Tuesday, December 14, 2021

#पुडला #ओल्या_लसणाच्या_पाती #लाल_राता_भात #काळा_भात 🧄🐠🐟🎣🌾🍚🍛

 #पुडला #ओल्या_लसणाच्या_पाती #लाल_राता_भात #काळा_भात 🧄🐠🐟🎣🌾🍚🍛

बाजारामधे सध्या ताजी ओल्या लसुणाची पाती बाजारात दाखल झालेय. ओली पाती, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट, हळद-मिरची पावडर, लिंबू रस असे सगळे लावून अर्धा तास पापलेट मुरवत ठेवला. उभ्या आडव्या खाचांमधे पातीचा लसूण खोवला आणि तळताना हलकासा रवा भुरभुरवला. ब-यापैकी जास्तीच्याच तेलात तळला. ओल्या लसणाच्या चेचलेल्या पातीची सुरेख चव आली होती.

एडवणला मस्त हलकी थंडीही पडतेय आता आणि दुपारच्या जेवणात लाल राता भात, काळा भात आणि स्थानिक भात सोबतीला बोंबलाचे वाडवळी पध्दतीचे झणझणीत कालवण आणि हा तळलेला ताजा पापलेट भन्नाट लागला.

केळीच्या पानातील वाफवलेला पुडला:

लाल राता तांदूळ, काळा तांदूळ यांचे बरेच वेगवेगळे प्रकार असतात. हा लाल राता भात/ देवभात किंवा गोडुस चवीचा थोडा चिकटसर असा काळा भात खायला चव विकसित व्हावी लागते, असे माझे वैयक्तिक मत आहे. दोन्ही भात बनवताना तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवावे लागतात. मग पाण्यात जरासे मीठ घालून, रोजच्या भाताला घेतात त्यापेक्षा ३-४ शिट्या जास्त घेतल्या की भात शिजतो. भांड्यात शिजवणार असाल तरी नेहमीपेक्षा अर्थातच जास्त वेळ लागतो. लाल राता भात मोकळा मोकळा होतो तर काळा भात जरा चिकटसर... सुरवातीला नाही तर या वेगळ्या अशा चवीची जरा सवय झाली की मगच मजा वाटते खायला.‌

आम्ही भाऊ बहिण जमलो होतो त्यामुळे स्वयंपाकघरात experiment  करण्यास मैदान मोकळे होते. मम्मीने मुख्य जेवण बनवले होतेच आणि मलासुद्धा आवडीने मोठाले मासे आणून दिले होते. म्हणून वरील मेन्युसोबतच 'पात्रा नी मच्छी' हा पारसी प्रकार आणि केळीच्या पानातील ह्या तीन प्रकारच्या भातांचा पुडला बनवला होता. साधारण कृती खालील प्रमाणे: 

१. तीन प्रकारचे भात तयार होते. मीठ टाकलेले होते. त्यात थोडेसा लिंबू रस पिळून मिसळून घेतला. सगळे वेगवेगळ्या भांड्यातच राहू द्यायचे.

२. चार-पाच कांद्याच्या पाकळ्या, न सोललेले चार-पाच अख्ख्या लसूणाच्या पाकळ्या मोकळ्या करून, ओल्या लसणाची बारीक चिरलेली पाती, चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, आठ-दहा कोलंब्या डोके साफ करून आणि धागा काढून, गाजराचे उभे तुकडे, टाॅमेटोचे उभे तुकडे हे सर्व जिन्नस पॅनमधे तेलावर काळेमिरे टाकून टाॅस करून घेतले. मीठ आणि मिरची पावडर भुरभुरली. थोडा लिंबूरस आणि आलेलसूण वाटण पण लावले. मोठ्या आचेवर पंधरा ते वीस मिनिटे न करपवता परतले. 

३. मुठभर ताजे खवलेले खोबरे, चार मिरची, थोडी लसूण पाती, इंच आले, मुठभर कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस, सात-आठ काळेमिरे, एक लवंग, मीठ यांची चटणी तयार ठेवा.

४. केळीच्या मोठाल्या पानाला तेलाचा हात लावून घेतला. भेळ खायला कागदाचा द्रोण बनवतो तसा केळीच्या पानाचा द्रोण बनवला. खोलगट भांड्यात उभा केला. आणि अगदी खालच्या टोकाला कांद्याच्या मोठ्या पाकळ्या टाकल्या. मग थोडा सफेद भात, त्यावर बारीक चिरलेली लसूण पाती आणि कोलंबीचे टाॅस केलेले मिश्रण, मग परत कांदा, त्यावर लाल राता भात आणि कोलंबीचे टाॅस केलेले मिश्रण, परत काळा भात आणि कोलंबीचे टाॅस केलेले मिश्रण असे सर्व थर लावले. मधे मधे आपण बनवलेली हिरवी चटणी आणि एक कैरी मिळालेले त्याचे तुकडे टाकले. आणि केळीच्या पानाचे तोंड बांधून घेतले. हा पुर्ण पुडला अर्धा तास वाफवून घेतला. उघडला तेव्हा मिश्र छान अरोमा स्वयंपाकघरात दरवळला. शक्य असल्यास हळदीची पाने वापरली तर अजून छान चव आणि सुगंधीत लागते हे. खोलल्यावर दिसणारे थरही रंगबिरंगी मोहक... ह्यात वाफवले गेलेले कोलंबी, लसूण, गाजर तर अप्रतिम लागते. कधीतरी नक्की हे करून पहा.

वाढताना सर्व मिक्स करून सर्व्ह करा. वेगळ्या चवीचे चांगले लागते.

 'पात्रा नी मच्छी' तर बनवायला अजून सोपी, पण पुढच्या वेळी पाककृती देते.

Reel Links:

1. For pudla:

https://www.facebook.com/sneha.a.chaudhari/videos/206696854991658/?fs=e&s=cl


2. For pomphret:

https://www.facebook.com/sneha.a.chaudhari/videos/605129390751387/?fs=e&s=cl














#kitchen #spice #एडवण #edwan #blackrice #red_rata_rice #food #pomphret 

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर



No comments:

Post a Comment