Monday, December 6, 2021

संक्रांत स्पेशल गावरान मडक्यातली साग्रसंगीत उकड-हंडी

 #पारंपारिक_उकडहंडी 🥘🌮🍛🍲🌿♥️

थंडीची चाहूल लागली आणि कोनफळे, जांभळी कंद, पापडी, ताजा घेवडा बाजारात दिसूही लागले एव्हाना. परवाच रोजच्या भाजीवाल्या काकांनी जांभळे कंद आणि ताजी सुरती पापडी दाखवली. म्हटले पुढच्या आठवड्यात घेते नक्की काका... 

ही उकडहंडीची पोस्ट जूनी आहे पण पुढच्या महिन्यात मकरसंक्रांत आलीच म्हणून आज ही मकरसंक्रांत स्पेशल उकडहंडी ची पोस्ट टाकत आहे. आता सगळ्या ताज्या भाज्या सुरू झाल्यात म्हटल्यावर हृया डिसेंबर च्या महिन्यात कधीही बनवू शकाल तुम्ही देखील...

आमच्या भागात मस्त थंडी  पडली आहे आणि उकडहंडी ला लागणा-या वस्तू हळूहळू भाजीवालींच्या टोपलीत डोकावायला लागल्या आहेत. ही पोस्ट एकदा नजरेखालून गेली कि तुम्ही आठवणीने ह्यात लागणा-या भाज्या गोळा करून, जमवून ठेऊन, तयारीने सिझनची खास मस्त पारंपरिक उकडहंडी बनवू शकतील. :

#संक्रांत स्पेशल गावरान मडक्यातली साग्रसंगीत उकड-हंडी

संक्रांतीला आमच्या कडे एडवणला तीळगुळासोबतच उकडहंडी नावाचा प्रसिध्द पारंपारीक पदार्थ चेला जातो. "तिळगुळ घ्या गोड गोड बोला" असे बोलत तीळगुळासोबतच उकडहंडी भरलेली भांडींची देवाणघेवाण होई. आता हे सगळे कमी झालेय. माझे मावशाजी ज्यांना आम्ही भाई म्हणत असू ते न चुकता दरवर्षी आम्हा सगळ्यांना, त्यांच्या माहिमच्या वाडीतले कंद, कोनफळ आणि क्वचित उकडहंडी मोठ्या आवडीने आणून देत असत. मग त्याच कोनफळाला वापरून आम्ही उकडहंडी बनवत. हा पदार्थ गावी अनेकांनी एकत्र येऊन बनवण्यात मजा यायची. आणि सामानाची लिस्ट जरा वेगळी आणि भलीमोठी दिसली तरी बनवायला काही वेळ आणि विशेष स्किल्स् लागत नाहीत.

तर मग तीन- चार वर्षापुर्वी आमचे भाईमामा यांच्या पुढाकाराने आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी गावरान उकडहंडी बनवली. थंडीत आमच्या एडवण मथाणेच्या बाजारात छान छान ताज्या आणि so called purely organic भाज्यांची वर्दळ असल्याने सामान आणि भाज्या जमवताना विशेष कष्ट नाही लागले.

उकड म्हणजे उकडलेले आणि हंडी म्हणजे मडक्यात बनवलेले म्हणून ह्या पदार्थांचे नाव #"उकडहंडी"!

सर्व काही आम्ही खास कॅमेरात टिपले आणि खवय्यांसाठी हा लेख खास लिहीण्याचा उद्देश म्हणजे पारंपारीक पदार्थाची ओळख निरंतन राहावी व अनेकांनी एकत्र येऊन ह्या पदार्थांचा आनंद व आस्वाद घ्यावा.


चला तर बघुया कशी बनवावी मडक्यातील गावरान उकडहंडी...

