Friday, March 22, 2024

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold
























भारतीय मसाले: प्रकार १०:

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold

शिरा छान वाफेवर फुलत असताना, पितळेच्या भारदस्त ओखलीत (छोटा खलबत्ता), लगबगीने, लयबध्द आवाजात वेलदोडा खलत बसलेली आज्जी अगदी डोळ्यासमोर येते. ताज्या वेलची पुड ची मजाच वेगळी असायची. रोजच्या मसाल्यांच्या डब्याव्यतिरिक्त खास शाही आणि महागड्या मसाल्यांच्या डब्यात, पिशवीत बांधलेल्या लवंगा, शहाजीरे, जायवंत्री, जायफळ, तमालपत्रांच्या सोबतीला हिरवट- पिवळट वेलची असायची. गोड पदार्थ करताना डब्यातून मोजून वेलची बाहेर काढल्या जायच्या.

दुधात‌ साखर, चहा पावडर,‌ आले आणि हिरवी वेलची घालून छान उकळवून प्यालेला मसाला चहा अगदी चुटकीसरशी ताजेतवाने करून टाकतो. मोदकाच्या सारणाच्या प्रत्येक घासागणिक जाणवणा-या वेलचीच्या सौम्य चवीने देखील अगदी छान वाटते. हिरवी वेलची म्हणजे आपणा भारतीयांच्या स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या साबूत मसाल्यांमधील एक महत्त्वाचा जिन्नस. किंमतीमुळे महागड्या शाही मसाल्यांमधील एक. हिरव्या वेलचीला True cardamom, green cardamom, small cardamom, Queen of spices म्हटले जाते. केरळमध्ये परंपरागत वेलचीचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या केला जातोय. दक्षिण भारतात केरळात मोठाल्या बागायती आपल्या बघायला मिळतात. कर्नाटक, तामिळनाडू पट्ट्यात देखील लागवड होते. भारतात जरी केरळ हाच मुख्य उत्पादक असला. तरी जगभरात भारताच्याही पुढे, मध्य अमेरिकेतील Guatemala (ग्वाटेमला) हा देश प्रमुख आणि सगळ्यात जास्त उत्पादन करणारा आहे. आपल्या भारतात, मुंबईत देखील ग्वाटेमाला वेलची उपलब्ध आहे. ग्वाटेमाला वेलची आपल्या भारतीय वेलची पेक्षा गडद हिरव्या रंगाची आणि अव्वल दर्जाची वेलची आहे. ग्वाटेमाला मधे वेलची लागवड अगदी १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच झाली, तरीही उत्तम पोषक वातावरणाच्या आणि मेहनतीच्या जोरावर, भारतापेक्षा अव्वल उत्पादक म्हणून नावाजला गेला. भारत देखील इतर मसाल्यांसोबत मोठ्या प्रमाणात वेलचीची अरब देशात निर्यात करतो. 

वेलची भारतात निरनिराळे मसाले बनवणे, मिठाई, आम पन्ना (पन्हे) सारखी पेय, गोड पदार्थ, बिर्याणी- पुलाव सारखे कैक भाताचे प्रकार, मांस- मटण ह्यांची सिझनिंग तसेच शाही मसाले तडका ह्यामध्ये वापरतात. काही खास महाराष्ट्रीय पदार्थ, शाही मिठाई मधे वेलचीचा सुगंध आणि स्वाद पदार्थांचा स्वाद खुलवतो. तेलावर  मांसाहारी चिकन मटणाचे पदार्थ आणि बिर्याणी चा स्वाद‌ देखील वधारते.

वेलचीचा वापर नैराश्य असलेले आजार, पचनसंस्था संबंधित व्यथा ह्यासाठी देखील होतो. वेलचीचे चांदीचा वर्ख लावलेले दाणे, तोंडाची दुर्गंधी दुर करण्यास, जेवणानंतर चघळण्यासाठी देखील वापरले जातात. वेलचीचे आकर्षक असे गुंफलेले सुबक हार देवाला चढवले जातात. लग्नसमारंभात नवरा नवरीला घालण्यासाठी देखील हिरव्यागार वेलचीचे हार, हौशी मंडळी बनवून घेतात. फारच  छान दिसतात हे हार.

