Wednesday, December 8, 2021

#मशरूम_सुप #अळिंबी_सुप

 #मशरूम_सुप #अळिंबी_सुप #herbs_tossed_mushrooms

#mushroom ♥️💁🌿🍄🧄🌶️

माझ्या आवडत्या पदार्थांमध्ये अळंबी म्हणजेच मशरूमस् अगदी पहिल्या क्रमांकावर आहेत. तंदूरी मशरूम, स्टफ्ड मशरूम, Tossed मशरूम, मशरूम चे भाताचे प्रकार असे सगळेच मस्त लागते. आणि त्याबरोबरच मशरूमचे लसूण तडका मारलेले क्रिमी सुप तर आमच्या कुटुंबातील बहूतेकांचे आवडते... कारण लागतेही भन्नाट चविष्ट. माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींनाही ह्या घरगुती आणि सोप्या सुपाने भुरळ घातली आणि रेसिपी शेअर करण्यास अनेकांनी‌ सांगितले. शेवटी आज रेसिपी लिहीलिच. माझ्याबरोबरच बाबा, सुप्रिया, रोहीत, मम्मी आणि आईलादेखील हे सुप आवडत असल्याने आणि बटण मशरूम आजकल सहज उपलब्ध असल्याने आम्ही हे वरचेवर बनवतो. 👩‍🌾👩‍🍳🧉🍵

फोटोमधे फुललेले जे अळिंबी आहेत ते पुर्वी आमच्याकडच्या गावरान बायका विशेषत: आदिवासी बायका पावसाळ्यात हे गावठी मशरूम वाट्यावर विकायला यायच्या. आताही आणतात पण कमी प्रमाणात. फुललेल्या पेक्षा कळी स्वरूपात असलेले अळिंबी जास्त चांगले. मुक्या अळिंबी. शेतामधे बांधावर किंवा एखाद्या झाडाच्या थोड्याशा ओलसर खोडावर उगवतात ही. साफ करून याची फक्त आले-लसूण पेस्ट, काळे मिरे आणि मीठ वापरून मटणासारख्या चवीची पौष्टिक भाजी बनवली जायची. आदिवासींना नैसर्गिक वनस्पती आणि औषधी गुणधर्माची योग्य माहिती असतेच ना... गावाकडे 'कुत्र्याची छत्री' म्हणून हिणवले जाणारे हे अळिंबी म्हणजे अगॅंरीकस प्रवर्गातील  खाण्यासाठी योग्य असा बुरशीचा प्रकार आहे.  या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळं येतात, त्या फळांस अळीम्बी  किंवा भूछत्र असे म्हणतात. अळंबीचे म्हणजेच मशरूम चे निसर्गात अनेक  प्रकार आढळून येतात. आपल्याकडे विशेषतः बटण मशरूम शहरी बाजारातही सहज मिळते. आजकल माॅलस् मधे 'wild mushrooms' म्हणून अनेक exotic प्रकारही उपलब्ध असतात. गावच्या बाजूला आदिवासी पावसाळ्यात विकायला घेऊन येतात.


लहान असताना बाबांनी महेंद्र म्हणून एका माणसाला, आमच्या वाडीमधे मशरूमची शेती करायला जागा आणि प्रोत्साहन दिले होते. तो हौशी नव-उद्योजक होता. त्यावेळी आमच्याकडे मशरूम जास्त प्रसिद्ध नव्हते, ठराविक हाॅटेल आणि वर्ग ते विकत घेत. त्यात अळिंबी शाकाहारी कि मांसाहारी हा वाद कायमच..... असो! तर काड पध्दतीने विशिष्ट Jute च्या गोण्यांमधे खास पध्दतीने ह्याची लागवड होई आणि मग लवकरच तयार अळंबी गोण्यांतून डोकावत. अळंबी अत्यंत नाजूक, नाशिवंत घटक त्यामुळे लगेच काढुन पॅकिंगमध्ये बाजारात पाठवले जात. अगदी ताजे काढलेले बटण मशरूम टोपलीतून घरात. :) आणि मम्मी बनवत असे लगेचच भाजी...मटणाच्या चवीची. ती चवच न्यारी. मशरूमच्या प्रेमात तेव्हापासूनच.... 🍄♥️💁🌿 हळूहळू सुप शिकले. सुप्रियाही हे मशरूमचे उत्तम सुप बनवते. 😋