साहित्य:

2 मध्यम कांदे बारीक चिरून

2 बटाटे मोठ्या चौकोनी फोडी करून

2 राताळी मोठ्या चौकोनी फोडी करून

3-4 वांगी मोठ्या चौकोनी फोडी करून

एक वाटी सुरती पापडी

एक वाटी सोललेला हिरवा चणा

एका फ्लॉवरचे तुकडे

एक वाटी मोडलेली फरसबी आणि पापडी

एक वाटी भिजवलेले शेंगदाणे

एक वाटी कोनफळच्या मोठ्या चौकोनी फोडी करून

जांभळा कंद एक वाटी तुकडे

एक वाटी वालपापडी

एक वाटी अटकोल (नवलकोल) च्या फोडी

एक वाटी तरळे (हे तलावामधे मिळते)

पाच शेवग्याच्या शेंगाचे तुकडे

एक वाटी चिरलेला ऊळपात म्हणजे पातीच्या कांदा

आले-लसूण पेस्ट एक वाटी

चिरलेली कोथिंबीर एक वाटी

सोललेल्या ऊसाचे बारीक तुकडे अर्धी वाटी

खवलेले खोबरे दोन वाटी

शेंगदाण्याचे कुट दोन वाटी

कच्ची केळीचे कापा एक वाटी

मटार दाणे एक वाटी

मका अर्धा वाटी


मसाल्याचे साहित्य:

पांढरे तीळ (unpolished) एक वाटी

सेलम हळद पावडर पाव वाटी 

बेडगी मिरची पावडर अर्धी वाटी

काश्मिरी मिरची पावडर अर्धी वाटी

गोडा ब्राह्मणी मसाला अर्धी वाटी 

स्पेशल गरम मसाला अर्धी वाटी

स्पेशल घरगुती मसाला एक वाटी 

चटपटा चाट मसाला एक छोटा चमचा

मीठ चवीनुसार

साखर एखाद चमचा

गुळ एक वाटी

अर्धा लिटर तेल

चिंचेचे पाणी एक वाटी

हिंग एक चमचा

(नुसत्या हळद, मीठ, रोजचा मसाला, गरम मसाला हे टाकून देखील चांगली चविष्ट उकडहंडी तयार होते. येथे आपण थोडेसे गोडा मसाला किंवा चाट मसाला वापर चव अजूनच भन्नाट करण्यासाठी वापरले आहेत. तुम्ही ते टाळू शकता. पण मग इतर मसाला प्रमाण वाढवा.)

दोन मोठी जाड आवरणाची मातीची मडकी 

चार केळीची पाने

सागाची असतात तशी मोठी चार पाच पाने

केळीचे सुकलेल्या खोडाचे धागे

एक मोठे पातेले किंवा गंज

मडकी आतुन बाहेरून साफ धुवून सुकवत ठेवा. मधल्या बाजूला केळीचे पान आणि भेंडीची* पाने लावा. तेलाचा हात सर्व पानाला लावून ठेवा. सागाची किंवा इतर मोठी पाने आणि नाही मिळाली तर केळीची पाने आणि केळीचे सुकलेल्या खोडाचे धागे बांधण्यासाठी तयार ठेवा. तुसाचा ठिग पेटवून आग तयार करण्यासाठी सगळे साहित्य बाजूलाच ठेवा. 

एका मोठ्या पातेल्यामधे वर दिलेले सर्व भाज्या, साहित्य, मसाल्याचे पदार्थ मिसळा. मीठ, गुळ, साखर, लिंबाचा रस, चिंचेचे पाणी वैगरे टाका व व्यवस्थित पंधरा मिनिटं सगळे वरखाली करत मिक्स करा. मग तेल ओता आणि परत सारे वरखाली करा. हलकेच चव घेऊन मीठाचा व मसाल्याचा अंदाज घ्या. काही कमीजास्त हवे असल्यास तसे टाकून परत मिक्स करा. 

आतून केळीची पाने लावलेल्या तयार मडक्यांमधे हाताने दाबत दाबत तयार कच्ची भाजी अलगद भरा. वरून  थोडे तेल अजून टाका. परत मडक्याचे तोंड भेंडीच्या* पानांनी झाकून केळीच्या वाकांनी घट्ट बांधा. अशा पध्दतीने सर्व मडकी तयार करून घ्या. 