वेलची आवरणाचे पिवळसर, हिरवट, गडद हिरवी, पांढरट पिवळी असे रंग असतात. दर्जेदार वेलचीची बाजारातील प्रत ही वेलचीची रूंदी, आवरणाचा हिरवेगारपणा आणि भरलेला (single seed or double seed) दाणा ह्यावर आधारीत असतो. 5 mm, 6 mm, 7 mm, 8 mm, 8+ mm आणि त्याहून थोडी मोठी अशा वेलचीच्या प्रत आणि त्यानुसार रोज ठरणारे भाव असतात. त्यातही ७०-८०% भरलेला दाणा, हिरवा रंग असे मुद्दे महत्वाचे ठरतात. व्यापारी भाषेत, rejection cardamom म्हणजे लहान आकारातील, वरचे आवरण अर्धवट उघडलेले, अपरिपक्व खुडणी झालेल्या, थोड्याशा दुमडलेल्या आकार बिघडलेल्या, निरनिराळ्या आकारातील लहान मोठ्या वेलची यांचा समावेश असतो. हे rejection/ split cardamom, दळण्यासाठी वापरता येतात. वरचे आवरण सोलून मोकळा केलेला वेलची दाणा (single or double seed) हा वेलची पावडर करण्यास वापरतात. Per liter gram असे मोजमाप ह्या व्यवसायात महत्त्वाचे ठरते‌. एक लिटर द्रव्य पदार्थ ज्या मोजमापाच्या भांड्यात राहतो, त्या भांड्यात पुरेपूर भरून, ८ mm किंवा कोणत्याही विशिष्ट आकारातील किती नग वेलची राहतात ती संख्या म्हणजे Per liter gram. 

दक्षिण भारतातील काही प्रदेशात आणि प्रामुख्याने केरळात होणारी वेलची लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, डोंगर उतारावरील जमिन, सावली असलेली जागा आवश्यक असते.

हिरवी वेलचीचे झुडूप असते. झुडूपाच्या तळाशी/ बुडाशी येणा-या सरळ काड्यांना वेलचीची सुरेख पांढरी फुले येतात ज्यावर जांभळट छटा असते. ह्या फुलांचे वेलची मधे रूपांतर होते. एका काडीवरील, सर्व वेलची एकदाच पक्व न होता, टप्प्याटप्प्याने तयार होत जातात. वेलची खुडण्यासाठी अनुभवी कामगार लागतात. कारण काढणीवेळी, खुडण्यासाठी कोणती वेलची योग्य आहे ते कळणे आवश्यक असते. खुडताना पण नखांनी वेलदोडा अलगद वेगळा करावा लागतो, जेणे करून इतर अपरिपक्व किंवा कोवळ्या फुलांना वा फळांना धक्का लागू नये. पाय दुमडून, कमरेत वाकून बसलेल्या स्थितीमध्ये, वेलचीची काढणी करणारे हे कुशल मनुष्यबळ केरळातील किंवा आजूबाजूच्या राज्यांमधून स्थलांतरित झालेले असते. अनेकांच्या पिढ्यानपिढ्या वेलची लागवड, काढणीमधे कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत.

सुकवलेल्या वेलचीदाण्यापासून रोपे बनवायचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. पण तशा वेलदोड्यांना वापरून खुप नगण्य प्रमाणात दर्जेदार रोपे तयार होतात. तसेच वातावरण देखील खास प्रकारचे पोषक असे आवश्यक असते. लागवडीकरीता झुडूपावर काही पक्व वेलची मुद्दाम ठेवल्या जातात, ज्यांच्यामधून वेलची दाणे काढून खास प्रक्रियेव्दारे रोपे बनवली जातात. सप्टेंबर- नोव्हेंबर दरम्यान वेलचीची तोड असते. कधीकधी पार फेब्रुवारी पर्यंत थोड्या अधिक प्रमाणात वेलची खुडणी चालू‌ राहते.

