Wednesday, February 16, 2022

वाडवळी पध्दतीने ताज्या_मास्यांचे_कालवण_आणि_तळलेले_मासे

 #ताज्या_मास्यांचे_कालवण_आणि_तळलेले_मासे

🐠🦈🐟🦐🐋🐠 #वाडवळी_कालवण

#vadvali_kalvan

वाडवळांकडचे मास्याचे कालवण भातात कालवून किंवा कालवणात बुडवलेली भाकरी ज्याने खाल्ली असेल, तो नक्कीच त्या चवीला विसरणार नाही. ह्या पाककृती मम्मीकडून शिकलेल्या आहेत. अजूनही ब-याच आहेत, लवकरच पोस्ट करू.


आमच्या एडवणची #वाडवळ (सोमवंशी क्षत्रिय) पध्दतीने मासे कालवण आणि तळलेले मासे बनवायची पध्द्त (Please Note: आम्ही एडवणला किंवा त्या पट्ट्यात अशा प्रकारे मासे बनवतो. डहाणू, केळवे, वसई किंवा आगाशी भागातील वाडवळांची मासे बनवायची पध्द्त पण घरोघरी थोडीफार वेगळी असू शकते याची नोंद घ्यावी. तुमच्याकडे वेगळी कृती असल्यास नक्की Comment मधे लिहा. आम्ही नक्की Try करू आणि पुढच्या लेखात लिहू. :) )


तर वाडवळ म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाची स्वयंपाकाची एक आगळी खासियत असलेली पध्द्त आहे. वाडवळांमधे सोमवंशी, सुर्यवंशी, चौकळशी, पाचकळशी, पानमाळी अशा जाती-पोटजाती आहेत. स्वयंपाकाच्या पध्दती थोड्याबहुत फरकाने सारख्याच... आमचा हा समाज मुंबई, ठाणे पासून डहाणू पुढपर्यत विस्तारला आहे. 


खाण्यापिण्याच्या सवयीबाबत चोख आणि चवीने खाणारे म्हणून वाडवळ प्रसिद्ध! बहुतांशी वाडवळ सामिष खातात. बागायती आणि शेतीवाडी बाळगून असलेल्या वाडवळांची खाद्यसंस्कृतीदेखील खुप चविष्ट आणि समृध्द आहे. वाडवळांमधे, मांसाहारी व शाकाहारी दोन्ही प्रकारचे बहुतांश पदार्थ बनवायला सोपे पण चमचमीत असतात. वाडवळ हे शेती वाडी करणारे आणि विशेषतः समुद्राला लागून असलेल्या भागात/ पट्ट्यात राहणारे त्यामुळे आहारात ताज्या भाज्या, भाकरी-भात आणि मासे यांचे प्रमाण विशेष. पुर्वपारापासून शेती-वाडी-बागायत-दुग्धव्यवसायात, खाऊची पाने हे व्यवसाय मुख्यत्वे वाडवळ समाज करत असे. घरातील पुरूषांसोबतच, महिलाही शेतातील अनेक कामांना हातभार लावत. ताजा भाजीपाला, शहाळी-नारळ, केळी आणि इतर फळे, निरनिराळी फुले, केळीची पाने-खांब जवळच्या बाजारपेठेत किंवा मोठाले गाठोडे घेऊन पार मुंबई वैगरे शहरातही महिलावर्ग सहज प्रवास करत असे. मग अशावेळी घरची कामे, स्वयंपाक भराभर उरकण्याकडे कल असे. म्हणून आमची मास्यांची कालवणे, भाज्या ह्या अगदी सरळसाध्या पध्द्तीने, झटपट होणा-या असतात आणि तरीदेखील चविष्ट! 🤗❤️ शेतीमधे तांदळाचे म्हणजेच भाताचे मुख्य उत्पादन. त्यामुळे चमच्याने किंवा हाताने तव्यावर फिरवलेली तांदळाची भाकरी आणि भात हे ओघाने आलेच. 

