Friday, January 21, 2022

सुक्या_मासळीचे_त-हेत-हेचे _प्रकार_असलेली_थाळी

 #सुक्या_मासळीचे_त-हेत-हेचे _प्रकार_असलेली_थाळी

🦐🐟❤️🌿

समुद्र किनारी वसलेल्या आमच्या एडवण गावी ताज्या मासोळ्यांबरोबरच उत्कृष्ट दर्जाची सुकी मच्छी मावरे मिळते. समुद्रकिनारी मस्त बोंबिल आणि अन्य मासे खाऱ्या वाऱ्यावर उन्हात सुकण्यासाठी ओलाणीवर रांगेत टांगलेले दिसतात. सोडे बनवण्यासाठी कोलंबी आणि करंदी, जवळा ठिकठिकाणी जमिनीवर पसरतात.


सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा  घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही, कारण एक प्रकारचा वास येतो. पण ताज्या असल्या तर जेवण बनवल्यानंतर अजिबात दर्प येत नाही. दर्जेदार सुकी मासळी ही खात्रीलायक कोळीणींकडूनच घ्या. 


भाकरी, गुरगुटा मऊसर भात, चिंचेचे सार, बटाटा किंवा वांगी घालून केलेली सुकी मच्छीची रस्सा भाजी, कांद्यात करपवून केलेल्या बोंबील किंवा सुकटीची सुकी भाजी आणि सुक्या बोंबलाचा ठेचा, कोलीम किंवा बोंबलाचे लोणचे आणि सफेद कांदा यांचा समावेश परिपुर्ण चविष्ट आणि so called flavour packed थाळी बनवतो.  मस्त पावसाळी वातावरणात हे सुक्या मास्यांचे पदार्थ जणू अजूनच चटकदार लागतात. 


आम्ही वाडवळ म्हणजे सोमवंशीय क्षत्रिय पाचकळशी ज्ञाती समाजाचे... हा समाज मुंबई पासून डहाणू पुढपर्यत विस्तारला आहे. खाण्यापिण्याच्या सवयीबाबत चोख आणि चवीने खाणारे म्हणून वाडवळ प्रसिद्ध! बहुतांशी वाडवळ सामिष खातात. बागायती आणि शेतीवाडी बाळगून असलेल्या वाडवळांची खाद्यसंस्कृतीदेखील खुप चविष्ट आणि समृध्द आहे. निरनिराळ्या शाकाहारी आणि मांसाहारी तसेच फराळी पदार्थांचा उत्कृष्ट खजिना‌ वाडवळी सुगरणींनी जोपासला आहे. वसई, आगाशी, बोर्डी, केळवा-माहिम, चिंचणी कडील महिलांचा वाडवळी पाककृती बनवण्यात विशेष हातखंडा मानला जातो.

तर ह्या पाककृती ह्या पट्टयापट्टयानुसार थोड्याबहूत फरकाने बदलणा-या...आम्ही सफाळे-केळवा परिसरात मोडणारे. आज मी जराश्या आमच्या भागातल्या आणि घरच्या पध्द्तीच्या वाडवळी पध्द्तीने बनवली जाणारी सुकी मासळी च्या रेसिपी देत आहे. आवडेल अशी अपेक्षा आहे. 


तसेच मुळातच कोकम (आमसुले) किंवा लिंबाच्या तुलनेत आम्हा वाडवळांच्या जेवणात चिंचेचा वापर जास्त केला जातो. माकूणसार, शिरगाव, अलिबाग भागात छान मीठाचे खडे लावून बनवलेले काळ्या उत्कृष्ट दर्जाची, चिंचोके आणि दोरे काढून साफ केलेली चिंच मिळते. 

पुर्वीच्या काळी कोठीच्या म्हणजेच साठवणूकीच्या अंधा-या खोलीत मोठेमोठे मातीचे घडे असत त्यात हे चिंचेचे गोळे वर्षभरासाठी भरून ठेवले जात. लहानपणी गुरगुट्या गाभुळलेल्या चिंचा खायला मज्जा यायची, मोठे होत गेलो तसे चिंचेचा एक चिंचकढी सोडली तर फारसा संबंध राहीला नाही. ह्या चिंचकढी म्हणजे साराची पाककृती सुध्दा समाविष्ट केली आहे.


चला मग आज बनवूया सुक्या मच्छीची परिपुर्ण थाळी! :)


1. पदार्थ १: सुके बोंबिल/ करंदी (सुकट)- वांगी- बटाटा रस्सा! 


चला पाहूया ही साधासोपी भाजी! 