केरळमध्ये गेल्यावर अनेक ठिकाणी मसाला बागायती किंवा वेगवेगळ्या मसाल्यांची लागवड केलेले खास Spice farms पर्यटनासाठी उपलब्ध असतात. तिथे प्रशिक्षित, मसाल्यांची माहिती असलेला कर्मचारी वर्ग, सर्व मसालापिकांची आणि वापराची माहिती देतो. तिथे वेलची ची झुडूपे सहज पाहता येतात. सगळ्या मसाला पिके,‌ काॅफी, चहा आणि अन्य वनौषधी वैगरे व्यवस्थित माहिती मिळते.

वेलची जेव्हा खुडली जाते तेव्हा ती फुगीर आणि हिरवीगार असते. Capsule म्हणतात त्याला आणि Pods. लंआतील दाणे ब्राऊन किंवा काळसर रंगाचे आणि थोडे चिकटसर असतात. वेलचीचे फळ जमिनीलगतच्या काड्यांवर आल्याने बहुतेकदा त्यावर माती लागलेली असू शकते. काही ठिकाणी हि पुर्ण काढणी पाण्याने धुऊन मग पुढच्या प्रक्रियेतून जाते. पारंपरिक पद्धतीने, ५-७ दिवस कडकडीत उन्हात सुकवून देखील वेलची साठवणूकीसाठी तयार करता येते. पण आजकाल, बहुतांशी ही वेलची काढल्यानंतर लगेचच काही वेळात, ड्रायर मधे सुकवली जाते. व्यावसायिक ड्रायर अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतात. वेलची झुडूपावरून काढून ड्रायर मधे टाकायच्या आधी, जास्त काळ बाहेर राहिल्यास, आवरणाच्या हिरव्या रंगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून कुशल अनुभवी मनुष्यबळ महत्वाचे ठरते.

मरियम रेशी या प्रसिध्द लेखिकेच्या, The Flavour of Spices ह्या पुस्तकात, मरियम ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण २०० किलो वेलची ही सुकवण्याच्या प्रक्रियेतून जवळपास ४० किलो पर्यंत उरते तेव्हा ती विक्रीयोग्य असते. एवढी आद्रता निघून गेल्यावर वेलची साठवणूक आणि वापरण्यास योग्य होते. वेलची त्यामुळेच एक शाही आणि महागड्या मसाल्यांमधे गणली जाते. 

घरगुती वापरासाठी वेलची साठवताना कोरड्या बरणीत ठेवावी. पण नैसर्गिकरीत्या रंग हळूहळू पिवळसर होत जातो. हिरवीगार वेलची फ्रिजमध्ये ठेवल्यास मात्र रंग छान हिरवाच राहतो. व्यावसायिकरित्या वेलची पावडर करताना वेलचीदाणा   भरडला जातो. चाळणा मारून बारीक पावडर केली जाते. घरगुती स्वरूपात वेलची पावडर करताना, काही जण वेलची दाणा मोकळा करून, दाणा भरडून घेतात. किंवा काही जण अख्खी वेलची पॅनमधे ३-५ मिनिटे, मंद आचेवर परतून घेतात. थंड झाल्यावर नुसती वेलची भरड स्वरूपात वाटून घेतात. काही साखर आणि वेलची एकत्र भरडून घेतात. पुड केल्यावर कोरड्या हवाबंद बरणीत २-३ महिने देखील चांगली राहते पावडर. पण अर्थातच ताज्या वेलची पुड ची लज्जतच वेगळी. तसेच वेलची अर्क असलेले केशर वेलची सिरप, वेलची अर्क ही बाजारात मिळतात.

बाकी वेलचीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, काही देशांमधे उत्तम उचल आहे. जानेवारी ते मे मसाला बनवायचा हंगाम म्हणून गरम मसाल्यात वापरण्यास आणि गणपती- दिवाळी दरम्यान मागणी आणि बाजारभाव बहुदा जास्त असतात. बाकी वेलची बाबत तुमच्याकडे काही छान आठवणी माहिती असाल तर नक्की सांगा.

