीवर जेवायला पंगती बसत मग तेव्हा पत्रावळीभोवती रांगोळी फक्त सुंदर कलात्मक वाटावे ह्याबरोबरच किडे, मुंगी किंवा किटक जेवणाभोवताली येऊ नयेत हया उद्देशाने असे. उदबत्ती चा बुक्का ही प्रसन्न वातावरण निर्मितीसाठी असे. परत भारीतली सुपारीची पाने जेवणाच्या जाड पानांमध्ये मोल्ड मधून आली आहेत. पत्रावळीचेही नवी eco-friendly ला दुजोरा देणारी मंडळी नव्याने वापर करीत आहेत हे स्वागतार्ह नक्कीच आहे. :)


असो, तर असा ह्या लेखाचा साधासा उद्देश हाच की, जेव्हाही आपण जेवण किंवा स्वयंपाक करतो ते नुसते बनवून कसेतरी वाढले तर तितकीशी मजा येत नाही. पण तेच जेवण अगदी सोप्या साध्या efforts ने ताटात मस्तपैकी arrange करून वाढले तर छानच वाटते. 


"वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥"


"अन्नदाता सुखी भव!!!"


#Images used in this article are some of homemade dishes presented while we had visitors. They are not perfectly arranged but given for representation purpose. :)


#थाळी #शाकाहारी #मांसाहारी #laxmi_masale_edwan #masala_bazaar_virar #spice_blends #maharashtrian_food #thalis #set_of_foods #veg #veg_thali #non_veg #nonveg_thali #egg_thali #mataki_thali #fish_thali #chicken_thali #mutton_thali #authenticfood


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/

















































No comments:

Post a Comment