Showing posts with label Kitchen. Show all posts
Showing posts with label Kitchen. Show all posts

Wednesday, February 16, 2022

वाडवळी पध्दतीने ताज्या_मास्यांचे_कालवण_आणि_तळलेले_मासे

 #ताज्या_मास्यांचे_कालवण_आणि_तळलेले_मासे

🐠🦈🐟🦐🐋🐠 #वाडवळी_कालवण

#vadvali_kalvan

वाडवळांकडचे मास्याचे कालवण भातात कालवून किंवा कालवणात बुडवलेली भाकरी ज्याने खाल्ली असेल, तो नक्कीच त्या चवीला विसरणार नाही. ह्या पाककृती मम्मीकडून शिकलेल्या आहेत. अजूनही ब-याच आहेत, लवकरच पोस्ट करू.


आमच्या एडवणची #वाडवळ (सोमवंशी क्षत्रिय) पध्दतीने मासे कालवण आणि तळलेले मासे बनवायची पध्द्त (Please Note: आम्ही एडवणला किंवा त्या पट्ट्यात अशा प्रकारे मासे बनवतो. डहाणू, केळवे, वसई किंवा आगाशी भागातील वाडवळांची मासे बनवायची पध्द्त पण घरोघरी थोडीफार वेगळी असू शकते याची नोंद घ्यावी. तुमच्याकडे वेगळी कृती असल्यास नक्की Comment मधे लिहा. आम्ही नक्की Try करू आणि पुढच्या लेखात लिहू. :) )


तर वाडवळ म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाची स्वयंपाकाची एक आगळी खासियत असलेली पध्द्त आहे. वाडवळांमधे सोमवंशी, सुर्यवंशी, चौकळशी, पाचकळशी, पानमाळी अशा जाती-पोटजाती आहेत. स्वयंपाकाच्या पध्दती थोड्याबहुत फरकाने सारख्याच... आमचा हा समाज मुंबई, ठाणे पासून डहाणू पुढपर्यत विस्तारला आहे. 


खाण्यापिण्याच्या सवयीबाबत चोख आणि चवीने खाणारे म्हणून वाडवळ प्रसिद्ध! बहुतांशी वाडवळ सामिष खातात. बागायती आणि शेतीवाडी बाळगून असलेल्या वाडवळांची खाद्यसंस्कृतीदेखील खुप चविष्ट आणि समृध्द आहे. वाडवळांमधे, मांसाहारी व शाकाहारी दोन्ही प्रकारचे बहुतांश पदार्थ बनवायला सोपे पण चमचमीत असतात. वाडवळ हे शेती वाडी करणारे आणि विशेषतः समुद्राला लागून असलेल्या भागात/ पट्ट्यात राहणारे त्यामुळे आहारात ताज्या भाज्या, भाकरी-भात आणि मासे यांचे प्रमाण विशेष. पुर्वपारापासून शेती-वाडी-बागायत-दुग्धव्यवसायात, खाऊची पाने हे व्यवसाय मुख्यत्वे वाडवळ समाज करत असे. घरातील पुरूषांसोबतच, महिलाही शेतातील अनेक कामांना हातभार लावत. ताजा भाजीपाला, शहाळी-नारळ, केळी आणि इतर फळे, निरनिराळी फुले, केळीची पाने-खांब जवळच्या बाजारपेठेत किंवा मोठाले गाठोडे घेऊन पार मुंबई वैगरे शहरातही महिलावर्ग सहज प्रवास करत असे. मग अशावेळी घरची कामे, स्वयंपाक भराभर उरकण्याकडे कल असे. म्हणून आमची मास्यांची कालवणे, भाज्या ह्या अगदी सरळसाध्या पध्द्तीने, झटपट होणा-या असतात आणि तरीदेखील चविष्ट! 🤗❤️ शेतीमधे तांदळाचे म्हणजेच भाताचे मुख्य उत्पादन. त्यामुळे चमच्याने किंवा हाताने तव्यावर फिरवलेली तांदळाची भाकरी आणि भात हे ओघाने आलेच. 

