Showing posts with label Special Food Memories ❤️. Show all posts
Showing posts with label Special Food Memories ❤️. Show all posts

Friday, March 22, 2024

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold
























भारतीय मसाले: प्रकार १०:

हिरवी वेलची: Queen of Spices/ Green gold

शिरा छान वाफेवर फुलत असताना, पितळेच्या भारदस्त ओखलीत (छोटा खलबत्ता), लगबगीने, लयबध्द आवाजात वेलदोडा खलत बसलेली आज्जी अगदी डोळ्यासमोर येते. ताज्या वेलची पुड ची मजाच वेगळी असायची. रोजच्या मसाल्यांच्या डब्याव्यतिरिक्त खास शाही आणि महागड्या मसाल्यांच्या डब्यात, पिशवीत बांधलेल्या लवंगा, शहाजीरे, जायवंत्री, जायफळ, तमालपत्रांच्या सोबतीला हिरवट- पिवळट वेलची असायची. गोड पदार्थ करताना डब्यातून मोजून वेलची बाहेर काढल्या जायच्या.

दुधात‌ साखर, चहा पावडर,‌ आले आणि हिरवी वेलची घालून छान उकळवून प्यालेला मसाला चहा अगदी चुटकीसरशी ताजेतवाने करून टाकतो. मोदकाच्या सारणाच्या प्रत्येक घासागणिक जाणवणा-या वेलचीच्या सौम्य चवीने देखील अगदी छान वाटते. हिरवी वेलची म्हणजे आपणा भारतीयांच्या स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या साबूत मसाल्यांमधील एक महत्त्वाचा जिन्नस. किंमतीमुळे महागड्या शाही मसाल्यांमधील एक. हिरव्या वेलचीला True cardamom, green cardamom, small cardamom, Queen of spices म्हटले जाते. केरळमध्ये परंपरागत वेलचीचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या केला जातोय. दक्षिण भारतात केरळात मोठाल्या बागायती आपल्या बघायला मिळतात. कर्नाटक, तामिळनाडू पट्ट्यात देखील लागवड होते. भारतात जरी केरळ हाच मुख्य उत्पादक असला. तरी जगभरात भारताच्याही पुढे, मध्य अमेरिकेतील Guatemala (ग्वाटेमला) हा देश प्रमुख आणि सगळ्यात जास्त उत्पादन करणारा आहे. आपल्या भारतात, मुंबईत देखील ग्वाटेमाला वेलची उपलब्ध आहे. ग्वाटेमाला वेलची आपल्या भारतीय वेलची पेक्षा गडद हिरव्या रंगाची आणि अव्वल दर्जाची वेलची आहे. ग्वाटेमाला मधे वेलची लागवड अगदी १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच झाली, तरीही उत्तम पोषक वातावरणाच्या आणि मेहनतीच्या जोरावर, भारतापेक्षा अव्वल उत्पादक म्हणून नावाजला गेला. भारत देखील इतर मसाल्यांसोबत मोठ्या प्रमाणात वेलचीची अरब देशात निर्यात करतो. 

वेलची भारतात निरनिराळे मसाले बनवणे, मिठाई, आम पन्ना (पन्हे) सारखी पेय, गोड पदार्थ, बिर्याणी- पुलाव सारखे कैक भाताचे प्रकार, मांस- मटण ह्यांची सिझनिंग तसेच शाही मसाले तडका ह्यामध्ये वापरतात. काही खास महाराष्ट्रीय पदार्थ, शाही मिठाई मधे वेलचीचा सुगंध आणि स्वाद पदार्थांचा स्वाद खुलवतो. तेलावर  मांसाहारी चिकन मटणाचे पदार्थ आणि बिर्याणी चा स्वाद‌ देखील वधारते.

वेलचीचा वापर नैराश्य असलेले आजार, पचनसंस्था संबंधित व्यथा ह्यासाठी देखील होतो. वेलचीचे चांदीचा वर्ख लावलेले दाणे, तोंडाची दुर्गंधी दुर करण्यास, जेवणानंतर चघळण्यासाठी देखील वापरले जातात. वेलचीचे आकर्षक असे गुंफलेले सुबक हार देवाला चढवले जातात. लग्नसमारंभात नवरा नवरीला घालण्यासाठी देखील हिरव्यागार वेलचीचे हार, हौशी मंडळी बनवून घेतात. फारच  छान दिसतात हे हार.

