Monday, February 14, 2022

वाडवळी_अननस_काजू_आमटी🥘🍍🌿

 #वाडवळी_अननस_काजू_आमटी🥘🍍🌿

लग्नाच्या पंगतीतील वाडवळी पध्दतीची प्रसिद्ध अननसाची आमटी... अननस-शेंगदाणा आमटी म्हणून प्रसिद्ध आहे.

❤️🍍🥜

वाडवळ म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाची स्वयंपाकाची एक आगळी खासियत असलेली पध्द्त आहे. वाडवळांमधे सोमवंशी, सुर्यवंशी, चौकळशी, पाचकळशी, पानमाळी अशा जाती-पोटजाती आहेत. स्वयंपाकाच्या पध्दती थोड्याबहुत फरकाने सारख्याच... आमचा हा समाज मुंबई, ठाणे पासून डहाणू पुढपर्यत विस्तारला आहे. आमच्या पट्ट्यातील सोमवंशी क्षत्रिय म्हणजेच वाडवळांकडे पुर्वी आणि काही भागात आजही हळदीचे आणि लग्नाचे जेवण शाकाहारी असते. सामिष प्रकारचे जेवण आप्तस्वकियांसाठी 'तिखट जेवण' म्हणून लग्न उरकल्यानंतर एक-दोन दिवसांनी दैवते उठवल्यानंतर दिले जाते. वाडवळ समाजात फार पूर्वीपासूनच हुंडा पध्द्ती नाही, ही एक उल्लेखनीय बाब येथे नमुद करावीशी वाटली. 


आजकाल जसे लग्नाच्या जेवणाचे भरगच्च १७६० मेन्य, बुफे आणि त-हेत-हेची Live counters दिमतीला असतात तसे पुर्वी नसत. सहजसाध्या वाडी मधे किंवा आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध भाज्या वापरून गावातलेच आचारी आणि बाईमाणसे जमून सुग्रास जेवण बनवले जाई. मग लग्नाच्या शाकाहारी जेवणाच्या पदार्थांमधे मस्त वाडवळी डाळ- वरण-भात, दुधी-चणाडाळ भाजी, शिराळा-बटाटा, चवळीचा रस्सा, शेंग-वांगे-बटाट, बटाट्याची भजी, पुरी, कोशिंबीर, पापड, आंब्याचे लोणचे, खीर किंवा बासूंदी, जिलेबी, टिपिकल बुंदीचा लाडू आणि दुधीची किंवा अननसाची आमटी असे सारे पदार्थ असत. मध्यमवर्गीय कुटुंब असेल तर सारवलेले मोठाले खळे सारवून, दगडगोटे साफ करून जेवणाच्या पंगतीसाठी तयार केले जाई किंवा मोठाल्या वाड्या साफ केल्या जात.

जेव्हा टेबले-ताटे नसत तेव्हा पंगती सारवलेल्या जमिनीवर सतरंजी सदृश चटया घालून बसत असे. पत्रावळ्या/ वाडीतली केळीची पाने आणि द्रोण जेवणासाठी वापरत. 


नंतर वर बसणारी पंगत आली. गावातल्या कोणा मंडपवाल्याची डुगडुगती आयताकृती टेबले एकेकाला टेकवून सुतळीने पक्की बांधून त्यावर कापडे टाकली जात. पलिकडे पडद्याआड आचारी आणि भांडी घासणा-या कामगारांची अगदी सहज दिसत असे. दगडांच्या चुलीवर  टाॅमेटो आणि बोर-मिरची वर येऊन खदखदणारे वरण आणि भाताची भांडी समोरच नजरेस पडत. कोणी कारागीर कोशिंबीरीच्या तयारीसाठी कांदा, मुळा, टाॅमेटो, कोथिंबीर च्या ठिगा-याला लाकडाच्या ठोकळ्यावर लयबद्ध उठवत असे. वरणासाठी आणि भाज्या वाढण्यासाठी स्टीलच्या बादल्या आणि लोणची- कोशिंबीर साठी चार भांड्याचे स्टीलचे लोणचेपात्र घेऊन घरातली मंडळी पंगतीची तयारी करायला लागत...पाण्याच्या पिंपा बाजूला ग्लासांची आरास तयार होत असे. 

