Wednesday, November 24, 2021

टाॅमेटो_सार

 #टाॅमेटो_सार

हे प्रत्येक जण वेगवेगळ्या पध्दतीने करतात. काही नंतर नारळाचे दुध घालतात तर काही सर्व घटक एकत्र वाटतात. मी आपली माझी झटपट पध्द्त देते. टाॅमेटो आणि ताजी गावठी कोथिंबीर घरचीच होती. एक दोन घरची आणि बाकी बाजारातून हुडकून आणलेली लालेलाल, मोठी रसाळ टाॅमेटो... 😀 टाॅमेटो उत्तम दर्जाची असली तरच सार छान होते. 


आपल्याला लागणार आहे:

 • चार रसाळ टाॅमेटो

 • दीड वाटी ताजे खवलेले खोबरे

 • आल्याचा लहानसा तुकडा

 • अर्धा बारीक चिरलेला कांदा

 • पाच सहा लसूण पाकळ्या

 • कढीपत्ता चार पाच पाने

 • साजूक तुप

 • जीरे

 • चिमुटभर साखर

 • बारीक चिरलेली कोथिंबीर

 • मीठ

 • तमालपत्र, चार पाच काळेमिरे आणि आवडत असल्यास लहानसा दालचिनीचा तुकडा


१. सार बनवताना टाॅमेटोचे तुकडे करून त्यांना बेताच्या पाण्यामधे सहा-सात मिनिटे उकळवते. थंड झाल्यावर सालासकट मिक्सरच्या भांड्यामधे टाकते. त्यात कांदा, लसूण, आले, कढीपत्त्याची एक दोन पाने, एखादी हिरवी मिरची आणि खवलेले खोबरे टाकते.‌ दोन तीन काळीमिरे देखील टाकते. काळेमिरे चा हलकासा हवाहवासा तिखटसर स्वाद येतो. तिखट सहन होत नसल्यास मिरची मिरे टाकू नका. पाणी बेताचे असू देते. हे सारे मिश्रण अगदी गंधाएवढे व्यवस्थित भरडून घेते. स्वच्छ कपड्यातून गाळून घेते. 

२. कढईत जरासे तेल व ब-यापैकी साजूक तुप ओतून काळेमिरे व जीरे तडतडवते. तीन चार कढीपत्त्याची पाने, चार पाकळ्या बारीक चिरलेला लसूण तडक्यावर लालसर होईपर्यंत परतते. मग लगेचच गाळलेले मिश्रण कढईत घालून ढवळते. गरजेनुसार पाणी वाढवते. तमालपत्र टाकते.

३. मीठ, साखर घालून चांगले थोडे दाट होईपर्यंत उकळवते. कोथिंबीर टाकून मग गॅस बंद करते. 

अगदी लालसर रंग हवा असल्यास एखादा लहान तुकडा बीट आपण घालू शकतो. टाॅमेटो कमी वेळ उकळवले आहेत म्हणून कच्चेपणा जाईस्तोवर उकळवणे गरजेचे आहे.

मस्त टाॅमेटोसार आस्वादास तयार!

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर










Monday, November 22, 2021

शेंगदाणे_आणि_राताळ्याची_उपवासाची_उसळ

 #शेंगदाणे_आणि_राताळ्याची_उपवासाची_उसळ

#संकष्टी 

राताळ्याचा वापर करून उपवासाला त-हेत-हेचे चविष्ट पदार्थ सहज करता येतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे शेंगदाणे आणि राताळ्याची उपवासाची भाजी! करायला अगदी सोपी असते आणि चवीला मस्त... ❤️🌿

त्यातही बाजारात गुलाबी सर-गडद राणी रंगाची गावठी राताळी, गावठी कोथिंबीर आणि ताज्या काढलेल्या भुईमूगाच्या शेंगा मिळाल्या तर उत्तमच... आता भुईमूगाच्या छान शेंगा यायला लागल्या तर आहेत.

