Friday, July 8, 2022

खापरोळी आणि रस!!! 🥞🥥👩‍🍳❤️

 This is heavenly in taste! 😍

#खापरोळी_आणि_रस ❤️🥥

साधा, सात्त्विक आणि बनवायला सोपा असा छान गोड कोकणी पदार्थ म्हणजे खापरोळी आणि रस!!! 🥞🥥👩‍🍳❤️🌿 

तसे पाहिले तर खापरोळी या पदार्थांची ओळख मला लग्नानंतरच झाली. आणि आई (रश्मी इंदूलकर) ने नाश्त्याला जेव्हा रसरशीत खापरोळी बनवली तेव्हा पहिल्याच घासात खापरोळीच्या सात्त्विक चवीने अगदी जिव्हा आणि मन तृप्त होऊन गेले. कोकणातील अनेक पदार्थामधे खोबरे आणि तांदूळ वापरला जातो. खापरोळीमधेदेखील तांदूळ, गुळ आणि खोबरे हे तीनच साधे घटक विशेषत: आहेत‌. 


आमच्याकडे हे पीठ जास्तीचेच बनवतात. आणि एकदा हे खापरोळीसाठी पीठ आंबवले की बाबा मजेमजेत बोलतात कि आता पुढचे तीन-चार दिवस नास्ता फिक्स... डोसे आंबोळ्या, इडल्या, आप्पे, मसाला उत्तपा असे प्रकार पीठ संपेपर्यंत सुरूच असतात. 😃❤️

तर करून पहा खापरोळी आणि रस न्याहरी ला, गोडसर आवडत असेल तर खापरोळी आवडेल तुम्हांला... घरात न्याहरीला खापरोळीचा बेत केला आणि कुणाला गोड नको असेल तर त्यांच्यासाठी नुस्ती आंबोळी चटणी बनवू शकता. :)

खापरोळी आणि रस बनवण्यासाठी आधीच तयारी करावी लागते. खापऱोळीच्या पीठाची आणि नारळाच्या रसाची...👩‍🍳

पाहुया कसे बनवायचे पीठ:

(मी दिलेले प्रमाण वापरून दोन तीन दिवस आंबोळी वैगरे बनवता येईल एवढे पीठ होते. म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजाने हे पीठ कमी प्रमाणात बनवा. तसेच पीठ बनवताना तांदूळ आणि डाळीचे प्रमाणही प्रत्येक घरी काही प्रमाणात निरनिराळे असू शकते. मी आमच्याकडचे प्रमाण दिले आहे.)

तर खापरोळी बनवण्यासाठी आदल्या दिवशी सकाळी चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ (प्रमाण: 4:1), मेथी एक चमचा आणि एक वाटी पोहे भिजवा. मग रात्री थोडेसे पाणी घालून थोडे थोडे करत भिजवलेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक केलेले पीठ चमच्याने ढवळून एकजीव करा. एका मोठ्या भांड्यात वरती झाकण ठेवून पीठ आंबून येण्यासाठी (Fermentation) ठेवा. सध्या थंडी असल्याने पीठ यायला वेळ लागू शकतो.

दुस-या दिवशी सकाळी पीठ छान आंबून वर आले असेल, ते ढवळावे आणि चवीनुसार मीठ आणि जराशीच सेलम हळद घालावी व परत एकजीव करावे. 

खापरोळीसाठी नारळाचा आणि गुळाचा रस: 🥥👩‍🍳🌿❤️🥞

दोन नारळ फोडून ताजे खोबरे खवून घ्या. ते मिक्सरमधून फिरवा. हा वाटलेला चव स्वच्छ धुतलेल्या सुती कापडातून पिळून आणि गाळून एका मोठ्या भांड्यात रस काढा. 

खोब-याचा रस काढून उरलेला चोथा परत बेताचे पाणी घालून मिक्सरमधून काढा. आणि दुस-या भांड्यात पिळून आणि गाळून घ्या. 

खोब-याच्या रसाने भरलेल्या दोन्ही भांड्यात किसलेला गुळ टाका. (गुळाचे प्रमाण तुम्हाला अपेक्षित गोडव्याप्रमाणे कमी जास्त करू शकता.) दोन्ही भांड्यातील नारळाच्या रसामधे गुळ अगदी एकजीव झाला पाहिजे असे सतत ढवळून करा. एक पाणी दाट असते आणि एक सौम्य! ❤️😍🍝

तुम्हाला आवडत असल्यास ह्या रसामधे तुम्ही वेलची पावडर, जायफळ पावडर आणि केसर टाकू शकता. आमच्याकडे आम्ही ही सारी जिन्नसे टाकत नाही कारण त्याचे साधे फ्लेवर्स आम्हाला आवडतात. कोकणातही सहज करतात हा तेव्हा खास काही दुसरे टाकत नाहीत. :)

बीडाचा जाड तवा गरम करत ठेवा. आणि तापल्यावर मीठाचे पाणी शिंपडून चुरचूरू द्या. कांद्याला आडवा मधोमध कापून त्याला तेलात बुडवून हलकेच तव्यावर फिरवतो. त्यावर खोलगट डावाने पीठ ओतायचे आणि हलकेच गोल फिरवायचे. जास्त नाही. हे जाडच राहिले पाहिजे. आणि त्यावर लगेच वाफ नीट लागण्यासाठी झाकण उलटे ठेवायचे. दोन मिनिटांनी झाकण काढले कि आंबोळी फुगून तयार असेल. चांगली जाळीदेखील पडली असेल. (आम्ही उलट्या बाजूने नाही भाजत) ती पलाटणीने तशीच काढायची आणि घट्ट रसात बुडवायची. हाताने पातळसर रसात जरा भिजवून लगेच खोलगट थाळीमधे ठेवायची आणि त्यात दुसरा जाडसर रस ओतायचा आणि मस्त आस्वाद घ्यायचा खापरोळी रसाचा! 😋❤️🥥


एक खापरोळी रसात बुडवलेली खाल्ली तरी पोट भरून जाते. रस जरा जास्त प्याला कि छान सुस्ती येते बरे का! 😛


#खापरोळी #khaproli #kokani #food #marathifood #soul_food #tasty

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर



















No comments:

Post a Comment