तर मग आज हा अळंबी म्हणजेच मशरूम चा सुप हा प्रकार पाहूया. तुम्हाला मशरूम आवडत असतील तर खुप आवडेल हा प्रकार. करून पहा आणि आम्हाला पण कळवा. 😀🥘

साहित्य पाहूया काय काय हवे:

बटण मशरूमस् १५-१६ नग

अर्धा कांदा

लसूण पाकळी किंवा लसूण पात ८-१० नग

दुध एक वाटी (साय असलेले)

पाणी दोन पाणी

काळे मिरे १५-१६ नग

मीठ चवीनुसार

साखर चिमुटभर

दोन चिमुटभर ओरीगानो आणि चिली फ्लेक्स्

अमुल बटर 

तेल

चला चमचमीत आणि क्रिमी गरमागरम मशरूम सुप कसे बनवायचे ते पाहुया...

१. बटण मशरूम्स् व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. आणि चिरून घ्या.🍄

२. पॅन गरम करून थोडेसे तेल (बटर जळू नये म्हणून) आणि बटर टाकून गरम होऊ द्या. लगेचच काळेमिरे, कांदा आणि मशरूम पॅनमधे टाकून छान सोनेरीसर होईपर्यंत परता. 

३. मीठ आणि साखर टाकून अजून थोडा वेळ परता आणि लगेच जाडसर साय असलेले दुध टाकून पाच मिनिटे नीट ढवळा आणि मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्या. (सुप जास्त तिखट नको असेल तर काळे मिरे बाहेर काढून मग मिश्रण बारीक करा.)

तसेच सहा-सात मशरूम चे तुकडे नंतर सर्व्ह करण्यासाठी बाजूला ठेवावे.

४. परत पॅन गरम करून त्यामधे बटर विरघळवा. त्यात बारीक

कापलेला लसूण किंवा लसणाची बारीक कापलेली पात टाका. आम्हाला तिखट आवडते म्हणून आम्ही बारीक कापलेली, कमी तिखट मिरचीदेखील तडक्यात आवर्जून टाकतो. लसूण मस्त चुरचुरीत झाला (करपवू नका.) कि लगेच बारीक केलेले मिश्रण ओतावे आणि ढवळावे. पाणी टाकावे. आणि परतून एक-दोन उकळ्या येऊ द्याव्या.

५. आता सर्व्ह करा मस्तपैकी आणि आधीच परतून ठेवलेल्या मशरूम चे तीन चार तुकडे टाका. आणि वरून ओरीगानो आणि चिली फ्लेक्स टाकावे. 

६. आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या लसूणाला बटरमधे परतून वरून तडका देऊ शकता. 🧄🌶️

७. अगदी चार थेंब लिंबू रस (आपण दुध वापरत असल्याने आधीच लिंबू रस टाकल्यास सुप फाटू शकते. म्हणून आवडत असल्यास सुप सर्व्ह झाल्यावर हलकेच पिळा! Citrus lover असतील तर भारी आवडेल तुम्हाला.) 🍋🌶️

उन्हाळ्यापेक्षा पावसाळा आणि थंडीत, मस्तपैकी गार्लिक ब्रेडसोबत सुप बोलमधे मशरूमचे दोन-तीन काप घालून, हर्ब्स पेरून मग सुप प्यायला भारीच वाटते. पातीचा कांदा असेल तर त्याचे थोडेसे तुकडे वरून गार्निश करू शकता. Mushroom lovers must try! :)

 • अजून हे करतानाच Herbs tossed Mushrooms पण तुम्ही बनवू शकता.

मशरूम उभे चिरून घ्यायचे. पॅन एकदम मोठ्या आचेवर ठेवायचा. बटर जळणार नाही ह्याची काळजी घेत ते पॅनमधे टाकले की लगेच चिरलेले मशरूम टाकायचे. आणि ओरिगानो, चिली फ्लेक्स, बेसिल, मीठ, चिमुटभर साखर, काळेमिरे पावडर, लिंबाचा थोडा रस हे टाकून मोठ्या आचेवरच पटापट ढवळत परतायचे. (मोठ्या आचेवरच कारण मशरूमला लगेच पाणी सुटते.) थोडासा गार्निशिंग साठी पातीचा कांदा टाकू शकता. फार छान लागते.

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com

#soup #healthy #mushrooms #alimbi #mushroomsoup #food #food_preparation #foodpreparation #herbs























No comments:

Post a Comment