आणि वाडीमधे लावलेल्या वांगी, टाॅमेटो, शेवग्याच्या शेंगा, दुधी, शिराळा, पडवळ, गवार, मेथी, मिरच्या, पालेभाज्या, उळपातीचा कांदा, केळी, केळफुलं, वालाचे गोळे, कोथिंबीर, अळू, देठ, कडवे वाल, गलके, कोबी, फ्लाॅवर अशा सर्व भाज्यांचा स्वयंपाकात वापर असतो. समुद्राकाठी वसलेले असल्याने ताजे मासे आणि सुके मासे दोन्ही प्रकार जेवणात असतात. आणि ताज्या भाज्यादेखील आम्ही ओल्या किंवा सुक्या मासळीमधे वापरतो. मास्यांमधे आले-लसूण पेस्ट आणि तिखट-मीठ-मसाला-चिंच आणि तांदळाचे किंवा रव्याचे पीठ लावून तळलेले मासे, पातळसर कालवण किंवा सुके खोबरे भाजून वाटण लावून केलेले थोडेसे जाडसर असे कोलंबी, बोयमासा, बोंबील, पापलेट,‌ मांदेळी, घोळ मासा, खा-या मास्याचे कालवण, किंवा कांद्यावर परतलेली कोलंबी, कोबीचे सुके बोंबील टाकलेले भानोळे आणि कालवे असे प्रकार असतात. वांगे किंवा दुधीदेखील कोलंबटासोबत (लहान कोलंबी) भाजीत घालतात. आमची कोलंबी-आंबा भाजी तर खुपच प्रसिद्ध आहे. सुकवलेल्या मास्यांबरोबर देखील काही भाज्या आम्ही वापरतो.


चिंचा खारवून मोठ्या प्रमाणात भरून ठेवल्या जातात. आंबटपणासाठी, कोकम/लिंबापेक्षा चिंचेचा सढळ वापर आमच्या पदार्थात असतो. चिंचकढी हा प्रकार आम्ही भातावर घेऊन सारासारखा खातो. आंबोशी हा सुकवलेल्या आंब्याचा प्रकार आणि खारवलेले आंबे (खा-या पाण्यात कै-या वर्षभर वापरण्यासाठी भरतात) उन्हाळ्यात कैरीचा वापर स्वयंपाकात सढळहस्ते असतो. आता ब-याच वर्षांपासून टाॅमेटो हादेखील आमच्या स्वयंपाकाचा भाग झाला आहे. चिंचेमुळे संधिवात वैगरे व्हायची भिती वाटणारे हमखास टाॅमेटो वापरतात. नारळाच्या दुधाचा किंवा खोब-याचा वापर मात्र जेमतेमच...  💁


तर आमच्या निसर्गरम्य एडवणला मस्त मोठ्या लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे नानाविविध त-हेचे चविष्ट मासे एडवणवासियांना खायला मिळतात.  एडवणला बोयमासा, पापलेट, बोंबील, कोलंबी आणि मांदेळी हे माशांचे प्रकार जास्त प्रमाणात मिळतात. खेकडे, रावस, हलवा, शेवंडी, काटी वैगरेही असतात. एडवणप्रमाणेच, अर्नाळा, आगाशी विरार ला बहुधा सगळीच मासळी ताजी आणि बांगडा, सुरमई देखील असतात. 


तर आज आपण पाहूया सोपी आणि झटपट अशी वाडवळ (सोमवंशी क्षत्रिय) पध्दतीने मासे कालवण आणि मासे तळण्यासाठीची कृती.‌ नारळाचे दुध किंवा धणा, लाल मिरची भिजवून वाटण आमच्याकडे सहसा नाही वापरत किंवा फोडणीत कांदा नाही टाकत. अगदी साधे, पातळसर पण फार चमचमीत होते हे कालवण. वाफाळता भात आणि तांदळाची पसरवून केलेल्या भाकरीसोबत तर अजून चविष्ट! 😊


----------------------------------------------------------


पदार्थ १: बोयमासा, ओले बोंबील किंवा पापलेटचे कालवण: 🐟🐠

(चिंच वापरून)


आमच्याकडे वाडवळ (सोमवंशी क्षत्रिय) पध्दतीने मासे कालवण कसे बनवतात ते बघुया...