वेलची आवरणाचे पिवळसर, हिरवट, गडद हिरवी, पांढरट पिवळी असे रंग असतात. दर्जेदार वेलचीची बाजारातील प्रत ही वेलचीची रूंदी, आवरणाचा हिरवेगारपणा आणि भरलेला (single seed or double seed) दाणा ह्यावर आधारीत असतो. 5 mm, 6 mm, 7 mm, 8 mm, 8+ mm आणि त्याहून थोडी मोठी अशा वेलचीच्या प्रत आणि त्यानुसार रोज ठरणारे भाव असतात. त्यातही ७०-८०% भरलेला दाणा, हिरवा रंग असे मुद्दे महत्वाचे ठरतात. व्यापारी भाषेत, rejection cardamom म्हणजे लहान आकारातील, वरचे आवरण अर्धवट उघडलेले, अपरिपक्व खुडणी झालेल्या, थोड्याशा दुमडलेल्या आकार बिघडलेल्या, निरनिराळ्या आकारातील लहान मोठ्या वेलची यांचा समावेश असतो. हे rejection/ split cardamom, दळण्यासाठी वापरता येतात. वरचे आवरण सोलून मोकळा केलेला वेलची दाणा (single or double seed) हा वेलची पावडर करण्यास वापरतात. Per liter gram असे मोजमाप ह्या व्यवसायात महत्त्वाचे ठरते‌. एक लिटर द्रव्य पदार्थ ज्या मोजमापाच्या भांड्यात राहतो, त्या भांड्यात पुरेपूर भरून, ८ mm किंवा कोणत्याही विशिष्ट आकारातील किती नग वेलची राहतात ती संख्या म्हणजे Per liter gram. 

दक्षिण भारतातील काही प्रदेशात आणि प्रामुख्याने केरळात होणारी वेलची लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, डोंगर उतारावरील जमिन, सावली असलेली जागा आवश्यक असते.

हिरवी वेलचीचे झुडूप असते. झुडूपाच्या तळाशी/ बुडाशी येणा-या सरळ काड्यांना वेलचीची सुरेख पांढरी फुले येतात ज्यावर जांभळट छटा असते. ह्या फुलांचे वेलची मधे रूपांतर होते. एका काडीवरील, सर्व वेलची एकदाच पक्व न होता, टप्प्याटप्प्याने तयार होत जातात. वेलची खुडण्यासाठी अनुभवी कामगार लागतात. कारण काढणीवेळी, खुडण्यासाठी कोणती वेलची योग्य आहे ते कळणे आवश्यक असते. खुडताना पण नखांनी वेलदोडा अलगद वेगळा करावा लागतो, जेणे करून इतर अपरिपक्व किंवा कोवळ्या फुलांना वा फळांना धक्का लागू नये. पाय दुमडून, कमरेत वाकून बसलेल्या स्थितीमध्ये, वेलचीची काढणी करणारे हे कुशल मनुष्यबळ केरळातील किंवा आजूबाजूच्या राज्यांमधून स्थलांतरित झालेले असते. अनेकांच्या पिढ्यानपिढ्या वेलची लागवड, काढणीमधे कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत.

सुकवलेल्या वेलचीदाण्यापासून रोपे बनवायचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. पण तशा वेलदोड्यांना वापरून खुप नगण्य प्रमाणात दर्जेदार रोपे तयार होतात. तसेच वातावरण देखील खास प्रकारचे पोषक असे आवश्यक असते. लागवडीकरीता झुडूपावर काही पक्व वेलची मुद्दाम ठेवल्या जातात, ज्यांच्यामधून वेलची दाणे काढून खास प्रक्रियेव्दारे रोपे बनवली जातात. सप्टेंबर- नोव्हेंबर दरम्यान वेलचीची तोड असते. कधीकधी पार फेब्रुवारी पर्यंत थोड्या अधिक प्रमाणात वेलची खुडणी चालू‌ राहते.

केरळमध्ये गेल्यावर अनेक ठिकाणी मसाला बागायती किंवा वेगवेगळ्या मसाल्यांची लागवड केलेले खास Spice farms पर्यटनासाठी उपलब्ध असतात. तिथे प्रशिक्षित, मसाल्यांची माहिती असलेला कर्मचारी वर्ग, सर्व मसालापिकांची आणि वापराची माहिती देतो. तिथे वेलची ची झुडूपे सहज पाहता येतात. सगळ्या मसाला पिके,‌ काॅफी, चहा आणि अन्य वनौषधी वैगरे व्यवस्थित माहिती मिळते.