काय साहित्य लागते ते पाहू,

दोन मोठे कांदे (बारीक चिरून)

आलेलसूण-मिरची पेस्ट दीड चमचा (आवणीच्या गडबडीत ही पेस्ट बहुदा नाही घालत...तरी भाजी चमचमीत लागते )

सुके बोंबिल १० नग (साफ केलेले आणि एका बोंबिलाचे तीन आडवे तुकडे )

तीन बटाटे (सालासकट बारीक चौकोनी तुकडे)

चार वांगी (बारीक फोडी)

कोथिंबीर बारीक चिरलेली


घरचा रोजचा मसाला २-३ चमचे अंदाजाने 

बेडगी मिरची पावडर एक चमचा

चवीपुरते मीठ

अर्धा चमचा सेलम हळद पावडर

चिंचेच्या कोळाचे पाणी एक वाटी


ही भाजी मस्त चुलीवर मोठ्या प्रमाणात बनवतात. चुलीवर बनवल्यामुळे खुप चविष्ट लागते. 


येथे आपण सोयिस्करपणे कुकरमध्ये बनवले आहे.

कुकर गरम करून घ्या. तेल ओता. मग बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त गुलाबीसर परतुन घ्या. आलेलसूण-मिरची पेस्ट घालून परता. आता घरचा रोजचा मसाला, मीठ, सेलम हळद, बेडगी मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. 


मग कापलेला बटाटा, वांगी, सुक्या बोंबलाचे तुकडे टाकून परतून घ्या. चिंचेच्या कोळाचे पाणी एक वाटी घालून अजून थोडे पाणी वरून ओता. थोडीशी कोथिंबीर टाकून, कुकरचे झाकण घालून एक शिटी घ्या. थोडीशी आंबट-तिखट अशी सुके बोंबिल- वांगी- बटाटा रस्सा भाजी तय्यार!


नुस्ता बोंबिल बटाटा रस्सा भाजी पण अफलातून लागते. चिंचेच्या जागी आमसुले म्हणजे कोकम टाकू शकता. खारवलेली कैरीदेखिल छान लागते.


तसेच ह्या रस्सामधे बोंबिलासोबत सुकट टाकून combination मधे बनवू शकता किंवा नुसती सुकटदेखिल टाकून बनवू शकता. शक्यतो सुकट टाकली तर विशेष साफ न करताच टाकतात. कारण इतके बारीक किचकट काम करायला वेळ नसतो आणि अख्खी टाकली तरी विशेष फरक पडत नाही.


------------------------------------------------------------


२. पदार्थ २: मांसाहारी ठेचा प्रकार : सुक्या बोंबलाचा ठेचा


हा साधासोपा सुक्या बोंबलाचा ठेचा बनवतात कसा... 

आपल्याला लागणार आहेत दहा सुके बोंबिल, पाच तिखट हिरव्या मिरच्या, दहा बारा लसूण पाकळ्या, मीठ, आवडत असल्यास लिंबाचा रस.


बोंबील गॅसवर किंवा चुलीमधे अगदी खरपुस आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. थंड झाल्यावर मधोमध चिरुन काटा काढून टाका. हातानेच तोडत बोंबलाचे लहान लहान तुकडे करा. आता मोठ्या खलबत्त्यात किंवा पाटा वरवंटयामधे बोंबलाचे तुकडे, मिरच्यांचे तुकडे, लसुण पाकळ्या, लिंबू रस, मीठ सारे टाकून बारीक सर ठेचून घ्या. वरवंटा वैगरे नसल्यास हलकेच मिक्सरमध्ये फिरवा. 


अफलातून चवीचा हा सुक्या बोंबलाचा ठेचा तांदळाची भाकरी, वाफाळता भात आणि साधी रस्सा भाजी बरोबर अप्रतिम लागतो.


------------------------------------------------------------


३.पदार्थ ३: सुके बोंबिल/ करंदी (सुकट) + कांदा परतवून‌ केलेली सुकी भाजी


साहित्य:

सुके बोंबिल १० नग (साफ केलेले आणि एका बोंबिलाचे तीन आडवे तुकडे ) किंवा एक वाटीभर साफ केलेली करंदी/ सुकट

बारीक चिरलेले पाच/ सहा कांदे

उपलब्ध असल्यास बारीक चिरलेला ऊळपात पातीचा कांदा

आले-लसूण-मिरची वाटण अर्धी वाटी

बारीक चिरलेली कोथिंबीर

हळद

चवीपुरते मीठ

लिंबूरस आवडत असल्यास


पॅनमधे तेल जास्तीचे घाला. गरम झाले की, बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त गुलाबीसर परतुन घ्या. आलेलसूण-मिरची पेस्ट घालून परता. आता घरचा रोजचा मसाला, मीठ, सेलम हळद, बेडगी मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. 


साफ केलेल्या सुक्या बोंबलाचे तुकडे किंवा धुवून साफ केलेली करंदी टाकून परतून मिक्स करा. मस्त बराच वेळ वरखाली करत शिजवा. काळसर होऊन शिजले कि सुकी भाजी तयार! 

आवडत असल्यास लिंबाचा रस टाका आणि कोथिंबीर भुरभुरावा. :)


------------------------------------------------------------


४. पदार्थ ४: तांदूळाची भाकरी: 


ही भाकरी साध्या unpolished रत्ना तांदूळाला किंवा कणीला बारीक भरडून केलेल्या पिठाची असते.