आणि वाडीमधे लावलेल्या वांगी, टाॅमेटो, शेवग्याच्या शेंगा, दुधी, शिराळा, पडवळ, गवार, मेथी, मिरच्या, पालेभाज्या, उळपातीचा कांदा, केळी, केळफुलं, वालाचे गोळे, कोथिंबीर, अळू, देठ, कडवे वाल, गलके, कोबी, फ्लाॅवर अशा सर्व भाज्यांचा स्वयंपाकात वापर असतो. समुद्राकाठी वसलेले असल्याने ताजे मासे आणि सुके मासे दोन्ही प्रकार जेवणात असतात. आणि ताज्या भाज्यादेखील आम्ही ओल्या किंवा सुक्या मासळीमधे वापरतो. मास्यांमधे आले-लसूण पेस्ट आणि तिखट-मीठ-मसाला-चिंच आणि तांदळाचे किंवा रव्याचे पीठ लावून तळलेले मासे, पातळसर कालवण किंवा सुके खोबरे भाजून वाटण लावून केलेले थोडेसे जाडसर असे कोलंबी, बोयमासा, बोंबील, पापलेट,‌ मांदेळी, घोळ मासा, खा-या मास्याचे कालवण, किंवा कांद्यावर परतलेली कोलंबी, कोबीचे सुके बोंबील टाकलेले भानोळे आणि कालवे असे प्रकार असतात. वांगे किंवा दुधीदेखील कोलंबटासोबत (लहान कोलंबी) भाजीत घालतात. आमची कोलंबी-आंबा भाजी तर खुपच प्रसिद्ध आहे. सुकवलेल्या मास्यांबरोबर देखील काही भाज्या आम्ही वापरतो.


चिंचा खारवून मोठ्या प्रमाणात भरून ठेवल्या जातात. आंबटपणासाठी, कोकम/लिंबापेक्षा चिंचेचा सढळ वापर आमच्या पदार्थात असतो. चिंचकढी हा प्रकार आम्ही भातावर घेऊन सारासारखा खातो. आंबोशी हा सुकवलेल्या आंब्याचा प्रकार आणि खारवलेले आंबे (खा-या पाण्यात कै-या वर्षभर वापरण्यासाठी भरतात) उन्हाळ्यात कैरीचा वापर स्वयंपाकात सढळहस्ते असतो. आता ब-याच वर्षांपासून टाॅमेटो हादेखील आमच्या स्वयंपाकाचा भाग झाला आहे. चिंचेमुळे संधिवात वैगरे व्हायची भिती वाटणारे हमखास टाॅमेटो वापरतात. नारळाच्या दुधाचा किंवा खोब-याचा वापर मात्र जेमतेमच...  💁


तर आमच्या निसर्गरम्य एडवणला मस्त मोठ्या लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे नानाविविध त-हेचे चविष्ट मासे एडवणवासियांना खायला मिळतात.  एडवणला बोयमासा, पापलेट, बोंबील, कोलंबी आणि मांदेळी हे माशांचे प्रकार जास्त प्रमाणात मिळतात. खेकडे, रावस, हलवा, शेवंडी, काटी वैगरेही असतात. एडवणप्रमाणेच, अर्नाळा, आगाशी विरार ला बहुधा सगळीच मासळी ताजी आणि बांगडा, सुरमई देखील असतात. 


तर आज आपण पाहूया सोपी आणि झटपट अशी वाडवळ (सोमवंशी क्षत्रिय) पध्दतीने मासे कालवण आणि मासे तळण्यासाठीची कृती.‌ नारळाचे दुध किंवा धणा, लाल मिरची भिजवून वाटण आमच्याकडे सहसा नाही वापरत किंवा फोडणीत कांदा नाही टाकत. अगदी साधे, पातळसर पण फार चमचमीत होते हे कालवण. वाफाळता भात आणि तांदळाची पसरवून केलेल्या भाकरीसोबत तर अजून चविष्ट! 😊


----------------------------------------------------------


पदार्थ १: बोयमासा, ओले बोंबील किंवा पापलेटचे कालवण: 🐟🐠

(चिंच वापरून)


आमच्याकडे वाडवळ (सोमवंशी क्षत्रिय) पध्दतीने मासे कालवण कसे बनवतात ते बघुया...


ताजे पापलेट व बोयमासा नीट साफ करून त्याचे तुकडे करून घ्या. स्वच्छ धुवून पाणी निथळवा. गरजेनुसार मीठ व आलेलसूण पेस्ट लावून ठेवा. 


एका भांड्यात तेल मध्यम गरम करा. त्यात आले लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित परता. 