वेलची जेव्हा खुडली जाते तेव्हा ती फुगीर आणि हिरवीगार असते. Capsule म्हणतात त्याला आणि Pods. लंआतील दाणे ब्राऊन किंवा काळसर रंगाचे आणि थोडे चिकटसर असतात. वेलचीचे फळ जमिनीलगतच्या काड्यांवर आल्याने बहुतेकदा त्यावर माती लागलेली असू शकते. काही ठिकाणी हि पुर्ण काढणी पाण्याने धुऊन मग पुढच्या प्रक्रियेतून जाते. पारंपरिक पद्धतीने, ५-७ दिवस कडकडीत उन्हात सुकवून देखील वेलची साठवणूकीसाठी तयार करता येते. पण आजकाल, बहुतांशी ही वेलची काढल्यानंतर लगेचच काही वेळात, ड्रायर मधे सुकवली जाते. व्यावसायिक ड्रायर अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतात. वेलची झुडूपावरून काढून ड्रायर मधे टाकायच्या आधी, जास्त काळ बाहेर राहिल्यास, आवरणाच्या हिरव्या रंगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून कुशल अनुभवी मनुष्यबळ महत्वाचे ठरते.

मरियम रेशी या प्रसिध्द लेखिकेच्या, The Flavour of Spices ह्या पुस्तकात, मरियम ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण २०० किलो वेलची ही सुकवण्याच्या प्रक्रियेतून जवळपास ४० किलो पर्यंत उरते तेव्हा ती विक्रीयोग्य असते. एवढी आद्रता निघून गेल्यावर वेलची साठवणूक आणि वापरण्यास योग्य होते. वेलची त्यामुळेच एक शाही आणि महागड्या मसाल्यांमधे गणली जाते. 

घरगुती वापरासाठी वेलची साठवताना कोरड्या बरणीत ठेवावी. पण नैसर्गिकरीत्या रंग हळूहळू पिवळसर होत जातो. हिरवीगार वेलची फ्रिजमध्ये ठेवल्यास मात्र रंग छान हिरवाच राहतो. व्यावसायिकरित्या वेलची पावडर करताना वेलचीदाणा   भरडला जातो. चाळणा मारून बारीक पावडर केली जाते. घरगुती स्वरूपात वेलची पावडर करताना, काही जण वेलची दाणा मोकळा करून, दाणा भरडून घेतात. किंवा काही जण अख्खी वेलची पॅनमधे ३-५ मिनिटे, मंद आचेवर परतून घेतात. थंड झाल्यावर नुसती वेलची भरड स्वरूपात वाटून घेतात. काही साखर आणि वेलची एकत्र भरडून घेतात. पुड केल्यावर कोरड्या हवाबंद बरणीत २-३ महिने देखील चांगली राहते पावडर. पण अर्थातच ताज्या वेलची पुड ची लज्जतच वेगळी. तसेच वेलची अर्क असलेले केशर वेलची सिरप, वेलची अर्क ही बाजारात मिळतात.

बाकी वेलचीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, काही देशांमधे उत्तम उचल आहे. जानेवारी ते मे मसाला बनवायचा हंगाम म्हणून गरम मसाल्यात वापरण्यास आणि गणपती- दिवाळी दरम्यान मागणी आणि बाजारभाव बहुदा जास्त असतात. बाकी वेलची बाबत तुमच्याकडे काही छान आठवणी माहिती असाल तर नक्की सांगा.

#वेलची #cardamom #हिरवीवेलची #वेलदोडा #greencardamom

Note: ह्या लेखातील बहुतेक फोटो स्वतः काढलेले, काही ओजस्वी चौधरी वहिनीने पाठवलेले तर‌ काही Royalty free photo माहितीसाठी घेतलेले आहेत. इंटरनेटवरून वेलची हारचे फोटो screenshot पोस्टकर्त्यांच्या नावासकट घेतले आहेत.