खुद्द मुख्य आचारीच घामाघूम होऊन कारागिरांवर लक्ष ठेवत, मोठाल्या उकळत्या तेलाच्या कढईच्या समोर छोट्याशा स्टूलाला टेकू बनवून पापड आणि पु-या कढईतून काढत बसलेला असे. वाडवळी पध्द्तीच्या भाज्यांचे वास एव्हाना सर्वांच्या भुका चाळवत असत. घरातली तरूण मुले ताटांची आणि पेल्यांची चळत मांडायला सुरुवात करत. कोणी बटाटे अर्धे कापून त्यात अगरबत्त्या लावून ठेवे. सर्वात शेवटची घरच्यांसोबत बसणा-या नवरा-नवरीच्या पंगतीला पानांभोवती रांगोळी आणि फुलांची सुरेख आरास केली जाई.

लग्न लागले रे लागले आणि हातातल्या अक्षता उडवून मोकळे झाले कि सगळे झुंडीने जेवणाच्या पंगतीकडे जात. वाढपींसोबत घरातली तरूण मुले देखील आग्रहाने वाढण्याचे लगबग करत. कोणाला काही हवे नको ते पाहत. अगदी मोकळेपणा असे ह्यात. भांड्याचे आवाज, नको तितकी लगबग, आचा-यांच्या चमुंचे आवाज अगदी सर्रास मंडपात ऐकू येत पण कोणाला काही फरक नसे. मधेच यजमान मंडपात अवतिर्ण होऊन पंगतीची चौकशी करून जाई. सहज सारे....


मी स्वत: लहान असताना गावातील अशी काही लग्ने पाहिली होती. एक दोन लग्नाचे अतिशय साधे पण अवर्णनीय चवीच्या, समाधान देणार-या अन्नाचा आस्वाद घेतला आहे. शिराळा-चणाडाळ, दुध्याची आमटी किंवा आज ज्याची पाककृती दिली आहे ती अननसाची आमटी शेंगदाणे घातलेली मी चाखली आहे. आंबट, गोड, हलकी तिखट अशी ही आमटी पुर्वीच्या वाडवळांच्या लग्नातील मुख्य पदार्थ होती. 

वाडवळांच्या वाड्यांमधे जोमाने उगवलेली अननस खुप कलात्मकपणे अननसाच्या आमटीसारख्या शाही भाजीमधे रूपांतरीत केली आहे. ज्यांना काजू महाग म्हणून परवडत नसे ते शेंगदाणे घालून बनवत. शेंगदाणे देखील ह्या आमटीत उत्तम लागत. आजकल जरा काळाच्या ओघात हरवत चाललेली ही अननसाच्या आमटीची पाककृती लिहीण्यास आमच्या तन्वी वहिनीच्या आईने, माझ्यासाठी पाठवलेले, त्यांच्या केळवे-माहिमच्या वाडीतले ताजे गुलाबी-पिवळसर देखणे अननस कारणीभुत ठरले. त्याचाही फोटो गंमत म्हणून दिला आहे. परत जेव्हा त्या अननसाचा फोटो पाहिला तेव्हा मनातच ठरवले कि करून पहायलाच हवे हे... ❤️ आणि केल्यानंतर घरी अगदीच आवडले सा-यांना...  म्हणून तुमच्याबरोबर पाककृती शेअर करत आहे.


साहित्य:

१. एक लहान आकाराचा पिकलेला गावरान अननस (गोडूस असला तर उत्तम)

२. काजूगर १५-२० नग (१-२ तास कोमट पाण्यात भिजवत ठेवा)

३. बेदाणे/ मनूका: १०-१५ नग

४. पाऊण वाटी ताजे खवलेले खोबरे

५. बेसन दीड चमचा

६. हिरवी मिरची १-२

७. आले तुकडा अर्धा

८. कढीपत्ता ५-६ पाने

९. चिंचेचा कोळ अगदी एक लहान चमचा

१०. गुळ आवडीनुसार

११. मीठ‌ (चवीनुसार)


मसाले:

१. बारीक राई

२. जीरे

३. दोन हिरव्या वेलची

४. तेल

५. जीरा पावडर: अर्धा चमचा

६. धणा पावडर: अर्धा चमचा

७. गोडा/‌ब्राम्हणी मसाला: पाऊण चमचा

८. सेलम हळद: अर्धा चमचा


चला पाहूया चटपटीत आणि अनोख्या चवीची अननसाची वाडवळी लग्नातली आमटी. काही ठिकाणी, काजूच्या जागी, भिजवलेले शेंगदाणे देखील वापरतात. शाही भाजी असावी अशी ईच्छा असल्यास काजू आणि मनूकांचा वापर होतो. आपण ह्या पाककृती मधे काजू आणि अननस, कुकरला एक शिटी लावून घेतो, जेणेकरून चांगले मऊसर व्हावेत पण काही ठिकाणी न उकडवता आमटीतच उकडवतात. आज मी दिलेली अननसाच्या आमटीची चव मात्र छान येते.


