Saturday, June 4, 2022

रूचकर_सांबार, लुशलुशीत इडली व पांढरी, लाल, हिरवी अशा तीन प्रकारच्या सोप्या चटण्या

इडली is ❤️

रूचकर_सांबार, लुशलुशीत इडली व पांढरी, लाल, हिरवी अशा तीन प्रकारच्या सोप्या चटण्या:

लुसलुशित शुभ्र इडली, नारळाची सुरेख पांढरी चटणी, पुदिना कोथिंबीर ची तडका दिलेली हिरवी चटणी, लाल अख्ख्या काश्मिरी बेडगी मिरच्यांची खोबरे अन् उडदाची डाळ टाकून बनवलेली लाल चटणी आणि चविष्ट असे मिश्र भाज्यांचे सांबार हा मेनू पण कधीतरी रोजच्या जेवणापेक्षा वेगळे म्हणून बनवू शकता. मस्त सौम्य चव आणि दरवळता वास नक्कीच सगळ्यांना आवडतो.

चमचमीत सांबार:
एक वाटी तुर डाळ एक तास भिजवा व हळद, हिंग जरासे तेल घालून कुकरला पाच ते सहा शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या व बाजूला ठेवा.
मोठ्या कढईत तेल गरम करा व हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता व जराशी उडीद डाळचा तडका दया. मोठा चौकोनी कापलेला कांदा टाकून परतून घ्या. त्यात मीठ, थोडासा गुळ व लक्ष्मी मसालेचा सांबार मसाला घालून छानपैकी मिक्स करून घ्या.

आता वांग्याचे उभे काप, शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, दुधीचे काप, आवडत असल्यास बटाट्याचे व लाल भोपळ्याचे काप, गाजरचे तुकडे अशा सगळ्या भाज्या व टाॅमेटोच्या कापा घालून व्यवस्थित मिसळा. एकदा चांगले परतून मग शिजलेली तूरडाळ व गरम पाणी घालावे. आंबटपणासाठी थोडा चिंचेचा कोळ घाला. कोथिंबीर चिरून टाका. भाज्यांना उकळी आणून व्यवस्थित शिजू दया.

तडकापात्रात तेल गरम करा. हिंग, मोहरी, जीरे, बोर मिरची किंवा काश्मिरी मिरची व कढीपत्ता ची फोडणी बनवा व मस्त सांबार वर तडका द्या. झाला चविष्ट सांबार तयार!

इडली:
 • इडली बनवण्यासाठी आदल्या रात्री दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ एकत्र किंवा वेगवेगळी भिजवा. (प्रमाण: २:१). अर्धा चमचा मेथी तांदूळसोबत भिजवा. साधारणपणे पाच तास भिजवा. मग एक वाटी पोहे धुवून ह्यात मिसळा.
 • थोडेसे पाणी घालून थोडी भिजवलेली उडद डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या व त्यातच थोडा भिजलेला तांदूळ टाकून बंद-चालू करत मिक्सर फिरवत वाटून घ्या. अशा पध्दतीने सगळे मिश्रण वाटून घ्या व चमच्याने सारे एकजीव करा. एका मोठ्या भांड्यात वरती झाकण ठेवून पीठ  येण्यासाठी ठेवा. एखादा कांदा फोडून पीठात टाकून झाकून ठेवा.

सकाळी पीठ छान वर आले असेल ते व्यवस्थित ढवळावे व मीठ घालावे व इडलीपात्रात साच्यांना तेल लावून, इडलीपात्र किंवा कुकरची शिटी काढून कुकरमध्ये, पात्र ठेवून इडली वाफवून घ्याव्यात. मस्त हलक्याफुलक्या लुसलूशीत इडल्या होतात.

पांढरी चटणी:
खवलेला नारळ, एखादी मिरची, जीरे, साखर, मीठ, पाणी मिक्सरमध्ये वाटून घ्या. तडकापात्रामधे तेल गरम करा व कढीपत्ता व हिंग मोहरी व बारीक चिरलेल्या मिरचीची फोडणी द्या. मस्त पांढरी चटणी तयार!

हिरवी चटणी:
कोथिंबीर, पुदिना, आले, लसूण, मिरची, लिंबाचा रस, दही, कढीपत्ता, मीठ, साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून चटणी बनवा व तडकापात्रात तेल गरम करून हिंग, मोहरी जीरे व कढीपत्ता चा तडका द्या.

लाल चटणी:
दोन अख्ख्या काश्मिरी मिरच्या व दोन बेडगी मिरच्या देठ काढून पाण्यात भिजवत ठेवा. थोडीशी उडीद डाळ तव्यावर तेल सोडून भाजून घ्या. मग उडीद डाळ, भिजवलेल्या मिरच्या, साखर, मीठ, लिंबाचा रस, खवलेला ओला नारळ आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करून चटणी बनवा आणि तापलेल्याे तेलावर छान कढीपत्ता, जराशी उडीद डाळ चा तडका द्या.

केळीच्या पानावर हे सारे वाढता आले तर अतिउत्तम...

तर असा हा रोजच्या पेक्षा काहीतरी निराळा जेवणाचा थाट नक्कीच घरच्यांना आवडेल बरे का! :)

#sounthindianspices #sambarmasala #chuteneys #idli









No comments:

Post a Comment