Monday, December 6, 2021

संक्रांत स्पेशल गावरान मडक्यातली साग्रसंगीत उकड-हंडी

 #पारंपारिक_उकडहंडी 🥘🌮🍛🍲🌿♥️

थंडीची चाहूल लागली आणि कोनफळे, जांभळी कंद, पापडी, ताजा घेवडा बाजारात दिसूही लागले एव्हाना. परवाच रोजच्या भाजीवाल्या काकांनी जांभळे कंद आणि ताजी सुरती पापडी दाखवली. म्हटले पुढच्या आठवड्यात घेते नक्की काका... 

ही उकडहंडीची पोस्ट जूनी आहे पण पुढच्या महिन्यात मकरसंक्रांत आलीच म्हणून आज ही मकरसंक्रांत स्पेशल उकडहंडी ची पोस्ट टाकत आहे. आता सगळ्या ताज्या भाज्या सुरू झाल्यात म्हटल्यावर हृया डिसेंबर च्या महिन्यात कधीही बनवू शकाल तुम्ही देखील...

आमच्या भागात मस्त थंडी  पडली आहे आणि उकडहंडी ला लागणा-या वस्तू हळूहळू भाजीवालींच्या टोपलीत डोकावायला लागल्या आहेत. ही पोस्ट एकदा नजरेखालून गेली कि तुम्ही आठवणीने ह्यात लागणा-या भाज्या गोळा करून, जमवून ठेऊन, तयारीने सिझनची खास मस्त पारंपरिक उकडहंडी बनवू शकतील. :

#संक्रांत स्पेशल गावरान मडक्यातली साग्रसंगीत उकड-हंडी

संक्रांतीला आमच्या कडे एडवणला तीळगुळासोबतच उकडहंडी नावाचा प्रसिध्द पारंपारीक पदार्थ चेला जातो. "तिळगुळ घ्या गोड गोड बोला" असे बोलत तीळगुळासोबतच उकडहंडी भरलेली भांडींची देवाणघेवाण होई. आता हे सगळे कमी झालेय. माझे मावशाजी ज्यांना आम्ही भाई म्हणत असू ते न चुकता दरवर्षी आम्हा सगळ्यांना, त्यांच्या माहिमच्या वाडीतले कंद, कोनफळ आणि क्वचित उकडहंडी मोठ्या आवडीने आणून देत असत. मग त्याच कोनफळाला वापरून आम्ही उकडहंडी बनवत. हा पदार्थ गावी अनेकांनी एकत्र येऊन बनवण्यात मजा यायची. आणि सामानाची लिस्ट जरा वेगळी आणि भलीमोठी दिसली तरी बनवायला काही वेळ आणि विशेष स्किल्स् लागत नाहीत.

तर मग तीन- चार वर्षापुर्वी आमचे भाईमामा यांच्या पुढाकाराने आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी गावरान उकडहंडी बनवली. थंडीत आमच्या एडवण मथाणेच्या बाजारात छान छान ताज्या आणि so called purely organic भाज्यांची वर्दळ असल्याने सामान आणि भाज्या जमवताना विशेष कष्ट नाही लागले.

उकड म्हणजे उकडलेले आणि हंडी म्हणजे मडक्यात बनवलेले म्हणून ह्या पदार्थांचे नाव #"उकडहंडी"!

सर्व काही आम्ही खास कॅमेरात टिपले आणि खवय्यांसाठी हा लेख खास लिहीण्याचा उद्देश म्हणजे पारंपारीक पदार्थाची ओळख निरंतन राहावी व अनेकांनी एकत्र येऊन ह्या पदार्थांचा आनंद व आस्वाद घ्यावा.


चला तर बघुया कशी बनवावी मडक्यातील गावरान उकडहंडी...

साहित्य:

2 मध्यम कांदे बारीक चिरून

2 बटाटे मोठ्या चौकोनी फोडी करून

2 राताळी मोठ्या चौकोनी फोडी करून

3-4 वांगी मोठ्या चौकोनी फोडी करून

एक वाटी सुरती पापडी

एक वाटी सोललेला हिरवा चणा

एका फ्लॉवरचे तुकडे

एक वाटी मोडलेली फरसबी आणि पापडी

एक वाटी भिजवलेले शेंगदाणे

एक वाटी कोनफळच्या मोठ्या चौकोनी फोडी करून

जांभळा कंद एक वाटी तुकडे

एक वाटी वालपापडी

एक वाटी अटकोल (नवलकोल) च्या फोडी

एक वाटी तरळे (हे तलावामधे मिळते)

