Saturday, January 22, 2022

ओले_काजूगर_अंडे_रस्सा 🥚🍳

 #ओले_काजूगर_अंडे_रस्सा

#काजी_कवठाचा_रस्सा

🍳❤️🥘 #ओल्याकाजूगराचीजादू

लग्न होईपर्यंत ओल्या काजूगरांशी कधी खास संबंधच आला नाही. कारण आम्हाला फक्त सुके काजूगर, खारवलेले काजूगर किंवा आपला काजू एवढेच माहीत... म्हणजे आमच्याही वाडीत काजूची झाडे आहेत आणि आमच्या पट्टयातही भरपुर काजू मिळतात. मथाण्याला मायगावड्याच्या निसर्गरम्य समुद्रालगत असलेल्या वानवडीमधे लहानपणी आम्ही जायचो. वानवडी निरनिराळ्या मोठाल्या चिंचा, नारळ, फणस, केळी आणि अजुनही अनेक झाडांनी हिरवीगार असे. त्यात उन्हाळ्यात मस्त काजूच्या झाडांना निरनिराळ्या छटेचे, मोहक लाल, पिवळे, हिरवे, नारिंगी, तपकिरी छटेचे काजू लगडलेले असत. रंग अणि छटा इतक्या त-हेत-हेच्या कि पाहतच राहावे. आणि मंद मादक असा काजूचा सुगंध अगदी जवळ गेलो तरी मोहवायचा. पण काजू खाल्ले कि पोटात दुखते हा गैरसमज असल्याने काजू खायचे धाडस केले नाही. काजू गर पक्व झाल्यावर चुलीत खरपुस भाजून कधीमधी खाल्लेले आठवतात पण ओल्या काजूगराची जादुई चव, लग्नानंतर आईने पहिल्यांदा जेव्हा उकडलेली अंडी आणि काजूगराची उसळ बनवली तेव्हा कळली.


ओले काजूगर कोकणी माणसासाठी कित्ती कित्ती खास असतात हेदेखिल आईला बघून कळले. विरारच्या बाजारात हिरवेगार काजूगर घेऊन बायका यायच्या.‌ आई ते आणायची आणि घरात मदत करायला बाई असायची तिच्यासोबत बसून बारीक कोयता आणि सुरीने गर मोकळा करायची. हाताला तेल लावले असले तरी आग आग होत असणार चिकाने तरी चिकटीने गर काढायच्या. कधी हाताला चटक्यासारखे काळपट डाग पडायचे. मग टोपलीभर काजू बियातून अगदी थोडेच काय ते काजूगर मिळाले तरी चेह-यावरचे भाव आनंदी असायचे. आचिर्णेला तिच्या गावी, तिच्या लहानपणी प्रेमळ गडीमाणसे कशी काजी काढून द्यायची ते आवर्जून आठवायची आणि रमत-गमत सांगताना आई नकळत आचिर्ण्याला भोज्जा लावून यायची. असा तो काजूगर कोकणींना प्रिय! ह्यावेळी मात्र नेहा म्हणून रत्नागिरी ला राहणा-या मुलीकडून हे मोठाले, टप्पोरे ओले काजूगर कुरिअर मागवले. आणि आता पाककृतींची सुरवात झालेय घरात...


साहित्य पहा काय लागते,

 • पाच उकडलेली अंडी (गॅसवर एक भांडे भरुन पाणी ठेवा. मीठ टाका आणि अंडी १५ मिनिटे उकडत ठेवा.)

 • ओले काजूगर एक ते दिड  मोठी वाटी

 • एक मोठा कांदा बारीक चिरलेला

 • आलेलसूण पेस्ट एक चमचा

 • कांदा-खोबरे वाटण

 • कोल्हापूरी कांदालसूण मसाला किंवा रोजच्या वापराचा मसाला

 • चवीपुरते मीठ

 • कोथिंबीर बारीक चिरलेली


*कांदा-खोबरे वाटण:

हे वाटण बहुतांशी कोल्हापुर किंवा कोकणात वेगवेगळ्या पदार्थांत वापरले जाते. चार पाच कांदे चिरा. आणि एक ओला नारळ फोडून खवून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा परतून घ्या आणि खवलेले खोबरे घाला. अगदी छान खरपुस भाजुन घ्या. थंड करून डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. दोन तीन महिने आरामात राहते. हवे तसे काढून घ्या आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्या.


काजू-अंड्याचा रस्सा बनवायला, 

१. काजूगर पाण्याने धुऊन, गरम पाण्यात एक उकळी येईपर्यंत उकळवा. थोड्या वेळाने साले काढता येतील. ती स्वच्छ काढून घ्या.

२. एका कढईमध्ये तेल गरम करा. बारीक चिरलेला कांदा छान गुलाबीसर परतून घ्या. चवीनुसार मीठ, आलेलसूण वाटण टाकून परता. थोडे शिजू द्या. (टाॅमेटो आणि मिरची आवडत असल्यास वापरू शकता. मुळ पाककृती मधे वापरत नाहीत.)

३. आता बारीक गंधगोळ वाटलेले कांदा-खोबरे वाटण टाका. चवीनुसार कोल्हापूरी कांदा लसूण किंवा रोजच्या वापरातील  मसाला टाका. चिरलेली कोथिंबीर टाका. अगदी नीट मिक्स करा, नावाला पाणी ओता आणि उकळी घ्या. 

४. आता काजूगर रस्स्यात सोडा. अंड्यांना टुथपिक ने टोचा किंवा अर्ध्या भागातून चिर पाडा. आणि ही अंडीपण रस्स्यामधे सोडा. परत थोडावेळ शिजवून घ्या. आणि कोथिंबीर टाकून गार्निश करा. वाफाळता भात, वरण, भाकरी किंवा चपाती सोबत मस्त ओल्या काजूगर- अंड्याच्या भाजीचा आनंद घ्या. 

खुप छान लागते चवीला. फक्त काजू गरम पडतात म्हणून मोजकेच खा. आणि हो अंडी पण जर गावठी मिळाली ना तर मग भाजीच्या चवीच्या चवीला अजूनच चार चांद लागतील.


नक्की करून पहा. ❤️🌿


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com


#काजी_कवठाची_भाजी #अंडे_ओले_काजूगर_उसळ #ओले_काजूगर #kajugar #cashewnuts #preparation #food #kokan

#egg_curry #authentic #egg_recipes











No comments:

Post a Comment