ताजे पापलेट व बोयमासा नीट साफ करून त्याचे तुकडे करून घ्या. स्वच्छ धुवून पाणी निथळवा. गरजेनुसार मीठ व आलेलसूण पेस्ट लावून ठेवा. 


एका भांड्यात तेल मध्यम गरम करा. त्यात आले लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित परता. 


मग थोडीशी सेलम हळद, मीठ आणि वाडवळी घरगुती मसाला किंवा तो नसेल तर रोजचा मसाला आणि मध्यम तिखट मिरची पावडर, थोडी धणा पावडर टाका आणि परत नीट परता. सुके खोबरे जरासे भाजून घ्या अणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हे वाटण टाकावे‌ आणि चांगले परतले कि मग पुन्हा माशांचे साफ केलेले तुकडे घालून अलगद परतायचे. 


चिंचेच्या कोळाचे पाणी आणि थोडे साधे गरम पाणी घालून चांगली उकळी काढायची. 10-15 मिनीटे उकळी येऊन शिजू द्या. मासे नाजूक असतात त्यामुळे ते तुटणार नाहीत किंवा जास्त शिजणार नाहीत ह्याची काळजी घ्या. आवडत असल्यास चिरलेली कोथींबीर घालावी. मस्त झक्कास आंबट-तिखट कालवण तयार! भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा. भारीच लागते. 😋


-------------------------------------------------------------


पदार्थ २: बोयमासा किंवा पापलेटचा टाॅमेटो रस्सा 🐟🐠

(टाॅमेटो वापरून)


ताजे पापलेट व बोयमासा नीट साफ करून त्याचे तुकडे करून घ्या. स्वच्छ धुवून पाणी निथळवा. गरजेनुसार मीठ व आलेलसूण पेस्ट लावून ठेवा. 


एका भांड्यात तेल मध्यम गरम करा. त्यात आले लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित परता. कढीपत्ता आणि एखाद दुसरी हिरवी मिरची घालख. दोन तीन लाल रसरशीत टाॅमेटोच्या फोडी करून परतुन घ्या.


मग थोडीशी सेलम हळद, मीठ आणि वाडवळी घरगुती मसाला किंवा तो नसेल तर रोजचा मसाला आणि मध्यम तिखट मिरची पावडर, थोडी धणा पावडर टाका आणि परत नीट परता. सुके खोबरे जरासे भाजून घ्या अणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हे वाटण कालवणात टाकावे‌ आणि चांगले परतले कि मग पुन्हा माशांचे साफ केलेले तुकडे घालून अलगद परतायचे. थोडे साधे गरम पाणी घालून चांगली उकळी काढायची. 10-15 मिनीटे उकळी येऊन शिजू द्या. मासे नाजूक असतात त्यामुळे ते तुटणार नाहीत किंवा जास्त शिजणार नाहीत ह्याची काळजी घ्या. 


भरपुर चिरलेली कोथींबीर घालावी, रस्सा तय्यार.


-------------------------------------------------------------


#पदार्थ ३: कोलंबी- वांगी- बटाटा रस्सा


काय लागते पहा:

दोन मोठे कांदे (बारीक चिरून)

आलेलसूण-मिरची पेस्ट दीड चमचा

मध्यम आकाराची कोलंबी (साले काढून साफ करून किंवा नुसते डोके, पाय आणि शेपटी काढा.)

तीन बटाटे (सालासकट बारीक चौकोनी तुकडे)

चार वांगी (बारीक फोडी)

कोथिंबीर बारीक चिरलेली


घरचा रोजचा मसाला २-३ चमचे अंदाजाने 

बेडगी मिरची पावडर एक चमचा

चवीपुरते मीठ

अर्धा चमचा सेलम हळद पावडर

चिंचेच्या कोळाचे पाणी एक वाटी


ही भाजी मस्त चुलीवर मोठ्या प्रमाणात बनवतात. चुलीवर बनवल्यामुळे खुप चविष्ट लागते. कढईत बनवलेले चांगले लागते. येथे आपण सोयिस्करपणे कुकरमध्ये बनवले आहे.