पाच शेवग्याच्या शेंगाचे तुकडे

एक वाटी चिरलेला ऊळपात म्हणजे पातीच्या कांदा

आले-लसूण पेस्ट एक वाटी

चिरलेली कोथिंबीर एक वाटी

सोललेल्या ऊसाचे बारीक तुकडे अर्धी वाटी

खवलेले खोबरे दोन वाटी

शेंगदाण्याचे कुट दोन वाटी

कच्ची केळीचे कापा एक वाटी

मटार दाणे एक वाटी

मका अर्धा वाटी


मसाल्याचे साहित्य:

पांढरे तीळ (unpolished) एक वाटी

सेलम हळद पावडर पाव वाटी 

बेडगी मिरची पावडर अर्धी वाटी

काश्मिरी मिरची पावडर अर्धी वाटी

गोडा ब्राह्मणी मसाला अर्धी वाटी 

स्पेशल गरम मसाला अर्धी वाटी

स्पेशल घरगुती मसाला एक वाटी 

चटपटा चाट मसाला एक छोटा चमचा

मीठ चवीनुसार

साखर एखाद चमचा

गुळ एक वाटी

अर्धा लिटर तेल

चिंचेचे पाणी एक वाटी

हिंग एक चमचा

(नुसत्या हळद, मीठ, रोजचा मसाला, गरम मसाला हे टाकून देखील चांगली चविष्ट उकडहंडी तयार होते. येथे आपण थोडेसे गोडा मसाला किंवा चाट मसाला वापर चव अजूनच भन्नाट करण्यासाठी वापरले आहेत. तुम्ही ते टाळू शकता. पण मग इतर मसाला प्रमाण वाढवा.)

दोन मोठी जाड आवरणाची मातीची मडकी 

चार केळीची पाने

सागाची असतात तशी मोठी चार पाच पाने

केळीचे सुकलेल्या खोडाचे धागे

एक मोठे पातेले किंवा गंज

मडकी आतुन बाहेरून साफ धुवून सुकवत ठेवा. मधल्या बाजूला केळीचे पान आणि भेंडीची* पाने लावा. तेलाचा हात सर्व पानाला लावून ठेवा. सागाची किंवा इतर मोठी पाने आणि नाही मिळाली तर केळीची पाने आणि केळीचे सुकलेल्या खोडाचे धागे बांधण्यासाठी तयार ठेवा. तुसाचा ठिग पेटवून आग तयार करण्यासाठी सगळे साहित्य बाजूलाच ठेवा. 

एका मोठ्या पातेल्यामधे वर दिलेले सर्व भाज्या, साहित्य, मसाल्याचे पदार्थ मिसळा. मीठ, गुळ, साखर, लिंबाचा रस, चिंचेचे पाणी वैगरे टाका व व्यवस्थित पंधरा मिनिटं सगळे वरखाली करत मिक्स करा. मग तेल ओता आणि परत सारे वरखाली करा. हलकेच चव घेऊन मीठाचा व मसाल्याचा अंदाज घ्या. काही कमीजास्त हवे असल्यास तसे टाकून परत मिक्स करा. 

आतून केळीची पाने लावलेल्या तयार मडक्यांमधे हाताने दाबत दाबत तयार कच्ची भाजी अलगद भरा. वरून  थोडे तेल अजून टाका. परत मडक्याचे तोंड भेंडीच्या* पानांनी झाकून केळीच्या वाकांनी घट्ट बांधा. अशा पध्दतीने सर्व मडकी तयार करून घ्या. 

*भेंडीचा पाला/ पाने

भेंडीचा म्हणजे आपण जी नेहमी भेंडीची भाजी खातो त्याचा पाला नाही. तर आमच्या गावी एक प्रकारची बदामी आकाराची पाने असलेले झाड असते त्यालाही भेंडी संबोधतात. उकडहंडी बनवताना जेव्हा हे मुरवलेले पदार्थ मडक्यामधे वाफवायला ठेवतात तेव्हा मडक्यातून वाफ बाहेर जाऊ नये यासाठी त्याचं तोंड व्यवस्थित बंद करणं आवश्यक आहे. नाहीतर भाज्या कच्चा राहून संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरतं. अशावेळी भेंडीच्या पानांनी मडके झाकले जाते आणि विस्तवात टाकून भाजले जाते.