मग थोडीशी सेलम हळद, मीठ आणि वाडवळी घरगुती मसाला किंवा तो नसेल तर रोजचा मसाला आणि मध्यम तिखट मिरची पावडर, थोडी धणा पावडर टाका आणि परत नीट परता. सुके खोबरे जरासे भाजून घ्या अणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हे वाटण टाकावे‌ आणि चांगले परतले कि मग पुन्हा माशांचे साफ केलेले तुकडे घालून अलगद परतायचे. 


चिंचेच्या कोळाचे पाणी आणि थोडे साधे गरम पाणी घालून चांगली उकळी काढायची. 10-15 मिनीटे उकळी येऊन शिजू द्या. मासे नाजूक असतात त्यामुळे ते तुटणार नाहीत किंवा जास्त शिजणार नाहीत ह्याची काळजी घ्या. आवडत असल्यास चिरलेली कोथींबीर घालावी. मस्त झक्कास आंबट-तिखट कालवण तयार! भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा. भारीच लागते. 😋


-------------------------------------------------------------


पदार्थ २: बोयमासा किंवा पापलेटचा टाॅमेटो रस्सा 🐟🐠

(टाॅमेटो वापरून)


ताजे पापलेट व बोयमासा नीट साफ करून त्याचे तुकडे करून घ्या. स्वच्छ धुवून पाणी निथळवा. गरजेनुसार मीठ व आलेलसूण पेस्ट लावून ठेवा. 


एका भांड्यात तेल मध्यम गरम करा. त्यात आले लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित परता. कढीपत्ता आणि एखाद दुसरी हिरवी मिरची घालख. दोन तीन लाल रसरशीत टाॅमेटोच्या फोडी करून परतुन घ्या.


मग थोडीशी सेलम हळद, मीठ आणि वाडवळी घरगुती मसाला किंवा तो नसेल तर रोजचा मसाला आणि मध्यम तिखट मिरची पावडर, थोडी धणा पावडर टाका आणि परत नीट परता. सुके खोबरे जरासे भाजून घ्या अणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हे वाटण कालवणात टाकावे‌ आणि चांगले परतले कि मग पुन्हा माशांचे साफ केलेले तुकडे घालून अलगद परतायचे. थोडे साधे गरम पाणी घालून चांगली उकळी काढायची. 10-15 मिनीटे उकळी येऊन शिजू द्या. मासे नाजूक असतात त्यामुळे ते तुटणार नाहीत किंवा जास्त शिजणार नाहीत ह्याची काळजी घ्या. 


भरपुर चिरलेली कोथींबीर घालावी, रस्सा तय्यार.


-------------------------------------------------------------


#पदार्थ ३: कोलंबी- वांगी- बटाटा रस्सा


काय लागते पहा:

दोन मोठे कांदे (बारीक चिरून)

आलेलसूण-मिरची पेस्ट दीड चमचा

मध्यम आकाराची कोलंबी (साले काढून साफ करून किंवा नुसते डोके, पाय आणि शेपटी काढा.)

तीन बटाटे (सालासकट बारीक चौकोनी तुकडे)

चार वांगी (बारीक फोडी)

कोथिंबीर बारीक चिरलेली


घरचा रोजचा मसाला २-३ चमचे अंदाजाने 

बेडगी मिरची पावडर एक चमचा

चवीपुरते मीठ

अर्धा चमचा सेलम हळद पावडर

चिंचेच्या कोळाचे पाणी एक वाटी


ही भाजी मस्त चुलीवर मोठ्या प्रमाणात बनवतात. चुलीवर बनवल्यामुळे खुप चविष्ट लागते. कढईत बनवलेले चांगले लागते. येथे आपण सोयिस्करपणे कुकरमध्ये बनवले आहे.


कुकर गरम करून घ्या. तेल ओता. मग बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त गुलाबीसर परतुन घ्या. आलेलसूण-मिरची पेस्ट घालून परता. आता घरचा रोजचा मसाला, मीठ, सेलम हळद, बेडगी मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. 

मग कापलेला बटाटा, वांगी, कोलंबी टाकून परतून घ्या. वेल वांगी किंवा हिरवी वांगी अधिक चविष्ट लागतात.