आपल्याला लागणारे साहित्य:

१. तुप किंवा तेल

२. चार-पाच राताळी

३. कढीपत्ता

४. दोन ते तीन मिरच्या

५. सोललेले शेंगदाणे (किंवा शेंगदाणे भिजवलेले)

६. जरासे ताजे खवलेले खोबरे

७. कोथिंबीर

८. मीठ 

९. चिमुटभर साखर

१०. जीरे


(Please note: उपवासाला ज्यांच्याकडे कढीपत्ता, कोथिंबीर वापरत नसतील त्यांनी ती वगळा तसेच मीठाच्या जागी सैधव मीठ वापरू शकता.)


१. एका कुकरमध्ये तुप किंवा तेल तापवा. जी-याची खमंग फोडणी करा. उभी चिर पाडून मिरची आणि कढीपत्ता टाकून परता. चवीपुरते मीठ, चिमुटभर साखर घाला. 

२. स्वच्छ धुतलेल्या रातळ्याची साले काढून राताळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. ते ह्या फोडणीवर टाका. भिजवलेले शेंगदाणे किंवा सोललेले शेंगदाणे टाका. आणि व्यवस्थित परता.‌ आणि एक ते दोन शिटी काढून घ्या. 

(जर जास्त घाई नसेल तर तुम्ही कढईमधे वाफेवर ही भाजी सहज करू शकता.)

3. राताळे आणि बटाटे शिजले कि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ताजे खवलेले खोबरे घालून सर्व्ह करा. 


ही भाजी मला थोडेसे लिंबू वरून पिळून आणि घट्ट दही घालून खायला आवडते. :) ह्यावरच तुम्हीदेखील फराळी चिवडा, कुस्करलेले वेफर्स आणि तळलेल्या बटाट्याचे छोटे तुकडे टाकून मिसळ बनवून खाऊ शकता. 

#fasting_menu #upvasache_padarth #fasting_recips #sweet_potatos #groundnut








Saturday, November 13, 2021

डिंक_सुकामेवा_लाडू

#डिंक_सुकामेवा_लाडू ❤️

Happiness is having Dink- Dryfruits Laddoo in winter days! ❤️🌿


लहानपणापासूनच आम्ही पाहायचो आमच्या मम्मीला तिच्या व्यस्त दिनक्रमातुनही वेळात वेळ काढून अनेक प्रकारचे उत्तमोत्तम पौष्टिक लाडू लिलया बनवताना... खास करून थंडीमधे.... आणि मग पटापट डब्बे भरून सग्यासोय-यांना पाठवत असे. मम्मीच्या हातचे लाडू अनेकांना आवडत. मला मात्र गोड पदार्थांचा ब-यापैकी तिटकारा होता. त्यात गोड लाडू ह्या प्रकाराला तर अगदी दिवाळीलादेखील मी हात लावत नसे. माझ्यासारखेच बाबांचेही. पण आम्हाला दोघांना मेथीचा, अगोड असे चुरमा लड्डू आणि डिंकाचा लाडू मात्र खुप आवडतो मग मम्मी आमच्यासाठी खास वाळायची हे लाडू... गेल्या वर्षामधे आमचे कुटुंब जरा वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या आजारपणातून सावरले. त्यामुळे थंडीमधे हाडांना मजबुती देणारे पौष्टिक असे लाडू मी तुम्हाला बनवून देते असे मी बाबांना सहज बोल्ले. ह्या आधी कधीही बनवले नव्हते पण सतत मम्मी आणि आई ह्यांना लाडू वाळताना पाहून पाहून पहिल्यांदाच केलेले असले तरी अगदी योग्य लाडू तयार झाले. निरनिराळ्या ग्रुपवर ह्याच डिंक लाडूच्या अप्रतिम आणि योग्य पाककृती अनेक सुगरणींनी पोस्ट केलेल्या आहेतच. पण मम्मी, आई आणि दोन्ही बाबांकडून, लाडू आवडल्याची सहज अशी मनापासून दाद मिळाली आणि मग वाटले साधी सोपी पाककृती असली तरीही पोस्ट करूया. न जाणो कोणाच्या कामी येईल.