#वेलची #cardamom #हिरवीवेलची #वेलदोडा #greencardamom

Note: ह्या लेखातील बहुतेक फोटो स्वतः काढलेले, काही ओजस्वी चौधरी वहिनीने पाठवलेले तर‌ काही Royalty free photo माहितीसाठी घेतलेले आहेत. इंटरनेटवरून वेलची हारचे फोटो screenshot पोस्टकर्त्यांच्या नावासकट घेतले आहेत.


Saturday, February 10, 2024

मेथी-मटार-मलई

मेथी-मटार-मलई ही उत्तर भारतीय लोकप्रिय भाजी आहे. दाटसर अशी ही भाजी सफेद ग्रेव्ही, पिवळसर ग्रेव्ही किंवा लाल ग्रेव्ही अशा तिन्ही प्रकारात चवीला छानच लागते. थंडीमधे ताजी मेथी आणि हंगामातील गोडूस मटारदाणे वापरून केलेली ही भाजी, गरमागरम पराठा, चपाती, रोटी सोबत खायला एकदम भारी!

मेथीच मेथी आलेय घरी. परवाच, केळीच्या पानात, नारळाच्या झावळीच्या दो-यांनी, रबरांनी बांधून घरून, मम्मीने एडवणवरून माझ्यासाठी आणि आजूबाजूला वाटायला पाठवलेल्या कोवळी मेथीच्या जुड्या पाठवल्या.🍀💚 मम्मीने एडवणला हौस म्हणून लावलेले हे हिरव्या गालीच्यांचे थोडेसे वाफे पण कमालीचा आनंद देतात. ताज्या मेथीच्या जुड्या भरभरून वाटून देखील उरल्या. त्यामुळे आता थोडे दिवस तरी ताज्या मेथीच्या पाककृती होणार आणि पोस्ट केल्या जाणार.

मेथी-मटर-मलाई ची सफेद किंवा पिवळसर ग्रेव्ही घरी विशेष आवडत नसल्याने लाल रंगाची ग्रेव्ही केली.

१. मेथी चार-पाचदा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन घेतली. माती राहणार नाही ह्याची काळजी घेऊन, निथळत ठेवली. हे खुप महत्वाचे आहे, नाहीतर खाताना हलकी कचकच जाणवते. मेथी जरा चिरून त्यावर हलकेसे मीठ मिसळून पंधरा मिनिटे ठेवले. मग जरा कुस्करून मेथी चे पाणी पिळून काढले. परत एकदा पाण्याने धुऊन पिळून निथळत ठेवली. त्यामुळे कडवटपणा थोडासा कमी होतो.

२. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दोन चिरलेले कांदे, १४-१५ काजू, अर्धा इंच आले, ६-७ लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि दोन टाॅमेटो असे थोडे मीठ टाकून चांगले परतून घेतले. पिवळी किंवा सफेद ग्रेव्ही करताना कोथिंबीर आणि टाॅमेटो टाळावे.‌ आवडीप्रमाणे काजू आणि कांदा वाढवावा. हे थंड करून, मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतले.

३. पॅनमध्ये, जरासे तेल घालून मेथी परतून घ्यावी. आणि बाहेर काढून ठेवावी.

४. परत तेल गरम करून, दोन हिरवी वेलची, दोन लवंगा, ३-४ काळेमिरे परतून घ्यावी. जीरे टाकावे. मग आपण केलेली लाल ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्या. चवीनुसार मीठ, थोडी जास्तीची साखर आणि लक्ष्मी मसालेचा गरम मसाला, रोजच्या वापरातील खास डंकावर बनवलेला स्पेशल वाडवळी मसाला, धणा पावडर आणि जीरा पावडर मिसळून चांगले परतून घ्यावे.

५. दहा मिनिटे पाण्यात वाफवलेले मटारचे दाणे ग्रेव्ही मधे टाकले, परतलेली मेथी देखील घातली आणि मिसळून घेतले.