चिंचेच्या कोळाचे पाणी एक वाटी घालून अजून थोडे पाणी वरून ओता. थोडीशी कोथिंबीर टाकून, कुकरचे झाकण घालून एक शिटी घ्या. थोडीशी आंबट-तिखट अशी कोलंबी- वांगी- बटाटा रस्सा भाजी तय्यार! खारवलेली कैरीदेखिल छान लागते.


-------------------------------------------------------------


#पदार्थ ४: शेंग-कोलंबी-वांग-आंबा भाजी:


वाडवळ म्हणजे सोमवंशी क्षत्रियांकडे आवडीने केला जाणारा व चवीने खाऊन संपवला जाणारी एक चविष्ट मिक्स भाजी म्हणजे शेंग-कोलंबी-वांग-आंबा किंवा कोलंबी-आंबा! कधी कधी वालाचे हिरवे गोळेदेखिल घालतात. सहज सोपी आणि चमचमीत भाजी!


वाडवळ मुख्यत्वे नायगाव ते डहाणू पट्ट्यात समुद्रकिनारकडे जमिनी व घरे असणारे. भातशेती व बागायत वाडी हे उपजत पारंपारिक मुख्य व्यवसाय. आणि समुद्रानजिक... त्यामुळे कोलंबी वा मासे आणि कैरी, वांगी, शेवगाच्या शेंगा वाडीतच मुबलक. त्यामुळे अशी शेंग-कोलंबी-वांग-आंबा ही वारंवार होणारी भाजी!


Prawns cooked with onion and raw mango, Eggplant/brinjal, drumsticks with the use of everyday simple mix masala.

(This vegetable is welkown in Vadval (Somvanshi Kshatriya) community and called Vadvali Kolambi Aamba bhaji)


बघुया काय काय लागेल साहित्य:

दोन मिरच्यांचे तुकडे 

आलेलसूण पेस्ट 

कढीपत्ता 

बारीक चिरलेली कोथिंबीर

दोन मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे 

साफ केलेल्या कोलंबी (साले ठेवली तर अजूनच चविष्ट लागतात)

आंबट कैरीचे तुकडे 

दोन बटाटे जाड उभ्या कापा करून

दोन वांगी जाडसर उभ्या कापा करून

दोन शेवगाच्या  शेंगाचे तुकडे

मिक्स मसाला आणि सेलम हळद

मीठ आणि चिमूटभर साखर


कधी कधी वालाचे हिरवे गोळेदेखिल घालतात.


एका जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून त्यात मिरच्या, आले लसूण पेस्ट आणि कढीपत्त्याची छान फोडणी करून त्यावर कांदा चांगला शिजवून घ्यावा. मिक्स मसाला, सेलम हळद, मीठ आणि चिमूटभर साखर घालून परतून घ्यावे. त्यानंतर साफ केलेल्या कोलंबी (साले ठेवली तर अजूनच चविष्ट लागतात), आंबट कैरीचे तुकडे, बटाट्याच्या फोडी, वांग्याचे काप, शेवगाच्या  शेंगाचे तुकडे टाकून व्यवस्थित ढवळावे. पाणी घालून झाकणामधेदेखिल पाणी ठेवून वाफेवर  शिजू द्यावे. एव्हाना मस्त दरवळ पसरला असेल. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे व मस्त मिश्र चवीची गावरान कोलंबी आंबा भाजी तयार असेल. 


-------------------------------------------------------------


#पदार्थ ५: आमखंडी 


वाडवळी खासियत आहे ही आणि माझ्यासारख्या अनेकांचा जीव कि प्राण... ❤️


बघुया काय काय लागेल साहित्य कोलंबी-आंबा किंवा आमखंडी साठी:


१. दोन मोठ्या आकाराचे उभे कापलेले कांदे 

२. एका मोठया आंबट कैरीचे तुकडे 

३. पंधरा-वीस कोळंबी साफ केलेल्या (साले काढू नका)

४. आले लसूण पेस्ट

५. बारीक चिरलेली कोथिंबीर

६. हिरवी मिरची व कढीपत्ता

७. रोजच्या वापराचा घरगुती वाडवळी मसाला

८. सेलम हळद पावडर

९. मीठ आणि चिमूटभर साखर

१०. कोथिंबीर बारीक चिरून


एका जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून त्यात कापलेला  कांदा चांगला परतून लालसर रंगावर शिजवून घ्यावा. मग मिरची, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, घरगुती वाडवळी मसाला, सेलम हळद, मीठ आणि चिमूटभर साखर (ऐच्छिक) घालून व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर  आंबट कैरीचे तुकडे आणि कोळंबी टाकून व्यवस्थित ढवळावे.🥘🍲