कुकर गरम करून घ्या. तेल ओता. मग बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त गुलाबीसर परतुन घ्या. आलेलसूण-मिरची पेस्ट घालून परता. आता घरचा रोजचा मसाला, मीठ, सेलम हळद, बेडगी मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. 

मग कापलेला बटाटा, वांगी, कोलंबी टाकून परतून घ्या. वेल वांगी किंवा हिरवी वांगी अधिक चविष्ट लागतात.


चिंचेच्या कोळाचे पाणी एक वाटी घालून अजून थोडे पाणी वरून ओता. थोडीशी कोथिंबीर टाकून, कुकरचे झाकण घालून एक शिटी घ्या. थोडीशी आंबट-तिखट अशी कोलंबी- वांगी- बटाटा रस्सा भाजी तय्यार! खारवलेली कैरीदेखिल छान लागते.


-------------------------------------------------------------


#पदार्थ ४: शेंग-कोलंबी-वांग-आंबा भाजी:


वाडवळ म्हणजे सोमवंशी क्षत्रियांकडे आवडीने केला जाणारा व चवीने खाऊन संपवला जाणारी एक चविष्ट मिक्स भाजी म्हणजे शेंग-कोलंबी-वांग-आंबा किंवा कोलंबी-आंबा! कधी कधी वालाचे हिरवे गोळेदेखिल घालतात. सहज सोपी आणि चमचमीत भाजी!


वाडवळ मुख्यत्वे नायगाव ते डहाणू पट्ट्यात समुद्रकिनारकडे जमिनी व घरे असणारे. भातशेती व बागायत वाडी हे उपजत पारंपारिक मुख्य व्यवसाय. आणि समुद्रानजिक... त्यामुळे कोलंबी वा मासे आणि कैरी, वांगी, शेवगाच्या शेंगा वाडीतच मुबलक. त्यामुळे अशी शेंग-कोलंबी-वांग-आंबा ही वारंवार होणारी भाजी!


Prawns cooked with onion and raw mango, Eggplant/brinjal, drumsticks with the use of everyday simple mix masala.

(This vegetable is welkown in Vadval (Somvanshi Kshatriya) community and called Vadvali Kolambi Aamba bhaji)


बघुया काय काय लागेल साहित्य:

दोन मिरच्यांचे तुकडे 

आलेलसूण पेस्ट 

कढीपत्ता 

बारीक चिरलेली कोथिंबीर

दोन मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे 

साफ केलेल्या कोलंबी (साले ठेवली तर अजूनच चविष्ट लागतात)

आंबट कैरीचे तुकडे 

दोन बटाटे जाड उभ्या कापा करून

दोन वांगी जाडसर उभ्या कापा करून

दोन शेवगाच्या  शेंगाचे तुकडे

मिक्स मसाला आणि सेलम हळद

मीठ आणि चिमूटभर साखर


कधी कधी वालाचे हिरवे गोळेदेखिल घालतात.


एका जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून त्यात मिरच्या, आले लसूण पेस्ट आणि कढीपत्त्याची छान फोडणी करून त्यावर कांदा चांगला शिजवून घ्यावा. मिक्स मसाला, सेलम हळद, मीठ आणि चिमूटभर साखर घालून परतून घ्यावे. त्यानंतर साफ केलेल्या कोलंबी (साले ठेवली तर अजूनच चविष्ट लागतात), आंबट कैरीचे तुकडे, बटाट्याच्या फोडी, वांग्याचे काप, शेवगाच्या  शेंगाचे तुकडे टाकून व्यवस्थित ढवळावे. पाणी घालून झाकणामधेदेखिल पाणी ठेवून वाफेवर  शिजू द्यावे. एव्हाना मस्त दरवळ पसरला असेल. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे व मस्त मिश्र चवीची गावरान कोलंबी आंबा भाजी तयार असेल. 