आता तुस पेटवायला घ्या. आग चांगली पेटली की मग सगळी मडकी आगीमधे शिजण्यासाठी ठेवा. जवळ- जवळ एक दीड तासात मध्यम आगीवर मडक्यातली सगळी भाजी शिजून तयार होते. मग मडकी आगीतून काढून दहा पंधरा मिनिटे बाहेर ठेवा. आणि अलगद काळजीपूर्वक झाकण्यासाठी लावलेली पाने काढून टाका. हातावर वाफ येते म्हणून सावधता बाळगा.

एव्हाना मिश्र वास छानपैकी दरवळला असेलच... आणि वाफाळती उकडहंडीतील भाजीदेखिल सुरेख वाटत असेल.

ह्यात गुजराती पध्दतीचे बेसनाचे मुठीया पण छान लागतात. हा Twist आहे बरे का... पारंपरिक पद्धतीने केल्या जाणा-या उकडहंडी पाककृती मधे मुठिया टाकत नाहीत.

बेसनाचे मुठीये बनवण्यासाठी बेसन पीठ घ्या. थोडेसे मीठ, हिरवी बारीक मेथी, ओवा, थोडीसी साखर आणि जाडसर दळलेले गव्हाचे पीठ सगळे मिक्स करा. तेल आणि पाणी वापरा. मस्त गोळा करून मळून घ्या. मग छोटे गोळे करून तेलात तळून घ्या. आणि तयार झालेल्या उकडहंडीतील भाजीत मिक्स करा.

उकडहंडीतील भाजी केळीच्या पानावर सगळ्यांना वाढा. गंम्मत म्हणजे ही भाजी नुसतीदेखाल खाल्ली जाते. पण तांदूळाच्या भाकरीसोबत छान लागते.

गुजराथी उंधियो आणि मराठमोळी पोपटी ह्याची रेसिपी आणि पध्द्त थोडीफार साध्यर्म दर्शवते पण चव खुप वेगळ्या आहेत. त्यातली उंधियो पाककृती देखील आधी पोस्ट केली होती.

(Most of the festivals are recalled in mind because of select unique recipes associated with it. Those special cuisine are easy to made and star of that day. One of such Ukadhandi making recipe from my native place called Edwan (Saphale). I always enjoy making it and if not then watching it over. 

Couple of years back for capturing its photo memory, we actually tried making it in base way. My mama Pravin Patil, sister Supriya and brother Shubham actually had rounds of our Edwan village to find required earthen pots to make it.

Ukad-handi is traditional receipe made specially on the occasion of Makar-sankranti....It is yummy blend of mixed vegetables!!

Maharashtrian style Undhiyo kinva Bhogichi Bhaji. Real joy is collecting all ingredients from rural areas, cutting them in various shapes and mixing it with basic spices. :) Yam, roots called Konfal and sweet potato, raw bananas, Tarale- a type of root from lake, groundnuts, big brinjals adds colour, nutritious value and texture! Many people come together and make this sabji at village side. Even though small portion of each vegetable we add, collectively it becomes too much in quantity. Making it better for us to share with many more people. 

It can be enjoyed with traditional Bhajarichi bhakari or Tandalachi ukad bhakari.

We can add muthiya in to it. Muthiya are basically from Gujarati kitchen, fried round small size fritters, made using besan, fenugreek leaves and spices. 

Recipe of Ukadhandi is shared in one of the image in case anyone wants to try. 

Its a dish to share with all with love and to closed once. :)

#authentic_Maharashtra #ukadhandi #sankrant_special #mix_veggie #edwan #mathane #vadval 

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


































Sunday, October 17, 2021

कोजागिरी पौर्णिमा आणि मसाला दुध

 को जागर्ति?!🌜😃🌟❤️🌿

#कोजागिरी_पोर्णिमा #को_जागर्ति ❤️🌿🌠🌝🌜

"आसमंत हा उजळून जाई, चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई;

कोजागिरीच्या पौर्णिमेची, रात हि आनंदात रंगून जाई ...

चंद्र चांदणे आकाश सजवी, पृथ्वी सगळी उजेडात हि थिजली;

मना-मनामध्ये आनंदाचे, रंग तरंग हे भरून जाई ...

