Tuesday, June 14, 2022

अनसा_फणसाची_भाजी 🍍 आणि फणसाच्या आठल्या आणि ग-यांची भाजी ❤️ (अंसा_फनसाची आमटी)

 #अनसा_फणसाची_भाजी 🍍 आणि

फणसाच्या आठल्या आणि ग-यांची भाजी ❤️

(अंसा_फनसाची आमटी)


वटपोर्णिमेच्या पुजेच्या दिवशी अन् आदल्या दिवशी कापा-बरका फणसाने आणि निरनिराळ्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून येणा-या आंब्यांनी अख्खा बाजार भरलेला असतो. मुख्यत: कापा फणसाचे ढीग घेऊन बायका बसलेल्या असतात. पुजेसाठी लागणा-या पाच फळांमधे फणसाचे गरे आणि आंबेदेखील असतात. म्हणून ह्या मे-जून दोन महिन्यात खास अनसा_फणसाची भाजी करायची मज्जा असते... मामाकडून आलेला फणस मम्मीने पाठवून दिला आणि छान अननस देखील मिळाला. वटपौर्णिमा साठी आणलेले पिकलेले गोड दशहरी आंबेदेखील होते. थोडे गोड चवीचे रसाळ आंबे, अर्धपिक्का आंबट गोड अननस, कापा फणसाचे रसरशीत गरे ह्या भाजीला योग्य असतात.


आंबट-तिखट-गोड अशा मिश्र चवीची अशी ही पारंपरिक भाजी ह्या मौसमात अनेकजणी बनवतात. अनसा_फणसाची भाजी ही तशी सारस्वतांची खासियत हे ऐकून होतेच. जेव्हा ह्या भाजीविषयी सई कोरान्ने ह्यांच्या पंगत पुस्तकात वाचले होते तेव्हापासूनच कधी एकदा करते असे झाले होते. पण ही पुस्तकाप्रमाणे तंतोतंत केली नाहीए. ह्या भाजीचे उपवासाची आणि नेहमीची अशी दोन्ही प्रकार आम्ही बनवले. (मुख्य पाककृती मधे धणा जीरा, कोथिंबीर, चिंचेचा कोळ किंवा काजू पाकळी वापरत नाहीत.)


अनसा_फणसाची भाजीला लागणारे साहित्य:

१. एक वाटी अननस मध्यम फोडी करून

२. एक वाटी आंबा लहान फोडी करून आणि साले पिळून काढलेला आंब्याचा रस

३. फणसाचे गरे उभे तुकडे करून

४. मोहरी

५. खवलेले ताजे खोबरे

६. काळमिरे दहा-बारा

७. हिंग

८. बारीक चिरलेली कोथिंबीर

९. उभी चिर पाडून हिरव्या मिरच्या/ किंवा दोन सुक्या बेडगी मिरच्या

१०. रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर

११. गुळ

१२. मीठ

१३. चिंचेचा कोळ (अननसाला थोडाही आंबटपणा नसल्यास)

१४. सेलम हळद पावडर आणि धणा-जीरा पावडर

१५. काजू पाकळी तुपावर लालसर करून

१६. खोबरेल तेल 


 • एका कढईत खोबरेल तेल घालून मोहरी तडतडवली. त्यातच जरासे हिंग आणि उभी चिर दिलेल्या हिरव्या मिरच्या परतल्या. लाल सुक्या मिरच्याही छान चव देतात. 

 • लगेचच अननसाच्या फोडी परतल्या. हळद, मीठ, धणा जीरा पुड, काश्मिरी मिरची पावडर घालून परतल्या. गुळ घातला. आणि फणसाचे तुकडे घातले. एक वाफ काढली.

 • खवलेले खोबरे, काळे मिरे बारीक वाटून घेतले. हे मिश्रण भाजीत घातले. थोडा वेळ परतून मग आंब्याचे काप आणि रस घालून एकत्र केले. थोड्या काजूच्या तुपावर परतलेल्या पाकळ्या घातल्या. आणि जरासा चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर घालून एक वाफ घेतली. छान दरवळ उठला होता. 

अनसा-फणसाची भाजी तय्यार झाली. घडीच्या मऊसुत पोळ्या किंवा भातासोबत अगदी चविष्ट लागते. मला तर नुसती खायलाही आवडते.


--------------------------------------------------------------


आता फणसाचे गरे वापरून झाले मग उरलेल्या फणसाच्या आठल्यांची केलेल्या भाजी ची पाककृती:


 • फणसाच्या आठल्या स्वच्छ धुवून त्यात थोडे पाणी आणि मीठ घालून उकडवून घेतल्या. थंड झाल्यावर वरचे सहज निघणारे आवरण काढून, आठल्याना जरासे चेचले.


 • खवलेले ताजे खोबरे, आल्याचा तुकडा, जीरे, जरासे धणे (उपवासासाठी नसल्यास टाकतो), थोडी काळेमिरी असे पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घेतले. अगदीच बारीक केले नाही.


 • कढईत खोबरेल तेल घालून त्यात जीरे तडतडवले. मुहाना ची वेगवेगळी उत्पादने मागवली होती. त्यात सुरेख असे खोबरेल तेल होते ते वापरले. आठल्या जरा पोटाला बाधू शकतात म्हणून जरासे हिंग, उभी चिर पाडलेल्या मिरच्या असे सर्व तेलात परतावे. लगेचच खोब-याचे बनवलेले वाटण टाकून परतले. जरासा गुळ, मीठ घालून मिक्स केले. आणि चेचलेल्या आठल्या  टाकल्या. आणि छान परतून, झाकणावर थोडेसे पाणी टाकून दहा ते पंधरा मिनिटे वाफेवर ठेवली भाजी.


 • झाकण काढून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मला आवडतो म्हणून जरासा लिंबाचा रस आणि फणसाचे सोललेले गरे टाकून पाच मिनीटे वाफ दिली. 


चमचमीत भाजी तय्यार झाली. ❤️


फणसाच्या अजूनही ब-याच पाककृती आधीच्या पोस्टमधे आहेत. त्याची लिंक खाली दिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10222639461149233&id=1053839802


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


















अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com



No comments:

Post a Comment