सगळी भाजी व्यवस्थित मिक्स केली, की थोडे पाणी घालून झाकणामधेदेखिल पाणी ठेवून वाफेवर  शिजू द्यावे. एव्हाना मस्त दरवळ पसरला असेल. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे व मस्त मिश्र चवीची गावरान कैरी टाकलेली कोळंबीची भाजी तयार असेल. चुलीवर करता आली तर चव अजूनच वाढते हा स्वानुभव आहे.😋


ही भाजी भाकरी सोबत उत्तमच लागते. पण साध्या  वाफाळत्या मऊसुत भाताबरोबर खायची गंमतच न्यारी! :) मग चिंचेचे सार, वरण किंवा आमटीची वेगळी अशी गरज भासत नाही. आणि सोबतीला फोडलेला कांदा वा मुळा, मिरची-बोंबलाचा ठेचा असले तर 'ज्जे ब्बात!!!' 😋🍲💁🦐🥭


टिप:

१. कोळंबी लहान किंवा मध्यम आकाराच्या घ्या. कोळंबीची साले काढू नका. फक्त पाय, शेपटी आणि मधला घाण असलेला काळा धागा काढून टाका. ह्या आमखंडीमधे साले असलेली कोलंबी जास्त चांगली लागते.

२. कोळंबी जागी करंदी टाकून देखील भाजी करू शकता.

३. काहीजण कांदा, आलेलसूण, कोथिंबीर, मिरची आणि एखादा टाॅमेटो असे मिक्सरमधून काढून, हे वाटण लावून जाडसर रस्सा देखील बनवतात.

४. काही जण, ह्यामध्ये थोडेसे नारळाचे दुध देखील घालतात. 


-------------------------------------------------------------


#पदार्थ ६: ओल्या बोंबलाचा पोपट 💚🌿


आपल्याला लागणार आहे:

 • २-३ कच्ची बनकेळी म्हणजेच भाजीची केळी

 • चार ते पाच ताजे ओले बोंबील

 • कोथिंबिर

 • लसूणाच्या ७-८ पाकळ्या

 • चिंच किंवा लिंबू

 • ३-४ मिरच्या

 • आले तुकडे

 • अर्ध्या खवलेल्या नारळाचे खोबरे

 • मीठ

 • राई

 • बारीक चिरलेला कांदा


नारळाच्या खवलेल्या खोब-याचे दुध काढून, गाळून घ्या. 

आले-लसूण, मीठ, कोथिंबीर, मिरच्या, चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस हे सगळे मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट करा. (मी थोडासा पुदीनादेखील वापरला आहे परंतु पारंपारिक पध्दतीमधे पुदीना वापरला जात नाही.) तुम्हाला अपेक्षित असलेल्या तिखटपणा नुसार मिरच्या आणि आंबटपणासाठी लिंबू/चिंचेचा कोळ तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता.


साफ केलेले, पाणी निथळलेले ताजे बोंबील तुकडे करून घ्या. त्यांना बनवलेली हिरवी पेस्ट लावून ठेवा. 

कच्ची केळी साले काढून, जाडसर चकत्या किंवा चौकोनी तुकडे करून घ्या. ह्या कापांना देखील हिरवे वाटण लावून ठेवा.

जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून मोहरी टाका‌ आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.‌ कांदा शिजल्यावर त्यात कच्ची केळी पाच मिनीटे परतून घ्या. मऊसर झाली असतील. ह्यातील अर्धी काढून घ्या. भांड्यात राहीलेले अर्धे केळ्यांचे काप गोलाकार रचा. त्यावर हिरव्या वाटणात मुरवलेले बोंबील गोलाकार स्वरूपात रचा. परत एकदा उरलेल्या कच्च्या केळ्याचे ‌काप बोंबलावर गोलाकार रचा. आणि बाजूने अलगद नारळाचे दुध भांड्यात ओता. पाच-दहा मिनिटे उकळी येऊ द्या. अलगद हातानेच भांडे हलवा. 