६. दोन वाटी दुधाची दाट साय मिक्सरमधून हलकेच फिरवली. (किंवा बाजारात मिळणारे तयार क्रिम पण वापरता येते.)
एका भांड्यात थोडी भाजी काढली आणि त्यात ही वाटलेली साय टाकून चांगले ढवळली. मग सर्व मुख्य भाजीत मिसळले. ह्यामुळे भाजी साय मिसळूनही फाटत नाही. सतत ढवळत जरा शिजवून घेतली. वरून किचन किंग मसाला भुरभुरवला आणि भाजी गरमागरम पराठ्यासोबत सर्व्ह केली. सोबतीला ताजे झटपट केलेले कैरीचे लोणचे.

मेथीच्या भाजीला नाक मुरडणारेदेखील, चवीने खातात ही भाजी...

(मेथी मुळे, चवीला जरा कडवट लागू शकते. कहीजण अगदीच कमी प्रमाणात मेथी घालतात आणि साखर जास्तीची घालतात म्हणजे कडवटपणा जाणवत नाही.)

#मेथी_मटर_मलाई #मेथी_मटर_मलई #मेथी #एडवण #मेथीचीभाजी

















मेथी- सुके बोंबील- बटाटा‌ सुकी भाजी 🍀

 मेथी- सुके बोंबील- बटाटा‌ सुकी भाजी


जाड बुडाच्या भांड्यात, तेल तापवून त्यात दोन मिरच्या उभ्या चिरून, १०-१३ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, दोन बारीक चिरलेले‌ कांदे अगदी चांगले‌ परतून घ्या. 


लक्ष्मी मसाले चा डंकावर बनवलेला स्पेशल वाडवळी मसाला एक चमचा आणि मीठ घालून परता. मधला काटा काढून, बारीक कापलेले सुके बोंबील आणि सालासकट बारीक कापलेला बटाटा टाकून परतून घ्या. हाताने थोड्याशा पाण्याचा हबका मारा आणि झाकण ठेवून दणदणीत वाफ काढा.


मेथी निवडून मग चांगली धुवून निथळून, बारीक चिरून घ्या. ती भाजीत घालून मिक्स करून परता. झाकण न ठेवता पंधरा- वीस मिनिटे चांगले शिजू द्या. बटाटे शिजले का पहा. शेवटी लिंबू रस पिळून कोथिंबीर भुरभुरवा. चविष्ट भाजी तयार. भाकरीसोबत छान लागते.


पातीचा कांदा देखील बारीक कापून टाकता येतो. त्याने देखील खुप चांगली चव येते.
















Thursday, January 11, 2024

पोपटी


 

White sauce, butter garlic tossed Crabs






 #White sauce, butter garlic tossed Crabs


पर्थला coastal line and port जवळ राहत असल्याने दर्जेदार seafood, त्यातही Salmon, shrimp and prawns, crabs, lobster, Barramundi असे मासे हमखास ताजे मिळतात. गेल्या वेळी खेकडे आणलेले. नेहमीच्या कोकणी रस्सा आणि वाडवळी कालवण पेक्षा वेगळे काय करता येईल म्हणून White sauce, butter garlic tossed crabs बनवले. Toast केलेला milk bread आणि Leafy salad with cheese सोबतीला white sauce मधे मुरलेले खेकडे चांगले लागले.


खेकडे स्वच्छ धुवून घेतले. वरचे कवच, खेकड्याच्या पायाचे nails कापून टाकले. आणि तोंडाकडचा भाग आणि अनावश्यक भाग काढून टाकले. नांगी/ फांगडे काढून जरा एक फटका मारून फोडून घेतले. अवांतर कवचाची किपची राहिली असेल तर नीट बघून काढून घ्या. खेड्यांचे बाकी पाय तसेच ठेऊन मधोमध कापले. हलकेसे परत धुवून घेतले. पाणी पुर्ण निथळून ठेवले.