पीठात flowing consistency मिळेल इतपत पाणी आणि मीठ घालून पीठ मस्त मळतात. मग मोठ्या तव्यावर खोलगट चमच्याने पीठ टाकून गोलाकार मोठा पसरवत जातात. वरुन एक मिनिटाकरता झाकण ठेवून लगेच झाकण काढल्यावर भाकरी कालथ्याने काढली कि तयार. काही जणी तर हातानेच गरम तव्यावर लयबध्द् गोल फिरवत भाकरी बनवतात.


:) थोडीशी Crispy आणि मऊ असते मस्त.


------------------------------------------------------------


५. पदार्थ ५: चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार 

(आमच्या घरी चिंचेची 'अमृती' म्हणून देखील संबोधले जाते.)

ही चिंचकढी दोन पध्द्तीने बनवतात. एक कच्चे चिंचेचे सार आणि दुसरी उकळी आणून कढवलेली चिंचेची कढी. विरार आगाशी आणि वसई पट्ट्यातील काही वाडवळ महिला अप्रतिम अशी चिंचकढी करण्यात माहिर आहेत. आपण आज उकळी देऊन केलेली चिंचकढी पाहणार आहोत. नंतर लवकरच कच्च्या साराची रेसिपी देते. चिंचकढी आणि मऊसर भाताचा पहिलाच घास, मनाला एडवणच्या घरी अलवार पोहोचवतो. माझी सुगरण मामी उत्तम चिंचकढी बनवते म्हणून ही रेसिपी तिच्याकडून खास घेतली आहे. ढोबळमानाने अशी पध्द्त थोड्याबहुत फरकाने वापरली जाते.


चिंचकढीसाठी आपल्याला खालील साहित्य लागते:

मुठभर आंबट चिंचेच्या कोळाचे पाणी

पातळ उभा लांबट चिरलेला कांदा

कढीपत्ता

दोन-तीन बारीक चिरलेल्या मिरच्या

आलेलसूण पेस्ट

थोडासा गुळ

चवीपुरते मीठ

जराशी साखर

बारीक चिरलेली कोथिंबीर

सेलम हळद पावडर


बारीक उभा चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, मीठ एका भांड्यात घेऊन जोर लावून कुस्करावे.

एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यामधे तेल गरम  करा. लगेचच अगदी थोड्याशा राई जीरा-हिंगाची फोडणी करा. त्यात हे कुस्करलेले मिश्रण आणि आले-लसूण परतवा, थोडेसे शिजवा आणि चिंचेचे पाणी आणि गुळ टाका. 

मस्त उकळी येऊ द्या आणि बघा ही चटपटीत चिंचकढी झालीसुध्दा तय्यार.


काहीवेळा आमच्याकडील वाडवळी लग्नातील तिखटजेवणावेळी सुक्के चिकन, मटण रस्सा, चिकन तंदूरी, भातासोबत चिंचकढी ठेवतात. सुके मासे वापरून केलेल्या पदार्थांनाही चिंचकढी उत्तम चविष्ट साथ देते.

तुम्हीदेखील सहज म्हणून करून खाऊन पहाच! :) 


------------------------------------------------------------


६. पदार्थ ६:

सुक्या मासळीचे लोणचे (कोलीम/ सुका बोंबील)


हे तिखटसर झणझणीत बनवतात. लोणच्यावर वरती नेहमी तेल ठेवतात. मुरलेल्या लोणच्यातील तेलही फार मस्त लागते भातावर. व्यवस्थित भरले तर वर्षं भर उत्तम राहते.


८-१० सुके बोंबील साफ करून एकाचे तीन ते चार अशाप्रकारे तुकडे करून घ्या. चांगले तेल तापवून त्यात खरपुस तळून घ्या. त्याच तेलात बारीक चिरलेली एक वाटी तिखट मिरची, बारीक चिरलेला लसूण, चवीपुरते मीठ, हळद, तिखट मिरची पावडर, जरासा लोणचे मसाला आणि लिंबू रस घालून तळा. त्यात आधीच तळलेले बोंबिल तुकडे घालून परता.  तयार मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. वरती तेल नेहमी असू द्या.

आणि आठवडाभर मुरवत ठेवा. आणि नंतर तोंडी लावायला घ्या.

अगदी सारख्या पध्दतीने अतिशय बारीक अशी करंदी, जवळा म्हणजे कोलीमचे लोणचे बनवू शकता.

चला तर मग कधीतरी बनवून पहा स्पेशल सुकी मच्छी थाळी! :)

#edwan #fish #bombay_duck #dry_prawns

#rain #monsoon #food #marathi #vadval #nonveg_pickle

#tamarind #tamarind_saar #dryfish #fish_recipes #tamarind_indianfood #food #indianfood #maharashtrian_food #chinch #chinchkadhi


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर






























No comments:

Post a Comment