१. सर्वप्रथम काजू एक दोन तास भिजवून घ्यायचे. अननस सोलून आणि कापून घ्यायचा. तसे हे महाजिकरीचे काम म्हणून फळविक्रेत्याकडूनच कापून घ्यायचे. कापलेल्या चकत्यांचे प्रत्येकी चार तुकडे करायचे. कुकरमधे अगदी थोड्याशा पाण्यात भिजवलेले काजू, अननसाचे तुकडे आणि मनूका हे टाकून एक शिटी करून घ्यावी. हव्या त्याच प्रमाणात छान शिजतात.

२. आता मिक्सरच्या भांड्यात तिखटपणानुसार एक ते दोन मिरच्या, खवलेले ताजे खोबरे, कोथिंबीर, आले,‌‌ बेसन, चिंचेचा कोळ‌आणि गुळ घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची.

३. कढईत तेल गरम करा. अगदी थोडेसे आवडत असल्यास साजूक तुप घाला. तापल्यावर राई आणि जिरे ची फोडणी द्या. वेलची टाका. मी कढीपत्त्याची पाच सहा पाने देखील फोडणीत घातली आहेत. पुर्णपणे ऐच्छिक आहे ते. 

४. आता ह्यात मीठ, हळद, गोडा मसाला, धणे व जीरे पावडर

टाकावे आणि शिजू द्यावे. ओल्या नारळाची इतर साहित्य घालून केलेली पेस्ट घालून परतावे.  तेल सुटेपर्यंत शिजवावे.

५. अननसाचे तुकडे, मनुके आणि काजू‌ टाकून परतावे. थोडेसे गरम  पाणी घालून ढवळून मग झाकणावर पाणी ठेऊन वाफ काढून घेतली की मस्तपैकी संमिश्र चवीची अननसाची आमटी तयार झाली असेल. 


चपाती आणि भाताबरोबर गरमागरम सर्व्ह करा. आणि नक्की दाद द्याल त्या सुगरणीला जीने पहिल्यांदा ही आगळीवेगळी पाककृती बनवली. 🍍🌿❤️🥜


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/


आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com


#अननस #अननसाची_आमटी #pineapple #cashew #vadval #wedding_food #aamti #groundnut















Tuesday, February 8, 2022

कोकण_आणि_कोकमं ❤रातांबे_ते_आमसुलं

#कोकण_आणि_कोकमं ❤️🌿 #रातांबे_ते_आमसुलं

आम्हा वाडवळांकडे  souring agents/ ingredients म्हणजेच स्वयंपाकात आंबट चवीसाठी वापरण्यात येणा-या जिन्नसात चिंच, कैरी, आंबोशी, लिंबाचाच जास्त वापर असे. त्यामुळे कोकणाची खासियत असलेले कोकम, रातांबा, आमसुलं, सोलं, आगळ/आगुळ ह्यातल्या कशाचाही कोकम सरबत सोडून अगदी गंधही नव्हता मला. विकतचे कोकम सरबतही आयते तयारच मिळायचे. फक्त पाणी घातले कि तय्यार! तसे म्हटले तर अपचन होऊ नये, व्यवस्थित पचावे म्हणून जीरावण म्हणून कोकमाचा वापर घरी वरचेवर असे किंवा अंगावर पित्त उठल्यास हे कोकम चोळले जाई. असे हे उष्मादाह कमी करणारे, पित्तनाशक बहुगुणी कोकम परिचयाचे होते पण रोजच्या वापरात नव्हते. पण अभिषेक कोकणातला त्यामुळे लग्नानंतर हळूहळू आईकडून कोकमाचा वेगवेगळ्या पध्दतीचा वापर कळला. आत्याकडे रत्नागिरीला गेलेलो तेव्हा टपोरी हिरवी- लाल फळे लगडलेले रातांब्याचे झाडही मला देखणे भासलेले. माझ्या आजीच्या वाड्याच्या घरी परसबागेत कोकमाचे झाड होते. लहानपणी खेळताना आम्ही भावंडे, त्याच्या कोवळ्या लालसर-हिरवट पानामधे रंगीत बडीशेप आणि पत्री खडीसाखर बांधून ती साधारण आंबटसर चवीच्या पानांची पुरचुंडी बांधून मटकावत असत. फार धम्माल वाटे त्याची.