मीठ, Himalayan pink salt, काळेमिरे भरड आणि गरम मसाला हलकासा लावून मुरवत (marinate) ठेवले.


खुप सा-या म्हणजे लसणाच्या ८-१० पाकळ्या अगदी बारीक करून घेतल्या. मध्यम आचेवर गरम झालेल्या जाड बुडाच्या पॅनमधे, ब-यापैकी जास्त प्रमाणात salted butter (आपल्याकडे अमुल बटर) वितळवून घेतले. त्यात बारीक केलेला लसूण, एक बारीक चिरलेला कांदा, थोडे काळेमिरे, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्ज, आल्याचे ३-४ slices, उभी चिरलेली एक तिखट मिरची, थोडे Himalayan pink salt, दोन पातीच्या कांद्याच्या, कंदाकडची बाजू (stems of spring onions) असे एक एक करत परतवून घेतले. थोडे कोमट पाणी घातले. झाकण ठेवून ५-१० मिनिटे वाफेवर शिजवले. मग white पास्ता मिक्स साॅस आणि मक्याचे काही दाणे मिक्स केले. पाणी टाकून चांगले ढवळावे. परत एक वाफ घेतली. (साॅस दाटसर राहीला पाहिजे म्हणून खुप पाणी नको)


झाकण काढून अजून थोडे मिक्स हर्ब्ज आणि चिली फ्लेक्स घातले. मग मुरवत ठेवलेल्या खेकड्यांना घालून मस्त टाॅस केले. Sweetish चिली सॉस घातला आणि मिक्स करून दणकट वाफ काढली. खेकड्यांमधे आणि फोडलेल्या डांग्यामधे/ फांगड्यामधे साॅस व्यवस्थित मुरला होता. झाकण काढल्यावर गॅस मोठा केला आणि जरा साॅस दाट होऊ दिला आणि लिंबू रस पिळला. टाॅमेटोचे तुकडे आणि कोथिंबीर पेरली आणि परत एकदा गॅसवरच मुरू दिले. Sundried tomato जास्त छान लागतात आणि texture पण छान दिसते, पण वेळेवर मिळाले नाहीत.


सलाद पाने, olives, cheese, काकडी, चेरी टोमॅटो, कांदा, pink salt, crushed peppercorns, chili flex आणि salad dressing टाकून सलाद बनवले. बटाट्याचे French fries, Milk bread toast करून सोबत हे Butter garlic tossed- Crabs in white sauce serve केले. मला shellfish ची ॲलर्जी असल्याने खेकडे खात नाही, पण ज्याच्यासाठी बनवलेले त्याला हा प्रकार भलताच आवडला. Sauce ची चव flavour packed चांगली लागली.


#crab #चिंबोरी #खेकडे #whitesauce #food

Creamy white sauce crab curry

Crab curry in a little different way... 

I don't eat crabs 🦀 but it's Abhiee's favorite seafood. So I keep searching for various recipes for crabs. All thanks to both my mums, as because of them, I can prepare decent, Kokani and Vadvali style Chimbori rassa and kalvan. 😁

In Perth, we are staying at the coastal line, port and could find great crabs and fresh seafood. This butter garlic tossed crab recipe is quite new for me but it turned out to be super delicious. Seasoned crabs in some pink salt, pepper and Garam masala by our own Laxmi Masale, herbs, chili flex, bird's eye chili. Look at these butter garlic tossed crabs cooked in white creamy sauce. Wow! That was truly 😋

If you have some great crab recipes, don't forget to share them with us. 🤗

#crabcurry #food #foodpreparation #crab #crablegs #seafood #perthlife #perth #fremantl








Thursday, December 14, 2023

उकड्या तांदळाच्या इडल्या

 कोकणातील उकडा तांदळाची इडली!