आईदेखील निरनिराळे लाडू सहज बनवते. तिचा हातखंडाच आहे त्यात... तिच्या हातचा बेसनाचा लाडू आत्ता माझ्या आवडीच्या लाडवांच्या लिस्टमधे जाऊन बसलेय. आईच्या सल्ल्याने मग लाडू बनवायचा घाट घातला.


डिंक-सुकामेव्याचे लाडू चविष्ट लागतात पण ते अगदी प्रमाणातच खाल्लेले चांगले नाहीतर शरीराला गरम पडतात. पुर्वीच्या काळी आजारपणानंतर, बाळंतपणानंतर ताकदीसाठी खाण्यासाठी म्हणून हे लाडू बनवले जायचे. थंडीमधे आवर्जुन घरोघरी हे लाडू केले जातात. आत्ता करून पाहिले तेव्हा ते किती सोपे आहेत हे लक्षात आले‌.


काय काय लागते पाहुया आपण,

१. काजू १०० ग्रॅम

२. बदाम १०० ग्रॅम

३. पिस्ता ५० ग्रॅम

४. काळे मनुका १०० ग्रॅम

५. बेदाणे ७५ ग्रॅम

६. ४-५ अंजीराचे बारीक तुकडे

७. खिसलेले सुके खोबरे ५० ग्रॅम

८. डिंक ७५ ग्रॅम

९. खजुर १०० ग्रॅम

१०. खारीक पावडर १०० ग्रॅम

११. गुलाबपाकळ्या २५ ग्रॅम

१२. खिसलेला थोडासा गुळ 

१३. खसखस थोडीशी

१४. तीळ थोडेसे

१५. सुंठ पावडर थोडीशी

१६. साजूक तुप


१. जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर काजू, बदाम, पिस्ता हलकेच भाजून घेतले. तु(म्हाला आवडत असल्यास मखाणा, मगज बी पण परतुन वापरू शकता.) हे थंड झाल्यावर हलकेच मिक्सरमधून बारीक करून घेतले. अगदी बारीक केले नाही.


२. मग लागोलाग तीळ आणि खसखस हलकेच भाजून घ्या. काळे मनुका, बेदाणे, अंजीर तुकडा अगदी नावालाच भाजून घेतला. मग सुकलेले किसलेले खोबरे परतुन घेतला. मिक्सर वर तीळ, सुंठ पावडर आणि थोड्या गुलाबपाकळ्या हलकेच जाडसर भरडुन‌ घेतल्या.


३. बी काढलेला खजुर मिक्सर मधुन बारीक करून घेतला. नैसर्गिक गोडव्यासाठी आम्ही खजुर वापरलाआहे.


४. कढईत तुप तापवुन त्यात लहान लहान बॅचेसमधे डिंक तळून फुलवून घेताना करपणार नाही ह्याकडे लक्ष दिले. हलका होत  फुलेपर्यत सतत हलवत तळला. तळताना मी हलकेच दोन-चार पाकळ्या तुपात टाकल्या तर डिंक फुलवत असताना काही डिंकांना सुरेख गुलाबीसर, पर्पल रंग आला. बोटांच्या चिमटीत फुलवलेला डिंक धरला असता मस्त फुटायचा.


५. त्याच उरलेल्या तुपात गुळ पातळ करून घेतला.


६. मोठ्या परातीत फुलवलेला डिंक, बेदाणे, मनुका, सुकामेव्याचे तुकडे, खारीकची पावडर, मिक्सरमधून फिरवून काढलेला खजुर, गुलाबपाकळ्या, तीळ, खसखस, सुंठ पावडर सारे एकत्र केले. सारे छान एकत्र मिसळून घेतले. त्याच वितळलेला गुळ ओतला. आणि सहन होईल असे गरम असताना परत सर्व एकत्र करून मग हवे तसे तुप हाताला लावत, कधी मिश्रणात मिसळत लाडू वळून घेतले.