रातांबा म्हणजे कोकमाचे फळ आणि कोकम/ आमसुले ही सुकल्यानंतरची जिन्नसे हे आत्ताशी कुठे लक्षात आले होते. आईकडून शिकलेली अफलातून सोलकढी, माशाच्या आमटीतले आमसूल अगदी मनापासून आवडले. चिंचेइतकीच कोकमे मस्त जमली. चांगली आमसुले, गोड आमसुले, सातपुटी कोकम ओळखायला शिकली. अनेक खाद्यपदार्थ ग्रुपमधे रातांब्यापासून आमसुले, आगुळ, कोकम बटर वैगरे बनवायचे सोपे प्रयोग सुगरणींनी आवडीने मांडले होते. त्यात मधुरा गानू ह्यांची पोस्ट पाहिली आणि लाॅकडाऊन मधे मिळालेल्या वेळेमधे हे करून पाहायची अनेक वर्षाची उर्मी‌ उफाळून आली. इच्छा तेथे मार्ग ह्या उक्तीचा प्रत्यय आला आणि नेहा दळवी म्हणजे जिच्याकडून ओले काजूगर घेतले होते तिने रातांबे पाठवायची सोय केली. आमच्या पालघर- विरार पट्ट्यातही रातांबे मुबलक मिळतात. माझ्या मम्मीनेही एडवणला कितीतरी रातांबे आणले होतेच. पण थेट कोकणातून आलेल्या टपो-या, गर्द राणी रंगाच्या रातांब्याने माझ्या मनाला भुरळ घातली होती. 


रातांबे स्वच्छ धुवून पुसून घेतले. सफेद लहान अळी पटकन होतात रातांब्यात, अशी फळे काढून टाकली. मधोमध फोडले. दोन अंगठ्यांनीही सहज फुटतात पण तुम्ही सुरीचा वापर करून दोन तुकडे करू शकतात. मधे अळी तर नाहीत ना ह्याची खात्री करा. आणि चांगले असेल तर त्यातील बिया वेगळ्या खोलगट भांड्यात ठेवा. आणि कोकमाची रिकामी साले दुसऱ्या भांड्यात. (Please note: Nonreactive metal किंवा सरळ काचेच्या भांड्याचा वापर केलात तरी चालेत. मला माहित नसल्याने आणि अधी लक्षात न आल्याने काही भांडी ह्या प्रयोगात खराब झाली.) रातांब्याच्या बिया मांसल गराच्या सुरेख सफेद, हलक्या गुलाबीसर ते गर्द अशा असतात. कोकमांचे, कोकम सरबतं, आगळ, आमसुलं अशा तीन प्रकारांसाठी तीन भाग केले.


१. कोकम सरबत आणि गोड कोकम:

 • एक स्वच्छ पुसलेली काचेची बरणी घेतली. त्यात थोडी साखर पसरली. मग फोडलेल्या रातांब्याच्या खोलगट वाट्यांसारख्या भागात साखर भरली. ह्या साखर-भरल्या वाट्या एकावर एक करत बरणीत रचल्या. 

 • मांसल बियांचा गर मुठीमधे बिया कुस्करत काढला. हा रस आणखी थोडी साखर मिसळून बरणीत भरला.

 • स्वच्छ पांढ-या कापडाने दादरा बांधला आणि ७-८ दिवस कडक उन्हात बरणी ठेवली. दररोज थोडी हलवली. रोज रस वाढताना दिसत होता.

 • आठवड्यभराने दादरा खोलला. अहा! काय सुंदर जाडसर रस पाझरत जमला होता. गोड कोकम म्हणून काही कोकमं वाटीत काढून ठेवली. खोलगट डावाने रस घेऊन एका ग्लासमधे ओतला. त्यात खडे मीठ आणि तव्यावर जीरे हलकेच शेकून बनवलेली जीरे पावडर मिसळली आणि व्यवस्थित ढवळले. आणि घरच्याघरी बनवलेल्या Summer special कोकम सरबताचा आस्वाद घेतला. 

आत्ता दोन तीन महिने मस्त homemade कोकम सरबत पिता येईल.


२. कोकम आगळ:

आगळ सोलकढीला उत्तम लागते. तसेच मासे मॅरिनेट करताना किंवा आमटी करताना‌ आंबटपणासाठी आगळ वापरतात. 

 • आमच्या मीठागरावरचे काही खडा मीठ पाण्यात घालून व्यवस्थित विरघळून घेतले. 

