Monday, December 6, 2021

चिकन सुप for Soul! ❤️✨🌿

चिकन सुप for Soul! ❤️✨🌿

आजारपणानंतर कोणी जवळचे नातेवाईक, स्टीलचा उभा फिरकीचा डब्यामधे पिलुचा सुप घेऊन येणे फार जिव्हाळ्याचे समजले जाई. 'Chicken soup for soul' नावाची छोट्या छोट्या लघुकथांचा समावेश असलेली लोकप्रिय अशी पुस्तकांची एक सुरेख मालिका देखील आहे. जसे चिकन सुप तुम्हाला ताकद देते त्याचप्रमाणे ह्या पुस्तकातील सुरेख लघुकथा- गोष्टी मनाला उमेद देतात. म्हणून पाककृतींचा लवलेशही नसलेल्या ह्या पुस्तकाला चक्क चिकन सुपाचे नाव दिले आहे. खुप सुंदर कथा ह्यात आहेत आणि मराठीसकट अनेक भाषांमधे अनुवादित झाले आहे.

एडवणला असाच धोधो पाऊस असायचा, मस्त मस्त वाटायचे पडणा-या पावसाच्या आवाजात. उशिरा संध्याकाळी अंधार पडायला लागताच, स्वयंपाकघरातून चिकनच्या सुपची चाहूल लागायची. छोट्या छोट्या वाट्यांमधून मम्मी मस्त साजूक तुपाच्या तर्रीवाले वाफाळते सुप आणून हळूहळू फुंकर मारत पण गरम प्यायला सांगायची. कोव्हिडमधून बाहेर आल्यावर, भरपुर लसूण घातलेले चिकन सुप आणि काळेमिरे-मीठ-कोथिंबीर भुरभुरवलेली गावठी कोंबडीची उकडलेली अंडी असे मला दिले होते. कोव्हिडच्या आजारपणामुळे गेलेली तोंडाची चव नुकतीच परत येत होती त्यात हे सुप पिऊन खुप खुप बरे वाटले होते. Chicken munchow सुप इतके चमचमीत नसले तरी Soul-food नक्कीच आहे.

सामिष आहार पद्धती असलेल्या आमच्याकडे ऑपरेशन वैगरे झाले असता, हाडांची झीज व जखम लौकर भरावी, ताकदी यावी, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून पाया सुप, सर्दी कमी व्हावी म्हणून चिंबोरी रस, विशेषतः पावसाळा- थंडीत, शरीरात ऊब राहावी, प्रतिकारशक्ती टिकून राहावी म्हणून कोवळ्या चिकनचे सुप हे वरचेवर होत असते. कफाची बाधा झाली असेल तर कफ सुटायला देखील मदत होते हा माझा स्वत:चा देखील अनुभव आहे. दुपारी किंवा संध्याकाळी जेवणा अगोदर हे गरमागरम घोट-घोट पिणे महत्वाचे. आणि कोंबडी/ कोंबडा गावठी आणि कोवळा असावा.

हे चिकनचे सुप म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीने बनवतात, मसाल्यांचा आणि इतर जिन्नसांचा खुप डामडौल अजिबात नसतोच. तरीही चवीला छान लागते. लहान मुले, वयस्कर व्यक्ती देखील पिऊ शकतात. हे सुप देखील घरोघरी वेगवेगळ्या पध्द्तीने केले जाते. मी आमची पध्द्त सांगते. हाडांचा भाग जास्त असलेले, शक्यतो कोवळ्या चिकनचे ताजे तुकडे महत्वाचे आहेत. हाडांचा रस उकळवताना निघाला पाहिजे. ते जास्त महत्त्वाचे ठरते.

काही जण उकडलेले चिकन मिक्सरला बारीक करून तो सुपसाठी वापरतात पण ते फार जड होते आणि दाट असल्यामुळे प्यायला सगळ्यांनाच आवडते असे नाही.

साहित्य पाहूया काय लागेल:
• पाव किलो हाडे जास्त असलेले चिकनचे बारीक केलेले तुकडे (बोनलेस वापरत नाहीत शक्यतो.)
• आलेलसूण- कोथिंबीर पेस्ट
• दालचिनी तुकडा
• तमालपत्र १-२
• काळेमिरे ६-७ (तुम्हाला कितपत तिखट लागते त्यानुसार)
• लवंग १
• जीरे अर्धा चमचा
• मीठ
• अर्ध्या लिंबूचा रस (मुळ पाककृती मधे वापर करत नाहीत)
• धणा जीरा पावडर
• अगदी नावाला गरम मसाला
• साजूक तूप
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• बारीक चिरलेला लसूण
• हळद पावडर
• चिकनच्या अडिच पट गरम पाणी

कोणतेही सुप मंद आचेवर बराच वेळ शिजवणे आणि आटवणे महत्वाचे असते म्हणून शक्यतो लवकर बनवायला घेऊन तुम्ही मंद आचेवर शिजवू शकता. पण आज मी तुम्हाला दाखवतेय ते कुकरमधले लवकर होणारे सुप.

• तर चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. वरवंट्याने हाडांवर बारीक एखादी चीर पडेल इतपत फोडा. बारीक तुकडे पडता कामा नये. बारीक केलेले आले-लसूण-कोथिंबीर, मीठ, हळद पावडर सर्व चिकनला व्यवस्थित चोळून घ्या.

• गॅस वर कुकर गरम झाला की, त्यात साजूक तूप टाकावे. थोडे गरम झाले की जिरा, दालचिनी, काळेमिरे, तमालपत्र, लवंग टाकून परतावे. बारीक चिरलेला लसूण लालसर परतुन घ्यावा.

• लगेच मॅरिनेट केलेले चिकन टाकून पाच मिनिटे छान परतावे. धणाजीरा पावडर आणि अगदी नावाला गरम मसाला टाकून परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जरासा लिंबाचा रस (नाही टाकला तरी चालतो) मिसळून चिकनच्या साधारण अडीच पण गरम पाणी त्यात ओता. एक उकळी आली कि कुकरला ५-६ शिट्या करून घ्या.

• वाफ गेल्यावर झाकण खोलून थोडी कोथिंबीर अजून मिसळा आणि १० मिनीटे रस उकळवून आटू द्या. सर्व्ह करताना अख्खे मसाले काढून टाका. एक-दोन तुकडे आणि रस्सा असे वाढा.

मुख्य म्हणजे गरमागरम प्यायला सांगा! ✨🌿❤️
.
.
.
.
.
- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#चिकनसुप #chicken_soup #immunity_booster #immumnity #food #food_preparation #vadval #वाडवळ #soups #flavours












No comments:

Post a Comment