आवडत असल्यास, खसखस आणि थोडाशा गुलाबाच्या लहान पाकळ्यांमधे, वाळलेला लाडू थोडासा घोळवला आणि कपकेकचे वेस्टन असते त्यामधे ठेवला तरी सुंदर दिसतो.

गुलाबी सुकवलेल्या गुलाबपाकळ्यांमुळे फार सुरेख स्वाद लाडू खाताना जाणवत होता. लाडू खाताना मधेमधे दाताखाली येणारा डिंक किंवा सुकामेव्याचा तुकडा अफलातून लागतो.

दिसतोही मस्त आणि हा लहान-मोठे कोणीही आवडीने खातात आणि उपवासाला देखील होतो.


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


#डिंकाचा_लाडू #डिंक_सुकामेवा #सुकामेवा #थंडी #पौष्टिक #Dink_dryfruits #almonds #cashews #pistacheo #raisin #rose_petals #jaggery #ladu #laddoo















Saturday, November 6, 2021

आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे

 #आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे

❤️🌿 #winter_is_here


मस्त हलकीशी गुलाबी थंडी पहाटेला विरारला जाणवू लागलेय.... बाजारात सध्या भरपुर चांगले आवळे, ओली हळद, आंबेहळद बाजारात उपलब्ध ‌आहेत. दरवर्षी आवळा-आंबेहळद-हळदीचे लोणचे ह्या सुमारास भरतोच आम्ही. बाबांचे परिचित घनश्याम आत्ताच गावावरून आले, येताना त्यांच्या शेतातील गावरान मोहरी, राईतेल, गावठी लसूण घेऊन आले. त्यामुळे ह्यावेळी गावठी छोट्या पाकळीच्या लसूणाची भर केलेय.


हळदीचे तुकडे करताना दरवळणारा तो विशिष्ट सुगंध मला फार आवडतो. कसला मोहक रंग तो ओल्या हळदीचा.... तळहातही सुरेख गडद पिवळसर रंग लेवून हळदुला झाला.... 💛


बाजारात जेव्हा मुबलक प्रमाणात ओली हळद, ताजी आंबेहळद, रसदार लिंबे, चांगले पक्व आले, हिरव्यागार मिरच्या आणि उत्कृष्ट रानआवळे उपलब्ध होतात, तेव्हा आपण बनवू शकतो हे आंबेहळदीचे चविष्ट लोणचे! 👩‍🍳🌶️🍋🌶️🍋🥕🥘🌶️


सोपी पध्द्त आहे, 'आंबेहळद-ओली-हळद-आले-मिरची-आवळा-लिंबू' लोणचे बनवण्याची!!!  🤷♥️🌿 अगदी भन्नाट लागते चवीला आणि सोपे आहे बनवायला त्यामुळे एकदा तरी बनवाच....‌😃 आई सकाळी गावरान साहित्य हुडकून आणते बाजारातून... 😃💁


आजकल अनेक कंपनींचा मराठमोळ्या प्रकारचा तयार लोणचे मसाला मिळतो. त्याचा वापर करून अनेक सुगरणी, नवख्या स्वयंपाक करणा-या युवती आणि कैक हौशी Home-chef , जेवणाची रंगत वाढवणारी आणि वाढलेल्या पानांची डावी बाजू सांभाळणा-री अशी त-हेत-हेची चविष्ट, चमचमीत आणि लज्जतदार लोणची बनवतात. कैरीचे, मोक्याचे, लिंबाचे, करवंदाचे, मिरचीचे, माईनमुळ्याचे, गाजराचे, आवळ्याचे आणि अजूनही बरीच लोणची हा तयार लोणचे मसाला वापरून झटपट बनवता येतात. :) आणि चटकदार लोणचे मसाला घरी बनवता येतो. तो मसाला आयत्या वेळी मिळाला नाही तरी घरच्याघरी व बनवता येईल असे मसाल्याचे प्रमाण दिले आहे. तुम्ही ते पण वापरू शकता. 🤷🌿💁♥️ तसेच हाच मसाला वापरून, लिंबू आणि १२ ही महिने मिळणा-या आंब्याच्या कै-यांचे लोणचे घालू शकता. :)


चला पाहूया कसे बनवायचे हे लोणचे...

