कोबी-बोंबलाची पोतेंडी हा वाडवळ सोमवंशी क्षत्रिय समाजाचा एक पारंपरिक पदार्थ... ❤️🌿 चहासोबत खायला बनवलेला पोटभरीचा पदार्थ...
छान चुलीवर आणि ओल्या ताज्या बोंबीलचा वापर करून केली जातो तेव्हा अधिकच चविष्ट लागते ही पोतेंडी... अगदी घरातच उपलब्ध पदार्थ वापरून मुख्य पाककृती ला जरासे Twist करून, सुका बोंबील वापरून बनवला.
तसा अगदीच साध्या-सोप्या पध्द्तीने बनवता येतो हा प्रकार. कोबी, उळपात म्हणजे पातीचा कांदा, कांदा, मिरची, आले-लसूण आणि ओले किंवा सुके बोंबील घालून, तांदूळ आणि बेसनाच्या पीठामधे कालवून वाफेवर शिजवल्यावर अगदी चविष्ट होते ही कोबी-बोंबीलाची पोतेंडी!
जेवताना वडीसारखे चपाती-भाकरीबरोबरही खाऊ शकता किंवा संध्याकाळी चहा पिताना Snack म्हणूनही आस्वाद घेऊ शकता.
चला पाहूया मग आज ही कोबीची पोतेंडी कशी बनवली आहे ते...
आपल्याला लागेल:
१. १५ सुके बोंबिल (साफ करून एकाचे दोन तुकडे करून)
२. दीड वाटी बारीक चिरलेला कोबी
३. एक कांदा बारीक चिरून
४. आले-लसूण बारीक चिरुन किंवा खलबत्त्यात चेचून (मी ८-१० लसूण पाकळ्या आणि दीड इंच आले घेतले.)
५. दोन मिरच्या बारीक चिरून
६. ३-४ उळपातीचे कांदे
७. भरपुर कोथिंबीर
८. तांदूळ पीठ अर्धी वाटी
९. बेसन पीठ अर्धी वाटी
१०. थालीपीठ भाजणी एक वाटी (हे मुद्दाम घातले.)
११. हळद
१२. मीठ
१३. गरम मसाला
१४. धणा पावडर
१५. जीरा पावडर
१६. हिंग पावडर
१७. चाट मसाला
१८. तेल
१. एक मोठे भांडे गरम करून थोडेसे तेल टाकले आणि त्यात आले-लसूण-मिरच्या आणि कांदा परतून घेतले. त्यातच मीठ आणि सर्व मसाले टाकून व्यवस्थित परतून घेतले.
२. हे परतलेले मिश्रण, बोंबील सोडून सर्व बारीक कापलेल्या भाज्यांवर टाकून मिक्स केले.
३. थालीपीठ, तांदूळ पीठ आणि बेसनपीठ मिश्रणात टाकून, थोडे थोडे पाणी टाकत छान मळून घेतले.
मिश्रण अगदी पातळ किंवा अगदी घट्ट व्हायला नको, ह्याची काळजी घ्या.
४. आता मिश्रणात बोंबील मिसळून हलकेच मळून घ्या.
५. आधीच्या भांड्यात परत थोडे जास्तीचेच तेल घालून गोलाकार पसरवून घ्या एकदा आणि मग हे तयार मिश्रण हलक्या हाताने थापून लावा.
अगदी जाड किंवा पातळ थर नको. साधारण वडीच्या एवढा जाडसर थर असावा.
६. गॅसवर जाड तवा ठेवून मग त्यावर हे भांडे ठेवावे. त्यावर हवा जाणार नाही असे झाकण ठेवावे. तव्यावर भांडे ठेवल्याने पोतेंडी करपणार नाही.
७. साधारण पहिली दहा मिनिटे गॅस मोठा ठेवा आणि नंतर मंद आचेवर २० मिनिटे ते अर्धा तास असेच वाफेवर ठेवा.
ह्यानंतर झाकण काढल्यावर, घमघमाटासह, थोडी Twist वाली वाडवळी पोतेंडी तय्यार असेल... ❤️ भांडे ताटात उलटे करा आणि तयाल्र पोतेंडी अलगद ताटात उलटी होईल. तिची वरची बाजू देखील थोडीशी भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मस्त चौकोनी तुकडे कापून आस्वाद घ्या. ❤️🌿
गावी मस्त चुलीवर करताना केळीच्या पानात मिश्रण ठेवतात आणि झाकणावरही पेटते कोळसे त्यामुळे वरून पण छान भाजला जातो आणि भन्नाट वास पसरतो. 😋 हा पदार्थ बनवताना ओले बोंबील वापरा. तेदेखील छान लागतात.
कोबीचे शाकाहारी भानोळे देखील साधारण थोड्याफार अशाच पध्दतीने करतात. 🙂💁
#पोतेंडी #वाडवळी_पदार्थ #vadval #potendi #potwndi_with_twist #food #cabbage #dry_bombayduck #bombay_duck #laxmimasale
No comments:
Post a Comment