-------------------------------------------------------------


#पदार्थ ५: आमखंडी 


वाडवळी खासियत आहे ही आणि माझ्यासारख्या अनेकांचा जीव कि प्राण... ❤️


बघुया काय काय लागेल साहित्य कोलंबी-आंबा किंवा आमखंडी साठी:


१. दोन मोठ्या आकाराचे उभे कापलेले कांदे 

२. एका मोठया आंबट कैरीचे तुकडे 

३. पंधरा-वीस कोळंबी साफ केलेल्या (साले काढू नका)

४. आले लसूण पेस्ट

५. बारीक चिरलेली कोथिंबीर

६. हिरवी मिरची व कढीपत्ता

७. रोजच्या वापराचा घरगुती वाडवळी मसाला

८. सेलम हळद पावडर

९. मीठ आणि चिमूटभर साखर

१०. कोथिंबीर बारीक चिरून


एका जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून त्यात कापलेला  कांदा चांगला परतून लालसर रंगावर शिजवून घ्यावा. मग मिरची, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, घरगुती वाडवळी मसाला, सेलम हळद, मीठ आणि चिमूटभर साखर (ऐच्छिक) घालून व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर  आंबट कैरीचे तुकडे आणि कोळंबी टाकून व्यवस्थित ढवळावे.🥘🍲


सगळी भाजी व्यवस्थित मिक्स केली, की थोडे पाणी घालून झाकणामधेदेखिल पाणी ठेवून वाफेवर  शिजू द्यावे. एव्हाना मस्त दरवळ पसरला असेल. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे व मस्त मिश्र चवीची गावरान कैरी टाकलेली कोळंबीची भाजी तयार असेल. चुलीवर करता आली तर चव अजूनच वाढते हा स्वानुभव आहे.😋


ही भाजी भाकरी सोबत उत्तमच लागते. पण साध्या  वाफाळत्या मऊसुत भाताबरोबर खायची गंमतच न्यारी! :) मग चिंचेचे सार, वरण किंवा आमटीची वेगळी अशी गरज भासत नाही. आणि सोबतीला फोडलेला कांदा वा मुळा, मिरची-बोंबलाचा ठेचा असले तर 'ज्जे ब्बात!!!' 😋🍲💁🦐🥭


टिप:

१. कोळंबी लहान किंवा मध्यम आकाराच्या घ्या. कोळंबीची साले काढू नका. फक्त पाय, शेपटी आणि मधला घाण असलेला काळा धागा काढून टाका. ह्या आमखंडीमधे साले असलेली कोलंबी जास्त चांगली लागते.

२. कोळंबी जागी करंदी टाकून देखील भाजी करू शकता.

३. काहीजण कांदा, आलेलसूण, कोथिंबीर, मिरची आणि एखादा टाॅमेटो असे मिक्सरमधून काढून, हे वाटण लावून जाडसर रस्सा देखील बनवतात.

४. काही जण, ह्यामध्ये थोडेसे नारळाचे दुध देखील घालतात. 


-------------------------------------------------------------


#पदार्थ ६: ओल्या बोंबलाचा पोपट 💚🌿


आपल्याला लागणार आहे:

 • २-३ कच्ची बनकेळी म्हणजेच भाजीची केळी

 • चार ते पाच ताजे ओले बोंबील

 • कोथिंबिर

 • लसूणाच्या ७-८ पाकळ्या

 • चिंच किंवा लिंबू

 • ३-४ मिरच्या

 • आले तुकडे

 • अर्ध्या खवलेल्या नारळाचे खोबरे

 • मीठ

 • राई

 • बारीक चिरलेला कांदा


नारळाच्या खवलेल्या खोब-याचे दुध काढून, गाळून घ्या. 

आले-लसूण, मीठ, कोथिंबीर, मिरच्या, चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस हे सगळे मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट करा. (मी थोडासा पुदीनादेखील वापरला आहे परंतु पारंपारिक पध्दतीमधे पुदीना वापरला जात नाही.) तुम्हाला अपेक्षित असलेल्या तिखटपणा नुसार मिरच्या आणि आंबटपणासाठी लिंबू/चिंचेचा कोळ तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता.


