Saturday, November 13, 2021

डिंक_सुकामेवा_लाडू

#डिंक_सुकामेवा_लाडू ❤️

Happiness is having Dink- Dryfruits Laddoo in winter days! ❤️🌿


लहानपणापासूनच आम्ही पाहायचो आमच्या मम्मीला तिच्या व्यस्त दिनक्रमातुनही वेळात वेळ काढून अनेक प्रकारचे उत्तमोत्तम पौष्टिक लाडू लिलया बनवताना... खास करून थंडीमधे.... आणि मग पटापट डब्बे भरून सग्यासोय-यांना पाठवत असे. मम्मीच्या हातचे लाडू अनेकांना आवडत. मला मात्र गोड पदार्थांचा ब-यापैकी तिटकारा होता. त्यात गोड लाडू ह्या प्रकाराला तर अगदी दिवाळीलादेखील मी हात लावत नसे. माझ्यासारखेच बाबांचेही. पण आम्हाला दोघांना मेथीचा, अगोड असे चुरमा लड्डू आणि डिंकाचा लाडू मात्र खुप आवडतो मग मम्मी आमच्यासाठी खास वाळायची हे लाडू... गेल्या वर्षामधे आमचे कुटुंब जरा वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या आजारपणातून सावरले. त्यामुळे थंडीमधे हाडांना मजबुती देणारे पौष्टिक असे लाडू मी तुम्हाला बनवून देते असे मी बाबांना सहज बोल्ले. ह्या आधी कधीही बनवले नव्हते पण सतत मम्मी आणि आई ह्यांना लाडू वाळताना पाहून पाहून पहिल्यांदाच केलेले असले तरी अगदी योग्य लाडू तयार झाले. निरनिराळ्या ग्रुपवर ह्याच डिंक लाडूच्या अप्रतिम आणि योग्य पाककृती अनेक सुगरणींनी पोस्ट केलेल्या आहेतच. पण मम्मी, आई आणि दोन्ही बाबांकडून, लाडू आवडल्याची सहज अशी मनापासून दाद मिळाली आणि मग वाटले साधी सोपी पाककृती असली तरीही पोस्ट करूया. न जाणो कोणाच्या कामी येईल.


आईदेखील निरनिराळे लाडू सहज बनवते. तिचा हातखंडाच आहे त्यात... तिच्या हातचा बेसनाचा लाडू आत्ता माझ्या आवडीच्या लाडवांच्या लिस्टमधे जाऊन बसलेय. आईच्या सल्ल्याने मग लाडू बनवायचा घाट घातला.


डिंक-सुकामेव्याचे लाडू चविष्ट लागतात पण ते अगदी प्रमाणातच खाल्लेले चांगले नाहीतर शरीराला गरम पडतात. पुर्वीच्या काळी आजारपणानंतर, बाळंतपणानंतर ताकदीसाठी खाण्यासाठी म्हणून हे लाडू बनवले जायचे. थंडीमधे आवर्जुन घरोघरी हे लाडू केले जातात. आत्ता करून पाहिले तेव्हा ते किती सोपे आहेत हे लक्षात आले‌.


काय काय लागते पाहुया आपण,

१. काजू १०० ग्रॅम

२. बदाम १०० ग्रॅम

३. पिस्ता ५० ग्रॅम

४. काळे मनुका १०० ग्रॅम

५. बेदाणे ७५ ग्रॅम

६. ४-५ अंजीराचे बारीक तुकडे

७. खिसलेले सुके खोबरे ५० ग्रॅम

८. डिंक ७५ ग्रॅम

९. खजुर १०० ग्रॅम

१०. खारीक पावडर १०० ग्रॅम

११. गुलाबपाकळ्या २५ ग्रॅम

१२. खिसलेला थोडासा गुळ 

१३. खसखस थोडीशी

१४. तीळ थोडेसे

१५. सुंठ पावडर थोडीशी

१६. साजूक तुप


१. जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर काजू, बदाम, पिस्ता हलकेच भाजून घेतले. तु(म्हाला आवडत असल्यास मखाणा, मगज बी पण परतुन वापरू शकता.) हे थंड झाल्यावर हलकेच मिक्सरमधून बारीक करून घेतले. अगदी बारीक केले नाही.


२. मग लागोलाग तीळ आणि खसखस हलकेच भाजून घ्या. काळे मनुका, बेदाणे, अंजीर तुकडा अगदी नावालाच भाजून घेतला. मग सुकलेले किसलेले खोबरे परतुन घेतला. मिक्सर वर तीळ, सुंठ पावडर आणि थोड्या गुलाबपाकळ्या हलकेच जाडसर भरडुन‌ घेतल्या.


३. बी काढलेला खजुर मिक्सर मधुन बारीक करून घेतला. नैसर्गिक गोडव्यासाठी आम्ही खजुर वापरलाआहे.


४. कढईत तुप तापवुन त्यात लहान लहान बॅचेसमधे डिंक तळून फुलवून घेताना करपणार नाही ह्याकडे लक्ष दिले. हलका होत  फुलेपर्यत सतत हलवत तळला. तळताना मी हलकेच दोन-चार पाकळ्या तुपात टाकल्या तर डिंक फुलवत असताना काही डिंकांना सुरेख गुलाबीसर, पर्पल रंग आला. बोटांच्या चिमटीत फुलवलेला डिंक धरला असता मस्त फुटायचा.


५. त्याच उरलेल्या तुपात गुळ पातळ करून घेतला.


६. मोठ्या परातीत फुलवलेला डिंक, बेदाणे, मनुका, सुकामेव्याचे तुकडे, खारीकची पावडर, मिक्सरमधून फिरवून काढलेला खजुर, गुलाबपाकळ्या, तीळ, खसखस, सुंठ पावडर सारे एकत्र केले. सारे छान एकत्र मिसळून घेतले. त्याच वितळलेला गुळ ओतला. आणि सहन होईल असे गरम असताना परत सर्व एकत्र करून मग हवे तसे तुप हाताला लावत, कधी मिश्रणात मिसळत लाडू वळून घेतले.


आवडत असल्यास, खसखस आणि थोडाशा गुलाबाच्या लहान पाकळ्यांमधे, वाळलेला लाडू थोडासा घोळवला आणि कपकेकचे वेस्टन असते त्यामधे ठेवला तरी सुंदर दिसतो.

गुलाबी सुकवलेल्या गुलाबपाकळ्यांमुळे फार सुरेख स्वाद लाडू खाताना जाणवत होता. लाडू खाताना मधेमधे दाताखाली येणारा डिंक किंवा सुकामेव्याचा तुकडा अफलातून लागतो.

दिसतोही मस्त आणि हा लहान-मोठे कोणीही आवडीने खातात आणि उपवासाला देखील होतो.


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


#डिंकाचा_लाडू #डिंक_सुकामेवा #सुकामेवा #थंडी #पौष्टिक #Dink_dryfruits #almonds #cashews #pistacheo #raisin #rose_petals #jaggery #ladu #laddoo















No comments:

Post a Comment