Saturday, February 19, 2022

काळे_वाटाणे_ओल्या_काजूगराची_उसळ

 #काळे_वाटाणे_ओल्या_काजूगराची_उसळ ❤️

Soul food for many! 🤩🌿

काळे वाटाणे- ओल्या काजूगराची उसळ म्हणजे अनेक कोकणवासी आणि मालवणी लोकांचा जीव की प्राण... मला लग्नानंतरच ह्या काळे वाटाण्याच्या उसळीला चाखायची संधी मिळाली. आई अर्थातच उत्तम बनवते. आमच्याकडे अगदी वरचेवर काळ्या वाटाण्याची उसळ होत असते. कधी भोपळ्याच्या घारग्यासोबत, कधी आंबोळीबरोबर तर कधी वड्यांसोबत ही कोकणी आणि मालवणी स्पेशल काळ्या वाटाण्याची उसळ खाल्ली जाते.‌ आमच्याकडे श्राध्दाला वड्यांसोबत, कधी भोपळ्याच्या घारग्यांसोबत तर बहुधा आंबोळीसोबत ही उसळ असते. प्रत्येकाच्या घरची वेगवेगळी पध्दत असू शकते, आई कडून शिकलेली पाककृती खालील प्रमाणे:

 • काळे वाटाणे- ओल्या काजूगराची उसळ: 

ओले काजूगरासाठी काजूच्या हंगामातच काजूच्या पक्व बिया साठवून ठेवतात आणि हव्या तेव्हा फोडून त्यातून काजू चा गर काढतात. जर ओले काजूगर नसतील तर सरळ आपले नेहमीचे काजू कोमट पाण्यात ३-४ तास भिजवून घ्यावेत.


कांदा-खोबरे वाटण: (हे उसळीसाठी आई वापरते.)

पाच कांदे उभे चिरून घ्या. आणि तेवढेच नारळाचे खवलेले खोबरे घ्या. तेलामधे कांदा अगदी मऊसर होईपर्यंत तळून घ्या आणि मग खोबरे टाका. आणि मिक्स करून घ्या. न करपवता पण चांगले खरपूस भाजून घ्या. थंड झाल्यावर फ्रिजमधे ठेवा. हवे तेवढे काढून, त्यात पाणी घालून मिक्सरला लावून अगदी बारीक करा.


साहित्य: 

१. अर्धा किलो काळे वाटाणे (वर नमुद केलेल्या प्रमाणे मोड आलेले)

२. एक वाटी ओले काजूगर किंवा भिजवलेले काजूगर

३. दोन कांदे बारीक चिरून

४. कांदा खोबरे वाटण

५. मालवणी मसाला/ कोल्हापुरी मसाला

६. मीठ

७. गरम मसाला

८. जीरा

९. राई


काळे वाटाणे एक दिवशी भिजवावे आणि मग भिजलेले वाटाणे एक रात्र बांधून ठेवावे म्हणजे बारीक मोड येतात. हे मोड आलेले वाटाणे कुकरमध्ये थोडे पाणी आणि हलके मीठ घालून पाच ते सात शिट्या काढून उकडून घ्यावेत. काळे वाटाणे शिजायला जरा वेळ लागतो.


कढईत तेल गरम झाले की मोहरी आणि जीरे परतून घ्या. लगेचच बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा शिजला कि कांदा खोबरे आणि थोडेसे उकडलेले काळे वाटाणे मिक्सरला लावून तयार झालेले बारीक वाटण टाकून परतून घ्या‌.


मालवणी मसाला किंवा कोल्हापुरी मसाला, मीठ घालून परता. गरम पाणी ओतून ढवळा. आणि उकडलेले काळे वाटाणे आणि काजूगर घालून ढवळा. चांगले शिजू द्या आणि काळ्या वाटाण्याची उसळ तयार. आवडत असल्यास तुम्ही ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे देखील घालू शकता.


अनेक जणांसाठी ही उसळ म्हणजे सगळ्यात आवडता पदार्थ आहे. Soul-food/ Comfort food जणू काही...‌✨🌿


------------------------------------------------------------


 • आंबोळी


आंबोळी हा प्रकार देखील मी लग्नानंतर पहिल्यांदा खाल्लेला. इडलीवर्गीय पदार्थांवर मुळत: प्रेम असल्याने आंबोळी खाताक्षणीच मनात भरली. आमच्याकडे हे पीठ आई जास्तीचेच बनवते. आणि एकदा हे आंबोळीसाठी पीठ आंबवले की बाबा मजेमजेत बोलतात कि आता पुढचे तीन-चार दिवस नास्ता फिक्स... डोसे, खापरोळ्या, इडल्या, आप्पे, मसाला उत्तपा असे प्रकार पीठ संपेपर्यंत सुरूच असतात. 😃❤️


नुस्ती आंबोळी चटणी, चहासोबत आंबोळी देखील अप्रतिम लागते. नावातच आंबवणे हृया प्रक्रियेचा बोध असलेल्या आंबोळीच्या पीठाची तयारी आदल्यादिवशी पासूनच करावी पीठ आंबवत ठेवून करावी लागते.


पाहुया कसे बनवायचे पीठ:

(मी दिलेले प्रमाण वापरून दोन तीन दिवस आंबोळी वैगरे बनवता येईल एवढे पीठ होते. म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजाने हे पीठ कमी प्रमाणात बनवा. तसेच पीठ बनवताना तांदूळ आणि डाळीचे प्रमाणही प्रत्येक घरी काही प्रमाणात निरनिराळे असू शकते. मी आमच्याकडचे प्रमाण दिले आहे.)

