Sunday, July 10, 2022

तवसाचे घारगे किंवा मोठ्या काकडी चे घारगे 🥒🥒

तवसाचे घारगे किंवा मोठ्या काकडी चे घारगे 🥒🥒

पौष्टिक असा पारंपरिक पदार्थ!

कोल्हापुरच्या घरी आम्ही कोकणी पध्दतीने ओवसा/ओसा/वंसा पुजतो. हा घरोघरी परंपरागत वेगवेगळ्या पध्दतीने पुजला जातो. गौरी आवाहनच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खास पुजेसाठी घेतलेल्या सुपामधे नारळ, विड्याची पाच पाने आणि त्यावर सुकी फळे म्हणजे अक्रोड, खारीक, सुपारी, लेकूरवाळी हळद आणि बदाम मांडलेले, मोठ्या काकड्या (तवस), ओटीचे सामानातील बांगडी आणि हळद लावलेले दोरे असे सर्व रचले जाते. त्यावर हळदीकुंकू, फुले आणि अक्षतांनी पुजले जाते. त्या सुपावर पदर झाकून देवापुढे आणि गौरीपुढे ओवाळले जातात. शेवटच्या दिवशी सुपातील काकड्या किसून काकडीचे घारगे किंवा घेवदे बनवतात. 


जसे लाल भोपळ्याचे घारगे प्रकार कोकणात करतात तसेच गावरान काकड्यांचे घारगे देखील उत्तम लागतात. बनवण्यासाठी पध्दत सारखीच...


सोपे चविष्ट घारगे बघुया बनवतात कसे ते:

साहित्य: 

गावठी काकड्या: ४-५ नग (साले काढून खिसून)

देशी गुळ खिसलेला (जेवढा खिस तेवढाच गुळ आम्ही घेतो.)

चवीपुरते मीठ

गव्हाचे पीठ (काकडी आणि गुळ खिसात सामावेल इतके.)

हलकेच भाजलेल्या जी-याची पुड एक ते दीड चमचा

तांदूळ पीठ थोडेसे

घारगे बनवताना खिसलेली काकडी, मीठ,‌ जीरापुड आणि खिसलेला गुळ एकत्र‌ मिक्स करून काकडीचे सुटलेले पाणी जरा सुकेल इतपत गरम करून परतून घ्या.‌ आणि साधारण थंड झाले की मस्त पुरीच्या पीठाच्या consistency पेक्षा थोडे पातळसर पीठ होईल अशा‌ बेताने त्यात गव्हाचे‌ पीठ मिक्स करा. एकजीव मळून पीठ तयार करा. थोडे लिबलिबीत राहते हे खरे... (तांदळाचे पीठ थोडेसे वापरू शकता.)

आता तेल गरम करा. आणि कर्दळी किंवा केळीच्या पानावर तेल लावून, घारगे थापून तेलात सोडायचे. पातळ थापले असता घारगे टम्म फुगत नाहीत. आम्ही जरा जाडसर थापतो‌ त्यामुळे घारगे टम्म फुगतात. ह्यांना करण्यासाठी सरावाची गरज लागते. सरावाने छान जमतात.

काळ्या वाटाण्याच्या उसळी सोबत घारगे खातात. छान लागतात. नक्की करुन पहा. 

#घारगे #gharage #gharge #cucumber_recipes #kokani_food #traditional_recipes












No comments:

Post a Comment