Wednesday, November 24, 2021

टाॅमेटो_सार

 #टाॅमेटो_सार

हे प्रत्येक जण वेगवेगळ्या पध्दतीने करतात. काही नंतर नारळाचे दुध घालतात तर काही सर्व घटक एकत्र वाटतात. मी आपली माझी झटपट पध्द्त देते. टाॅमेटो आणि ताजी गावठी कोथिंबीर घरचीच होती. एक दोन घरची आणि बाकी बाजारातून हुडकून आणलेली लालेलाल, मोठी रसाळ टाॅमेटो... 😀 टाॅमेटो उत्तम दर्जाची असली तरच सार छान होते. 


आपल्याला लागणार आहे:

 • चार रसाळ टाॅमेटो

 • दीड वाटी ताजे खवलेले खोबरे

 • आल्याचा लहानसा तुकडा

 • अर्धा बारीक चिरलेला कांदा

 • पाच सहा लसूण पाकळ्या

 • कढीपत्ता चार पाच पाने

 • साजूक तुप

 • जीरे

 • चिमुटभर साखर

 • बारीक चिरलेली कोथिंबीर

 • मीठ

 • तमालपत्र, चार पाच काळेमिरे आणि आवडत असल्यास लहानसा दालचिनीचा तुकडा


१. सार बनवताना टाॅमेटोचे तुकडे करून त्यांना बेताच्या पाण्यामधे सहा-सात मिनिटे उकळवते. थंड झाल्यावर सालासकट मिक्सरच्या भांड्यामधे टाकते. त्यात कांदा, लसूण, आले, कढीपत्त्याची एक दोन पाने, एखादी हिरवी मिरची आणि खवलेले खोबरे टाकते.‌ दोन तीन काळीमिरे देखील टाकते. काळेमिरे चा हलकासा हवाहवासा तिखटसर स्वाद येतो. तिखट सहन होत नसल्यास मिरची मिरे टाकू नका. पाणी बेताचे असू देते. हे सारे मिश्रण अगदी गंधाएवढे व्यवस्थित भरडून घेते. स्वच्छ कपड्यातून गाळून घेते. 

२. कढईत जरासे तेल व ब-यापैकी साजूक तुप ओतून काळेमिरे व जीरे तडतडवते. तीन चार कढीपत्त्याची पाने, चार पाकळ्या बारीक चिरलेला लसूण तडक्यावर लालसर होईपर्यंत परतते. मग लगेचच गाळलेले मिश्रण कढईत घालून ढवळते. गरजेनुसार पाणी वाढवते. तमालपत्र टाकते.

३. मीठ, साखर घालून चांगले थोडे दाट होईपर्यंत उकळवते. कोथिंबीर टाकून मग गॅस बंद करते. 

अगदी लालसर रंग हवा असल्यास एखादा लहान तुकडा बीट आपण घालू शकतो. टाॅमेटो कमी वेळ उकळवले आहेत म्हणून कच्चेपणा जाईस्तोवर उकळवणे गरजेचे आहे.

मस्त टाॅमेटोसार आस्वादास तयार!

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर










No comments:

Post a Comment