*भेंडीचा पाला/ पाने

भेंडीचा म्हणजे आपण जी नेहमी भेंडीची भाजी खातो त्याचा पाला नाही. तर आमच्या गावी एक प्रकारची बदामी आकाराची पाने असलेले झाड असते त्यालाही भेंडी संबोधतात. उकडहंडी बनवताना जेव्हा हे मुरवलेले पदार्थ मडक्यामधे वाफवायला ठेवतात तेव्हा मडक्यातून वाफ बाहेर जाऊ नये यासाठी त्याचं तोंड व्यवस्थित बंद करणं आवश्यक आहे. नाहीतर भाज्या कच्चा राहून संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरतं. अशावेळी भेंडीच्या पानांनी मडके झाकले जाते आणि विस्तवात टाकून भाजले जाते.

आता तुस पेटवायला घ्या. आग चांगली पेटली की मग सगळी मडकी आगीमधे शिजण्यासाठी ठेवा. जवळ- जवळ एक दीड तासात मध्यम आगीवर मडक्यातली सगळी भाजी शिजून तयार होते. मग मडकी आगीतून काढून दहा पंधरा मिनिटे बाहेर ठेवा. आणि अलगद काळजीपूर्वक झाकण्यासाठी लावलेली पाने काढून टाका. हातावर वाफ येते म्हणून सावधता बाळगा.

एव्हाना मिश्र वास छानपैकी दरवळला असेलच... आणि वाफाळती उकडहंडीतील भाजीदेखिल सुरेख वाटत असेल.

ह्यात गुजराती पध्दतीचे बेसनाचे मुठीया पण छान लागतात. हा Twist आहे बरे का... पारंपरिक पद्धतीने केल्या जाणा-या उकडहंडी पाककृती मधे मुठिया टाकत नाहीत.

बेसनाचे मुठीये बनवण्यासाठी बेसन पीठ घ्या. थोडेसे मीठ, हिरवी बारीक मेथी, ओवा, थोडीसी साखर आणि जाडसर दळलेले गव्हाचे पीठ सगळे मिक्स करा. तेल आणि पाणी वापरा. मस्त गोळा करून मळून घ्या. मग छोटे गोळे करून तेलात तळून घ्या. आणि तयार झालेल्या उकडहंडीतील भाजीत मिक्स करा.

उकडहंडीतील भाजी केळीच्या पानावर सगळ्यांना वाढा. गंम्मत म्हणजे ही भाजी नुसतीदेखाल खाल्ली जाते. पण तांदूळाच्या भाकरीसोबत छान लागते.

गुजराथी उंधियो आणि मराठमोळी पोपटी ह्याची रेसिपी आणि पध्द्त थोडीफार साध्यर्म दर्शवते पण चव खुप वेगळ्या आहेत. त्यातली उंधियो पाककृती देखील आधी पोस्ट केली होती.

(Most of the festivals are recalled in mind because of select unique recipes associated with it. Those special cuisine are easy to made and star of that day. One of such Ukadhandi making recipe from my native place called Edwan (Saphale). I always enjoy making it and if not then watching it over. 

Couple of years back for capturing its photo memory, we actually tried making it in base way. My mama Pravin Patil, sister Supriya and brother Shubham actually had rounds of our Edwan village to find required earthen pots to make it.

Ukad-handi is traditional receipe made specially on the occasion of Makar-sankranti....It is yummy blend of mixed vegetables!!

Maharashtrian style Undhiyo kinva Bhogichi Bhaji. Real joy is collecting all ingredients from rural areas, cutting them in various shapes and mixing it with basic spices. :) Yam, roots called Konfal and sweet potato, raw bananas, Tarale- a type of root from lake, groundnuts, big brinjals adds colour, nutritious value and texture! Many people come together and make this sabji at village side. Even though small portion of each vegetable we add, collectively it becomes too much in quantity. Making it better for us to share with many more people. 

It can be enjoyed with traditional Bhajarichi bhakari or Tandalachi ukad bhakari.

We can add muthiya in to it. Muthiya are basically from Gujarati kitchen, fried round small size fritters, made using besan, fenugreek leaves and spices. 

Recipe of Ukadhandi is shared in one of the image in case anyone wants to try. 

Its a dish to share with all with love and to closed once. :)

#authentic_Maharashtra #ukadhandi #sankrant_special #mix_veggie #edwan #mathane #vadval 

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


































No comments:

Post a Comment