तर आंबोळी बनवण्यासाठी आदल्या दिवशी सकाळी चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ (प्रमाण: 4:1), मेथी एक चमचा आणि एक वाटी पोहे भिजवा. मग रात्री थोडेसे पाणी घालून थोडे थोडे करत भिजवलेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक केलेले पीठ चमच्याने ढवळून एकजीव करा. एका मोठ्या भांड्यात वरती झाकण ठेवून पीठ आंबून येण्यासाठी (Fermentation) ठेवा.


दुस-या दिवशी सकाळी पीठ छान आंबून वर आले असेल, ते ढवळावे आणि चवीनुसार मीठ  घालावे व परत एकजीव करावे. 

बीडाचा जाड तवा गरम करत ठेवा. आणि तापल्यावर मीठाचे पाणी शिंपडून चुरचूरू द्या. कांद्याला आडवा मधोमध कापून त्याला तेलात बुडवून हलकेच तव्यावर फिरवतो. त्यावर खोलगट डावाने पीठ ओतायचे आणि हलकेच गोल फिरवायचे. जास्त नाही. हे थोडे जाडच राहिले पाहिजे. आणि त्यावर लगेच वाफ नीट लागण्यासाठी झाकण उलटे ठेवायचे. दोन मिनिटांनी झाकण काढले कि आंबोळी फुगून तयार असेल. चांगली जाळीदेखील पडली असेल. (आम्ही उलट्या बाजूने नाही भाजत) ती पलाटणीने तशीच काढायची. मऊ लुसलुशीत झालेली असते. 


काळा वाटाणा- काजूगर उसळ आणि आंबोळी हे Heavenly combination आहे हे नक्की! ❤️


------------------------------------------------------------


 • भोपळ्याचे घारगे:


लाल भोपळ्याचे घारगे प्रकार कोकणात करतात. घरी जसे आंबोळीसोबत काळ्या वाटाण्याची उसळ खातात तसेच घारग्यांसोबतदेखील खातात. गोडूस लुसलुशीत घारगे नुस्त खायला पण चविष्ट लागतात.


सोपे चविष्ट घारगे बघुया बनवतात कसे ते:

साहित्य: 

- भोपळा अर्धा किलो: साले काढून आणि किसणीवर खिसून

- देशी गुळ कीसलेला (जेवढा कीस तेवढाच गुळ आम्ही घेतो.)

- चवीपुरते मीठ

- गव्हाचे पीठ (भोपळ्याचा कीस आणि गुळ पीठात सामावेल इतके.)

- जीरापुड एक ते दीड चमचा


घारगे बनवताना खिसलेला/ किसलेला भोपळा, मीठ,‌ जीरापुड आणि कीसलेला गुळ एकत्र‌ करा आणि कढईत भोपळ्याचा कीस मऊसर होईस्तोवर शिजवून एका परातीत साधारण थंड करत ठेवा.‌ आणि मस्त पुरीच्या पीठाच्या consistency सारखे पीठ होईल अशा‌ बेताने त्यात गव्हाचे‌ पीठ मिक्स करा. एकजीव मळून पीठाचा गोळा तयार करा. तेलाचा अलगद हात लावा. जरा पंधरा-वीस मिनिटे हे असेच ठेवा. आणि पुन्हा मळून लहान गोळे करून घ्या.


आता कढईत तेल गरम करा. आणि प्लास्टिकच्या पिशवीवर किंवा चिकटणार नाहीत अशा पृष्ठभागावर घागरे गोलाकार थापून, अलगद तेलात सोडायचे. सोडताच त्याच्या वरच्या बाजूला गरम तेल उडवत रहा. म्हणजे फुलले जातील. थोडेसे जाडसर थापून तेलात सोडले असता घारगे टम्म फुगतात. तयार घारग्यांचा गरमागरम उसळीबरोबर आस्वाद घ्या. फार छान लागतात हेदेखील.


------------------------------------------------------------


 • वडे:

मधे छिद्र असलेले वडे बहुधा आमच्याकडे केले जातात पण ह्यावेळी पुरीसारखे गोड वडे बनवले होते.

१. एक किलो जाडसर तांदूळ

२. एक वाटी उडीद डाळ

३. अर्धी वाटी चणा डाळ

४. दोन चमचे धणे भाजून

५. पाव चमचा मेथी भाजून


वरील सारे साहित्य हलकेच भाजून आणि थंड झाल्यावर एकत्र करून दळून आणावे. वड्यासाठी पीठ भागवताना, आई त्यात मीठ, हळद, अगदी थोडासा गुळ आणि बारीक चिरलेला कांदा घालते आणि कोमटसर पाणी घालून चांगले मळून घेते. थोडा वेळ उमलू दिले कि वडे थापून तळायचे! छान केशरी-ब्राऊन वडे तयार होतात. हळद नाही टाकली तरी चालते. 


वडे आणि उसळ श्राध्दासाठी देखील बनवले जातात आणि नैवेद्यासाठी ताटात रचतात.

#काळ्यावाटाण्याचीउसळ #काळावाटाणा #kalavatana #malvanivade #gharage #amboli #आंबोळी #घारगे #वडे

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com


















No comments:

Post a Comment