साफ केलेले, पाणी निथळलेले ताजे बोंबील तुकडे करून घ्या. त्यांना बनवलेली हिरवी पेस्ट लावून ठेवा. 

कच्ची केळी साले काढून, जाडसर चकत्या किंवा चौकोनी तुकडे करून घ्या. ह्या कापांना देखील हिरवे वाटण लावून ठेवा.

जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून मोहरी टाका‌ आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.‌ कांदा शिजल्यावर त्यात कच्ची केळी पाच मिनीटे परतून घ्या. मऊसर झाली असतील. ह्यातील अर्धी काढून घ्या. भांड्यात राहीलेले अर्धे केळ्यांचे काप गोलाकार रचा. त्यावर हिरव्या वाटणात मुरवलेले बोंबील गोलाकार स्वरूपात रचा. परत एकदा उरलेल्या कच्च्या केळ्याचे ‌काप बोंबलावर गोलाकार रचा. आणि बाजूने अलगद नारळाचे दुध भांड्यात ओता. पाच-दहा मिनिटे उकळी येऊ द्या. अलगद हातानेच भांडे हलवा. 


चमच्याचे जास्त ढवळू नका नाहीतर बोंबील नाजून असल्याने तुटून जातो आणि जास्त वेळ‌ उकळले‌ तर विरघळवून जातो. मस्त हिरवट-पोपटी रस्सा असलेलं कालवण होईल.


आमच्याकडे केली जाणारी तांदूळाची भाकरी: 

ही भाकरी साध्या unpolished रत्ना तांदूळाला किंवा कणीला बारीक भरडून केलेल्या पिठाची असते.

पीठात flowing consistency मिळेल इतपत पाणी आणि मीठ घालून पीठ मस्त मळतात. मग मोठ्या तव्यावर खोलगट चमच्याने पीठ टाकून गोलाकार मोठा पसरवत जातात. वरुन एक मिनिटाकरता झाकण ठेवून लगेच झाकण काढल्यावर भाकरी कालथ्याने काढली कि तयार. काही जणी तर हातानेच गरम तव्यावर लयबध्द् गोल फिरवत भाकरी बनवतात.

थोडीशी Crispy आणि मऊ असते मस्त.


गरमागरम सुरेख हिरवट असा बोंबलाचा पोपट अलगद ताटात वाढून भाकरी किंवा भाताबरोबर आस्वाद घ्या. सोबत पांढरा कांदा आणि तळलेली एखादी तुकडी असली तरी लज्जत अजूनच वाढेल! 🙂


-------------------------------------------------------------


#पदार्थ ७: तळलेले बोयमासा किंवा पापलेट:


मासे तळण्यासाठी माशांच्या तुकड्यांना गरजेनुसार पण जरासे जास्तीचे आलेलसूण वाटण, लिंबाचा रस किंवा चिंचेच्या कोळाचे पाणी, थोडीशी सेलम हळद, मीठ आणि वाडवळी घरगुती मसाला किंवा मध्यम तिखट मिरची पावडर, थोडी धणा पावडर मिक्स करून व्यवस्थित चोळा. 

आतुन बाहेरून सर्व बाजूंनी लावा. दहा पंधरा मिनिटे मॅरीनेट होऊ द्या.

मग तांदळाचे पीठ व थोडासा रवा मिक्स करून घेऊन त्यामधे तुकड्यांना घोळवून तव्यावर तेलावर शॅलो फ्राय करा. कुरकुरीत तळून मस्त भात व कालवणासोबत सर्व्ह करा.


तुम्ही नक्की बनवून पहा. हेदेखील तुम्हाला आवडेलच!!! :)


#fish #local_fish #fish_kalvan #edwan #fish_fry

#virar #वाडवळ #सोमवंशी_क्षत्रिय #soksh #kalvan #कालवण

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर













































No comments:

Post a Comment