चमच्याचे जास्त ढवळू नका नाहीतर बोंबील नाजून असल्याने तुटून जातो आणि जास्त वेळ‌ उकळले‌ तर विरघळवून जातो. मस्त हिरवट-पोपटी रस्सा असलेलं कालवण होईल.


आमच्याकडे केली जाणारी तांदूळाची भाकरी: 

ही भाकरी साध्या unpolished रत्ना तांदूळाला किंवा कणीला बारीक भरडून केलेल्या पिठाची असते.

पीठात flowing consistency मिळेल इतपत पाणी आणि मीठ घालून पीठ मस्त मळतात. मग मोठ्या तव्यावर खोलगट चमच्याने पीठ टाकून गोलाकार मोठा पसरवत जातात. वरुन एक मिनिटाकरता झाकण ठेवून लगेच झाकण काढल्यावर भाकरी कालथ्याने काढली कि तयार. काही जणी तर हातानेच गरम तव्यावर लयबध्द् गोल फिरवत भाकरी बनवतात.

थोडीशी Crispy आणि मऊ असते मस्त.


गरमागरम सुरेख हिरवट असा बोंबलाचा पोपट अलगद ताटात वाढून भाकरी किंवा भाताबरोबर आस्वाद घ्या. सोबत पांढरा कांदा आणि तळलेली एखादी तुकडी असली तरी लज्जत अजूनच वाढेल! 🙂


-------------------------------------------------------------


#पदार्थ ७: तळलेले बोयमासा किंवा पापलेट:


मासे तळण्यासाठी माशांच्या तुकड्यांना गरजेनुसार पण जरासे जास्तीचे आलेलसूण वाटण, लिंबाचा रस किंवा चिंचेच्या कोळाचे पाणी, थोडीशी सेलम हळद, मीठ आणि वाडवळी घरगुती मसाला किंवा मध्यम तिखट मिरची पावडर, थोडी धणा पावडर मिक्स करून व्यवस्थित चोळा. 

आतुन बाहेरून सर्व बाजूंनी लावा. दहा पंधरा मिनिटे मॅरीनेट होऊ द्या.

मग तांदळाचे पीठ व थोडासा रवा मिक्स करून घेऊन त्यामधे तुकड्यांना घोळवून तव्यावर तेलावर शॅलो फ्राय करा. कुरकुरीत तळून मस्त भात व कालवणासोबत सर्व्ह करा.


तुम्ही नक्की बनवून पहा. हेदेखील तुम्हाला आवडेलच!!! :)


#fish #local_fish #fish_kalvan #edwan #fish_fry

#virar #वाडवळ #सोमवंशी_क्षत्रिय #soksh #kalvan #कालवण

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर













































Tuesday, September 25, 2018

Masala Dabba/ मसाल्याचा डब्बा

तुमच्या आमच्या स्वयंपाकघरातील मसाल्याचा डब्बा! 🍽❤

ही पोस्ट वाचून, तुम्हीसुध्दा तुमच्या स्वयंपाकघरातील मसाला डब्ब्याचा फोटो नक्की "मुख्य पोस्ट" च्या Comment मधे पोस्ट करा ही विनंती! :) आम्हाला निश्चितच आनंद होईल.

तर आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याचा डब्बा, म्हणजे एक असा पिटारा ज्यामधे राखलेले ठराविक अखंड मसाले आणि मसाला पावडरी वापरून घरोघरच्या अन्नपुर्णा रोजच्या जेवणाला खमंग, चविष्ट आणि घरगुती चव प्राप्त करून देत असतात. भारतात बहुतांश स्वयंपाकघरात हमखास आढळून येणारा हा मसाल्याचा डब्बा प्रत्येक घरच्या खाद्यपरंपरेनुसार आपापला वेगळेपणा जपून असतो.
आकर्षक आकाराचे हलकेसे नाजूक कोरीव काम केलेले सागवानी वा लाकडी, सुबक असे एकसंध मसाला डबे पुर्वीच्या काळी स्वयंपाकघराची शोभा वाढवायचे. त्यात आतल्या जागी गोलाकार अथवा चौकोनी खळगी कोरलेल्या असत ज्यामधे अखंड व तयार  रोजच्या वापराचे मसाल्याचे वा मुख्यत्वे तडक्याचे मसाले असत. राई, जिरा, हिंग पावडर (अख्खी डबीच, कारण उघड्या हिंगाचा वास उडतो), जीरा पावडर, धणा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर हे तडक्यावर वापरायला आणि जेवणामधे लागणारे आवश्यक जिन्नस ह्या मसाल्याच्या डब्यात काढलेले असत. रूखवतात देखिल आकर्षक उच्च दर्जाचे अख्खे मसाले भरलेला मसाला डब्बा भाव खाऊन जातो.