राता लाल तांदूळ, काळा तांदूळ, बासमती तांदूळासोबतच काही दिवसांपूर्वी कोकणातील उकडा तांदूळ देखील दि मसाला बझार मधे विक्रीसाठी उपलब्ध होता. उकडा तांदूळ ची माहिती आईकडून कळली होती. पण हा भात गेल्यावर्षी प्रथमच खाल्ला. पचायला जड वाटला. मग पुन्हा ह्या भाताच्या वाटेला फिरकली नाही. मग कोकणात रानमाणूस कडे फिरायला गेले असता झोळांबे गावात ओंकार च्या आईने गरमागरम उकड्या तांदळाची पेज आणि फणसाची भाजी बनवली होती ती खाल्लेली. गेल्या महिन्यात कोकणातील दापोली मधे माहेर असलेल्या मनिषा अभ्यंकर मसाला बझार ला रूजू झाल्या. उकडा तांदूळ पाहून सहजच ह्याच्या इडल्या आम्ही बनवतो, छानच होतात असे बोलल्या. एक दोन दिवसात इडली सांबार चा बेत होताच म्हटले ह्यावेळी उकड्या तांदळाच्या इडल्या बनवूया. 

तर हा खास उकडा तांदूळ बनवताना, टरफलासकटच भात, पाण्यात शिजवला जातो. चुलीवर मोठ्या पातेल्यात पाणी गरम झाले की भात/ धान त्यात टाकतात. निकृष्ट किंवा पोकळ धान वर तरंगते ते काढून टाकतात. भातावर झाकण ठेवून चांगली उकळी आली की पुन्हा ढवळून कढ आणली जाते. चांगला रटरटत शिजतो. टरफलातून आतला पांढरा तांदूळ डोकावतो. ह्या तांदळाला मोठ्या टोपलीत/ चाळणीत पाणी निथळून जावे म्हणून ठेवले जाते. सर्व पाणी निथळून गेले की मग स्वच्छ कापडावर सावलीमध्ये हा भात पसरवला जातो. वर खाली करत सावलीतच चांगला सुकला की मग गिरणीत भरडून आणला जातो. पेज करून, भात करून, पीठ स्वरूपात भाकरी करून उकडा तांदूळ, पुर्वी कोकणी घराघरात खाल्ला जायचा. 

इडली करताना नेहमीप्रमाणे स्वच्छ धुतलेले चार वाटी उकडा तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ+ १५-२० मेथी दाणे पाण्यात वेगवेगळे भिजत घातली. सकाळी १० च्या सुमारास भिजवले. रात्री १० च्या सुमारास थोडे थोडे करत उकडा तांदूळ, उडीद डाळ, मेथी आणि पोहे एकत्र करून मिक्सरमधून बारीक केले. पाणी जास्त न घालता, पीठाचा पोत मध्यम ठेवला. सगळे नीट मिसळले आणि मोठ्या चमच्याने फेटले. कापलेला कांदा ठेवून पीठ झाकले. उकड्या तांदळामुळे पीठाचा रंग offwhite- grainy लालसर होता. 

सकाळी पीठ चांगलेच वर आले होते. छोट्या मिनी बटण इडली साच्यात आणि नेहमीच्या साच्यात इडल्या वाफवून घेतल्या. इडल्या काढताच सुरेख spongy texture ने मन सुखावून गेले. पीठ भरडताना लागलेल्या जास्तीच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखं वाटले. 😀 खरेच चांगल्या इडल्या झाल्या.‌

सोबत पटकन होणारी खोबरे- मिरची- जीरा- कोथिंबीर - लसूण- कैरीची, फोडणी टाकून केलेली हिरवीगार चटणी आणि आपला लक्ष्मी मसालेचा सांबार मसाला वापरून झटपट चटपटीत सांबार बनवला. तुम्ही वापरला आहे का आपला सांबार मसाला? मस्त चव येते सांबार ला!

इतकी वर्षे उकड्या तांदळाच्या इडल्या इतक्या सुंदर होतात हे माहीत नव्हते. म्हणून आज लिहीले ह्या बाबत खास म्हणजे जे इडली प्रेमी आहेत त्यांच्या नजरेस लेख आला की ते एकदा तरी करून आस्वाद घेऊ शकतात.

#उकडातांदूळ #rice #preboiledrice