साहित्य: (साहित्य प्रमाणे आवडी-निवडीप्रमाणे कमी-अधिक करू शकता)

१. १०० ग्रॅम आंबेहळद

२. ५० ग्रॅम ओली हळद

३. १५० ग्रॅम आले

४. ४-५ मोठे आवळे

५. ४-५ लिंबू (आम्ही जास्त घालतो)

६. १४-१५ हिरव्या मिरच्या

७. मीठ चवीनुसार

८. चिमूटभर साखर

९. अर्धा चमचा हळद

१०. १०० -१२५ ग्रॅम तयार लोणचे मसाला 

(तयार लोणचे मसाला नसल्यास, लोणचे मसाला घरी बनवण्यासाठी १०० ग्रॅम राईडाळ भाजून मिक्सरमधे जाडसर भरडून, ५०-६० ग्रॅम बेडगी मिरची पावडर, २५-४० ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर, १० ग्रॅम हिंग पावडर,‌‌ अर्धा चमचा थोडीसे भाजून‌ जाडसर भरडलेले मेथीदाणे असे सर्व एकत्र मिक्स करा. आणि वापरा.)


चला सोपी कृती पाहू.

१. सर्व साहित्य स्वच्छ धुवून, कपड्याने पुसून घ्या. पाण्याचा अंश राहता कामा नये. 

२. सर्व साहित्य बुडेल इतपत तेल अंदाजाने घ्या आणि गरम करा. नंतर थंड करत ठेवा.

३. एका लिंबू च्या आठ ह्याप्रमाणे लहान फोडी करा. बिया काढून टाका.

४. आंबेहळद, आले, ओली हळद यांची साले काढून मग बारीक कापून घ्या.

५. आवळ्याचे व मिरचीचे देखील बारीक तुकडे करा.

६. सगळे एकत्र करून मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. (साधारण ९-१० तास रहायला हवे)

७. सकाळी सगळ्या मिश्रणात १०० -१२५ ग्रॅम तयार महाराष्ट्रीयन पध्द्तीचा लोणचे मसाला टाकून मिक्स करा. (तयार लोणचे मसाला नसल्यास, लोणचे मसाला घरी बनवण्यासाठी १०० ग्रॅम राईडाळ मिक्सरमधे भरडून, ५०-६० ग्रॅम बेडगी मिरची पावडर, २५-४० ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर, १० ग्रॅम हिंग पावडर,‌‌ अर्धा चमचा थोडीशी भाजून‌ जाडसर भरडलेले मेथीदाणे मिक्स करा.)

८. गरम करून थंड केलेले तेल त्यात टाकून व्यवस्थित परता.

बरणी मधे भरून ठेवा. आम्ही हे फ्रिजमधे ठेवतो, कारण काहीवेळा आंबेहळद आणि ओली हळदीमध्ये पाण्याचा अंश असू शकतो, ज्यामुळे लोणचे फसफसू शकते.


तुम्ही कसे बनवता ते, आम्हालापण सांगा पाहू! 💁


#pickles #achar #lonache #lonache_masala #marathi_food #लोणचे_स्पर्धा_online #Contest_alert #लोणचे_स्पेशल #pickles ❤️🌿

#home_quarantine_time #lets_spread_happiness #positivity #lets_breath_summer #participants_entry

#pickle_contest #letsbringthebest #traditional_recipes #lonache #laxmi_masale #the_masala_bazaar #edwan #virar #soul













Tuesday, November 2, 2021

दोन_प्रकारच्या_करंजी_दिवाळी_फराळ

दोन_प्रकारच्या_करंजी_दिवाळी_फराळ

♥️🌟💥🌿🌾✨ #फराळ_प्रकार

दोन प्रकारच्या सारणाच्या चविष्ट करंज्यांच्या पाककृती आई रश्मी इंदूलकरच्या पध्द्तीने! :)  तिच्या हातच्या करंज्या तर अगदी लाजवाब! ही करंजी आहे बनवायला सोपी पण patience ठेवून निगुतीने करणे गरजेचे. अगदी अलगद वाळणे असो कि मंद गॅसवर धांदरटपणा न करता तळणे असो. :) बाकी एकदा जमली कि lifetime बनवता येईल.