कालपरत्वे, मसाल्याच्या डब्यामधे बदल होत गेले. साधारणपणे सात गोल वाट्यांचा असलेला गोलाकार मसाला डब्बा हा पितळ, स्टील, प्लास्टिक, फायबर तसेच क्वचितच अॅल्युमिनीयम अशा धातूंनी किंवा मटेरिअलने बनवलेला  असे. टप्परवेअरचादेखिल सुंदर लालचूटूक मसाला डब्बा आहेच. सात खण वा वाट्यांच्या जागी नऊ, बारा, सोळा खण/ वाट्यादेखिल आल्या.

मोठ्या प्रमाणात बनवलेले वर्षभराचे मसाले व हळद हे एका मोठ्या डब्यात जपून ठेवलेले असते. त्यातून खुप जपून आठवडाभर पुरतील इतपत मसाले ह्या मसाल्याच्या लहान डब्यात काढले जातात. ह्यामुळे मसालादेखिल वारंवार खोलल्याने खराब होण्याचा धोका टळतो व आवश्यक जिन्नस एकाच डब्यात ठेवल्याने वेळ सुद्धा वाचतो.

नाही म्हटले तरी, मसाल्याच्या डब्यांच्या ठेवणीवरून आणि मधे भरलेल्या पदार्थांवरून गृहिणींच्या स्वभावाचा थोडाफार आढावा येतोच की... काही डब्बे अगदी चांगल्या जाड स्टीलचे टिकावू अन् त्यामुळे वर्षानुवषे टिकणारे... मधे भरलेले मसाले जिन्नस देखिल स्वच्छ निवडलेले, व्यवस्थित न सांडता भरलेले, छोटासा बेताचा चमचा ठेऊन झाकण नीट लावलेला असा हा मसाले डब्बा नेटक्या गृहिणीचे प्रतिबिंब वाटतो.
तर काहींचे मसाला डब्बे अगदीच तकलादू आणि कामचलाऊ, चीर गेलेले... कसेबसे बंद होणारे झाकण, त्यामुळे ओलसर- मऊ पडलेले आतील मसाले, डब्याच्या मापाचा नसलेला चमचा... तोही हळद, मिरची पावडरचा रंग मिरवणारा. मधल्या वाट्यामधेदेखिल धांदरटपणामुळे एकमेकांमधे मिक्स झालेले अस्ताव्यस्त मसाले... राईमधे जीरे, हळदीत हिंग असा अवतार, ओलाव्यामुळे जन्मलेला फिरणारा टोका किटक... एकुणच जपलेला व जाणवणारा अव्यवस्थितपणा...

महाराष्ट्रीयन गृहिणी असल्यास डब्यात राई, जीरा, हिंगासोबतच तीळ, मेथी, उडिदडाळ देखिल असू शकते... कोकणाकडचे असल्यास मच्छीसाठी लागणारे अख्खे धणे आणि त्रिफळादेखिल डब्ब्यात जागा पटकवतात. बिहार बंगाल बाजूकडे पाचफोरन प्रकार तडक्याला वापरत असल्याने कलौंजी म्हणजेच कांदाबी, बडिशेप देखिल ठेवतात. पंजाबी असलेले काळीमिरे, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, बादियान, जायवंत्री चा वापर जास्त असतो. खमंग तडक्यासाठी अख्खी बेडगी, काश्मिरी किंवा गोल बोर मिरचीदेखिल ठेवली जाते. कसूरी मेथी आणि सुकलेली कढीपत्त्याची पाने क्वचित दिसतात.