बदाम- पिस्ता, केशर मलई, दुध सुगंधी बनवून जाई;

आई लक्ष्मी च्या आशीर्वादाने, चंद्र तारका हरकून जाई ...

चंद्राची ती मंगल पूजा, लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादे;

लहान मोठे सुखात न्हाई , कोजागिरीच्या पौर्णिमेची

रात हि आनंदात रंगून जाई ...!" 🌝🌛❤️🌿🌠🌜

कवी अमोल गोवेकर (Lovely poem Taken from Internet) यांनी अगदी सोप्या शब्दांत कोजागिरी पौर्णिमा चे वर्णन केले आहे. 

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आणि मोठा आणि सुरेख वाटतो. ✨🧡

लहानपणापासून कोजागिरी ही एक खास चांदणी रात्र‌ म्हणून मम्मी-बाबांसोबत आम्ही दोघी बहिणी एडवणच्या घरी गच्चीवर छान जागरण करत मसाला दूधाचा आस्वाद घेत असू. एडवण गावी प्रदुषण कमी त्यामुळे लख्ख स्वच्छ आकाश दिसे... जवळच असलेल्या समुद्राचा आवाज रात्रीच्या सुन्न वातावरणात कानावर येत असे. एव्हाना थंडी देखील आपले अस्तित्व दाखवून एक छानसे वातावरण बनवून ठेवी. त्यात मस्त चंद्राच्या उजेडाने उजळलेल्या रात्री, दूध चांगले घोटून‌ आणि त्यात केशर, काजू, पिस्ते, बदाम, वेलदोडे पावडर आणि साखर घालून, आटवून चंद्रदेवाला आणि लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात, चंद्राचे प्रतिबिंब स्थिर दुधात‌ दिसते आणि ते दूध मग प्रसाद म्हणून प्राशन केले जाते. चंद्राचे चांगले गुणधर्म असलेली किरणे या दुधावर पडल्याने ते पिण्यास उत्तम असे मानले जाते. गरमागरम चविष्ट दुध प्यायला काय ती मज्जा येई... 🥛🥛🍶❤️🌜

आज विरारघरी हलकाफुलका मेन्यु असतो. दस-याला तोरणासाठी आणल्या जाणा-या भाताच्या लोंबीतले भाताचे भरलेले दाणे सोलून ते भात शिजवताना टाकतात. आज सहजच पांढरा पुलाव आणि कढी केली. नैवेद्य अर्पण केला. रोजच्या साग्रसंगीत वरण-भात-चपाती-भाजी-कोशिंबीर बेताला डच्चू देऊन आज रात्री घरी वडापाव, चटणी, कांदाभजी आणि मसाला दुध असा चटकमटक बेत असतो. आज गडबडीत फोटो काढायला जमले नाही म्हणून काही फोटो आधीचेच जोडलेत... ;) 

तर अशा ह्या कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्रीपर्यंत जागरण केले जाते. त्याची अशी आख्यायिका सांगतात की मध्यरात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन 'को जागर्ति' म्हणजेच 'कोण जागत आहे' असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. 

कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे श्री लक्ष्मी देवी विचारत येते. खरेच किती सुरेख कल्पना... ❤️🌟😃

नुकत्याच नवरात्री संपलेल्या असतात आणि गरबा fever पण पुर्णपणे ओसरलेला नसतो...मग अनेक ठिकाणी आवडीने रात्र जागवत गरबा रंगतो. अंताक्षरीच्या मैफिली झाडल्या जातात. चंद्राच्या सुरेख सोबतीने उजळलेल्या रात्री, मस्त पांढरीशुभ्र मेजवानी रंगते. अनेक सुगरणी पांढ-या रंगसंगतीचे निरनिराळे पदार्थ मोठ्या हौसेने बनवून आणतात. पांढरा ढोकळा, भात, पांढरी कढी, रसमलाई, दहीभात, खमंग काकडी, नारळाची वडी आणि अशा अनेक शुभ्र पदार्थांनी मैफिल रंगते. एकमेकांच्या सोबतीने एकत्र येत, हसतखेळत जागरण होते. 

कोजागिरी निमित्ताने सर्व एकत्र येत. आनंद भरलेला राही उजळलेल्या लख्ख रात्री!!! तुम्हाला देखील कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!! जागते रहो!!! 😃🌟🌜❤️🌿

#kojagiri #kojagarti

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/

आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com