काय काय लागते पहा:

खोब-याच्या वाट्या आणून त्याचा वरचा काळसर थर काढून टाका. आणि पांढरा भाग बारीक किसणीवर गोलाकार फिरवत किसून घ्या. अगदी बारीक खिस हवा. हा खिस दोन्ही प्रकारच्या सारणासाठी वापरू शकता. ह्याला खुप वेळ लागतो पण ही पायरी महत्वाची आहे.

सारण १: सुके खोबरे-खसखस
एक वाटी सुके खोबरे
एक वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी भाजलेली खसखस
थोडासा भाजलेला रवा
अगदी बारीक चिरलेला पिस्ता आणि बदाम
वेलची पुड
वरील सारे मिश्रण एकत्र करा.

सारण २: भाजलेले बेसन पीठ
एक वाटी सुके खोबरे
एक वाटी पिठीसाखर
एक वाटी भाजलेले बेसन
अगदी बारीक चिरलेला पिस्ता आणि बदाम
वेलची पुड
वरील सारे मिश्रण एकत्र करा. आणि तयार ठेवा.

वरच्या आवरणासाठी:
७. मैदा दीड वाटी
८. बारीक रवा एक चमचा
९. मीठ चवीनुसार
१०. तेल व पाणी मळण्याकरता

तुप किंवा तेल तळण्याकरीता

अगदी सोप्या आहेत करंज्या पण निगुतीने करा बरे का! :)
१. पीठ बांधून घेताना दिड वाटी मैदा चाळून घ्या.
२. चवीपुरते मीठ व बारीक रवा मिक्स करा.
३. थोडे तुप गरम करून मोहन म्हणून ते पीठात घाला. ४. पीठ पाणी किंवा दूध घालत मऊसर मळून घ्यावे. आणि थोडा वेळ उमलू द्या. खलबत्त्याच्या वरवंट्याने चेचून घ्या. चेचून घेणे महत्वाचे आहे.
८. पोळपाट लाटणे घेऊन, एका थाळीत थोडे तांदूळ पीठ घ्या. भिजवलेल्या पिठाचे छोटे गोळे बनवा. तांदूळ पीठात गोळा फिरवून गोलाकार लाटून  घ्या.
९. त्यात दोन सारणांपैकी आवडीचे सारण भरून मस्त करंजी बनवून बाजूला ताटात लावून ठेवा. सर्व करंज्या अशाच प्रकारे तयार करून ताटात ठेवा. मला आईने करंजीचा साचा दिला. मी तो वापरते त्यामुळे करंज्या एकसारख्या सुबक आणि पटापट झाल्या.
१०. तेल किंवा तूप गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यावर मंद आचेवर एकामागून एक करंज्या सोडाव्यात. मंद आचेवरच तळून घ्याव्यात. मग तेल निथळून झाऱ्याने बाहेर काढून परत व्यवस्थित लावाव्यात.
झाल्या की मग तुम्हीही आस्वाद घ्या, गोड गोड करंज्यांचा...अगदी मनापासून गोड असणाऱ्या आणि माया लावणाऱ्या कोकणी माणसांसारख्या!!! :)

#करंज्या #करंजी #फराळ
#karanji #maharashtrian_sweets
#naralipornima #festivals
#faral #diwali #maharashtrian

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.
https://www.facebook.com/themasalabazaarstore/

आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.
www.themasalabazaar.com