आमच्या मित्रपरिवारातील एक उत्कृष्ट लाकडी वस्तू बनवणारे संजय पाटील Sanjay Patil आर्टिस्ट यांच्याकडून नुकताच मी एक सागवानी, झायकेदार मसाला डब्बा घेतला. सहज निघणा-या आतील बारा चौकोनी डब्या, मापाचा लाकडी चमचा आणि पारदर्शक जाड काचेचे झाकण ह्यामुळे मस्तच दिसतो हा मसाल्याचा जुन्या स्टाईलचा वाटणारा Antique डब्बा! Instagram वर दि मसाला बझार चे मसाल्याचे Promotional photoshoot साठी आम्ही ह्याचा वापर करतो. तसेच आमच्या प्रिया Priyanka Chavan Gharat म्हणून खास मैत्रिणीनेदेखिल मस्त trendy and cool असा fibre चा आकर्षक मसाला बाॅक्स भेट म्हणून दिला. आता मस्त हे दोन्ही मसाल्याचे डब्बे स्वयंपाकघरात बाजूबाजूला नांदत आहेत.
आजकल डिझायनर किचन ट्राॅलीमधेच मस्तपैकी वरून  पारदर्शक काचेच्या सुरेख बाटल्यांचा संच बसवून देतात.

म्हणतात ना, "A Woman never throw a spice!" :)
ह्याला अनुसरून अन्नपुर्णा गृहिणी वागतात, खरेच एकही मसाला जिन्नस सहजासहजी फेकत नाहीत अन् विविध मसाला डब्ब्यात भरून काटकसरीने वापरतात.
राई, धणा, जीरा, दालचिनी सारखे रोजच्या वापराचे अख्खे मसाले साठी एक मसाला डब्बा, दुसरा खास शाही अख्खे मसाले जसे हिरवा वेलदोडा, मसाला वेलची, बादियान, लवंगा, दगडफुल, तमालपत्र, जायवंत्री, शहाजीरे ह्यासाठी. हा मसाला डब्बा आठवड्यातून एखाद दोनदाच लागतो... कधी पुलाव, मसाला भात, चिकन किंवा पंजाबी पदार्थ बनवतेवेळी...
तिसरा मसाला डब्बा, पावडर व तयार मसाले ठेवण्यासाठी. ह्यामधे मिरची पावडर, हळद पावडर, धणा पावडर, जीरा पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, किचनकिंग मसाला किंवा रोजच्या वापराचा All in one भाजी मसाला ठेवतात.

माझाही जीव जडलाय एका अतिशय घडीव व रेखीव अशा पितळी मसाल्याच्या डब्ब्यावर... लवकरच चांगल्या दिवशी घेऊन येते त्याला घरी वर्षानुवर्षे वापरायला....

तर असे हे आमचे भारतीय मसाला डब्ब्याचे पुराण! :)
तुम्हीसुध्दा तुमच्या स्वयंपाकघरातील मसाला डब्ब्याचा फोटो नक्की Comment मधे पोस्ट करा ही विनंती!

Indian Spice-box:
A box containing handful of essential spices which adds flavours and taste in food we eat! We call it Masala dabba! :)

Indian spice box or phodanicha masala dabba – It is essential, very functional in almost every Indian household’s kitchen. You should have it, if you are cooking Indian food more frequently.
It must contain:
1. Mustard seeds (Rai/Mohari)
2. Coriander seeds (Dhane)
3. Cumin seeds (Jeera)
4. Big cardamom (Mothi velachi/ Masala Velachi)
5. Small cardamom (Hiravi Velachi/ Veldoda)
6. Fenugreek Seeds ( Methi Dane)

If possible keep Asafoetida  (Hing powder) and Sauf (Badishop), Black Pepper (Kalemiri) and Bay leaf (Tamalpatra/  Tejpatta) also in it.
You can use these ingredients while tempering any food. It has medicinal and aromatic values to it.

In Gifting section, The Masala Bazaar has ethnic and pretty 'Indian Phodanicha Masala Dabba' options for presenting it on Rukhavat or House warming celebrations! :)
Variety of masala box with customised spices are made as per order and budget!
Contact/ Whatsup 9890043675 for more details.

Please note: Image used can be copyrighted. Taken from internet and for information/representation purpose only.
.
.
.
.
.
.
#मसाला_डब्बा #masalabox #themasalabazaar #laxmimasale #laxmi_masala_edwan #spiceblends #wholespices #spicesfortadaka #everydayessentials
#spice_dabba #maharashtrian_cooking
#cooking_essentials #laxmi_masale_edwan
#masala_bazaar_virar #laxmi_masale #masala_box #fresh_spices #spices_virar #spices_edwan