 • कोकमाची काही साले आणि बिया ह्यामधे मिसळल्या. आणि ब-यापैकी मुठीने पाण्यातच कुस्करल्या. 

(अगदी थोडेच रातांबे असल्याने आणि तात्पुरते वापरायला बनवायचे असल्याने पाणी वापरले पण टिकाऊ आगळं बनवताना पाणी वापरू नये. कोकम फोडल्यावर बियांचा गर आणि रस ह्यात खडा मीठ किंवा साधे मीठ घालून ३-४ दिवसांनी जो रस जमतो तो म्हणजे खरे आगळं)

 • साधारण ऊन लागेल असे हे भांडे ठेवले. छान दाट गुलाबी पाणी दोन-तीन दिवसांत पाझरले. हे झाले आगळ.

(अजून एक पध्द्त: रातांबे फोडताना त्याच्या बिया एखाद्या गाळणीवर काढाव्यात (प्लॅस्टिकची चालेल). खाली रस पाझरेल, त्यात खडे मीठ किंवा साधे मीठही चालेल, ते घालून २-३ दिवस उन्हात ठेवायचं. नंतर तयार होईल तो खरा आगळ. 

Suggested by: Prasad Kulkarni)


३. आमसुले: 

 • आमच्या मीठागरावरचे काही खडा मीठ पाण्यात घालून व्यवस्थित विरघळून घेतले.

 • त्यात रातांब्याची साले भिजवली. आणि एका पसरट भांड्यात कडक उन्हात सुकवायला ठेवली. आगळ काढताना वापरलेली साले देखील वाळवायला ठेवली. अशाप्रकारे चार दिवस कडक ऊन दिले. (ताटे वापरणार असाल तर मधे प्लॅस्टिक पिशवी लावून त्यावर कोकम वाळवा नाहीतर प्रतिक्रिया होऊन ताटावर सहजासहजी न निघणारे काळे डाग पडतील. ही चुक माझ्याकडून झाली.)

 • पाचव्या दिवसांनंतर मस्त सुकलेल्या रातांब्यांना आगळाचा हात लावला. तळहाताच्या ओंजळीत आगळ घेऊन ते व्यवस्थित चोळावे लागते. परत सुकायला ठेवले.

 • असे सहाव्या, सातव्या दिवशीही केले आणि परत वाळवले. 

आणि मनाजोगती आमसुले तयार झाली. कोरड्या बरणीत व्यवस्थित भरून ठेवली. 


४. कोकम बटर:

सुकवलेल्या सर्व बियांचे भांडे अचानक सरकल्याने सर्व बिया सांडून गेल्या त्यामुळे कोकम बटर करायचे राहीले. आता पुढच्या वेळी ते बनवते. पण मधुरा गानू ह्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे खालील प्रकारे कोकम बटर बनवतात.

'रातांब्याच्या बिया कडकडीत सुकवायच्या. बियांच्या वरचा भाग फेकून द्यायचा आणि मधला भाग काढून तो पाण्यात भरपुर उकळायचा. मग पाण्यावर बियांपासून निघणारे तेल/बटर साचते. थंड झाल्यावर ते वरती जो थर साचतो ते कोकम बटर. स्वयंपाकात वापर करता येतो. तसेच थंडीत वैगरे पाय फुटले तर हा गोळा गरम करून लावता येतो आणि त्याने आराम मिळते.'


बाकी कोकमं वापरून सोलकढी, आमसुलाची खास चटणी, माशाची आमटी, तिखलं, तळलेले मासे यांच्या पाककृती आधीच लिहीलेल्या आहेतच. आमसुलाचे सार कसे बनवायचे याची पाककृती देखील लवकरच लिहीते.

Please note:

प्रत्येकाच्या कोकम, आगळ बनवण्याच्या वापरात येणा-या पध्दती थोड्याफर अंशाने भिन्न असू शकतात आणि त्याचा आम्ही आदर करतो. ही मी वापरून पाहिलेली आणि साधी सोपी पध्द्त सहज म्हणून फोटो आणि लेख स्वरूपात दिली आहे. सुचना असल्यास नक्कीच कळवा. 

- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर


#kokam #amsule #kokan #foodpreparation #कोकम #आमसुल #रातांबे #कोकम_सरबत #summer_drink #refreshing_drink #kokanspecial #mangosteen #kokum #amsul #Garciniaindica #tropical #fruit #indianfruit #souringagent #kokan #kokani #food #marathi