Friday, May 4, 2018

उन्हाळा आणि मुरवलेल्या चटपटीत कैरीच्या लोणच्याची परंपरा! :) Pickled Memories! :)


"तायडे! तू ये वाड्याला रहायला, तुझ्यासाठी मी तुला आवडते तशी आंब्याच्या लोणच्याची बरणी ठेवलेय भरून मुरवत..." आज्जीचा फोनवरचे तिच्याकडे वाडयाला लवकर जावे म्हणून जिव्हाळयाचे आमिष असायचे हे... ;) आज्जू अगदी हातोहात सहजतेने कितीतरी प्रकारची, सगळ्यांच्या आवडीची लोणची बनवायची... अंदाजे मोजमापे तरी किती अचूक!
मथाण्याच्या मामाकडच्या दोन्ही मामी देखिल तशाच वेगवेगळ्या चवींची सुरेख लोणची भरायच्या. चूलीवरच्या गरमागरम भाकरी, वाफाळता चहा, काळेमिरे पुड भिरभिरवलेले अंडे आणि मामीने बनवलेले लोणचे जबरी नाश्त्याची गंमत होती. आमची मम्मी व्यवसायानिमित्त दिवसाला शंभर दिडशे किलो लोणची तिच्या सहेली उत्पादनसाठी सहज बनवते. शाकहारी असो वा मांसाहारी, लोणची असतात तिची भन्नाट... आणि मी, सोना आणि बाबा यांच्या प्रत्येकासाठीदेखिल तितक्याच आवडीने वेगळी आंब्याची लोणची ती भरायची आणि आम्हा दोघींसाठी हाॅस्टेलला पाठवायची. घरापासून लांब असताना घरच्या लोणच्याच्या फोडीची गोडी अजूनच अविट लागायची.
विरार मम्मीदेखिल गुळाच्या पाकातील झटपट गोड व चविष्ट लोणची वरचेवर बनवते.

तर असे हे लोणचेपुराण.... एका फोडीबरोबर अनेक वर्षाच्या अनेक मुरलेल्या आठवणींना परत ताजे करून गेले.... :)
लोणचे भरलेच शेवटी... चिनीमातीच्या टिपीकल बरण्या आणि बाहेरदेशातून जपून लगेजमधून न फोडता आणलेल्या सुरेख घाटाच्या काचेच्या जाम ठेवण्यास वापरतात त्या बरण्यांमधून भरून ठेवले.

तर मग असा हा मस्त (?) उन्हाळा सुरु झाला अन् बाजारात निरनिराळ्या कैऱ्या दिसायला लागल्या. हिरव्यागार तांबूस पिवळसर झाक असलेली कैरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी आणते. तयार आंबेदेखिल बाजारात हजेरी लावत आहेत. लोणच्याचे आंबे, भोकराची फळे आणि त्याच्या हव्या तशा फोडी करून देणा-या कापावाल्यांचे छान ठेले सजले आहेत. कितीतरी प्रकारचे लहानमोठ्या आकाराचे राजापूरी, तोतापूरी, ढोबा, दशेरी सारख्या आंब्याच्या कैरी हारीने मांडलेल्या दिसतात. किलोवारी आवडीचे आंबे निवडून हवे असल्यास लगेचच भल्यामोठया कोयत्यासारख्या सु-याने लयबद्ध फाटफाट आवाज करून सराईतपणे कापून मिळतात.

एकदा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं तयार करणं कुणालाही नक्कीच आवडेल. आंब्याचे-कैरीचे लोणचे घालायची प्रत्येकची स्वतःची किंवा घराण्याची अशी एक खास पध्द्त असते. आणि हे लोणचेदेखिल अनेक प्रकारे भरता येते, तिखट, आंबट, गोड, मोहरीमय किंवा खिसून चुंदा अथवा लवंगा केशरात मुरलेला गोडगोड मुरांबा... :)
कधीही जेवणात चटपटीत लोणच्याची फोड लज्जत आणतं. लग्नाच्या वा कुठल्याही पंगतीत लोणच्याचा मान अढळ... अशाच झटपट होणाऱ्या कैरीच्या तिखट लोणच्याची महाराष्ट्रीयन स्टाईल रेसिपी देतोय तुमच्यासाठी ज्याची चटकदार काप जेवणाला अधिक रंगतदार बनवेल. अर्थातच आपला "लक्ष्मी मसाले एडवण पालघरचा तयार लोणचे मसाला वापरून! :)

कैरीचे तिखट लोणचे

साहित्य बघूया काय काय लागते:
साधारण एक किलो लोणच्याच्या कडक कैर्‍या, 200 ग्रॅम मीठ, 1 चमचा मेथीदाणे भरड (मेथी थोडीशी भाजून, मिक्सरमधून जाडसर भरडून घ्यावी), 2 चमचे लक्ष्मी सेलम हळद, १० ग्रॅम हिंग, 5-6 चमचे लक्ष्मी बेडगी मिरची पावडर, १00 ग्रॅम  राईगोळे/  राईडाळ, 200 ग्रॅम गुळ, तेल, 14-15 काळेमिरे, 4-5 लवंगा, 3-4 अख्ख्या रेशमपट्टा मिरच्या, 10 ग्रॅम बडीशेप, 3-4 छोटे दालचिनी तुकडे, चिमुटभर साखर, दोन टीस्पून लिंबू रस.

चला कृतीकडे वळूया:
कैरी स्वच्छ धुवून व नीट पुसून घ्या. पाण्याचा अगदी थोडाही अंश लागायला नको. कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात व त्यांना मीठ व हळद लावून ठेवावे. मीठ जरासे भाजून घ्यावे म्हणजे कैर्‍यांना फार पाणी सुटत नाही.

अर्धे  तेल एका पातेल्यात घालून त्यात हिंग, काळेमिरे, लवंग, दालचिनी, बडीशेप व मेथी भरड हलकिशी तळून घ्यावी. गुळ खिसून घालावा म्हणजे लवकर एकजीव होतो. पातेले खाली उतरवून त्यात लक्ष्मी बेडगी मिरची पावडर व लक्ष्मी तयार लोणचे मसाला, साखर, लिंबू रस घालून जरा हलवावे.
एव्हाना छान वास सुटला असेल. मोठया परातीत कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात, त्यावर गार झालेली लोणचे फोडणी ओतून लोणचे नीट कालवावे व बरणीत भरावे. झाकण घट्ट लावावे. हवे तर बरणीच्या तोंडाशी व झाकणाखाली एक बेताचे गोल कापलेले स्वच्छ फडके धाग्याने बांधावे. लोणच्याच्या फोडींवर तेल राहील इतके असावे. म्हणजे लोणचे खराब होत नाही. :)

नक्की बनवा व नविन रेसिपी आम्हाला देखिल पाठवा. :)

#pickles #mango_pickle #aajji_picklegift #lonachi #Maharashtrian_lonachi #themasalabazaar_spices #laxmimasale_edwan #saheliproducts_edwan



No comments:

Post a Comment